हिटलरच्या छळछावणीतून सुटका करून घेत पळालेल्या 'त्या' 9 जणींची गोष्ट

फोटो स्रोत, MARTINE FOURCAUT
- Author, लुसी वेलीस
- Role, बीबीसी न्यूज
नाझींनी 1945 साली आपल्याला 'मृत्यू प्रयाणा'साठी पाठवलं होतं, तेव्हा नऊ महिलांचं एक प्रतिकार पथक तयार करून आपण स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न कसा केला, याची गोष्ट वेन स्ट्रॉस यांना त्यांची आजी सांगत होती.
वेन यांना याबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. या कुतूहलापोटी त्यांनी आणखी शोध घ्यायला सुरुवात केली आणि या महिलांच्या अनेक पाऊलखुणा त्यांना सापडत गेल्या. त्यातून 75 वर्षांनी या महिलांचं शौर्य जगासमोर आलं.
एकदा वेन स्ट्रॉस त्यांची 83 वर्षांची आजी हेलेन पोडलियास्की यांच्यासोबत दुपारी शांतपणे जेवत होत्या. हेलेन फ्रान्सच्या नागरिक होत्या, तर वेन मूळच्या अमेरिकी पण आता फ्रान्समध्ये राहणाऱ्या लेखिका आहेत. ही 2002 सालची गोष्ट आहे.
दोघींमध्ये जेवताना बोलणं सुरू होतं, तेव्हा हेलेन यांनी त्यांच्या काही आठवणी सांगायला सुरुवात केली. आपल्या आजीने दुसऱ्या महायुद्धावेळी फ्रान्समध्ये लढलेल्या प्रतिकार पथकांमध्ये सहभाग घेतला होता, हे वेन यांना माहीत होतं. पण या काळातील आजीच्या आयुष्याची पूर्ण माहिती मात्र त्यांना नव्हती.
आपल्या संघर्षरत भूतकाळाची गोष्ट सांगताना हेलेन म्हणाल्या की, त्यांना गेस्टापोच्या जवानांनी पकडलं होतं, त्यांचा छळ करून अखेरीस त्यांना जर्मनीतील छळछावणीत पाठवण्यात आलं.
परंतु, मित्र राष्ट्रांच्या फौजा हळूहळू जर्मनीच्या जवळ येऊ लागल्या, तेव्हा छळछावण्यांमधल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. नाझींच्या अत्याचाराचा शेवटचा टप्पा ठरलेल्या 'मृत्यू प्रयाणा'त सहभागी होण्यासाठी या लोकांना भाग पाडण्यात आलं.
"मग मी बायकांच्या एका गटासोबत तिथून पळून गेले," असं आजीने ओझरतं सांगितलं.

फोटो स्रोत, Swedish red cross
वेन म्हणतात, "आजी आयुष्याच्या त्या अखेरच्या काळात याबद्दल मोकळेपणाने बोलायला तयार असावी, असं मला वाटलं."
वेन यांच्या म्हणण्यानुसार, "अन्याय आणि अत्याचाराच्या या कालखंडातून बचावलेले इतर लोक बरीच वर्षं मौन राखून होते. त्यांनी आपल्या कुटुंबियांसमोरही त्या आठवणींबद्दल कधी वाच्यता केली नाही, पण आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या कोणाशी मात्र ते याबद्दल थोडंफार बोलत असत."
शूर हेलेन आणि धोकादायक वाट
हेलेन पोडलियास्की यांना फ्रान्सच्या ईशान्य भागात प्रतिकार फौजांची गुप्तहेर म्हणून काम करताना अटक झाली, तेव्हा त्या केवळ 24 वर्षांच्या होत्या. त्यांचं खोटं नाव ख्रिस्तीन असं होतं. हेलेन यांना जर्मनसह इतर पाच भाषा बोलता येत होत्या आणि त्या उच्चशिक्षित इंजीनिअर होत्या.

महायुद्धाचं ते शेवटचं वर्ष होतं. फ्रान्समधील प्रतिकार फौजांचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी नाझींनी मोठी मोहीम सुरू केली होती. या दरम्यान 1944 साली हेलेन यांना अटक झाली. त्याच्याच पुढेमागे इतर आठ महिलांना अटक झाली होती, त्यातील एक हेलेन यांची शाळेतली मैत्रीण होती.
वेन सांगतात की, सुझान मॉडेट (खोटं नाव: झाझा) या आशावादी, दयाळू व उदार अंतःकरणाच्या होत्या. प्रतिकार फौजांमधील रेने मॉडेट यांच्याशी बाविसाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि त्यानंतर एकाच महिन्यात पती-पत्नी दोघांनाही अटक झाली. फ्रान्समधील तरुण नागरिकांना जर्मनीतील कारखान्यांमध्ये काम करण्यापासून वाचवून भूमिगत व्हायला मदत करायचं काम हे दोघं करत होते.
