8000 चायनीज रेस्तरॉमध्ये पदार्थांची चव घेणारी व्यक्ती म्हणते...

डेव्हिड आर चॅन

फोटो स्रोत, COURTESY OF DAVID R.CHAN

फोटो कॅप्शन, डेव्हिड आर चॅन
    • Author, झाओयिन फेंग
    • Role, बीबीसी न्यूज

अमेरिकेतील अनेक लोकांना चायनीज पदार्थ आवडतात. मात्र, डेव्हिड आर चॅन यांच्यासाठी चायनीज पदार्थांचं वेगळंच महत्त्व आहे.

लॉस एंजल्समध्ये राहणारे 72 वर्षीय चॅन हे माजी कर सल्लागार वकील आहे. त्यांनी आतापर्यंत अमेरिकेतील जवळपास 8 हजार चायनीज रेस्तरॉमध्ये पदार्थांचा आस्वाद घेतला असून हा सिलसिला सुरुच असल्याचा त्यांचा दावा आहे.

अनेक दशकांपासून त्यांनी यापैकी प्रत्येक रेस्तरॉमधील पदार्थांच्या संदर्भातील माहिती गोळा केली आहे. त्याचबरोबर हजारो रेस्तरॉचे बिझनेस कार्ड्स आणि मेन्यूचाही त्यात समावेश आहे.

आपण जर रोज एका चायनीज रेस्तरॉला भेट दिली तर त्यांच्या सध्याच्या आकड्यापर्यंत म्हणजे 7812 रेस्तरॉचा आकडा गाठायला आपल्याला 20 वर्षे लागतील.

या 5 वर्षांच्या काळात त्यांनी पायनॅपल बनपासून ते, डुकराचे मांस, चिकन फीट (कोंबडीचे पाय), टी स्मोक्ड डक (बदक) अशा विविध पदार्थांची चव चाखली आहे. चॅन हे रोज त्यांनी जमवलेली माहिती सोशल मीडियावरही शेअर करतात.

चायनीज-अमेरिकन म्हणून स्वतःचा शोध घेण्यासाठी चॅन यांच्या या खाद्य प्रवासाची सुरुवात झाली होती. पण अनेक वर्षांच्या या सातत्यामुळं चॅन हे अमेरिकेतील चिनी खाद्य पदार्थांबरोबरच चिनी संस्कृतीच्या बदलाचे साक्षीदारही बनले आहेत.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

चॅन हे चिनी खाद्य पदार्थांचे परीक्षक नाहीत. तसंच त्यांना खाण्याची खूप आवड आहे असंही नाही. विशेष म्हणजे त्यांना अजूनही चॉपस्टिकचा वापरही करता येत नाही. त्यांनी कॅफेन टाळण्यासाठी चहा सोडला असून कमी साखरयुक्त आणि कमी कोलेस्टेरॉलयुक्त आहाराचा अवलंब त्यांनी केला आहे.

पण त्यामुळं ते थांबले नाहीत.

पहिल्यांदा आवडले नाही

चॅन यांचे आजी आजोबा हे चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातून अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक झाले होते. पण असं असलं तरी चॅन यांना लहानपणी कधीही चायनीज पदार्थ खायला मिळाले नाही. त्यांनी प्रथमच चायनीज फेअरला भेट दिली, तेव्हा त्यांना चायनीज पदार्थ फारसे आवडलेही नव्हते.

चॅन यांना 1950 मध्ये सर्वप्रथम चायनीज खाण्याचा योग आला तेव्हाच्या आठवणी ते सांगतात. "ते पदार्थ फारसे आवडणारे किंवा चांगले नव्हते. आम्ही कार्यक्रमांना जायचो तेव्हा मी केवळ सोया सॉस आणि भात याशिवाय दुसरं काहीही खात नव्हतो," असं ते म्हणाले.

19 व्या शतकाच्या मध्यामध्ये अमेरिकेत सर्वप्रथम चायनीज पदार्थ चीनमधून आलेल्या स्थलांतरीतांनी तयार केले होते. हे सर्व चिनी संपत्ती जमवण्याची स्वप्ने घेऊन अमेरिकेत आले होते. 1849 मध्ये अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पहिलं चायनीज रेस्तरॉ कँटॉन रेस्तरॉची सुरुवात झाली.

अमेरिकेत सुरुवातीला आलेले चिनी स्थलांतरीत हे प्रामुख्यानं दक्षिण चीनमधील ग्रामीण कँटोनीज काऊंटी टोईसॅनमधले होते. सागरी भागातील या नागरिकांमध्ये प्रामुख्यानं बोटीनं प्रवास करण्याची परंपरा होता. पण रक्तरंजित संघर्ष आणि आर्थिक संकटामुळं त्यांच्यावर अमेरिकेत स्थलांतरीत होण्याची वेळ आली.

