1 डॉक्टर, 300 रुग्णांच्या खूनाचा आरोप आणि निर्दोष सुटका, काय होतं प्रकरण?

फोटो स्रोत, Getty Images
आज आपल्यापैकी अनेकांनी डॉक्टर जॉन बोडकिन अॅडम्सबद्दल ऐकलं नसेल. पण 1950 च्या दशकात युरोपियन वृत्तपत्रांसाठी ते 'हेडलाईन मटेरियल' होते.
ते इंग्लंडच्या आग्नेय किनारपट्टी भागातील ईस्टबोर्न इथं डॉक्टर होते. पैशांसाठी त्यांनी आपल्या 100 हून अधिक रुग्णांची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान 310 मृत्यू प्रमाणपत्रांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी 163 मृत्यू प्रमाणपत्रांचे कसून विश्लेषण करण्यात आलं.
300 जणांचा खून केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर लावल्याची अफवा पसरली होती.
जेन रॉबिन्स लिखित 'क्युरियस हॅबिट्स ऑफ डॉ. अॅडम्स' या पुस्तकानुसार, डॉ. अॅडम्स यांचं नाव त्यांच्या 132 रुग्णांच्या मृत्यूपत्रात नोंदवलेलं होतं.
डॉक्टरांनी आपल्या रुग्णांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यांना 19 डिसेंबर 1956 रोजी अटक करण्यात आली. 18 मार्च 1957 रोजी खटला सुरू झाला आणि तो 17 दिवस चालला.
पण, डॉक्टरांवरील आरोप सिद्ध होऊ न शकल्याने त्यांना निर्दोष घोषित करण्यात आलं आणि 4 एप्रिल रोजी त्यांची सुटका झाली. वृत्तपत्रांनी या खटल्याला 'शतकाचा खून खटला' असं म्हटलं.
रुग्णांच्या मृत्यूपत्रात डॉ. अॅडम्स यांचं नाव
डॉ. अॅडम्स 1922 मध्ये नॉर्दर्न आयर्लंडमधून ब्रिटनमधील ईस्टबोर्न इथं आले. त्यांनी ईस्टबोर्नमध्ये बराच काळ प्रॅक्टिस केली आणि मग ते इंग्लंडमधील सर्वांत श्रीमंत डॉक्टरांपैकी एक बनले.
डॉ. अॅडम्स यांच्या मृत्यू झालेल्या रुग्णांनी मृत्यूपत्रात त्यांचं नाव जोडलं होतं, असा आरोप तपासादरम्यान करण्यात आला.
13 नोव्हेंबर 1950 रोजी एडिथ एलिस मोरेल या त्यांच्या रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला.
यावेळी सरकारी वकिलानं आरोप केला की, "तिचा मृत्यू झाला तेव्हा ती 81 वर्षांची होती. तिने 1,57,000 युरो आणि तिची रोल्स रॉयस डॉ. अॅडम्स यांना दिली होती."
सिबिल बेडफोर्ड लिखित 'द ट्रायल ऑफ डॉ. अॅडम्स' या पुस्तकात याचा उल्लेख आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या खटल्याच्या सुनावणी न्यायमूर्ती पॅट्रिक डेव्हलिन यांच्यासमोर झाली होती. 1985 मध्ये त्यांनी या खटल्यावर आधारित 'इझिंग द पासिंग' नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं परीक्षण प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉ. जे.जी. गोव्ह यांनी केलं. एका न्यायमूर्तीनं 25 वर्षांनंतर खटल्याबाबत का लिहिलं, असा प्रश्न वाचकांना पडेल, असं त्यांनी नमूद केलं होतं.
"डॉ. अॅडम्स हे एक उत्तम डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या रूग्णांचा, विशेषत: वृद्धांचा विश्वास संपादन केला होता. पण, त्यांनी धोकादायक औषधांचे भारी डोस लिहून दिल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे.
"हे पुस्तक लिहून 25 वर्षांनंतर न्यायमूर्ती आपला निकाल योग्य आहे का, असा प्रश्न सार्वजनिकपणे विचारत आहेत का? जर आता खटला चालवला गेला तर नवीन पुरावे समोर येतील का आणि वेगळा निकाल लागेल का?" असा सवाल त्यांनी केला होता.
खटल्यादरम्यान असा आरोप करण्यात आला की, डॉक्टर वृद्ध आणि मरणासन्न रुग्णांकडून त्यांच्या मर्जीनुसार इच्छापत्र करुन घ्यायचे आणि नंतर रुग्णाला ठार मारायचे. डॉक्टर 'सीरियल किलर' असल्याचा आरोपही करण्यात आला.
'याला खून म्हणता येईल का?'
डॉक्टरांच्या देखरेखीखाली मरण पावलेल्या 163 रूग्णांच्या मृत्यूपैकी पोलिसांनी 23 मृत्यूंबद्दल चौकशी सुरू केली. यात मुख्यत्वेकरून असे रुग्ण होते ज्यांनी त्यांची संपत्ती डॉ. अॅडम्स यांना दिल्यावर त्यांचा मृत्यू झाला होता.
सिबिल बेडफोर्डच्या 'द ट्रायल ऑफ डॉ. अॅडम्स'नुसार, डॉ. अॅडम्स यांना 19 डिसेंबर 1956 रोजी सकाळी अटक करण्यात आली. डॉ. अॅडम्स यांना हे जाणून घ्यायचे होते की, त्यांना का अटक करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले होते, "खून? तो खून होता हे सिद्ध करता येईल का? मला वाटत नाही".
एडिथ अॅलिस मोरेलची परिचारिका स्ट्रोनेक या खटल्यात साक्षीदार होती. स्ट्रोनेकचा आरोप आहे की, डॉ. अॅडम्सने एडिथला मॉर्फिन आणि हिरोईनचा खूप जास्त डोस दिला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Getty Images
खटल्याच्या शेवटी डॉ. अॅडम्स यांना स्पष्टीकरण देण्याची संधी देण्यात आली.
"खून? याला खून म्हणता येईल का? ती मरत होती, तिच्या वेदना कमी करून मी तिला मरण्यासाठी मदत केली. मी फक्त तिच्या मरणाच्या वेदना कमी करत होतो. ती कोणत्याही क्षणी मरू शकत होती, मी तिला वेदनारहित मृत्यू देऊन तिची मदत केली", असं डॉ.अॅडम्स यांनी म्हटलं होतं.
निकालाच्या दिवशी न्यायमूर्ती डेव्हलिन म्हणाले, "डॉ. अॅडम्स खुनी आहेत हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही सबळ पुरावे नाहीत. सादर केलेले पुरावे त्यांना दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नाहीत."
त्यामुळे डॉक्टरांना निर्दोष ठरवत त्यांची सुटका करण्यात आली.
डॉ. अॅडम्सकडे 17 खोल्यांचे घर आणि एक रोल्स रॉयस कार होती. ते इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत डॉक्टरांपैकी एक होते.
खटल्यादरम्यान 1957 मध्ये त्यांचा डॉक्टरकिचा परवाना रद्द करण्यात आला. त्यांना 1960 मध्ये पुन्हा परवाना मिळाला आणि त्यांनी त्यांची वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू ठेवली. 4 जुलै 1983 रोजी त्यांचे निधन झाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








