You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीन: शी जिनपिंग यांना आधुनिक चीनचा 'हिरो' बनवणारा 'ऐतिहासिक प्रस्ताव' पारित
- Author, वाई यिप
- Role, बीबीसी प्रतिनिधी
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या राजकीय इतिहासात राष्ट्रपती शी जिनपिंग यांची जागा मजबूत करण्यासाठी एक 'ऐतिहासिक प्रस्ताव' मंजूर केला गेला आहे.
या दस्तऐवजात पक्षाच्या गेल्या 100 वर्षांच्या इतिहासाचा सारांश, पक्षप्रमुखांची कामगिरी आणि भविष्यातल्या दिशांची चर्चा केली गेली आहे.
कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाल्यापासून अशा प्रकारचा प्रस्ताव फक्त तिसऱ्यांदा पारित झालेला आहे. सगळ्यात पहिला प्रस्ताव माओ त्से तुंग यांनी 1945 साली आणि दुसरा प्रस्ताव देंग शियाओपिंग यांनी 1981 मध्ये पारित केला होता.
या ताज्या प्रस्तावाला गुरुवारी, 11 नोव्हेंबरला पक्षाच्या सहाव्या महाअधिवेशनात पारित केलं. या अधिवेशनाला चीनच्या सगळ्यात महत्त्वाच्या राजकीय कार्यक्रमांपैकी एक मानलं जातं.
अशा तऱ्हेचा प्रस्ताव पारित करणारे शी जिनपिंग चीनचे फक्त तिसरे नेते ठरले आहेत. पक्षाने हे पाऊल उचलण्याचा उद्देश शी जिगपिंग यांना पक्षाचे संस्थापक माओ त्से तुंग आणि त्यांचे उत्तराधिकारी देंग शियाओपिंग यांच्या समतुल्य उभं करणं आहे.
"मागच्या दोन प्रस्तावांप्रमाणेच, हा प्रस्तावही पक्षाचे सिद्धांत, इच्छाशक्ती आणि कृती यांना एकत्रित करण्यात मोलाची भूमिका बजावेल. यामुळे भविष्यातली प्रगती निश्चित करता येईल," असं कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ अधिकारी क्यू क्विंगशान यांनी म्हटलं.
अनेक पर्यवेक्षकांचं म्हणणं आहे की हा प्रस्ताव देंग शियाओपिंग यांच्या काळात चीनमध्ये सुरू केलेल्या विकेंद्रीकरणाच्या हालचालींना मागे घेण्याचा प्रयत्न आहे.
गेल्या चार दशकांपासून देशात विकेंद्रीकरणाचे प्रयत्न होत आहेत. आता ताज्या गोष्टींवरून वाटतंय की चीनचं राजकारण पुन्हा व्यक्तीकेंद्रीत व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
बंद दाराआड होणाऱ्या या चार दिवसांच्या अधिवेशनात पक्षाच्या 19 व्या केंद्रीय समितीचे 370 हून अधिक पूर्णवेळ आणि वैकल्पिक सदस्य जमा झाले. पक्षाची केंद्रीय समिती देशातल्या उच्चपदस्थ नेत्यांचा समूह आहे.
पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसच्या आधी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची ही शेवटची मोठी बैठक होती. येत्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये (बैठक) शी जिनपिंग राष्ट्रपती म्हणून तिसऱ्यांदा कार्यकाळ मिळावा हा प्रयत्न करतील.
याआधी 2018 साली राष्ट्रपती पदासाठी दोन कार्यकाळांची निर्धारित सीमा मागे घेतली होती. यामुळे शी आता आजीवन आपल्या पदावर कायम राहू शकतात.
हा प्रस्ताव इतका महत्त्वाचा का?
बीबीसीशी बोलताना तज्ज्ञांनी सांगितलं की हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे चीनच्या सत्तेवर शी यांची पकड मजबूत होईल. ते अनिवार्य ठरतील.
चीनमधलं न्यूजलेटर चाईन नीकनचे संपादक एडम नी यांनी म्हटलं की, "चीनच्या आजवरच्या प्रवासातले नायक म्हणून शी जिगपिंग स्वतःला स्थापित करू इच्छितात."
एडम म्हणतात, "या ऐतिहासित प्रस्तावाला पुढे करत त्यांनी स्वतःला पक्ष आणि आधुनिक चीनच्या भव्य गाथेत जागा केली आहे. शी शक्तीप्रदर्शन करत आहेत. हा प्रस्ताव त्यांचा स्वतःला सत्तेत कायम ठेवण्यासाठी मार्ग आहे."
सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटीचे डॉ चोंग जा इयान यांनी म्हटलं की या घटनेमुळे शी जिगपिंग इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरले आहेत.
डॉ. चोंग यांनी म्हटलं, "देशाचे आधीचे नेते हू जिंताओ आणि जियांग जेमिन यांच्याकडे शी जिगपिगंसारखे एकत्रित अधिकार कधीच नव्हते. सध्याच्या काळात शी जिगपिंग यांच्यावर खूप भर दिला जातोय.
देंग शियाओपिंग आणि माओ त्से तुंग या दोन्ही नेत्यांनी जेव्हा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर केले होते तेव्हा त्याचा वापर इतिहासाशी असलेले दुवे तोडून टाकण्यासाठी केला गेला.
पहिला प्रस्ताव 1945 साली माओ त्से तुंग यांनी पारित केला. यामुळे माओंचं नेतृत्व मजबूत झालं. परिणामी 1949 साली पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्थापनेची घोषणा करताना त्यांच्याकडे सर्वाधिकार होते.
देंग शियाओपिंग यांनी 1978 साली पदभार सांभाळला. त्यानंतर 1981 साली त्यांनी दुसरा ऐतिहासिक प्रस्ताव पारित केला. यात त्यांनी 1966 ते 1976 च्या काळात चीनमध्ये झालेल्या सांस्कृतिक क्रांतीवर टीका केली. त्यांनी माओंच्या चुकांवर टीका केली ज्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यांनी चीनच्या आर्थिक सुधारणांचा पाया घातला.
पण एडम नी म्हणतात की आधी जे प्रस्ताव आले त्यांचा उद्देश वेगळा होता. ताज्या प्रस्तावाचा उद्देश जे चालू आहे ते तसंच चालू राहावं असा आहे.
जिगपिंग यांचा प्रस्ताव त्या टप्प्यावर आलाय जेव्हा चीन जगातली एक महाशक्ती बनला आहे. काही दशकांपूर्वी ही गोष्ट फक्त कल्पनेतच शक्य होती.
ते म्हणतात, "अनेक अर्थांनी शी यांच्या नेतृत्वात चीनची कम्युनिस्ट पार्टी आणि चीन शिखरावर पोहचला आहे."
पण तरीही जाणकारांचं म्हणणं आहे की राजकारणात 'कधीही, काहीही होऊ शकतं." म्हणजे येत्या काळात शी जिगपिंगच सत्तेत राहतील याचे कितीही संकेत मिळत असले तरी काहीही होऊ शकतं.
नी म्हणतात, "चीनचं अभिजन राजकारण पारदर्शक नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)