You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
म्यानमार : आँग सान सू ची यांना आणखी 7 वर्षांची शिक्षा
म्यानमारच्या लष्करी न्यायालयानं आँग सान सू ची यांना आणखी 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या नव्या शिक्षेमुळे आँग सान सू ची यांची एकूण शिक्षा 33 वर्षे झाली आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये म्यानमारच्या लष्कराने सरकार उलथवल्यानंतर लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या आँग सान सू ची यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यानंतर आँग सान सू ची यांच्यावर 19 आरोपांबद्दल 18 महिने खटला चालला. मानवाधिकार समूह या खटल्याकडे केवळ दिखावा म्हणून पाहतात.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं गेल्याच आठवड्यात आँग सान सू ची यांच्या सुटकेची मागणी केली होती.
म्यानमारमधील लष्करी न्यायालयानं आँग सान सू ची यांना दोषी ठरवलं. कारण त्यांनी एका मंत्र्यासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेताना नियमांचं पालन केलं नाही, असा आरोप ठेवण्यात आला होता.
यापूर्वीही आँग सान सू ची यांना 14 वेगवेगळ्या आरोपांखाली शिक्षा सुनावण्यात आलीय. यात कोव्हिड सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन, वॉकी-टॉकी आयात करणं आणि गोपनियतेचं भंग करणं अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
यंदा आँग सान सू ची यांच्यावरील खटला बंद खोलीत झाला. तिथे जनता किंवा माध्यमांना जाण्यास बंदी होती. शिवाय, आँग सान सू ची यांच्या वकिलांनाही पत्रकारांना माहिती देण्यास बंदी घालण्यात आली होती.
आँग सान सू ची यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. 77 वर्षीय नोबेल विजेत्या आँग सान सू ची यांनी त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ नजरकैदेतच घालवला आहे.
कोण आहेत आँग सान सू ची
म्यानमारला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रणी आँग सान यांची लेक म्हणजे आँग सान सू ची. सू ची या दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली. 1948मध्ये म्यानमारला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं त्याच्या काही दिवस आधीच हे घडलं.
सू ची यांच्याकडे एकेकाळी मानवाधिकारांच्या पाईक यादृष्टीने पाहिलं जात असे. म्यानमारमधील लष्करी प्रशासनाविरोधात त्यांनी स्वत:च्या स्वातंत्र्याचा त्याग केला होता.
1991मध्ये सू ची यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी त्या नजरकैदेत होत्या. सत्ता हाताशी नसताना सशक्त असण्याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे, असं नोबेल समितीने त्यावेळी म्हटलं होतं.
1989 ते 2010 या कालावधीत सू ची नजरकैदेत होत्या.
2015मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाचं नेतृत्व केलं. या पक्षाने निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.
म्यानमारच्या संविधानानुसार सू ची राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत कारण त्यांच्या मुलांनी परदेशी नागरिकत्व घेतलं आहे. मात्र 75 वर्षीय सू ची यांच्याकडे देशाच्या नेत्या म्हणूनच पाहिलं जातं.
प्रशासकपदी नियुक्ती झाल्यापासून रोहिंग्या मुस्लिमांना देण्यात आलेल्या वागणुकीसंदर्भात सू ची यांचं सरकार वादाच्या केंद्रस्थानी आहे.
2017मध्ये रखाईन प्रांतात लष्कराच्या कारवाईने पोलीस ठाण्यांवर करण्यात आलेल्या हिंसक हल्ल्यांनंतर हजारो रोहिंग्यांनी म्यानमारमधून पळ काढत बांगलादेशमध्ये आश्रय घेतला.
बलात्कार, खून रोखण्यासाठी सू ची यांनी काहीही केलं नसल्याचा आरोप एकेकाळच्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय समर्थकांनी केला. लष्कराने केलेल्या कारवाईचा सू ची यांनी निषेध न केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
पुढारलेल्या विचारांच्या राजकारणी अशी सू ची यांची प्रतिमा होती. बहुविध वंश, वर्ण, इतिहास लाभलेल्या देशाचं त्या नेतृत्व करत आहेत अशी धारणा होती. मात्र 2019मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांनी ज्या पद्धतीने लष्करी कारवाईचं समर्थन केलं त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला.
म्यानमारमध्ये बहुसंख्य अशा बौध्द समाजात सू ची प्रचंड लोकप्रिय आहेत. रोहिंग्या मुस्लिमांचा मात्र त्यांना फारसा पाठिंबा नाही.
म्यानमारविषयी थोडक्यात
म्यानमारला पूर्वी बर्मा म्हणून ओळखलं जायचं. 1948 साली म्यानमार ब्रिटीशांपासून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर म्यानमार बहुतांश काळ लष्करी सत्तेच्या अधिपत्याखाली राहिला आहे.
सैन्याचे निर्बंध 2010 पासून कमी व्हायला लागले. 2015 मध्ये म्यानमारमध्ये मुक्त निवडणुका झाल्या. त्याच्या पुढच्या वर्षी आँग सान सू ची यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही सरकार स्थापन झालं.
2017 साली म्यानमारमधल्या रोहिंग्या कट्टरतावाद्यांनी पोलिसांवर हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून म्यानमारच्या सैन्याने रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधात कारवाई सुरू केली. यामध्ये 5 लाख रोहिंग्या मुस्लिमांना शेजारच्या बांगलादेशात निर्वासित व्हावं लागलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)