हौसाबाई पाटील यांनी 'क्रांतिसिंह' नाना पाटलांच्या सांगितलेल्या आठवणी

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - 'क्रांतीसिंह' नाना पाटील आज असते तर...
    • Author, प्राजक्ता ढेकळे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या आणि माजी आमदार भगवानराव (बप्पा) पाटील यांच्या पत्नी श्रीमती हौसाबाई भगवानराव पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 97 वर्षाच्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शनिवारी कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 23 सप्टेंबर 2021 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

हौसाक्का म्हणून त्यांची ओळख होती. वडिलांप्रमाणेच त्यांनी देखील स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सामाजिक-सांस्कृतिक लढ्यासाठी समर्पित केलं होतं.

लाईन

ब्रिटिश राजवटीच्या काळात दक्षिण महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार किंवा पत्री सरकार स्थापन करण्यात आलं होतं.

स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेली त्यांची लेक हौसाबाई पाटील यांनी क्रांतिसिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या वडिलांच्या आठवणी बीबीसी मराठीकडे 2018 मध्ये सांगितल्या होत्या.

"गोरं घालविलं अन काळं आणलं... आमचं चुकलंच जरा! खुर्च्याच जाळायला पाहिजे होत्या त्या, मग खरं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं असतं," स्वातंत्र्याच्या संकल्पनेविषयी हौसाबाई पाटील सांगत होत्या.

हौसाबाई उर्फ हौसाक्का... क्रांतीसिंह नाना पाटील यांची लेक.. सध्या त्या राहतात सांगली जिल्ह्यातल्या हणमंतवडिये या गावी राहत होत्या.

वय झालं असलं तरी हौसाबाईंच्या आवाजातली जरब आणि कणखरपणा आजही तसाच कायम होता.

स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरोधात नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची (पत्री सरकार) स्थापना करण्यात आली होती. दक्षिण महाराष्ट्रात या पत्री सरकारांनी क्रांती केली.

पत्री सरकारला स्वातंत्र्यसेनानी जी. डी. बापू लाड, स्वातंत्र्यसेनानी शाहीर शंकरराव निकम आणि क्रांतीविरांगना हौसाबाई पाटील यांचं भक्कम पाठबळ लाभलं होतं.

'...अन् शस्त्रलुटीची मोहीम आम्ही फत्ते केली'

पत्री सरकारला आवश्यक असणारा शस्त्रपुरवठा करण्याचं काम त्या काळात हौसाबाईंनी केलं होतं.

हौसाबाई पाटील आणि नाना पाटील

फोटो स्रोत, SUBHASH PATIL

फोटो कॅप्शन, हौसाबाई पाटील आणि नाना पाटील

याविषयीची आठवणी सांगताना हौसाबाईंनी सांगितलं होतं, "सांगली जिल्ह्यातल्या भवानी नगर इथल्या ब्रिटीशांच्या पोलीस ठाण्यातील शस्त्र लुटण्याची जबाबदारी माझ्यावर सोपण्यात आली होती. दिवसाढवळया शस्त्र लुटणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखंच होतं. पण मला हे काम फत्ते करायचं होतं.

बरोबरच्या सहकाऱ्यांना कुणी काय करायचं याची जबाबदारी समजावून सांगून मी माझ्याबरोबर काही सहकाऱ्यांना घेतलं आणि पोलीस ठाण्याच्या आवारात गेले.

माझ्या सहकाऱ्यानं माझा भाऊ असल्याचं नाटक करत मी सासरी नांदायला जात नाही म्हणून मला मारहाण करायला सुरुवात केली. माझा भाऊ गालावर चापटी, पाठीत धपाटे घालत मला नांदायला जा म्हणून सांगत होता.

