INDvsPAK: पाकिस्तान संघाच्या 5 जमेच्या बाजू, ज्यामुळे भारतीय संघाला राहावं लागेल सावध

फोटो स्रोत, Gareth Copley - ECB
भारत-पाकिस्तानच्या संघांदरम्यान दरम्यान आज टी-20 विश्वचषकाचा शुभारंभाचा सामना होत आहे. हा सामना यूएईच्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होत आहे.
दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवण्यासाठी डावपेच आखण्यात व्यस्त आहेत. विजयासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची तयारी या संघांनी केली आहे.
विश्वचषक स्पर्धांचा विचार करता भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये भारताचं पारडं कायम जड राहिलं आहे. पाकिस्तानला अद्याप विश्वचषकात एकदाही भारताचा पराभव करता आलेला नाही. त्यामुळं भारत-पाकिस्तानदरम्यानच्या प्रत्येक विश्वचषकाच्या सामन्यात हा विक्रम तयार होण्याची आणि मोडण्याची शक्यता असल्यानं त्याचा दबाव कायम असतो.
पाकिस्तानच्या संघावरही हा दबाव आहे आणि दोन्ही देशांच्या सध्याच्या संबंधांमध्ये हा दबाव आणखी वाढतो.
भारतीय संघाची सध्याची कामगिरी आणि विश्वचषक स्पर्धांमधील यापूर्वीच्या सामन्याचा विचार करता भारताचा आत्मविश्वास दुणावलेला असेल. मात्र, अशीही काही कारणं आहेत जी पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचू शकतात.
यूएईमध्ये खेळण्याचा अनुभव
पाकिस्तानच्या क्रिकेटपटुंना संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे.
पाकिस्ताननं यूएईमध्ये 36 टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 25 सामने दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले आहेत. शिवाय आज होत असलेला सामनाही इथंच होत आहे.

फोटो स्रोत, Nathan Stirk
मात्र भारतानं दुबईच काय पण संपूर्ण यूएईमध्ये एकही टी20 सामना खेळलेला नाही. त्याचा फायदा पाकिस्तानला मिळू शकतो.
दुसरीकडं भारतीय क्रिकेटपटुंनीही नुकतेच यूएईमध्येच आयपीएलचे सामने खेळले आहेत. ही बाब भारतीयांसाठी फायदेशीर ठरू शकते.
बाबर आणि रिझवानची जोडी
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची सलामीची जोडी अत्यंत चांगली कामगिरी करत आहे.
पाकिस्तानी माध्यमांनी ही जोडी सईद अन्वर आणि आमीर सोहेल यांच्यानंतरची पाकिस्तानची सर्वात उत्तम सलामीची जोडी असल्याचा दावा केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बाबर-रिझवान यांच्या जोडीची सरासरी 52.10 आणि रन रेट 9.16 चा आहे.
पाकिस्तानच्या सलामी फलंदाजांना आजवर भारतीय संघाला आव्हान देता आलेलं नाही. मात्र, यावेळी चित्र वेगळं असू शकतं.
धोनीची टीममधील अनुपस्थिती
पाकिस्तानबरोबर झालेल्या सर्व आठ टी20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व धोनीनं केलं आहे. त्या आठपैकी सात सामन्यांत भारताला विजय मिळाला आहे. त्याचं श्रेय धोनीच्या नेतृत्वाला जातं.

फोटो स्रोत, Getty Images
धोनीचा अनुभव आणि नेतृत्वाचा फायदा या सामन्यात भारतीय संघाला मिळू शकणार नाही.
मात्र, विराट कोहलीनंही कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे. मात्र बदललेल्या कर्णधाराबरोबरच परिस्थितीही बदलू शकते.
विराट कोहलीवर दबाव
भारतीय कर्णधार विराट कोहलीनं टी20 विश्वचषकानंतर टी20 चं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं कोहलीच्या नऊ वर्षांच्या कर्णधारपदाची कारकिर्द संपणार आहे.

फोटो स्रोत, MATTHEW LEWIS-ICC
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 चा पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. मात्र, त्यानंतर भारतीय टीमला पुन्हा या विश्वचषकावर नाव कोरता आलेलं नाही.
विराट कोहली कर्णधार असताना हा अखेरचा टी-20 विश्वचषक होत आहे. तो जिंकणं त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
कर्णधार पदाच्या कारकिर्दीत या विश्वचषक विजयाची नोंद असावी, अशी कोहलीची इच्छा नक्कीच असेल.
शिवाय गेल्या काही काळात त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळं त्याच्यावर स्वतःच्या कामगिरीबरोबरच संघाच्या कामगिरीचाही दबाव असू शकतो.
काही वेळाचा सर्वोत्तम खेळ
टी20 सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या तुलनेत भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. मात्र, टी20 सामन्यांचा फॉरमॅट पाकिस्तानच्या संघासाठी फायदेशीरही ठरू शकतो.
या फॉरमॅटमध्ये तीन-चार तास सलग चांगली कामगिरी करत फॉर्म कायम ठेवण्याची गरज नसते.
काही चांगल्या ओव्हर आणि अर्ध्या तासाचा चांगला खेळही तुम्हाला विजय मिळवून देऊ शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








