बिटकॉइन : क्रिप्टोकरन्सी मायनिंगच्या व्यवसायात अमेरिकेनंतर कझाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर कसं पोहोचलं?

गेल्यावर्षी जेव्हा चीननं अचानक क्रिप्टोकरन्सी मायनिंगवर बंदीची घोषणा केली होती, तेव्हा आपल्या शेजारी देश असलेल्या कझाकिस्तानमध्ये ही इंडस्ट्री अत्यंत वेगानं विकसित होऊ लागली होती.
सध्या मध्य एशियाचा हा देश क्रिप्टोमायनिंगच्या बाबतीत जगातला दुसरा सर्वांत मोठा देश आहे. मात्र, बेहिशेबी वीज वापर होणाऱ्या या इंडस्ट्रीतील डेटा सेंटर्स कझाकिस्तानमध्ये कोळशावर चालणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांवरचा दबाव वाढवत आहेत. प्रदूषण वाढत आहे आणि कार्बन उत्सर्जनही होत आहे.
मोल्दिर शुभायेवा कझाकिस्तानात क्रिप्टो मायनिंगच्या व्यवसायात उतरणाऱ्या नव्या पिढीतील बिझनेसवुमेन आहेत. त्या इंजीनीअर्स आणि इतर कन्स्ट्रक्शन वर्कर्सच्या गर्दीतून निघून बिटकॉईन माइनच्या धूळ असलेल्या साईटवर पोहोचतात तेव्हा त्या वेगळ्याच दिसतात.
त्यांच्या कपड्यांमधूनही त्यांच्या स्मार्टनेसची झलक दिसते. 35 वर्षांच्या मोल्दिर पिवळ्या लंगाच्या लेन्स असलेल्या चष्म्यातून बाहेरचा नजारा पाहत आहेत. समोर वेल्डिंगचं काम सुरू आहे आणि इमारतीच्या पायाभरणीसाठी एका ट्रकमधून साहित्य टाकलं जात आहे.
कझाकिस्तानच्या अलमाती शहरात तयार होणाऱ्या त्यांच्या नव्या बिटकॉइन माइनच्या निर्मिर्तीवर त्या बारकाईनं नजर ठेवून आहेत.
बिटकॉइन माइनिंग
पुरुषांचा दबदबा असलेल्या या व्यवसायात मोल्दिर शुभायेवा एक मोठं नाव आहेत. त्यांनी प्रचंड परिश्रमानं त्यांचा उद्योग देशातील सर्वांत मोठ्या क्रिप्टो मायनिंगपर्यंत पोहोचवला आहे.
"मी माझ्या जीवनातील गेली चार वर्षं केवळ कामातच घालवली आहेत. अनेकदा तर मी ऑफिसमध्येच झोपायचे," असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, SHEVTSOVY/GETTY IMAGES
बिटकॉइनच्या व्यवसायात मोल्दिर यांना जवळपास पाच वर्षांपूर्वी आवड निर्माण होऊ लागली होती. त्यांनी भावाबरोबरच घरातून बिटकॉइन मायनिंगचं काम सुरू केलं. नंतर मोठ्या आकाराच्या माईन्सपर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी इतर क्लाइंट्सनाही ते भाड्यानं दिलं.
"कझाकिस्तानात माझा व्यवसाय आणि या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. विशेषतः गेल्या एका वर्षामध्ये. माझी सकाळची सुरुवात एका बिटकॉइनची किंमत किती वाढली हे पाहून होते. त्याची किंमत 50,000 डॉलर झाली होती, त्यावेळी प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं. त्यात कायम तेजी पाहायला मिळत आहे," असं मोल्दिर सांगतात.
बिटकॉइनची किंमत नाट्यमय पद्धतीनं खालीवर होत असते. मार्च, 2020 मध्ये एक बिटकॉइन 5000 डॉलरमध्ये मिळत होता. वर्षभरात त्याची किंमत 65,000 डॉलरपर्यंत पोहोचली होती.
त्यानंतर त्यांच्या दरात प्रचंड घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. एक वेळ अशी होती जेव्हा ते 35,000 डॉलरपर्यंत पोहोचले होते.
पण मोल्दिर आणि कझाकिस्तानातील त्यांच्यासारख्या इतर व्यावसायिकांसाठी क्रिप्टो मायनिंग अजूनही नफाखोराचा चांगला व्यवसाय बनला आहे.
