कोव्हिड-19 चा उगम कसा झाला? या प्रश्नाचं उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हिड-19 चा उगम नेमका कुठून झाला? हे शोधणं कधीही शक्य नसल्याचं अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी म्हटलं आहे. मात्र जैविक शस्त्र म्हणून वापरण्यासाठी ते तयार करण्यात आलं नसल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
कोरोनाचा विषाणू पसरण्यामागे प्राण्यांमध्ये माणसांमध्ये येणं किंवा प्रयोगशाळेतून लीक होणं अशा दोन्ही शक्यता असू शकतात, असं अमेरेकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभाग संचालक कार्यालयानं (ODNI)म्हटलं आहे. हे कार्यालय विषाणूच्या उगमाबाबत अभ्यास करत होतं.
मात्र, अगदी ठाम निष्कर्षावर पोहोचण्यासाठी पुरेशी माहितीच उपलब्ध नसल्याचं, त्यांनी म्हटलं आहे.
चीननं या अहवालावर टीका केली आहे.
ही माहिती एका अहवालात प्रकाशित करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनानं ऑगस्टमध्ये जाहीर केलेल्या 90 दिवसांचा आढाव्याचा पुढचा भाग म्हणजे, हा अहवाल होता.
या विषाणूच्या उगमाबाबत गुप्तचर संस्थांमध्ये एकमत नसल्याचं त्यात म्हटलं. चार संस्थांनी याचा प्रसार संसर्ग झालेल्या प्राणी किंवा विषाणूमुळं झाल्याचं मुल्यांकन केलं. पण हे मुल्यांकनं 'कमी' आत्मविश्वासावर आधारित असलेलं आहे.
तर एका संस्थेनं कोरोनाचा मानवाला झालेल्या पहिला संसर्ग हा प्रयोगशाळेतील अपघातामुळं झाला असल्याचं मत, "मध्यम" आत्मविश्वासासह मांडलं. वुहानमधील इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी या प्रयोगशाळेत प्राण्यांवरील प्रयोगाचा याच्याशी संबंध असू शकतो, असं त्यात म्हटलं आहे.
तसंच 2019 च्या अखेरीस कोरोनाचा उद्रेक होण्याच्या आधीपर्यंत चीनच्या अधिकाऱ्यांनाही या विषाणूच्या अस्तित्वाची माहिती नव्हती, असंही या अहवालात म्हटलं आहे. मात्र, चीन हा सातत्यानं जागतिक तपासात अडथळा आणत असून माहिती देण्यात टाळाटाळ करत असल्याचंही त्यात म्हटलं आहे.
कोव्हिड-19 ची सुरुवातीची काही प्रकरणं समोर आल्यानंतर चीनमधील अधिकाऱ्यांनी वुहानमधील माशांच्या मार्केटबरोबर याचा संबंध जोडला. त्यावरून हा विषाणू माणसांत प्राण्यांद्वारे आल्याचा सिद्धांत प्रमुख शास्त्रज्ञांनी मांडला.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला हा विषाणू वुहानमधील प्रयोगशाळेतून पसरला असल्याची शक्यता अमेरिकेतील विविध माध्यमांतून व्यक्त करण्यात आली. समोर येत असलेल्या विविध पुराव्यांवरून तसं वाटत असल्याचं यात म्हटलं गेलं. कदाचित अपघातानं हा विषाणू पसरला असेल अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली.
त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मे महिन्यात गुप्तचर अधिकाऱ्यांना या विषाणूचा उगम नेमका कुठून झाला याचा तपास करण्याचे आदेश दिले. चीननं प्रयोगशाळेतून विषाणू पसरल्याचं फेटाळलं होतं, तरी त्या दिशेनंही तपास करण्यात आला.
गुप्तचर संस्थांच्या या अहवालाला वॉशिंग्टनमधील चीनच्या दुतावासानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडं निवेदन देत, उत्तर दिलं आहे. "कोव्हिड-19 चा उगम शोधण्यासाठी अमेरिकेनं शास्त्रज्ञांऐवजी त्यांच्या गुप्तचर यंत्रणांवर विश्वास ठेवला. हे संपूर्ण राजकीय नाट्य आहे," असं चीनच्या दुतावासानं म्हटलं.
"विषाणू नेमका कसा आला याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे. त्यासाठी आम्ही मदत करतच राहणार आहोत. मात्र, या मुद्दयाचं राजकारण करण्यास आमचा तीव्र विरोध आहे," असं त्यात म्हटलं आहे.
जगभरात जवळपास 24 कोटी लोकांना कोरोना विषाणूचू लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर या विषाणूमुळं 49 लाखांपेक्षा अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