आमच्या दोघांच्या वादावादीचं नाट्य पोलीस ठाण्याच्या समोर चांगलंच रंगात आलं. शेवटी मी काही केल्या ऐकत नाही म्हटल्यावर माझ्या भावानं रागानं माझ्या डोक्यात मारण्यासाठी म्हणून मोठा दगड उचचला अन् तेवढ्यात आतले दोन पोलीस त्याला थांबवण्यासाठी बाहेर पळत आले. तोपर्यंत ठरल्याप्रमाणे बाकीचे सहकारी तेथील बंदुका आणि काडतुसं घेऊन फरार झाले. मात्र तरीसुद्धा हा कट आम्ही रचला होता हे पोलिसांच्या लक्षात आलं नाही. अन् शस्त्रलुटीची मोहीम आम्ही फत्ते केली."

'दादांनी मला मिठी मारत हंबरडा फोडला'

इंग्रजांविरोधातल्या लढ्यात पत्री सरकारमधील कार्यकर्त्यांनी विविध प्रकारची सोंगं, भन्नाट कल्पना लढवून इंग्रजांना जेरीस आणलं होतं.

इंग्रजांनी ठिकठिकाणी उभारलेले डाक बंगले जाळणं असो, रेल्वेचे रूळ उखाड्णं असो, फोनच्या तारा तोडणं असो वा इंग्रजांचा खजिना लुटणं असो, या सर्वच गोष्टीमध्ये हौसाताई आघाडीवर असायच्या.

हौसाबाई पाटील

फोटो स्रोत, PRAJAKTA DHEKALE

हौसाताई सांगत, "शस्त्र लुटताना एकदा प्रतिसरकारमधील कार्यकर्ते बाळ जोशी यांना इंग्रजांनी अटक केली आणि गोव्यातल्या पणजी येथील तुरुंगात ठेवलं. तुरुंगातील बाळ जोशींना भेटून कार्यकर्यत्यांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा होता. पण हा निरोप पोहोचवणार कोण? याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली.

कारण पत्री सरकारवर इंग्रज कडक नजर ठेवून होते. मी बाळ जोशींना भेटायला जावं असं कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा मला सांगितलं. मी मात्र माझं चार महिन्याचं बाळ आजारी असल्याचं सांगत नकार दिला. कार्यकर्त्यांनी ही गोष्ट दादांच्या म्हणजेच नाना पाटलांच्या कानावर घातली.

त्यावर नाना पाटील म्हणाले 'मी तिला जा ही म्हणार नाही आणि थांबही म्हणणार नाही. मात्र माझी मुलगी म्हणून तिने बाप करत असलेल्या कार्याला शोभेल असे वागावे'. दादांचे हे उद्गार ऐकताच मी माझ्या बाळाला आत्याजवळ सोडलं आणि बाळ जोशींना भेटण्यासाठी रवाना झाले. तिथं पोहोचून मला सांगितलेली कामगिरी पार पाडली.

माघारी परतताना इंग्रजांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आडवाटेने चालायला सुरुवात केली. या मार्गात असलेली मांडवी नदीची खाडी मी पोहत पार केली. पुढे जंगलातून अनवाणी चालत वाट शोधत घरी पोहोचले. कामगिरी पार पाडून सुखरूप घरी आले तेव्हा मात्र दादांनी मला मिठी मारत हंबरडा फोडला,'' हौसाबाई त्यावेळचं चित्र डोळ्यासमोर उभं करायच्या.

'पण खरंच लोक स्वतंत्र झाले का?'

"रानावनातून हिंडत, आयुष्यातील अनेक वर्षं भूमिगत राहून क्रांतीसिंहांच्या प्रतिसरकारनं स्वातंत्र्य मिळवलं. पण खरंच लोक स्वतंत्र झाले का? असा प्रश्न आजही पडतो. आजही लोकांच्या अन्न, वस्त्राच्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत याची खंत वाटत राहते," हौसाबाई त्यांचं मत मांडत.

सध्याच्या सरकारबद्दल बोलताना हौसाबाई म्हणायच्या, "माझं वडील क्रांतीसिंह नाना पाटील जिवंत असतं तर त्यांनी 3 दिवसापेक्षा जास्त दिवस हे सरकार ठिवलं नसतं, कधीच त्याला बाजार दाखवला असता."