वेन म्हणतात, "त्यांच्यात एक निकोल क्लेरेन्ससुद्धा होत्या. पॅरिसमधील प्रतिकार फौजांशी संबंधित गुप्तहेरांच्या त्या प्रमुख होत्या."
त्यामुळे त्यांच्यावर कायम टांगती तलवार असायची. ऑगस्ट 1944 मध्ये पॅरिस स्वतंत्र होण्याच्या तीनच आठवडे आधी, वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांना अटक झाली आणि शहराबाहेर जाणाऱ्या शेवटच्या गाडीतून त्यांना हद्दपार करण्यात आलं.
जॅकलीन ऑब्रे डू बोल्डे (जॅकी) यासुद्धा पॅरिसमधून बाहेर काढण्यात आलेल्या शेवटच्या कैद्यांपैकी एक होत्या.
वेन म्हणतात, "29 वर्षांच्या जॅकी त्या गटातील सर्वांत ज्येष्ठ होत्या. त्यांचा सैनिक नवराही युद्धात मरण पावला होता आणि रेझिस्टन्स नेटवर्क या एका प्रमुख गुप्तहेर जाळ्यात त्यांचा सहभाग होता. जॅकी यांचे वडील खलाशी असल्यामुळे बरेच दिवस समुद्रावर असायचे, त्यामुळे त्यांची देखभाल त्यांच्या काका-काकूंनी केली होती."

वेन म्हणतात, "वडील घरी आल्यावर जॅकी त्यांच्या सोबत जात असत. त्या खूप सुंदर होत्या. त्या खलाशासारखंच बोलायच्या आणि त्यांचं बोलणं परखड असे. त्यांना एका पाठोपाठ एक सिगारेट प्यायची सवय होती आणि त्यांचा आवाज खर्जातील होता. त्या खूप शक्तिशाली होत्या."
पण त्याच वेळी जॅकी अतिशय विश्वासू आणि काळजी घेणाऱ्यासुद्धा होत्या, असं वेन म्हणतात.
मेडलॉन वर्स्टिजेन (लॉन) व गिलेमेट डँडल्स (गुइगुई) यांना अटक झाली तेव्हा त्या अनुक्रमे 27 व 23 वर्षांच्या तरुणी होत्या. त्या दोघींची चांगली मैत्री होती आणि दोघीही डच उच्चभू वर्गातून आलेल्या होत्या.
वेन म्हणतात, "त्या पॅरिसमधील डच गटात सहभागी व्हायला आल्या होत्या, पण लवकरच त्यांना अटक झाली. गुईगुई अॅथलीट होत्या आणि स्वभावाने सौम्य होत्या. तर, लॉन मात्र प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत असत."
या महिलांच्या गटातील रेनी लेबॉन चेटेने (झिंका) 'आश्चर्यकारक शौर्य' राखून होत्या, असं वेन सांगतात. झिंका 'लहानखुऱ्या बाहुल्या'सारख्या होत्या. त्या लहान चणीच्या होत्या, त्यांचे केस कुरळे होते आणि त्यांच्या पुढच्या दातांमध्ये फट होती.
एका ब्रिटिश एअरमनला इंग्लंडला परतण्यासाठी मदत करणाऱ्या जाळ्यात त्यांचा व त्यांच्या पतीचा सहभाग होता.
झिंका यांना त्या 29 वर्षांच्या असताना अटक झाली होती, असं वेन सांगतात. झिंका यांनी तुरुंगातच एका मुलीला जन्म दिला; आणि तिचं नाव फ्रान्स असं ठेवलं. पण त्यांना केवळ 18 दिवस स्वतःच्या
मुलीला सोबत ठेवण्याची परवानगी मिळाली. नंतर मुलीचा ताबा त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आणि त्यांना जर्मनीत हद्दपार करण्यात आलं. आपल्याला मुलीसाठी जिवंत राहायचं आहे, असं त्या कायम म्हणत असत.

फोटो स्रोत, DROITS RÉSERVÉS
याच गटात योने ले गुयिलू (मेना) यांचाही समावेश होता. त्या कामगारवर्गातून आल्या होत्या आणि 'त्यांना कायम प्रेमात असायला आवडायचं,' असं वेन सांगतात. मेना यांनी पॅरिसमध्ये डच भूमिगत प्रतिकार पथकासोबत काम केलं आणि या दरम्यान एका डच तरुणावर त्यांचं प्रेम बसलं. पण केवळ बाविसाव्या वर्षी त्यांना अटक झाली.