कझाकिस्तानातील डिजिटल गोल्डचा व्यवसाय
क्रिप्टो मायनिंग नेमकं काय आहे आणि ते कसं चालतं असा प्रश्न विचारायला हवा. खरं तर, क्रिप्टो मायनिंग ही अशी प्रक्रिया आहे ज्यावर अनेक प्रकारच्या क्रिप्टो करन्सीचा व्यवसाय चालतो. मग ते बिटकॉइन असेल अथवा इथेरियम किंवा लाइटकॉइन.
हे एक प्रकारचं डिजिटल चलन आहे. तसंच कोणतंही सरकार आणि कोणत्याही बँकेचं यावर नियंत्रण नाही.
त्याबदल्यात अनेक मोठ्या कम्प्युटर नेटवर्कच्या मदतीनं प्रत्येक व्यवहार आणि ट्रान्सफरची तपासणी केली जाते. त्याच्या देवाण-घेवाण (ट्रान्झॅक्शन) चा हिशेब एवढा गुंतागुंतीचा असतो की, त्यासाठी अत्यंत शक्तीशाली कम्प्युटर नेटवर्कची गरज असते.

प्रोत्साहन म्हणून ही सिस्टीम अशा लोकांना बक्षीस देते जे या प्रक्रियेमध्ये बिटकॉइनद्वारे योगदान देत असतात.
मोल्दिर आणि त्यांच्यासारखे इतर व्यावसायिक यांच्यामुळंच कझाकिस्तान हा अमेरिकेनंतरचा बिटकॉइन मायनिंग क्षेत्रातील जगातला दुसरा सर्वांत मोठा देश बनला आहे.
क्रिप्टो करन्सी माइनिंगच्या जागतिक नेटवर्कमध्ये आज कझाकिस्तानची भागीदारी 18 टक्क्यांच्या जवळपास आहे आणि त्याच जोरावर हा व्यवसाय वाढत आहे.
कझाकिस्तानात क्रिप्टो करन्सी मायनिंगची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. त्याची दोन प्रमुख कारणं सांगितली जातात. पहिलं म्हणजे, स्वस्त वीजेचा पुरवठा आणि दुसरं म्हणजे यासाठी आवश्यक असलेली मैत्रीपूर्ण सरकारी धोरणं.
पण 2021 मध्ये चीननं अचानक क्रिप्टो करन्सी मायनिंगवर बंदी लावली. त्यामुळं कझाकिस्तानात वीज व्यवसाय वेग पकडू लागला.
त्यानंतर देशात कंपन्यांचा पूर आला. त्याचबरोबर मोठ्या संख्येनं कम्प्युटरही आले.
कझाकिस्तानात आधीपासून असलेल्या क्रिप्टो मायनिंग सेंटरकडून या वाढलेल्या मागणीनुसार पुरवठा करणं शक्य नव्हतं. त्यामुळं या क्षेत्रात नव्या लोकांसाठी संधी निर्माण झाली.
कझाकिस्तानातील मोठ्या क्रिप्टो माइन्स
कझाकिस्तानात तुम्ही अलमाती शहाराकडून एकिबास्तुज शहराकडे जाता तेव्हा 1300 किलोमीटरच्या या प्रवासात तुम्हाला देशाच्या क्रिप्टो मायनिंग इंडस्ट्रीच्या आकाराचा अंदाज येतो.
याचप्रवासात तुम्हाला सध्याच्या जगातील सर्वांत मोठ्या क्रिप्टो माइन्स असल्याचं सांगितल्या जाणाऱ्या ठिकाणाची भेट होते. इनेगिक्स नावाच्या कंपनीनं ते तयार केलं आहे.
सर्वांत आधी तुमचं लक्ष जाईल ते याठिकाणच्या गोंधळाकडे. याठिकाणी हजारोंच्या संख्येनं कंप्युटर्स दिसतात. हा आवाज त्यात असलेल्या आणि फुल स्पीडमध्ये चालणाऱ्या लहान पंख्यांमधून येत असतो.
एवढंच नाही तर हे कम्प्युटर ज्या हॉलमध्ये ठेवले आहेत, ते थंड करण्यासाठी मोठ्या आकाराचे पंखे असतात, त्याचा आवाजही स्पष्ट ऐकायला येतो.

