सिंगापूरच्या पंतप्रधानांचं 'नेहरुंच्या भारता'बाबत वक्तव्य, भारतानं बोलावलं उच्चायुक्तांना

सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लूंग

फोटो स्रोत, twitter/leehsienloong

सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लूंग यांनी संसदेत दिलेल्या एका भाषणावर कठोर भूमिका घेत गुरुवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिल्लीतील सिंगापूरचे उच्चायुक्त सायमन वाँग यांना हजर होण्याचे आदेश दिले.

सीन लूंग यांचं वक्तव्य विनाकारण आणि अस्वीकार्य असल्याचं भारतानं स्पष्ट केल्याचं द हिंदू या वृत्तपत्रानं भारत सरकारच्या सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.

सिंगापूरचे पंतप्रधान लूंग यांनी नेहरुंचा भारत हा सातत्यानं कमकुवत होत गेला अशी टीका केली होती शिवाय खासदारांवर गुन्हेगारी आरोप असल्याचा उल्लेख केला होता.

15 फेब्रुवारीला सिंगापूरच्या संसदेत विशेषाधिकार समितीच्या एका अहवालावर पंतप्रधान लूंग भाषण देत होते. हा अहवाल देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या वर्कर्स पार्टीचे सदस्य खोटं बोलले असल्याबद्दलच्या आरोपांच्या चौकशीबाबतचा होता.

त्यावर बोलताना पंतप्रधान लूंग यांनी राजकीय प्रामाणिकता घटत चालल्याचं उदाहरण देताना सध्याच्या भारत आणि इस्रायलच्या नेत्यांचं उदाहरण दिलं होतं. त्यांनी ब्रिटनच्या ''पार्टी गेट'' स्कँडलचाही उल्लेख केला होता, असं वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

''नेहरुंचा भारत सध्या असा बनला आहे, जिथं लोकसभेच्या अर्ध्यापेक्षा अधिक खासदारांविरोधात गुन्हेगारी आरोप आहेत, असं माध्यमं सांगत आहेत. या आरोपांत बलात्कार आणि हत्या अशा आरोपांचा समावेश आहे. पण यापैकी अनेक आरोप हे राजकीय हेतूनं प्रेरित असतात,'' असंही पंतप्रधान लूंग यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं.

आपण सिंगापूरला त्या मार्गावर जाण्यापासून रोखणं हेही महत्त्वाचं असल्याचंही ते म्हणाले होते.

सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही देशांदरम्यानच्या दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये एका वादाला सुरुवात झाली आहे.

या भाषणाच्या सुरुवातील, पंतप्रधान ली यांनी भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इस्रायलचे माजी पंतप्रधान डेवीड बेन-गुरियन यांनी त्यांच्या देशांसाठी लढलेल्या स्वातंत्र्य संग्रामाचंही कौतुक केलं. पण त्याचबरोबर असंही म्हटलं की, राजकीय नेत्यांनी अनेक पिढ्यांची नैतिक मूल्य सातत्यानं खाली खेचण्याचं काम केलं आहे.

''स्वातंत्र्यासाठी लढणारे आणि जिंकणारे नेते हे धाडसी, सांस्कृतिक आणि प्रचंड क्षमता असलेले असामान्य व्यक्ती असतात. ते आगीसारख्या परिस्थितीतून तावून सुलाखून निघालेले असतात. त्यामुळं ते सर्वसामान्यांचे नेते बनतात. जसे डेवीड बेन-गुरियन, जवाहर लाल नेहरू आणि आपले अनेक नेते,'' असंही ते म्हणाले.

समितीच्या रिपोर्टच्या निष्कर्षांवर चर्चेनंतर सिंगापूरच्या संसेदत वर्कर्स पार्टीच्या तीन नेत्यांवर दंड ठोठावण्याची रक्कम ठरवण्यासाठी मतदान झालं. या रिपोर्टनुसार वर्कस पार्टीचे रईस खान यांच्यासह तिघांना खोटं बोलल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून त्यांच्यावर 26,000 अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. तर वर्कर्स पार्टीचे अध्यक्ष प्रितम सिंह आणि उपाध्यक्ष फैसल मनप यांच्यावरही यात सहभागी असण्यासाठी गुन्हेगारी कारवाई होऊ शकते.

भारतीय खासदारांबाबत केलेल्या दाव्यासाठी ली यांनी कोणत्याही रिपोर्टचा दाखला दिलेला नाही, असं वृत्तपत्रानं म्हटलं आहे. मात्र, त्यांनी हे वक्तव्य असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या 2019 च्या एका रिपोर्टच्या आधारे केलं असल्याची चर्चा आहे. त्यात सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या 539 उमेदवारांपैकी 233 खासदारांवर गुन्हेगारी आरोप असल्याचं म्हटलं होतं.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)