नोवाक जोकोविचने खटला जिंकला; ऑस्ट्रेलियाच्या सरकारला न्यायालयाची चपराक

फोटो स्रोत, Getty Images
टेनिसपटू नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे. मात्र या निर्णयानंतरही जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळू शकणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन कायद्यानुसार, मंत्र्यांना विशेषाधिकार असतात. याद्वारे ते व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतात. जोकोविचचा व्हिसा पुन्हा रद्द केल्यास त्याला तीन वर्ष ऑस्ट्रेलियात प्रवेश करता येणार नाही.
दरम्यान जोकोविचने कोरोना लस घेतली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. जोकोविचला याआधी दोनदा कोरोनाचा संसर्ग झाला होता.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन या वर्षातील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने यासंदर्भातील नियम अतिशय कठोर केले आहेत. जोकोविचने कोरोना लस घेतलेली नाही. लशीसंदर्भात त्याने काही आक्षेप नोंदवले होते. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळण्यासाठी तसंच ऑस्ट्रेलियात दाखल होण्यासाठी ठराविक नियमांची पूर्तता करणं आवश्यक असतं. अपवादात्मक परिस्थितीत लस न घेतलेल्या व्यक्तींना सवलत देण्यात येते. जोकोविचने त्यासाठी आवेदन सादर केलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने त्याचा व्हिसा रद्द केल्याने त्याला डिटेन्शन हॉटेलमध्ये थांबावं लागलं होतं.
न्यायालयाच्या निर्णयामुळे जोकोविच डिटेन्शन हॉटेलमधून बाहेर पडून ऑस्ट्रेलियात प्रवेश करू शकतो. कायदेशीर प्रक्रियेसाठी जोकोविचला जो खर्च आला ती रक्कम ऑस्ट्रेलियाचं सरकार भरणार आहे. जोकोविचलला तातडीने डिटेन्शन हॉटेलमधून सोडलं जाईल. जोकोविचचा पासपोर्ट आणि अन्य तपशील त्याला त्वरित परत केले जातील.
जोकोविचबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर न्यायालयाच्या परिसरात जमलेल्या त्याच्या चाहत्यांनी गाणी म्हणत, घोषणा देत आनंद व्यक्त केला.
जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयासाठी सरकारकडे ठोस युक्तिवाद नव्हता असं न्यायाधीश अँथनी केली यांनी सांगितलं.
स्पर्धेचे संचालक तसंच वकिलांशी बोलण्यासाठी जोकोविचला पुरेसा वेळ दिला नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
मेलबर्नमध्ये दाखल झाल्यानंतर जोकोविचला अशा पद्धतीने डिटेन्शन हॉटेलमध्ये थांबवून ठेवण्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
इमिग्रेशन मंत्री विशेषाधिकाराअंतर्गत जोकोविचचा व्हिसा पुन्हा रद्द करू शकतात.
या घडामोडींना जोकोविचच्या लसविरोधाची पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळेच जगभरात चर्चा सुरू आहे.
जोकोविचनं कोरोनाविषाणूवरची लस घेतली आहे की नाही, हे उघड केलेलं नाही. पण गेल्या वर्षी त्यानं आपला लसीकरणाला विरोध असल्याचं म्हटलं होतं.
डिसेंबरमध्ये हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आणि ऑस्ट्रेलियात प्रवेशाविषयीचे कडक नियम पाहता जोकोविच यंदा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळू शकेल की नाही अशी चर्चाही सुरू झाली होती.
पण 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी लसीकरणाच्या अटीतून जोकोविचला सूट देण्यात आल्याचं या स्पर्धेचे आयोजक असलेल्या टेनिस ऑस्ट्रेलियानं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतरच जोकोविच दुबईहून मेलबर्नला रवाना झाला. बुधवारी रात्री उशीरा तो मेलबर्नला पोहोचला, तेव्हा मात्र ऑस्ट्रेलियन सरकारनं त्याचा व्हिसा रद्द केला.
जोकोविचवर का झाली कारवाई?
मेलबर्न एयरपोर्टवर जवळपास सात तास जोकोविचची चौकशी सुरू होती.
जोकोविचनं ऑस्ट्रेलियात प्रवेशासाठी आवश्यक नियमांची पूर्तता केली नसल्याचं आणि त्याला देशाबाहेर पाठवलं जाणार असल्याचं तिथल्या सीमा दलाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलं.
पाठोपाठ त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. व्हिक्टोरिया राज्याच्या क्रीडामंत्र्यांनीही जोकोविचनं व्हिसासाठी केलेल्या अर्जाला पाठिंबा नाकारल्याचं जाहीर केलं आहे.
जोकोविचला त्याचं परतीचं विमान मिळेपर्यंत एका डिटेन्शन हॉटेलमध्ये नेण्यात आल्याचं वृत्त आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जोकोविचनं वैद्यकीय पुरावे दिले नसल्याचं स्पष्ट केलंय.
लसीकरणातून सवलत कुणाला मिळत आहे?
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी नियमांनुसार यंदा सर्व खेळाडूंचं लसीकरण होणं आवश्यक आहे.
वैद्यकीय कारणांमुळे एखाद्याला लसीकरणातून सवलत मिळू शकते.