चायनीज रेस्तरॉमधील पदार्थ

फोटो स्रोत, Getty Images

चॅन यांनी पहिल्यांचा टॉप सुईची चव घेतली तोपर्यंत अमेरिकेत तुलनेनं कमी प्रमाणात चायनीज-अमेरिकनची लोकसंख्या (एकूण लोकसंख्येच्या 0.08 टक्के) होती. त्यापैकी बहुतांश हे टोईसॅनमधून आलेले होते.

"हे अत्यंत कमी प्रतिनिधित्व होतं. जणू चीनमधील सर्व अमेरिकन हे लॉस एंजल्सपासून 100 मैल अंतरावरील एका छोट्याशा गावातील असावेत, अशी स्थिती होती," असं चॅन म्हणाले. त्याचा परिमाण म्हणजे सुरुवातीच्या काळातील अमेरिकन-चायनीज पदार्थांत दोन्ही खाद्यसंस्कृती एकरुप झालेल्या असायच्या. स्थानिक साहित्य वापरून अमेरिकेसारखी चव असलेले हे पदार्थ तयार केले जायचे.

मात्र, हळूहळू 1960 च्या दशकात यात बदल व्हायला सुरुवात झाली. नवीन कायद्यामुळं आशियातून होणाऱ्या स्थलांतरावरील निर्बंध हटवण्यात आली. त्यामुळं अमेरिकेत प्रामुख्यानं चीन, हाँगकाँग आणि तैवानमधून जाणाऱ्या स्थलांतरीतांचा ओघ मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. त्यामुळं केवळ कँटोनीजच नव्हे तर चीनमधील इतरही प्रादेशिक पदार्थ, पाककृती त्यांच्याबरोबर अमेरिकेत आल्या.

दरम्यानच्या काळात अमेरिकेत मानवी हक्क चळवळीचा जोर वाढला होता. त्यावेळी कॉलेजात शिकणाऱ्या चॅन यांना त्यातून प्रेरणा मिळाली. त्यांनी चिनी-अमेरिकन वारसा शोधण्यास सुरुवात केली.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि चीनचे तत्कालीन पंतप्रधान झोऊ एनलाई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि चीनचे तत्कालीन पंतप्रधान झोऊ एनलाई

1960 च्या दशकात त्यांनी स्थानिक यलो पेजेसमध्ये असलेल्या चिनी रेस्तरॉमध्ये विविध पदार्थांचा आस्वाद घेणं सुरू केलं.

"सुरुवातीला हे सर्व केवळ स्वतःचा शोध घेण्यासाठी सुरू झालं होतं. अमेरिकेतील चीनच्या इतिहासाच्या आवडीमुळं मी चायनीज पदार्थांकडे खेचला गेलो. देशाच्या विविध भागात नेमकं चिंनी नागरिकांचं अस्तित्व कसं आहे, हे त्यामुळं जाणून घेता आलं," असं चॅन म्हणाले.

यातून त्यांनी खाद्यपदार्थांमध्ये असलेल्या वैविध्याबाबत महत्त्वाची माहिती मिळवली. यात एवढं वैविध्य आहे याची त्यांना आधी कल्पनाच नव्हती, असं ते सांगतात.

कँटोनीज पदार्थ हे एका घासाच्या आकारातील पदार्थ असलेल्या डीम सम डिशेससाठी ओळखले जातात. नैसर्गिक चव मिळावी म्हणून त्यावर अगदी कमी प्रमाणात मसाले आणि इतर साहित्य वापरलं जातं. फुजियानी पदार्थांमध्ये शक्यतो सीफूड आणि मांसाचा रस्सा दिला जातो. हा भाग किनारपट्टीलगतचा आहे. तर सिच्युआनीज पदार्थ हे मोठ्या प्रमाणावर काळेमीरे आणि लाल मिरचीच्या वापरासाठी प्रसिद्ध आहेत.

कर सल्लागार, वकील म्हणून प्रदीर्घ कारकीर्दीत चॅन अनेकदा व्यावसायिक प्रवासासाठी अमेरिकेतील विविध राज्यांबरोबर कॅनडा आणि आशियामध्ये जायचे. त्याठिकाणचे चायनीज पदार्थही त्यांनी चाखले आणि त्याची नोंद घेतली.

अस्सल चायनीज पदार्थ मिळणारं अमेरिकेतील सर्वात उत्तम ठिकाण म्हणजे लॉस एंजल्समधील गॅब्रियल व्हॅली असल्याचं चॅन सांगतात. मात्र, डिम-सम डिशसाठी सॅन फ्रान्सिस्को उत्तम असल्याचं ते म्हणाले.

