Omicron : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या धास्तीने 'या' देशांनी लादले निर्बंध

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटच्या भीतीपोटी जगभरातील देशांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. यात प्रामुख्यानं प्रवासावरील निर्बंधांचा समावेश आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचा नवा ओमिक्रॉन विषाणू हा चिंतेचा विषय असल्याचं आधीच सागितलं आहे. कोरोना विषाणूचं अनेकवेळा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेलं या आढळून आलं आहे.
यानंतर जगभरातील देशांनी प्रवासाशी संबंधित काही नियम आखले आहेत. इस्रायल, पाकिस्तान आणि इंग्लंड या देशांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, तर इतर देशांनीही खबरदारी म्हणून विविध पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
पण दक्षिण आफ्रिकेनं याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसंच WHO नं देखील घाईघाईत प्रवास निर्बंध लादणाऱ्या देशांनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून निर्णय घ्यावे असं म्हटलं आहे.
इस्रायलध्ये परदेशी प्रवाशांना बंदी?
जगभरातील देशांनी कोरोनाच्या नव्या विषाणूचा धसका घेत दक्षिण आफ्रिकेतून प्रवासावर निर्बंध आणले. मात्र इस्रायलनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. परदेशातील नागरिकांच्या देशातील प्रवेशावर 14 दिवसांसाठी बंदी लावण्याच्या विचारात इस्रायल आहे.

फोटो स्रोत, Reuters
देशात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारीसाठी इस्रायलनं हा निर्णय घेतल्याचं स्थानिक माध्यमांचं मत आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर रविवारी (28 नोव्हेंबर) मध्यरात्रीपासून हे निर्बंध लादले जाऊ शकतात.
इस्रायलमध्ये या नव्या व्हेरिएंटचा आतापर्यंत एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळं इस्रायलचे नागरिक नसणाऱ्यांच्या प्रवासावर तर निर्बंध असतीलच, पण इस्रायलचा नागरिक असेल आणि लसीकरण झालं असेल तरी त्यांना तीन दिवस विलगीकरणात राहावं लागेल. तर लसीकरण झालेलं नसणाऱ्यांसाठी सात दिवसांच्या विलगीकरणाचा निय्म असेल.
अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये आतापर्यंत कोरोनामुळं 8100 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. तर 13 लाखापेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
पाकिस्तानचे सात देशांवर प्रवास निर्बंध
पाकिस्तानच्या नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटर (एनसीओसी) च्या अधिसूचनेनुसार ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका पाहता, सात देशांवर प्रवासासंबंधी निर्बंध लागू केले आहेत.
यानुसार दक्षिण आफ्रिका, लेसोथो, इस्वातिनी, मोझाम्बिक, बोत्सवाना आणि नामिबियामधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या देशांचा 'सी' श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचा अर्थ म्हणजे या देशांसाठी निर्बंध असून ते केवळ विशिष्ट एनसीओसी दिशानिर्देशांनुसारच पाकिस्तानात प्रवास करू शकतील.
पाकिस्तानात येणाऱ्यांकडे लसीकरण प्रमाणपत्र, प्रवासाच्या 72 तासांपूर्वीच्या चाचणीचा अहवाल असणं गरजेचं असेल. सोबतच पाकिस्तानच्या विमानतळावरही अँटिजेन टेस्ट होईल, असं सांगण्यात आलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
टेस्ट निगेटिव्ह आली तरी तीन दिवस विलगीकरण आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा टेस्ट करावी लागेल. पॉझिटिव्ह असलेल्यांना 10 दिवस विलगणीकरणात राहावं लागेल.
ब्रिटनमध्ये कठोर निर्बंध
ब्रिटननं दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करणाऱ्यांवर बंदीबरोबर देशामध्येही कोरोनाचे नियम अधिक कठोर केले आहेत.
पुढील आठवड्यापासून दुकानात खरेदी करताना आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना, मास्क परिधान करणं अनिवार्य असेल, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
त्याशिवाय विदेशातून येणाऱ्यांची पीसीआर चाचणी केली जाईल. नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्यास त्याचं लसीकरण झालं असलं तरी विलगीकरणात जावं लागेल.
मात्र, 2020 च्या तुलनेत यंदा ख्रिसमसचं सेलिब्रेशन अधिक चांगलं होईल असं जॉन्सन यांनी म्हटलं आहे.
'कौतुकाऐवजी शिक्षा दिली'
दक्षिण आफ्रिकेनं या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत माहिती दिली म्हणून कौतुक व्हायला हवं, तर उलट आम्हाला शिक्षा दिली जात आहे, असं आफ्रिकेनं म्हटलं आहे.
दक्षिण आफ्रिकेनं याबाबत जगाला माहिती दिली म्हणून सगळे आमच्यावर निर्बंध लावत आहेत, असं दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
WHO ला या व्हेरिएंटच्या पहिल्या रुग्णाची माहिती 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेकडून मिळाली होती. त्याशिवाय बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्येही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








