Omicron Covid : कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीकडून संसर्ग पसरणं कधी आणि कसं थांबतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बीबीसी न्यूज
- Role, मुंडो सर्व्हिस
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा व्हेरीएंट ओमिक्रॉनमुळं ही संख्या वाढत आहे.
पण ओमिक्रॉन जसजसा पसरत आहे, तसे यापूर्वीच्या विषाणूच्या तुलनेत याची लक्षणं आणि होणारे आजार कमी असल्याचं स्पष्ट व्हायला लागलं आहे.
म्हणजेच ज्यांना या विषाणूची लागण होते आणि त्यातही त्यांचं लसीकरण झालेलं असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागण्याची किंवा मृत्यूची शक्यता ही अत्यंत कमी असते.
त्यामुळंच आता अनेक देश कोरोनाची लागण झाल्यानंतर विलगीकरणात राहावं लागण्याच्या कालावधीमध्ये पुन्हा बदल करत आहेत.
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट कसा बदलत आहे आणि कोरोना व्हायरसचा आतापर्यंतचा प्रसार नेमका कसा झाला आहे, हे आम्ही खाली देत आहोत.
विषाणूच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला लक्षणं दिसण्यास किती काळ लागतो?
ओमिक्रॉनवर अत्यंत मोजका असा अभ्यास झाला असला तरी आतापर्यंत जे काही समोर आलं आहे ते म्हणजे या व्हायरसच्या संसर्गाचं प्रमाण तर अधिक आहेच, पण तसंच याचा लक्षणं दिसण्याचा कालावधीही यापूर्वीच्या व्हेरिएंट्सपेक्षा कमी आहे.
हा कालावधी म्हणजेच विषाणूच्या संपर्कात आल्यापासून लक्षणं दिसायला सुरुवात होण्यापर्यंतचा कालावधी.
कोरोनाच्या आधीच्या व्हेरिएंट्समध्ये लागण झाल्यानंतर साधारणपणे पाच-सहा दिवसांत लक्षणं दिसायला सुरुवात होत होती.
डेल्टा व्हेरिएंटमध्ये चार दिवसांत ही लक्षणं दिसायला लागत होती.

फोटो स्रोत, Getty Images
पण ओमिक्रॉनबाबत आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या व्हेरिएंट्ससाठी हा कालावधी दोन ते तीन दिवसांचा आहे.
"साधारणपणे [ओमिक्रॉनमध्ये] यात अत्यंत वेगानं विषाणूंची संख्या वाढते," असं जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार आणि साथीचे आजारांचे विशेषज्ञ डॉ. विन्सेंट सोरियानो यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना म्हटलं आहे.
"कुणीतरी शिंकल्यानंतर एका दिवसात विषाणूंची संख्या वाढायला सुरुवात होते आणि दोन दिवसांत लक्षणं येतील एवढी ती संख्या वाढते," असं स्पेनच्या ला रिओजा आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील प्राध्यापकांनी सांगितलं.
अमेरिकेत सहा कोरोना रुग्णांवर झालेला अभ्यास हा डिसेंबरमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्यात इतर व्हेरिएंट्सच्या पाच ते सहा दिवसांच्या तुलनेत याचा लक्षणं जाणवण्याचा कालावधी (इन्क्युबेशन पिरियड) तीन दिवसच होता.
लागण झालेल्या व्यक्तीकडून इतरांना संसर्गाचा धोका किती काळ असतो?
लोकांना कोरोनाच्या विषाणूची लागण झाल्यानंतर प्रामुख्यानं सुरुवातीच्या काळात त्याचा संसर्ग पसरवला जाण्याची शक्यता अधिक असते हे स्पष्टच आहे.
ओमिक्रॉनमध्ये लक्षणं दिसण्याच्या एक ते दोन दिवस आधी आणि लक्षणं दिसल्याच्या दोन ते तीन दिवस नंतरपर्यंत विषाणूच्या संसर्गाची शक्यता असते.
"आमच्या मते विषाणू हा केवळ पाच दिवस संसर्गजन्य असतो. ही इतरांना संसर्ग करण्याची क्षमता असते. याचा संसर्ग इतरांना पोहोचवण्याची क्षमता चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तीन ते पाच दिवसांपर्यंत असते. तो संसर्ग झाल्याचा दुसरा दिवस असतो," याकडेही अभ्यासक लक्ष वेधतात.

फोटो स्रोत, Getty Images
शिवाय, ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये कोरोनाचा विषाणू शरीरात राहण्याचा कालावधी हादेखील केवळ सात दिवसांचा आहे.
"पण हे औषध आहे गणित नाही. त्यामुळं यात तुम्हाला काही तफावतीची शक्यता ठेवावी लागेल. कदाचित काही लोक असेही असतील ज्यांच्या शरिरात तो तीन ते चार दिवसच राहत असेल पण काही जणांसाठी हा काळ सात दिवसांचा असतो. ओमिक्रॉनमध्ये यापूर्वीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत संसर्गाचा वेग हा जास्त आहे," असं विसेंटे सोरियानो म्हणाले.