या सर्व नऊ महिलांपैकी सर्वांत कमी वयाच्या होत्या जोसेफिन बोर्डानावा (जोसी). त्यांना मार्सेलीमध्ये अटक झाली तेव्हा त्या केवळ 20 वर्षांच्या होत्या. त्या स्पॅनिश होत्या आणि त्यांचा आवाज अतिशय गोड होता, असं वेन सांगतात.
जोसी अनेकदा गाणी म्हणून मुलांना शांत ठेवत व खूश करत, असं वेन म्हणतात.
या नऊ जणींना जर्मनीच्या उत्तर भागातील रॅवेन्सव्रक इथे महिलांसाठीच्या छळछावणीत पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांना लिपजिग इथल्या एका श्रमछावणीत शस्त्रं तयार करण्यासाठी पाठवलं गेलं. इथेच त्यांची एकमेकांशी घनिष्ठ मैत्री झाली.
छळछावणीतील परिस्थिती भयंकर होती. तिथे त्यांना उपाशी ठेवलं जात असे, त्यांचा छळ केला जात असे आणि त्यांना तपासणीसाठी नग्नावस्थेत बर्फावर उभं केलं जात असे.
अशा खडतर परिस्थितीवर त्यांनी मैत्रीसंबंधांद्वारे मात केली. त्यात एक परंपराही सहाय्यभूत ठरली होती. एकजुटीचं प्रतीक म्हणून एका वाडग्यात त्या आपापल्या सुपातला एक चमचा ओतत असत. त्यानंतर त्या दिवशी सुपाची सर्वाधिक गरज असणाऱ्या त्यांच्यातील एकीला ती वाटी दिली जात असे.
उपासमार झालेल्या महिलांचं मृत्यू प्रयाण
प्रचंड भूक लागली असली तरी जेवणाविषयी बोलून थोडं आश्वस्त वाटतं, हे या महिलांच्या लक्षात आलं होतं, असं वेन सांगतात.
दररोज रात्री निकोल चेस्टनट क्रिममधील स्ट्रॉबेरी वेबरॉयज कसे तयार करायचे याची पाककृती सांगत असत. कार्यालयातून चोरलेल्या कागदांवर ते ही पाककृती लिहून काढत. निकोल यांनी या कागदांच्या गठ्ठ्याचं पुस्तक तयार केलं नि त्याला स्वतःच्या चटईचं कव्हर बनवलं.

फोटो स्रोत, JETSKE SPANJER & ANGE WIEBERDINK
वेन यांनी त्यांच्या आजीच्या या आठवणी नोंदवल्या, तेव्हा आपण कैदेत असतानाही सैनिक होतो आमि या महिलांसोबत पँजरफाउस्ट हे शस्त्र तयार करत होतो, हे त्यांच्या आजीने त्यांना विशेष अधोरेखित करून सांगितलं.
वेन सांगतात की, एप्रिल 1945मध्ये मित्र राष्ट्रांच्या फौजांनी अनेकदा या कारखान्यावर बॉम्बवर्षाव केला, त्यामुळे ही छावणी रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, उपाशी, फटक्या कपड्यांमधल्या, थकलेल्या महिला जर्मनीच्या पूर्व भागातील ग्रामीण भागांच्या दिशेने जाऊ लागल्या.
त्यांची पावलं रक्ताने भरली होती. चालत दूरदूरपर्यंत जावं लागत असल्यामुळे त्यांच्या पायांना भेगा पडल्या. हा प्रवास या महिलांसाठी धोकादायक होता, असं वेन म्हणतात.
त्या सांगतात, "आपल्याकडे केवळ हाच पर्याय उरल्याचं त्या महिलांना माहीत होतं. त्यांना एकतर पळून जाता आलं असतं किंवा मग या लोकांच्या हातून मरण पत्करावं लागलं असतं. किंवा मग उपासमारीने त्यांचा मृत्यू झाला असता. त्यामुळे या प्रवासादरम्यान निर्माण झालेल्या अनागोंदीचा फायदा घेऊन त्यांनी एका दरीत उडी घेतली आणि आता आपण मेलो आहोत असं नाटक त्यांनी केलं. तिथे प्रेतांचे इतके ढिग पडलेले होते की त्यात त्यांची भर पडल्याचं मानून इतर कैद्यांचा प्रवास पुढे सुरू राहिला."