त्यांना एकदा मिसिसिपीच्या क्लार्क्सडेलमध्ये अनपेक्षितपणे अत्यंत उत्तम असं चाऊमीन मिळालं होतं. याठिकाणी 200 वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक चायनीज अमेरिकन समुदाय आहेत. त्यांना सर्वाधिक न आवडलेले पदार्थ हे उत्तर डकोटामधील फार्गो येथील आहेत. "फ्राईड राईस बॉईल्ड राईस सारखा होता. त्यावर कोणीतरी सोया सॉस टाकला होता," असं चॅन म्हणाले. या शहरात कोणताही चिनी समुदाय नाही.

अमेरिकन-चायनीज पदार्थांचा उदय आणि विकास

गेल्या दशकांमध्ये विद्यापीठात चीनमधील विद्यार्थ्यांचा ओघ वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणजे अमेरिकेत चिनी पदार्थांचं लोकशाहीकरण झालं आहे, असं चॅन यांना वाटतं. आता कॉलेज असलेल्या कोणत्याही गावात चांगलं रेस्तरॉ असतं आणि त्याठिकाणच्या पदार्थांचा सगळे आस्वाद घेतात.

काही वर्षांपूर्वी आलेल्या तेजीच्या पूर्वी, अमेरिकेच्या नागरिकांची चायनीज पदार्थांबरोबर झालेली आठवणीत राहणारी पहिली भेट म्हणजे, 1972 मध्ये राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यादरम्यानची आहे.

त्यावेळी रिचर्ड निक्सन यांच्यासाठी चीनचे तत्कालीन पंतप्रधान झोऊ एनलाई यांनी बीजिंगमध्ये एका भव्य मेजवानीचं आयोजन केलं होतं. या मेजवानीचं टिव्ही वर प्रसारण करण्यात आलं होतं.

त्यावेळी लाखो अमेरिकन नागरिकांनी त्यांचे राष्ट्राध्यक्ष चॉप स्टिकच्या मदतीनं, त्यांनी यापूर्वी फारशी माहिती नसलेले पदार्थ चाखत असल्याचं टिव्हीवर पाहिलं होतं. मेन्यूमध्ये पेकिंग रोस्ट डक, फ्राईड गिब्लेट आणि कमळाच्या बीयांपासून तयार केलेल्या गोड पदार्थाचा समावेश होता.

चायनीज रेस्तरॉमधील पदार्थ

फोटो स्रोत, Getty Images

निक्सन यांच्या या दौऱ्यामुळं अमेरिकेत चायनिज पदार्थांच्या विकासासाठी वाट आणखी प्रशस्त झाली, असं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील इतिहासाचे प्राध्यापक आणि टॉप सुईचे लेखक याँग चेन म्हणाले.

चायनिज अमेरिकन रेस्तरॉ असोसिएशनच्या अंदाजानुसार सध्या अमेरिकेत एकूण चायनिज रेस्तरॉची संख्या 45 हजारांपेक्षा अधिक आहे. मॅकडॉनल्ड्स, बर्गर किंग, केंटकी फ्राईड चिकन आणि वेडीज आऊटलेट या सर्वांच्या एकत्रित संख्येपेक्षा ती अधिक आहे.

थँक्स गिव्हींग आणि ख्रिसमस सारख्या सार्वजनिक सुट्यांच्या काळात सुरू राहणाऱ्या काही मोजक्या ठिकाणांमध्ये चायनीज रेस्तरॉचा समावेश असतो. त्यामुळं कुटुंबातील जास्त सदस्यांसाठी जेवण तयार करण्याचा कंटाळा असलेल्यांसाठी ते महत्त्वाचे स्थान बनलेले आहेत.

सध्याच्या काळात अमेरिकेतील चायनिज पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या वैविध्य असलेल्या चीनच्या सर्वच भागांतील डिशेसचा समावेश आहे. अमेरिकेतील मोठ्या शहरांमध्ये मोठ्या रेस्तरॉनीदेखी चायनिज पदार्थांसाठी दारं खुली केली आहेत.

चॅन यांच्यासाठी हा प्रकार चायनिज पदार्थांविषय अधिक माहिती मिळवण्यासाठीची संधी ठरतो. किती रेस्तरॉला भेट द्यायची याचं त्यांनी लक्ष्य ठरवलेलं नाही. पण शक्य तेवढ्या अधिक रेस्तरॉला भेट देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ते सांगतात.

निवृत्तीच्या जीवनात ते नवनवीन ठिकाणी भेटी देऊन फूड ब्लॉग सुरू ठेवणार आहेत.

मात्र, त्यांच्या कौशल्याबाबत त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीला शंका आहे. त्या म्हणजे त्यांच्या पत्नी. त्या चीनच्या आहेत. लोक चॅन यांना चायनिज पदार्थांबाबत विचारतात त्याचंही त्यांना आश्चर्य वाटतं.

कारण त्यांच्या घरात स्वयंपाक त्या तयार करतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)