एअर इंडिया टाटांनी विकत घेतली खरी, पण 'या' 3 आव्हानांचं काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
टाटा उद्योगसमुह एकेकाळी दावा करायचा की 'मीठ बनवण्यापासून विमान उडवण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांची कंपनी करू शकते.' हा दावा ते आता पुन्हा करू शकतात कारण एअर इंडियाची मालकी आता टाटांकडे आली आहे.
भारताची राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाच्या विक्रीसाठी लावलेल्या बोलीत सर्वाधिक बोली टाटा सन्स या उद्योगसमुहाने लावली होती.
एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे आल्यामुळे त्यांच्या गटात उत्साहाचं वातावरण आहे. याचं एक कारण म्हणजे एअर इंडियाची स्थापना जेआरडी टाटांनी केली होती.
1953 साली ही कंपनी सरकारने टाटाकडून अधिग्रहित केली पण तरीही त्याचं संचालन टाटा कंपनीच करत होती. अखेर सत्तरच्या दशकात जेव्हा जनता दलाचं सरकार आलं तेव्हा याचं व्यवस्थापन पूर्णतः टाटाच्या हातातून काढून घेतलं गेलं.
तज्ज्ञ सांगतात की एअर इंडियाचं अधिग्रहण झाल्यानंतर 1993 पर्यंत या संस्थेच्या अध्यक्षपदी एअर इंडियाचे वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असणारे उच्चपदस्थ अधिकारी नियुक्त होत होते. पण यानंतर मात्र या पदावर सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक व्हायला लागली. नागरी उड्डाण क्षेत्रातला अनुभव या लोकांकडे असेलच असं नव्हतं. जोवर ते या क्षेत्रातले खाच-खळगे समजतील तोवर त्यांची बदली व्हायची.
एअर इंडिया विकत घेतल्यानंतर टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी एक पत्रक जारी करून 'हा एक ऐतिहासिक क्षण' असल्याचं म्हटलं. ते असंही म्हणाले की देशातल्या सगळ्यात प्रमुख विमानकंपनीची मालकी मिळणं एक गौरवास्पद गोष्ट आहे.
ते म्हणाले, "प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल अशी जागतिक स्तरावरची एअरलाईन चालवावी असाच आमचा प्रयत्न आहे. महाराजाची घरवापसी ही भारतात विमान उद्योगाचा पाया घालणाऱ्या जेआरडी टाटांना खऱ्या अर्थाने श्रद्धाजंली ठरेल."
नागरी उड्डाणातली दुसरी सर्वात मोठी कंपनी
एअर इंडिया विकत घेतल्यानंतर आता टाटाकडे तीन एअरलाईन्स झाल्या आहेत. एअर विस्तारात टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्सची भागीदारी आहे. तर मलेशियाच्या एअर एशियातही टाटाची भागीदारी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एअर इंडिया विकत घेतल्यानंतर टाटा सन्स कंपनी आता देशातली देशांतर्गत नागरी उड्डाणातली दुसरी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. पहिली कंपनी इंडिगो एअरलाईन्स आहे. इंडिगो एअरलाईन्सचा एकूण बाजारातला वाटा 57 टक्के आहे. एअर इंडियाचं अधिग्रहण केल्यानंतर टाटाकडे आता बाजारातला 27 टक्के वाटा येईल.
तज्ज्ञांना वाटतं की एअर इंडियाच्या अधिग्रहणानंतर टाटा समुहासमोर काही आव्हानं उभी राहतील कारण त्यांच्याकडे आधीच दोन एअरलाईन्सचं व्यवस्थापन आहे.
नागरी उड्डाण क्षेत्रातले तज्ज्ञ आणि वरिष्ठ पत्रकार अश्विनी फडणीस यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "दोन नीट चालणाऱ्या एअरलाईन्स त्यांच्याकडे असताना आता तिसऱ्या एअरलाईनचं संचालन ते कसं करतात हे सगळ्यांत मोठं आव्हान असेल. एअर इंडियात ते जागतिक पातळीवर दिल्या जातात अशा सेवा देऊ शकतात का? हाही प्रश्न आहे. अर्थात ज्या दोन एअरलाईन्सचं संचालन टाटाकडे आहे त्यात दिल्या जाणाऱ्या सेवा उकृष्ट आहेत."
1. तोटा कसा भरून निघणार?
अश्विनी फडणीस म्हणतात, "टाटा एअर इंडियाचा तोटा कसा कमी करतील हेही एक आव्हानच आहे." ते सरकारी आकड्याचे दाखले देऊन सांगतात की एअर इंडियाला सरासरी दिवसाला 20 कोटी रुपयांचा तोटा होतो आहे. याचमुळे ही कंपनी सरकारला विकावी लागली असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
"सरकारच्या डोक्यावरचं ओझं उतरलं पण आता टाटा उद्योगसमुहासमोर आव्हान आहे की अधिग्रहणानंतर त्यांना जे काही मिळालं त्याचा ते कसा वापर करतात. तोट्यात जाणाऱ्या एअर इंडियाचा कसा कायापालट करतात. यासाठी संपूर्ण एअरलाईन्सच्या संरचनेत बदल करावा लागेल."
