You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानच्या नोटांवर जिन्नांचा फोटो छापण्यास विरोध का झाला होता?
- Author, अकील अब्बास जाफरी
- Role, इतिहासकार
ही घटना आहे 24 डिसेंबर 1957 ची. स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं तेव्हा प्रथमच पाकिस्ताने संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो छापलेली 100 रुपयांची नोट जारी केली होती.
या हिरव्या नोटेच्या दुसऱ्या बाजुला लाहोरमधील बादशाह मशिदीचा फोटो होता.
या नोटा कराची, लाहोर आणि ढाका (आताचा बांगलादेश) मध्ये एकाच वेळी जारी करण्यात आल्या होत्या.
या नोटेवर स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे तत्कालीन गव्हर्नर अब्दुल कादीर यांची उर्दूतील सही होती.
एखाद्या व्यक्तीचा फोटो असलेली पाकिस्तानच्या चलनातील ही पहिलीच नोट होती.
मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो असलेली ही नोट जारी झाल्यानंतर उलेमा आणि इतर अनेकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
जिन्नांनाही आवडत नव्हतं
याबाबत 30 डिसेंबर 1957 ला दैनिक जंगमध्ये सर्वात पहिली बातमी प्रसिद्ध झाली होती.
सेंट्रल जमीयत उलेमा-ए-पाकिस्तानचे अध्यक्ष मौलाना अब्दुल हमीद बदायूंनी यांनी याचा तीव्र विरोध केला होता.
पाकिस्तानचे संस्थापक असलेल्या जिन्नांचा ते जिवंत असताना पोस्टाच्या तिकिटावर त्यांचा फोटो प्रकाशित करण्यास विरोध होता. त्यांना ते आवडलं नव्हतं, असं ते म्हणाले.
त्यांच्या मते, पाकिस्तानचे संस्थापक जिन्ना यांनी त्यांच्या जीवनकाळात पोस्टाच्या तिकिटांवर चंद्र-तारे किंवा एखाद्या प्रसिद्ध पाकिस्तानी इमारतीचा फोटो छापणं योग्य समजलं होतं.
त्याचप्रमाणे, कुल पाकिस्तान दस्तूर (ऑल पाकिस्तान कॉन्स्टीट्यूशन) पक्षाचे अध्यक्ष मौलाना असद-उल-कादरी यांनीही 'इस्लाम मानणाऱ्यांना' जिन्ना यांचा फोटो असलेल्या नोटेवर बहिष्कार टाकण्याची विनंती केली होती. जारी करण्यात आलेल्या नोटा मागे घेण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडण्याचा त्यांचा विचार होता.
त्यांनी सरकारचं हे पाऊल म्हणजे, "मुस्लिम भावनेचा अपमान" असल्याचं म्हटलं होतं. तसंच हा प्रकार "पूर्णपणे इस्लाम विरोधी" असल्याचंही म्हटलं होतं.
त्यांनी राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा आणि अर्थ मंत्र्यांना लोकांच्या भावनांचा सन्मान करत नोटा मागे घेण्याचं आवाहन केलं होतं.
जिन्नांच्या स्मरणार्थ जारी केली नोट
याच बातमीत सेंट्रल जमियत उलेमा-ए-इस्लामचे उपाध्यक्ष मौलाना मुफ्ती मोहम्मद शफी यांचंही एक वक्तव्य प्रकाशित करण्यात आलं होतं. त्यात त्यांनी 25 डिसेंबरला पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने एक नवी 100 रुपयांची नोट जिन्ना यांच्या फोटोसह जारी करण्यात आली असल्याचं म्हटलं होतं.
पाकिस्तानच्या संस्थापकांच्या स्मृतीच्या स्मरणार्थ ती जारी केल्याचं सांगण्यात येत आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.
'कायदे आझम आणि पाकिस्तान सध्या काही भोळे मित्र आणि कारस्थानी शत्रू यांच्या कारस्थानात अडकले आहेत. त्यांची एक एक आठवण निवडून नष्ट केली जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व त्यांच्याच नावावर केलं जात आहे, हे दुर्दैवी आहे,' असंही त्यांनी म्हटलं होतं.
मौलाना मुफ्ती मोहम्मद शफी यांच्या मते, पाकिस्तानचे संस्थापक त्यांच्या स्वभावानुसार लोकशाहीचे समर्थक होते. पाकिस्तानात ती लागू करण्याचा ते पूर्ण प्रयत्न करत होत. त्यांना कायदे आझम म्हणणाऱ्यांनी दहा वर्षात लोकशाहीची वाईट अवस्था केली आहे. आपली संसद आणि आपलं सरकार कट कारस्थानांचं ठिकाण बनलं आहे.
"कायदे आझम यांच्या गुणांपैकी मोठा गुण म्हणजे त्यांना कधीही पाकिस्तानच्या चलनावर त्यांचा किंवा इतरांचा फोटो लावणं आवडत नव्हतं. उलट त्यांना कोणीतरी हा सल्ला दिला तेव्हा त्यांनी तो फेटाळला होता. त्यांनी अत्यंत विचारपूर्वक आणि इस्लामच्या शिकवणीनुसार हे पाऊल उचललं होतं. इतर मुस्लिम देशांसाठी तो आदर्श ठरला होता.