पण अशा खेळाडूंना योग्य तो अर्ज आणि वैद्यकीय कागदपत्रं दिल्यावरच ही सवलत घेता येणार आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र पथकं या अर्जांची छाननी करणं आवश्यक आहे. तसंच छाननी करणाऱ्यांपासून खेळाडूंची ओळख गुप्त ठेवली जाते आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एकूण 26 खेळाडूंनी वैद्यकीय कारणांमुळे लसीकरणाच्या अटीतून सूट मागितली होती, त्यातल्या काहींनाच सवलत देण्यात आल्याचं टेनिस ऑस्ट्रेलियानं जाहीर आहे.
सामान्यतः ज्यांना हृदयाला सूज येण्यासारखे काही विकार आहेत, किंवा लशीच्या पहिल्या डोसनंतर घातक लक्षणं दिसून आली आहेत अथवा आधी कोव्हिड झाल्यामुळे लस घेण्यासाठी अजून अवकाश आहे, अशांना वैद्यकीय सवलत मिळू शकते.
जोकोविचला गेल्या वर्षी जूनमध्ये कोव्हिड होऊन गेला आहे, त्यामुळे त्याला लस घेण्यापासून सध्या सवलत मिळालेली असू शकते.
जोकोविचचा लसीकरणाला विरोध आहे का?
जोकोविचने वैद्यकीय सवलत मागितलेली असल्यानं त्यानं अजून लस घेतली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
एप्रिल 2020 मध्ये एका फेसबुक लाईव्हदरम्यान जोकोविचनं लसीकरणाविषयी आपलं मत व्यक्त केलं होतं.

फोटो स्रोत, Shi Tang
तो म्हणाला होता, "व्यक्तिशः माझा लसीकरणाला विरोध आहे आणि प्रवास करता यावा यासाठी मला कोणी लस घ्यायला भाग पाडलेलं मला नको आहे. पण लस बंधनकारक झाली, तर काय होईल? मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. माझं याविषयी स्वतःचं काही मत आहे, आणि ते कधी बदलेल का, हे मला माहिती नाही."
जोकोविचनं हे जाहीर केल्यानंतर काहींनी त्याचं कौतुक केलं तर अनेकांनी त्याच्यावर टीका केली.
लशीविषयी अतर्क्य गैरसमजांचं समर्थन करणाऱ्या फेसबुक ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल्सवर जोकोविचचं हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात शेअर केलं गेलं. जगावर नियंत्रण मिळवण्याच्या योजनेचा लस हा एक भाग असल्याच्या 'Conspiracy Theory' वर या गटांचा ठाम विश्वास आहे.
लशीला उघडपणे विरोध करणारे काही अमेरिकन खेळाडू जोकोविचच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. तर दुसरीकडे जोकोविचसारख्या मोठ्या खेळाडूनं घेतलेल्या भूमिकेमुळे लस ही अजून केवळ प्रयोगात्मकच आहे अशा कुठलाही पुरावा नसलेल्या दाव्यांना बळकटी मिळत असल्याची टीकाही होते आहे.
पुढे काय होईल?
या सगळ्यांत अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याचं बीबीसीच्या ऑस्ट्रेलियातील प्रतिनिधी शायमा खलिल सांगतात.
त्या म्हणतात, "स्कॉट मॉरिसन यांनी कडक भूमिका घेतली आहे, पण काही प्रश्नांचं उत्तर मिळालेलं नाही. जोकोविचच्या व्हिसासंबधी काय अडचण होती? त्यानं कोणतं वैद्यकीय कारण देऊन ही सवलत मागितली? त्याच्या व्हिसा अर्जात काही समस्या होती, तर त्याला उड्डाण करण्याची परवानगीच का मिळाली? "
जोकोविच आता न्यायालयात दाद मागू शकतो, पुन्हा व्हिसासाठी अर्ज करून स्पर्धेसाटी ऑस्ट्रेलियात प्रवेश करू शकतो असं स्थानिक वृत्तपत्रांचं म्हणणं आहे.
जोकोविचच्या मायदेशात, म्हणजे सर्बियामध्ये या सगळ्या प्रकारावरून राग व्यक्त होतो आहे. त्यांचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिच यांनी जोकोविचला मिळालेली वागणूक म्हणजे छळ असून, देश त्याच्या पाठीशी उभा असल्याचं म्हटलं आहे.
जोकोविचच्या वडिलांनी आपल्या मुलाला पोलिसांच्या बंदोबस्तात एयरपोर्टवर डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप केलाय आणि हा फक्त जोकोविचसाठी नाही तर सगळ्या जगासाठी लढा आहे असा दावा केलाय.
तर एकट्या जोकोविचवर कारवाई होत असल्याच्या आरोपाचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी खंडन केलंय.
जोकोविचला लसीकरणाच्या अटीतून सूट देण्याला अनेक ऑस्ट्रेलियन नागरिकांनी विरोध केला होता.
सर्वसामान्यांना प्रवासावरील कडक निर्बंधांमुळे आपल्या आजारी किंवा मरणाच्या दारात असलेल्या नातेवाईकांनाही भेटायला जाता येत नाहीये, अशात सेलिब्रिटींना सवलती का दिल्या जातायत असा प्रश्न अनेकांनी विचारला होता.
जगातल्या सर्वांत कडक निर्बंधांपैकी काही ऑस्ट्रेलियात लागू आहेत. तिथे 90 टक्के प्रौढ लोकांचं लसीकरण झालेलं असूनही लोकांना दुसर्या राज्यात अथवा परदेशात सहजासहजी जाता येत नाही.
मात्र काही श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींना ऑस्ट्रेलियात प्रवेश दिल्याचा मुद्दा ऑस्ट्रेलियात याआधीही चर्चेत होता.
(संकलन - जान्हवी मुळे)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