याचा अर्थ म्हणजे लक्षणं आढळल्यानंतर जवळपास सात दिवसांनी बहुतांश लोकांकडून जर त्यांना पुढं लक्षणं नसतील तर कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका नसतो.
लागण झालेल्या व्यक्तीकडून संसर्ग पसरू शकतो का हे तपासण्यासाठी संबंधितांची अँटिजेन टेस्ट करावी असा सल्लाही तज्ज्ञ देतात.
रुग्णाकडून संसर्गाचा धोका आहे का हे अँटिजेन टेस्टमधून स्पष्ट होऊ शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
"ही तपासणी स्वस्तात होते आणि एखादा रुग्ण संसर्ग पसरवू शकतो का याचं उत्तर त्यातून मिळू शकतं."
ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतरचा कालावधी हा इतर व्हेरिएंटच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळं अनेक देशांनी विलगीकरणाचा कालावधीदेखील कमी केला आहे.
अमेरिकेमध्ये विलगीकरणाचा कालावधी 10 दिवसांवरून 5 दिवसांवर आणण्यात आला आहे. तर इंग्लंडमध्ये विलगीकरणाचा कालावधी 10 वरुन 7 दिवसांवर आणण्यात आला आहे. सोबतच दोन अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह असाव्यात अशी अटही आहे.
मला कोव्हीड आणि लक्षणंही होती, मी इतर लोकांबरोबर केव्हा राहू शकतो?
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC)च्या मते तुमची कोव्हीड टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तुम्ही खालील गोष्टी कराव्या :
- पाच दिवसांसाठी स्वतः घरी विलगीकरणात राहा.
- जर तुम्हाला लक्षणं नसतील किंवा पाच दिवसांनंतर तुमची लक्षणं कमी झाली असतील, तर तुम्ही घराबाहेर पडू शकता.
- त्यानंतर पुढचे पाच दिवस तुम्ही इतर लोकांबरोबर असाल तेव्हा मास्क परिधान करा.
- तुम्हाला ताप असेल तर ताप जाईपर्यंत घरी विलगीकरणातच राहा.
स्त्रोत - CDC
संसर्ग झालेल्या व्यक्तीला लक्षणं नसतील तर?
कोव्हीडमध्ये असंही पाहायला मिळालं आहे की, अनेकांना लागण होऊण पूर्ण कालावधी संपेपर्यंतही लक्षणं आढळून येत नाहीत.
साथीच्या रोगांचे तज्ज्ञ विसेंट सोरियानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्षणं नसलेला संसर्ग हा लक्षण असलेल्या संसर्गासारखाच असावा असं अपेक्षित आहे.
"लक्षणं नसलेल्या संसर्गाबाबत अजून बरंच काही समोर आलेलं नाही. मात्र, संसर्ग पसरवण्याच्या क्षमतेचा कालावधी हा लक्षणं असलेल्या लोकांप्रमाणेच असायला हवा," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
"कोव्हीड संदर्भात लहान मुलांबाबतही काही अभ्यास झाले आहेत. प्रामुख्यानं लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्ण मुलांच्या अभ्यासातून समोर आलं की, त्यांच्यामध्ये लक्षणं नसली तर त्यांचा व्हायरल लोड हा लक्षणं असलेल्या प्रौढांइतकाच असतो."
तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची लागण झालेल्या पण लक्षणं नसलेल्या व्यक्तीमध्ये 10 दिवसांनंतर संसर्ग पसरवण्याची क्षमता शिल्लक नसते.
लक्षणं नसलेला व्यक्ती इतरांना संसर्ग पसरवू शकतो?
अभ्यासातून समोर आलं आहे की, लक्षणं नसलेले पण कोव्हीडची लागण झालेले रुग्ण हे इतरांना कोरानाचा संसर्ग पोहोचवू शकतात.
JAMA नेटवर्क ओपन (जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन) मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार लागण झालेल्या जवळपास चारपैकी एका जणाला लक्षणं नसलेल्यांकडून लागण झाली आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा विचार करता लक्षणं नसलेल्यांकडून संसर्ग पसरण्याचं प्रमाण हे अधिक जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लक्षणं नसलेल्या लोकांकडून संसर्ग पसरण्याची अधिक शक्यता असते कारण ते विलगीकरणात गेलेले नसतात आणि संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेत नसतात.
त्यामुळंच प्रशासनानं मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे, तोही विशेषतः बंद खोली असलेल्या ठिकाणी. कारण अशा ठिकाणी कोरोनाची लागण असलेला व्यक्ती असल्यास नकळत इतरांना तो संसर्ग पोहोचवण्याचा धोका अधिक असतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