पुढचे दहा दिवस या महिला आघाडीवरील अमेरिकी सैनिकांना शोधायला रवाना झाल्या. जॅकी यांना डिप्थिरिया होता, निकोल यांना न्यूमोनिया झाला होता, झिंका यांना ट्यूबरक्यूलॉसिस झाला होता, तर हेलेन यांच्या पुठ्ठ्यात वेदना होत होत्या. त्यांचं हाड मोडलं होतं आणि त्या भुकेने तडफडत होत्या, पण त्या सर्व जणींनी एकत्रच यातून मुक्त व्हायचं ठरवलं होतं.
वेन यांना या सर्व प्रवासाचा तपशील मिळवण्यासाठी बरीच गुप्तहेरगिरी करावी लागली आणि तीन वेळा त्या जर्मनीलाही जाऊन आल्या. त्यानंतर त्यांना या महिलांनी नक्की कोणत्या मार्गाने पुढचा प्रवास केला ते कळलं. पण इतक्या अवघड परिस्थितीतसुद्धा त्या रोज काही पावलं पुढे टाकतच होत्या, ही बाब वेन यांना आश्चर्यकारक वाटली.
वेन म्हणतात, "काही वेळा त्या पाच ते सहा किलोमीटरच चालू शकत होत्या. त्या भुकेने तडफडत होत्या, त्यामुळे त्यांना जेवणाची गरज होती. शिवाय, त्यांना झोपण्यासाठी सुरक्षित जागाही गरजेची होती. अशा वेळी वाटेत एखाद्या गावातील लोकांशी जाऊन बोलणं गरजेचं होतं.
पण त्या एखाद्या गावात जात तेव्हा ते आणखीच धोकादायक वाटायचं. कारण, कदाचित आपण एखाद्या जाळ्यात अडकू किंवा गावकरी आपली हत्या करून टाकतील, अशी भीती त्यांना होती."

फोटो स्रोत, FRANCE LEBON CHÂTENAY DUBROEUCQ
हेलेन आणि लॉन यांना जर्मन बोलता येत होती, त्यामुळे त्या पुढे होऊन गावातल्या प्रमुखाशी बोलून तिथल्या धर्मशाळेत झोपायची परवानगी मागायच्या नि काही उरलं-सुरलं खाणं असेल तर ते द्यायची विनंती करायच्या.
वेन म्हणतात, "आपल्या सोबत काही गैर गोष्ट घडलेली नाही, सगळं काही ठीक आहे, आणि आपण भ्यालेलो नाहीत, असं दाखवणं हाच सर्वोत्तम डावपेच ठरेल, हे त्यांना लगेचच लक्षात आलं."
जर्मनीत सॅक्सॉनीमधील मुल्दे नदीच्या दुसऱ्या काठावर अमेरिकी सैनिक असल्याचं त्यांना कळल्यावर त्यांना हा एक शेवटचा अडथळा पार करायचा होता.
"मुल्दे नदीवरील पुलावर उभं राहून काठाकडे पाहणं मला बरंच उद्बोधक वाटलं," असं वेन सांगतात. सैनिकी अभिलेखागारातून त्यांनी काही माहिती जमवली होती, काही महिलांनी या पलायनाची हकिगत लिहून ठेवल्यामुळे त्यातून काही माहिती मिळाली, तर लॉन यांच्या कथेचा शोध घेतलेल्या चित्रपटकर्त्यांशीही वेन बोलल्या. तसंच या महिलांच्या कुटुंबियांशी बोलणंही उपयुक्त ठरलं.
नदी पार करणं, हा या महिलांसाठी पलायनातील सर्वांत भयंकर प्रसंग ठरल्याचं वेन यांच्या लक्षात आलं.
नदीच्या दुसऱ्या तीरावर यशस्वीरित्या पोचल्यावर त्यातल्या काही जणींना तर आपण आता एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही असं जाणवलं. जॅकीला धाप लागली होती. पण आपल्यातलं कोणीही वाटेत मागे राहू द्यायचं नाही, असा त्या नऊ जणींनी निग्रह केला होता.
दरम्यान, एक जीप त्यांच्या दिशेने आली आणि त्यातून दोन अमेरिकी सैनिक उडी मारून बाहेर आले. या सैनिकांनी त्यांना सुरक्षित असल्याचं आश्वस्त करत सिगरेट देऊ केली.
या महिलांना सर्वसामान्य आयुष्याशी परत जुळवून घेणं किती अवघड झालं, हे संशोधनादरम्यान वेन यांच्या लक्षात आलं.
वेन म्हणतात, "त्या दुबळ्या नि भयावह दिसत होत्या. छावणीत राहून आलेल्या महिला म्हणून त्यांना कलंकाला सामोरं जावं लागलं. त्यांना एक प्रकारचा एकटेपणाही सहन करावा लागला."