फोटो स्रोत, Getty Images
या क्रिप्टो माइनचे मालक 34 वर्षीय येर्बोल्सिन आहेत. "मशीनमधून येणाऱ्या या आवाजामुळं मी उत्साहीत होतो. कारण हा पैशाचा, डिजिटल मनीचा खणखणाट आहे," असं ते हसत म्हणाले.
मोल्दिर यांच्याप्रमाणेच येर्बोल्सिन यांनीही काही वर्षांपूर्वी लहान पातळीवर क्रिप्टो करन्सी मायनिंगचं काम सुरू केलं होतं.
येर्बोल्सिन यांनी त्यांची कंपनी एका गॅरेजमधून सुरू केली होती. त्यावेळी त्यांच्याकडे मोजकेच कम्प्युटर्स असायचे. आज त्यांच्या क्रिप्टो करन्सी माइन्समध्ये आठ मोठे हँगर्स आहेत. त्यात 300 मिलियन डॉलरच्या मशीन लावलेल्या आहेत आणि च्या 24 तास काम करतात.
या मशीन सुरू ठेवण्यासाठी 150 लोकांच्या टीम आहेत. अनेक इंजीनीअर्स आहेत आणि त्या सगळयांना एका वाळवंटात तयार केलेल्या या मायनिंग सेंटरमध्ये सलग 15 दिवस राहावं लागतं.
अलमाज मगज हेदेखील 12 तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात. त्यांचं काम मशीनवरून धूळ हटवण्याचं आहे. ब्रेकमध्येही त्यांना वेळ नसतो. या मशीनमध्ये नेमकं काय काम होतं, हेही माहिती नव्हतं, असं त्या म्हणतात.
"इथं येण्यापूर्वी आम्हाला बिटकॉईनबाबत माहिती नव्हती. मी कधीही याबाबत ऐकलं नव्हतं," असं ते म्हणाले.
अलमाज आणि त्यांच्यासारखं काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवर येर्बोल्सिन याठिकाणी लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मोठ्या नेटवर्कच्या माध्यमातून नजर ठेवतात.
"आम्हाला गर्व आहे की, क्रिप्टोकरन्सीच्या जगात कझाकिस्तान आता एवढं महत्त्वाचं बनलं आहे. आम्ही देशभक्त आहोत आणि आम्हाला देशाचा गौरव आणखी वाढवायचा आहे," असं येर्बोल्सिन म्हणतात.
पर्यावरणाच्या हानीचा मुद्दा
पण कझाकिस्तानच्या या यशामुळं देशात आनंदाचं वातावरण आहे असंही नाही. पर्यावरणासाठी काम करणारे लोक नेहमी या क्रिप्टोकरन्सी माइन्समध्ये वापल्या जाणाऱ्या बेहिशेबी वीजेच्या मुद्द्यावरून टीका करत आहेत.
केम्ब्रिज विद्यापीठ बिटकॉइन इलेक्ट्रिसिटी कंझम्प्शन इंडेक्स चालवतं. त्यानुसार बिटकॉइनच्या मायनिंगमध्ये यूक्रेन किंवा नॉर्वेच्या एकूण वीज वापरापेक्षा जास्त वीज खर्च होते.

हे माहिती नाही की, यात किती वीज ही ऊर्जेच्या नव्या स्त्रोतांपासून मिळते. पण ते डाना येरमोलिनोक सारख्या पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, कझाकिस्तानसारख्या देशांमध्ये केवळ दोन टक्के वीजच अपारंपरिक स्त्रोतांपासून मिळते.
"याठिकाणी प्रामुख्यानं कोळसा हाच ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. विशेषतः गर्मी निर्माण करण्याच्या आणि वीज निर्मितीच्या कामासाठी," असं त्या म्हणाल्या.
डाना कझाकिस्तानच्या कारागंडा शहरात राहतात. याठिकाणी देशातील सर्वांत मोठं कोळशाचं भांडार आहे. त्या पर्यावरणाच्या हानीच्या मोबदल्यात क्रिप्टो मायनिंगच्या नावावर देशात येणाऱ्या समृद्धीबाबत चिंता व्यक्त करतात.
"मी रोज घराबाहेर निघते, तेव्हा मला प्रदूषण पाहायला मिळतं. थंडीत अशी अवस्था असते की, शेजाऱ्याची घरंही दिसत नाही. मी हवेत श्वास कसा घेत आहे, हेही मला समजत नाही," असं त्या म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








