अल-अक्सा मशिद, जेरुसलेम : ज्यू लोक मुसलमानांचे कपडे घालून प्रार्थना का करत आहेत?

फोटो स्रोत, BBC/CHANNELNEWS13
"किती विचित्र आहे. प्रार्थना केल्याबद्दलही तुम्हाला अटक होऊ शकते."
ज्यू इस्रायली कार्यकर्ते रफाएल मॉरिस यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं, तेव्हा त्यांच्या तोंडावरचं उपहासात्मक हास्य सहज दिसलं.
रफाएल हे मुस्लिमांप्रमाणे पोशाख करून अल-अक्सा मशिदीत प्रार्थनेसाठी जातात.
असं कृत्य करण्याच्या मोहिमेला एक रितसर नावही देण्यात आलं आहे. ही मोहीम चालवणाऱ्या समुहाचं नेतृत्व रफाएल हेच करतात.
'रिटर्निंग टू माऊंट' नामक या मोहिमेत रफाएल यांच्यासह इतर काही लोक सहभागी आहेत.
टेंपल माऊंटचा ताबा पुन्हा मिळवणं, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
मुस्लिमांप्रमाणे पोशाख करूनच आपण अल-अक्सा मशिदीत जातो, असं त्यांनी सांगितलं.
अशा प्रकारे प्रार्थनेसाठी अल-अक्सा मशिदीत जाणं हे योग्यच असल्याचं रफाएल सांगतात. इतकंच नव्हे तर अल-अक्सा मशिदीचा उल्लेख ते टेंपल माऊंट असाच करतात, हे विशेष.

रफाएल म्हणतात, "मी धार्मिक ज्यू आहे. टेंपल माऊंट ज्यू धर्मीयांचंच आहे, असं माझं ठाम मत आहे. बायबलमध्येही तेच लिहिलं आहे."
भीतीच्या सावटाखाली प्रार्थना
रफाएल आणि त्यांचे सहकारी मुस्लिमांप्रमाणे तयार होऊन मशिदीत जातात.
ते म्हणतात, "तुम्हाला फक्त कपडेच बदलायचे असतात. टोपी घालावी लागते. काही प्रमाणात केस कापावे लागतात. भाषेवरून कुणी पकडू नये, यासाठी अरबीही शिकावी लागते."
रफाएल सांगतात, "मुस्लीम दिवसातून पाचवेळा नमाज अदा करतात. थोडीशी सावधगिरी बाळगून ज्यू प्रार्थना गुणगुणत त्यांच्यासोबतच आपल्याला प्रार्थना करता येऊ शकते. त्यासाठी टेंपलमध्ये कुठेही उभं राहून प्रार्थना केलं तरी चालतं."
खरं तर, मुस्लीम पोशाख परिधान करून मशिदीत ज्यू प्रार्थना करणं अतिशय जोखमीचं काम आहे.
लोकांना आपली खरी ओळख समजली, तर हल्ला होऊ शकतो. आपल्याला अटकही होऊ शकते.

रफाएल म्हणतात, सुरुवातीला हे खूप भीतीदायक होतं. पण नंतर नंतर भीती निघून गेली. आता मला त्याचं काही वाटत नाही."
ते सांगतात, "भीती तर नक्कीच असते. पण प्रार्थना करायला मिळतेय, याचा आनंदही होतो. शिवाय, कुणाच्याही अडथळ्याशिवाय मोकळेपणाने फिरता येतं."
महत्त्व कशामुळे?
हे ज्यू बांधवांसाठी अत्यंत पवित्र ठिकाण आहे. इस्लाम धर्मातही हे तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात पवित्र स्थळ म्हणून मानलं जातं.
ज्यूंसाठी हे ठिकाण 'टेंपल माऊंट' तर मुस्लिमांसाठी 'अल-हराम-अल-शरीफ' नावाने ओळखलं जातं.
अल-अक्सा मशीद किंवा 'डोम ऑफ द रॉक' म्हणूनही यांची वेगळी ओळख आहे. डोम ऑफ द रॉकला ज्यू धर्मात सर्वाधिक पवित्रस्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे.

मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित असल्यामुळे डोम ऑफ द रॉकला मुस्लीम धर्मीयसुद्धा पवित्र तीर्थस्थळ मानतात.
या धार्मिक ठिकाणी बिगर-मुस्लिमांच्या प्रार्थनेवर बंदी घालण्यात आलेली आहे.
पण ज्यू धर्मीयांचं याठिकाणी पोशाख बदलत मुस्लीम असल्याचं भासवून येणं, याविषयी आता वाद निर्माण होऊ लागला आहे.
कुराणचे धडे देणाऱ्या पॅलेस्टिनी मुस्लीम कार्यकर्त्या हनादी हलावानी या प्रकारावरून विशेष नाराज दिसून येतात.
त्या म्हणतात, "अल-अक्सा मशिदीत मुस्लीम पोशाख करून अशा प्रकारे येणं, हे चुकीचं आहे. हा एक राजकीय डावपेच आहे."
हनादी आपला दिवसातील बहुतांश वेळ अल-अक्सामध्येच घालवतात.
त्या सांगतात, "अल-अक्सा मशिद माझं आयुष्य आहे. एक मुस्लीम म्हणून प्रत्येकाच्या श्रद्धा याठिकाणी जोडलेल्या आहेत. ही काय सामान्य मशीद नाही."
त्या म्हणतात, "मी एक मुस्लीम आहे. मशिदीत प्रवेश करण्यासाठी माझीसुद्धा तपासणी होते. पोलीस याठिकाणी शस्त्र घेऊन येतात. त्या लोकांना सुरक्षा देतात. अखेर अडचणी कोण निर्माण करत आहे? ज्यांच्याकडे शस्त्रं आहेत, ते की ज्यांच्याकडे फक्त कुराण आहे,ते?
काय आहे वाद?
अल-अक्सा मशीद परिसर जुन्या जेरुसलेम शहरात आहे. हे शहर मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र शहरांपैकी एक मानलं जातं. पण याच ठिकाणी ज्यू लोकांचं पवित्र टेंपल माऊंटही आहे.
1967 सालच्या इजरायल-अरब युद्धानंतर इस्रायलने पूर्व जेरुसलेम आपल्या ताब्यात घेतला होता. हे शहर आपली राजधानी असल्याचं इस्रायल सांगत असतो.

फोटो स्रोत, Reuters
पण त्या गोष्टीला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्यता मिळालेली नाही. पॅलेस्टिनी पूर्व जेरूसलेमला भविष्यातील एका स्वतंत्र देशाच्या राजधानीच्या स्वरुपात पाहतात.
ज्यू नागरिक याठिकाणी येऊ शकतात. मात्र त्यांना आतमध्ये येऊन प्रार्थना करण्याची परवानगी नाही. प्रार्थना करताना पकडले गेल्यास त्यांना अटकही होऊ शकते.
गेल्या काही वर्षांत इजरायलने ज्यू नागरिकांना इथं येण्यापासून रोखणारे निर्बंध काही प्रमाणात हटवले. पण त्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांचा एक गट नाराज आहे.
अल-अक्सा मशिद
ऑक्टोबर 2016 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेची सांस्कृतिक शाखा असलेल्या युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाने यासंदर्भात एक प्रस्तावमंजूर केला होता.
जेरुसलेममधील ऐतिहासिक अल-अक्सा मशिदीवर केवळ मुस्लिमांचा अधिकार आहे. याठिकाणी ज्यूंचा कोणताच दावा नाही, असं युनेस्कोच्या समितीने म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यामुळे याबाबत नेहमीच तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते.
दरम्यान, याठिकाणी एक नवीन टेंपल बनवलं जावं, अशी रफाएल यांची इच्छा आहे. त्यांच्यासारख्या अनेकजणांच्या मनातही हीच भावना आहे.
सध्या तरी रफाएल यांच्यावर जेरुसलेम शहरात प्रवेश करण्यावर बंदी आहे. मात्र लवकरच पुन्हा याठिकाणी येणार, असा इशारा रफाएल यांनी दिला.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