"संघटना म्हणून त्या एकमेकांच्या जवळ होत्या आणि आता अचानक त्यांची गोष्ट ऐकण्यात काही रस नसलेल्या लोकांमध्ये त्या येऊन पडल्या होत्या. त्यामुळे त्यांना मानसिक पातळीवर एकटेपणा जाणवला असावा, असं मला वाटतं. त्यांना सैनिक म्हणून ओळख नसल्यामुळे त्यांची ही पीटीएसडी (पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर) विकाराची स्थिती दखलपात्र ठरली नाही."
तरुण महिलांना युद्धानंतर त्यांच्या कहाण्यांबाबत मौन बाळगण्यास सांगितलं जातं, त्यामुळे त्यांचं शौर्यही प्रकाशात येत नाही, असं वेन म्हणतात.
त्या सांगतात, "1038 कॉम्पेग्नॉन्स डे ला लिबरेशन, अशा नावाची एक संघटना होती. प्रतिकाराची धुरा या गटाकडे असल्याचं मानलं जात होतं. यात सहा महिला होत्या, त्यातल्या चार आधीच मरण पावल्या होत्या. हे हास्यास्पद होतं, कारण प्रतिकार फौजांमध्ये सुमारे 50 टक्के महिला होत्या."
वेन म्हणतात, "काही महिलांनी त्यांच्या भूतकाळापासून पिच्छा सोडवला आणि त्यांनी आयुष्य पुढे सुरू ठेवलं. पण गुईगुई व मेना आयुष्यभर एकमेकांची मैत्री निभावत होत्या आणि त्यांनी एकमेकींच्या मुलांची आईसारखी काळजीही घेतली."
"अनेक वर्षांपासून या महिला एकमेकांच्या संपर्कात आहे. माझ्या आजीने मला ही कहाणी ऐकवली तेव्हा या गटातल्या ज्या महिला हयात होत्या त्यांचं पुनर्मिलन झालं."
झिंका यांच्या मुलीचं काय झालं?
झिंका तीन वर्षं त्यांच्या मुलीचा शोध घेत होत्या, असं वेन सांगतात. "योगायोगाने मला तिचा शोध लागला. मी तिला भेटायला गेले तेव्हा दक्षिण फ्रान्समध्ये मी राहत होते तिथून जवळच तीसुद्धआ राहत होती. सत्तर वर्षांनी स्वतःच्या आईविषयी एवढं सगळं कळल्यावर माझी काय अवस्था होईल, त्याची कल्पना करून पाहा, असं ती म्हणाली."
युद्धानंतर पहिल्यांदाच फ्रान्स तिच्या आईला भेटत होती. पण झिंका खूप आजारी होत्या आणि छावणीत टीबीचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर अनेक वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. झिंका खूपदा बऱ्याच दुबळ्या झाल्या, त्यामुळे त्यांना स्वतःच्या मुलीची काळजी घेणं शक्य होत नसे आणि त्या मुलीला दुसऱ्या कुटुंबियांकडे राहायला पाठवत असत.
झिंका 1978 साली मरण पावल्या, पण फ्रान्स यांना त्यांच्या आईच्या या साहसी पलायनाबद्दल माहिती नव्हतं. वेन म्हणतात, "आपल्या आईसाठी आपण किती महत्त्वाचे होतो, हे त्यांना माहिती नव्हतं. आपल्या आईसाठी आपलं असणं किती महत्त्वाचं होतं, हे त्यांना नंतर कळलं."
हेलेनसुद्धा 2012 साली मरण पावल्या. वेन त्यांच्या पुस्तकात लिहितात की, आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात हे स्पष्ट झालं होतं की हेलेन त्यांच्या भूतकाळातील या टप्प्यातून मुक्त झालेल्या नाहीत.
वेन म्हणतात, "महिलांना युद्धाची झळ बसते, पण ती गंभीरपणे निदर्शनास येत नाही. त्यामुळे त्यांच्या वेदनांबद्दल लोकांना कळावं, असं मला वाटतं." औदार्य व दयाबुद्धी यांच्या अविस्मरणीय गोष्टींचाही 'स्वीकार व्हावा', असं वेन यांना वाटतं. या सर्व महिला आपापल्या परीने एकमेकींशई जोडलेल्या राहिल्या, या सुंदर गोष्टींचा सोहळा साजरा व्हायला हवा, असं मला वाटतं.
वेन यांनी त्यांच्या आजीवर 'द नाइन' या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








