Narendra Modi UNGA : नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला नाव न घेता दिला 'हा' इशारा...

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Ani

फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेला संबोधित केलं. 25 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला. दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून उपयोग करणाऱ्यांनी याचा फटका तुम्हालाही बसू शकतो हे लक्षात घ्यावं, असं म्हणत मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला.

याशिवाय, अफगाणिस्तानमधील परिस्थिती, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विश्वासार्हतेवर तसंच परिणामकारकतेवर भाष्य केलं. जगातील कोरोना उत्पादकांना भारतात येण्याचं निमंत्रण पंतप्रधानांनी दिलं.

संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेला संबोधित करताना पाकिस्तानचं नाव न घेता ते म्हणाले, "दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून जे वापर करत आहेl त्यांनी लक्षात घ्यावं की दहशतवाद त्यांच्यासाठीही धोकादायक आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादाची बीज रोवण्यासाठी होऊ नये यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. तिथल्या संवेदनशील परिस्थितीचा कोणी गैरफायदा घेऊ नये, याकडे लक्ष द्यावं लागेल."

कोरोना लशीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "भारताने जगातली पहिली डीएनए लस विकसित केली आहे. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना ही लस देण्यात येऊ शकते. आरएनए लस अंतिम टप्प्यात आहे. भारताचे शास्त्रज्ञ नेझल लस अर्थात नाकाद्वारे लस विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे."

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं गंभीर उल्लंघन आणि भाजप सरकारवर मुस्लीमांविरोधी भीतीचं वातावरण निर्माण केल्याचा आरोप केला होता.

''भारत विविध कारवाया आणि निर्णयांच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचं उल्लंघन करत आहे. वादग्रस्त भागात संयुक्त राष्ट्रांच्या निगराणीत निःपक्षपणे जनमत चाचणीद्वारे निर्णय व्हावा, असं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावात म्हटलं आहे. भारत कश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नियमांचंही उल्लंघन करत आहे. काश्मीरमधील मानवाधिकारांच्या या पायमल्लीवर जगाचा प्रतिसाद मात्र भेदभाव करणारा आहे," असं इम्रान खान म्हणाले होते.

मोदींच्या संबोधनातले प्रमुख मुद्दे-

  • या 15 ऑगस्ट रोजी भारताने स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात प्रवेश केला आहे. आमची विविधता सक्षम लोकशाहीचं प्रतीक आहे.
  • असंख्य भाषा विविध खाणंपिणं हे व्हायब्रंट लोकशाहीचं द्योतक आहे.
  • एक लहान मुलगा रेल्वे स्टेशनवर आपल्या वडिलांना मदत करत होता, तो मुलगा भारताचा पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा संयुक्त राष्ट्र परिषदेत संबोधित करण्याची संधी मिळाली आहे.
  • गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून आणि त्यानंतर सात वर्ष भारताचा पंतप्रधान म्हणून मी भारताचं प्रतिनिधित्व करतो आहे. डेमोक्रसी कॅन डिलिव्हर, डेमोक्रसी हॅज डिलिव्हर्ड असं मी म्हणू शकतो.
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती आहे. व्यक्ती ते समष्टी असा विचार करण्याची शिकवण त्यांनी दिली. कोणीही वंचित, उपेक्षित राहायला नको. भारत इंटिग्रेटिड, इक्विटेबल डेव्हलपमेंटच्या मार्गावर आहे.
  • विकास सर्वसमावेशक, सर्वांगीण, सर्वव्यापी, सर्वपोषक व्हावा ही आमची प्राथमिकता आहे.
  • 43 कोटी लोकांचं बँकेचं खातं उघडण्यात आलं. 36 कोटी लोकांना विमा कवच मिळालं आहे. 50 कोटी पेक्षा लोकांना विनाशुल्क उपचार देण्यात आले. 3 कोटी पक्की घरं तयार करून बेघर लोकांना घर मिळवून दिलं.
  • कोणत्याही देशाच्या विकासासाठी नागरिकांकडे जमीन आणि घरांचे मालमत्ता हक्क असणं आवश्यक आहे. 6 लाखांहून अधिक गावांमध्ये ड्रोनने मॅपिंग करून कोट्यवधी लोकांना त्यांचे घर आणि मालमत्तेचं डिजिटल रेकॉर्ड मिळवून देण्यात येत आहेत.
  • भारतीयांची प्रगती होते, तेव्हा जगाच्या विकासाला हातभार लागतो. भारतात सुधारणा होते तेव्हा जगातही बदल पाहायला मिळतो.
  • अफगाणिस्तानमधील महिला, बालकं यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे. ती आपल्याला निभवावी लागेल. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या परिणामकारकतेला सुधारावं लागेल. अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अफगाणिस्तानच्या संकटाने जागतिक समस्यांना अधिक गहिरं केलं आहे.
  • भारताने जगातली पहिली डीएनए लस विकसित केली आहे. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना ही लस देण्यात येऊ शकते. आरएनए लस अंतिम टप्प्यात आहे. भारताचे शास्त्रज्ञ नेझल लस अर्थात नाकाद्वारे लस विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)