एअर इंडियाच्या अधिग्रहणाच्या वेळेस टाटा समुहासाठी काही अटीही घातल्या गेल्या होत्या. याबद्दल सविस्तर सांगताना भारत सरकारचे नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांनी स्पष्ट केलं की एअर इंडियाचं अधिग्रहण करणारा उद्योग समूह वर्षभर कोणत्याही कर्मचाऱ्याला काढून टाकू शकत नाही. एका वर्षानेही नोकरीवरून काढण्याऐवजी त्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय द्यायला लागेल. त्याबरोबर पीएफ आणि ग्रॅच्युईटीही द्यावी लागेल.
सद्यस्थितीत एअर इंडिया तीन भागात वाटली गेली आहे. एक एअर इंडिया इंटरनॅशनल - ज्यात परदेशी उड्डणांचं व्यवस्थापन होतं, दुसरी एअर इंडिया जी घरगुती उड्डाणांचं संचालन करते आणि तिसरी एअर इंडिया एक्सप्रेस ज्यात आखाती देश आणि दक्षिण भारतातलं राज्य केरळ यांच्याअंतर्गत होणाऱ्या उड्डाणांचं संचालन होतं.

फोटो स्रोत, Getty Images
बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाकडे 12805 कर्मचारी आहेत ज्यापैकी 4000 कंत्राटी आहेत तर 8084 परमनंट आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसकडे 1434 कायम कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणं हेही टाटासमोर एक आव्हान असेल.
2. विमानं आणायची कोठून?
आता आणखी एक मोठं आव्हान टाटासमोर आहे ज्याचा उल्लेख अश्विनी फडणीस करतात ते म्हणजे उडवायला विमानं कुठून आणायची?
एअर इंडियाकडे सध्या 107 विमानांचा ताफा आहे ज्यात लहान,मोठ्या विमानांचा समावेश आहे. यात एअरबस आणि बोईंग विमानांचाही समावेश आहे.
पण आता सगळ्या मोठ्या विमानकंपन्या विमानं विकत घेत नाहीत तर भाड्याने घेतात कारण विमान विकत घ्यायला भलीमोठी किंमत मोजावी लागते तर लीजवर घेतलेल्या विमानाचं फक्त भाडं भरावं लागतं. देशांतर्गत उड्डाणात वापरली जाणारी बोईंग-737 विमानं असोत, एअरबस किंवा ड्रीमलायनर यांचं भाडं साधारण दर महिन्याला 3.5 लाख अमेरिकन डॉलर्स इतकं असतं.
टाटा समुहासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांना 1500 प्रशिक्षित पायलट मिळतील तसंच 2000 इंजिनियरही मिळतील. पण टाटा समुहासाठी सगळ्यात फायद्याची गोष्ट म्हणजे त्यांना घरगुती आणि आंतरराष्ट्रीय़ उड्डाणांसाठी स्लॉट मिळतील.
3. स्लॉटसाठी पैसे?
विमानतळांवर विमानांची संख्या वाढतेय आणि प्रवाशांची पण. अशात प्रत्येक विमानकंपनीला विमानतळावर स्लॉट विकत घ्यावे लागतात. सोप्या शब्दात सांगायचं तर तिथे उतरण्यासाठी आणि प्रवासी भरण्यासाठी एक ठराविक जागा आणि वेळ.

फोटो स्रोत, Getty Images
भाड्याने जागा घेण्यासारखंच आहे हे. पण या स्लॉटसाठी भरमसाठ पैसे मोजावे लागतात.
एअर इंडियाचा फायदा हा आहे की त्यांच्याकडे सध्या 6200 देशांतर्गत स्लॉट आहेत तर परदेशात 900 पेक्षा जास्त स्लॉट आहेत.
फडणीस आणि नागरी उड्डाण क्षेत्रातले जाणकार म्हणतात की हे स्लॉट विकत घेण्यासाठी विमानकंपन्यांमध्ये स्पर्धा असते. फडणीस एक उदाहरण देतात - जेट एअरवेजकडे लंडन विमानतळावर जो स्लॉट होता तो त्यांनी एतिहाद एअरवेजला कित्येक अब्ज डॉलर्सला विकला.
जाणकार म्हणतात की टाटाने ज्या अटींवर एअर इंडिया विकत घेतलं आहे त्या अटी त्यांना फायद्याच्या ठरणार आहेत. एअर इंडिया विकत घेतल्यामुळे टाटाकडे एकूण 18 हजार कोटी रूपयांचं देणं आलं आहे पण त्यातले 15 हजार कोटी रुपये कर्ज आहेत तर 2700 कोटी रुपये टाटाला द्यायचे आहेत.
फडणीस म्हणतात की टाटाकडे टीसीएस सारखी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी आहे. याचा फायदा त्यांना होणारच.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








