You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगभरातले देश चीनवर धोरणात्मक बहिष्कार का घालतायत?
चीनच्या शिनजियांग प्रांतात तयार केलेल्या वस्तू आयात केल्या तर त्या तयार करताना मजुरांची पिळवणूक करण्यात आली नसल्याचं आता अमेरिकेतल्या कंपन्यांना सिद्ध करावं लागेल. अमेरिकन काँग्रेसने तसा कायदा मंजूर केलाय.
विगर मुस्लिम बहुल प्रांत असणाऱ्या शिनजियांगमध्ये चीनतर्फे या समाजाची पिळवणूक केली जात असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. आजवर अनेकदा चीनने हे आरोप फेटाळले आहेत.
कोका-कोला, नायके आणि अॅपलसारख्या शिनजियांग प्रांतात व्यापार करणाऱ्या अनेक कंपन्यांनी अमेरिकन सरकारच्या या धोरणावर टीका केलीय.
बीजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार
अमेरिकेसह जगभरातल्या अनेक देशांनी वीगर मुसलमानांच्या पिळवणुकीच्या याच मुद्द्यावरून चीनमध्ये होऊ घातलेल्या हिवाळी ऑलिम्पिकवर धोरणात्मक बहिष्कार - Diplomatic Boycott जाहीर केलेला आहे.
अमेरिका, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, लिथुएनिया आणि कोसोवोने बीजिंग विंटर ऑलिम्पिकवर धोरणात्मक बहिष्कार जाहीर केलाय. म्हणजे या देशांचे खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होतील, पण या देशांचे कोणाही मंत्री वा अधिकारी ऑलिम्पिकला हजेरी लावणार नाहीत.
शिनजियांग प्रांतामध्ये वीगर मुसलमानांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत असून त्याच्या निषेधार्थ आपण हे पाऊल उचलत असल्याचं अमेरिकेने म्हटलं होतं.
चीनचा शेजारी देश जपानही हिवाळी ऑलिम्पिकवर असा धोरणात्मक बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. पण आपण असं करणार नसल्याचं फ्रान्स आणि दक्षिण कोरियाने स्पष्ट केलंय.
याविषयी बोलतना फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले होते,"अशी पावलं उचलणं हे प्रतिकात्मक असेल आणि त्यातून मोठं काही साध्य होणार नसेल, तर या मुद्दयांचं राजकारण करावं असं मला वाटत नाही."
अमेरिकेने 6 डिसेंबरला त्यांचा हिवाळी ऑलिम्पिकवरचा धोरणात्मक बहिष्कार जाहीर केला. आपण या निर्णयाचा आदर करतो, पण त्याने खेळ यशस्वीपणे पार पडण्यावर काही परिणाम होणार नसल्याचं ऑलिम्पिक समितीने म्हटलं होतं.
चीनवर काय आरोप आहेत?
चीनच्या वायव्येला असणाऱ्या शिनजियांग प्रांतामध्ये वीगर मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहेत. या लोकांवर चीन सरकारद्वारे अत्याचार करण्यात येत असून तिथे मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त वीगर मुस्लिमांना ताब्यात घेण्यात आलं असून 'Re-Education Camp' च्या नावाखाली उभारण्यात आलेल्या मोठ्या तुरुंगांमध्ये या लोकांना डांबण्यात आल्याचा आरोप मानवी हक्क संघटनांनी केलेला आहे.
वीगर मुस्लिमांचा वापर कामगार म्हणून जबरदस्तीने करण्यात येत असून महिलांच्या बळजबरीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिय करण्यात येत असल्याचे पुरावेही समोर आले होते.
आपला शारीरिक आणि लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोपही या कॅम्प्समध्ये डांबण्यात आलेल्या माजी बंधकांनी केला होता.
यासोबतच हाँगकाँग नॅशनल सिक्युरिटी लॉ सारखे कायदे आणत हाँगकाँगमधल्या लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा आरोपही चीन सरकारवर आहे.
ह्युमन राईट्स वॉच या संस्थेने 2021च्या त्यांच्या वार्षिक अहवालात म्हटलंय, "चीन कम्युनिस्ट पक्षासोबत लोकांनी निष्ठा दाखवावी यासाठी सरकारकडून देशभरातला दबाव वाढलेला आहे."
चीन सरकारने हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
चीनचा प्रतिसाद काय?
शिनजियांग प्रांतामध्ये कोणत्याही प्रकारे मानवी हक्कांचं उल्लंघन होत नसल्याचं चीनने सातत्याने म्हटलंय. शिवाय चीनवर हाँगकाँगसारख्या चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये असा इशाराही त्यांनी त्यांच्यावर वारंवार आरोप करणाऱ्या अमेरिका आणि जर्मनीसारख्या देशांना दिला आहे.
अमेरिकेने बीजिंग ऑलिम्पिकवर धोरणात्मक बहिष्कार टाकल्यानंतर त्याविषयीही चीनने कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
'अमेरिकेने ऑलम्पिकच्या भावनांचं उल्लंघन केलं असून अशी चुकीची पावलं उचलण्याची किंमत त्यांना मोजावी लागेल,' असं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं होतं. पण चीन याबद्दल नेमकी काय पावलं उचलणार, हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
चीनमधल्या वीबो या सोशल मीडिया अॅपवर अमेरिका विरोधी हॅशटॅग्स ट्रेंड होत होते.
बीजिंग विंटर ऑलिम्पिक कधी आहे?
4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीच्या काळात बीजिंगमध्ये विंटर ऑलिम्पिक स्पर्धा होतील, तर 4 मार्च 13 मार्चे या काळात पॅरालिम्पिक होतील.
चीन सरकार आणि चीनमधले उद्योग मिळून या ऑलिम्पिकवर 3.9 अब्ज डॉलर्सचा खर्च करत आहेत. बीजिंग आणि आसपासच्या शहरात या ऑलिम्पिक इव्हेंट होतील.
यामधील 109 विविध इव्हेंट्समध्ये सुमारे 3,000 अॅथलीट सहभाही होतील. एकूण 736 स्पर्धक पॅरालिम्पिकच्या 78 विविध इव्हेंट्समध्ये सहभागी होतील.
बीजिंगमध्ये फारशी बर्फवृष्टी होत नाही म्हणून स्पर्धेचे आयोजक तब्बल 12 कोटी क्युबिक मीटर खोटा बर्फ या स्पर्धांच्या ठिकाणी फवारतील.
लोकांना या खेळांच्या ठिकाणी नेण्यासाठी चीनने नवीन हायस्पीड रेल्वे लाईनही उभारली आहे. पण कोव्हिडच्या निर्बंधांमुळे हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा या फारशा प्रेक्षकांविना पार पडतील. सध्याच्या नियमांनुसार चीनच्या मुख्यभूमीवर राहणारे आणि कोव्हिड नसणारे लोकच ऑलिम्पिक स्थळी जाऊ शकतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)