"त्यांच्या जीवन काळात आणि नंतर आजवर ही परंपरा कायम राहिली. पण आज त्यांच्या जन्मदिनी कायदे आझम यांच्या त्याच भक्तांनी 100 रुपयांच्या नव्या नोटेवर त्यांचा फोटो छापून ही परंपरा मोडीत काढली आहे. त्यांनी कायदे आझम आणि पाकिस्तानची फार मोठी सेवा केली आहे, असं त्यांना वाटत आहे," असं त्यांनी याबाबत म्हटलं होतं.
वृत्तपत्रांवरून हे लक्षात येतं की नोटांवर कायदे आझम यांचा फोटो छापण्यास धार्मिक गटांबरोबरच व्यापाऱ्यांनीही विरोध केला होता.
31 डिसेंबर 1957 ला प्रकाशित एका वृत्तानुसार सरगोधामध्ये आठ वेगवेगळ्या धार्मिक आणि इतर दलांच्या नेत्यांनी एक संयुक्त निवेदन दिलं होतं.
त्यात "पाकिस्तानी नोटांवर फोटो छापण्याबाबत स्टेट बैंक ऑफ पाकिस्तानचा नवा प्रस्ताव पाकिस्तानी संविधानातील दिशानिर्देश आणि त्याच्या मूळ भावनेच्या विरोधी आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी संविधानाप्रती निष्ठेची शपथ घेतली आहे, त्यामुळं आम्ही या प्रस्तावाचा तीव्र विरोध करतो आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर आणि सरकारनं चलनावर एखाद्याचा फोटो छापण्याची प्रथा सुरू होईल, असा प्रस्ताव लागू करू नये अशी मागणी करतो," असं त्यात म्हटलं होतं.
'पाकिस्तान एक लोकशाही देश आहे आणि याठिकाणी राजेशाहीच्या स्मारकांचं पुनरुज्जीवन करता कामा नये.'
या निवेदनावर जमात-ए-इस्लामी सरगोधाचे अमीर हकीम मुश्ताक, जमात-ए-अहल-ए-हदीस सरगोधाचे अध्यक्ष रझाउल्लाह सनई, सर्राफा असोसिएशन सरगोधाचे अध्यक्ष अब्दुल मजीद मिर्झा, क्लॉथ मर्चंट असोसिएशन सरगोधाचे अध्यक्ष अब्दुल रेहमान, जनरल मर्चंट असोसिएशन सरगोधाचे सरचिटणीस मोहम्मद इस्माइल, अंजुमन आराइया रेल बाझारचे सचिन मियां मोहम्मद शफी, किराणा मर्चंट असोसिएशन सरगोधाचे सरचिटणीस मियां मोहम्मद तुफैल आणि अंजुमन आराइया सरगोधाचे अध्य अब्दुल खालिक यांच्या सह्या होत्या.
त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये वाचकांची पत्रंही छापली होती. त्यात काही वाचकांनी उलेमांच्या विरोधाला पाठिंबा दिला होता तर काहींनी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या या पावलाचं कौतुक केलं होतं.
नोटांवर पाकिस्तानच्या संस्थापकांचे फोटो छापल्यानंतर त्यावेळचे प्रसिद्ध शायर एहसान दानिश यांनी त्यांच्या भावना मांडणारे काही शेर लिहिले होते.
देखूं, देखूं, क्या अजूबा है, ज़रा देना इधर
क़ायद-ए-आज़म की है तस्वीर सौ के नोट पर
ज़हन भटका है ये किसका, ये सितम किसने किया?
मेरी ख़ुश तबी में शामिल ज़हर-ए-ग़म किसने किया?
मस्लिहत, कह कर ज़बान-ए-हाल सी दी जाएगी?
क्या इसी तस्वीर से रिश्वत भी ली, दी जाएगी?
दिल लरज़ उठे, न क्यों इस ख़्वाब की ताबीर से?
रात दिन होगी स्मगलिंग भी इसी तस्वीर से?
क्या मुसलमां इस तरह भी लाएंगे मुझ पर अज़ाब?
क्या इस तस्वीर से जाकर ख़रीदेंगे शराब?
लोग क्या खेलेंगे मेरी रूह की तनवीर से?
मुल्क भर में क्या जुआ होगा इसी तस्वीर से?
कलमा गो क्या यूं भी लूटेंगे मिरा सब्र व करार?
क्या इस तस्वीर से चकलों में होगा कारोबार?
नोट पर तस्वीर, दानिश इनहिराफ़-ए-दीन है
ये जनाब-ए-क़ायद-ए-आज़म की इक तौहीन है.
उलेमांच्या विरोधानंतर काही दिवसांनी हे प्रकरण शांत झालं आणि शंभर रुपयांच्या नोटेपासून सुरू झालेला हा प्रकार इतर नोटांबाबतही सुरू झाला. पाच रुपये आणि त्यापेक्षा जास्त मूल्याच्या सर्व नोटांवर मग पाकिस्तानच्या संस्थापकांचा फोटो छापला जाऊ लागला.
3 ऑक्टोबर 1948 ला बहावलपूर संस्थाननं एक पोस्टाचं तिकिट जारी केलं होतं. त्यावर पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना आणि बहावलपूरचे अमीर सर सादिक मोहम्मद खान अब्बासी यांचे फोटो छापले होते, याचा उल्लेख याठिकाणी करायला हवा.
मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो असलेलं हे जगातील पहिलं पोस्टाचं तिकिट होतं.
पाकिस्तानच्या पोस्टाच्या तिकिटांवर पाकिस्तानच्या संस्थापकांचा फोटो सर्वप्रथम अधिकृतरित्या 25 डिसेंबर 1966 ला प्रकाशित झाला होता. ती 15 पैसे आणि 50 पैसे अशी दोन तिकिटं होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)