क्रांतीसिंह नाना पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत

फोटो स्रोत, SUBHASH PATIL

फोटो कॅप्शन, क्रांतीसिंह नाना पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत

क्रांतीसिंह नाना पाटलांची एकुलती एका मुलगी असलेल्या हौसाबाई 3 वर्षांच्या असतानाच त्यांच्यावरील आईचं छत्र हरवलं. देशवसेवेचा वसा घेतलेल्या वडिलांचा सहवासही त्यांना पुरेशा प्रमाणात मिळाला नाही. स्वातंत्र्य लढ्यासाठी वडील भूमिगत राहत असल्यामुळे हौसाबाई अत्यंत खडतर परिस्थितीत जीवन जगावं लागलं. मात्र देशभक्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं.

पुढे प्रतिसरकारच्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. इंग्रजांच्या नजरा चुकवून भूमिगत अ‍सलेल्या कार्यकर्त्यांना निरोप पोहोचवणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, पत्रीसरकारला लागणाऱ्या हत्यारांची ने-आण करणे, अशी कामं त्यांनी केली.

त्याविषयी अधिक सांगताना हौसाबाईंनी सांगितलं होतं, "कार्यकर्त्यांना निरोपाच्या चिठ्ठ्या पोहोचवताना त्या गोऱ्या साहेबाच्या हाताला लागू नये म्हणून अनेकदा केसाच्या आंबाड्यात त्यांना लपवून न्यायचो, तर कधी पायाच्या तळव्याला डिंक लावून तिथं चिठ्ठी चिटकवून ती पोहोचवायचो.

एकदा तर इंग्रजांनी मला आणि माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्याला अडवून विचारपूस करायला सुरुवात केली. तेव्हा नेमके आम्ही निरोप पोहोचवण्यासाठी निघालो होते. आता आमची तपासणी होणार हे लक्षात येताच त्यांची नजर चुकवून मी ती चिठ्ठी गिळून टाकली. अन आम्ही त्यांच्या तावडीत सापडता सापडता वाचलो."

गांधी माझा सखा गं...

वडिलांबरोबर देशसेवेच्या कार्यात स्वत:ला झोकून देत असतानाच इतर महिलांनाही मी त्यात विविध प्रकारे सहभागी करून घेतलं. प्रतिसरकारचा समाजावर इतका प्रभाव होता की महिला जात्यावर दळण दळताना ओव्या म्हणायच्या...

गांधी माझा सखा गं, ओवी त्याला गाईनं,

तुरुंगात जाऊनिया स्वराज मिळविनं

नाना माझा भाऊ गं, ओवी त्याला गाऊया,

त्याच्यासंगे लढता लढता स्वराज्य मिळवूया.

क्रांतीसिंह नाना पाटलांचं औक्षण करताना गावखेड्यातील महिला.

फोटो स्रोत, SUBHASH PATIL

फोटो कॅप्शन, क्रांतीसिंह नाना पाटलांचं औक्षण करताना गावखेड्यातील महिला.

शेतात काम करतानाही अनेक शेतकरी महिला पत्री सरकारवर गाणी म्हणत असत.

नाना पाटील, नाना पाटी गुंगू एकच सूर

नाना पाटील, नाना पाटी गुंगू एकच सूर,

नसानसातून वाहे आमच्या देशभक्तीचा पूर'

नसानसातून वाहे आमच्या देशभक्तीचा पूर.

अशी ती गाणी असत.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना नाना पाटलांनी आपल्या रोबर असलेल्या सहकाऱ्यांना कोणत्याही अंधश्रध्देला बळी पडून दिलं नाही.

स्वत: क्रांतीसिंह नाना पाटलांनी हुंडा, मानपान, मंडप, वाजंत्री, जेवण, कोणताही धार्मिक विधी न करता हौसाबाईंचे लग्न स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते भगवानराव मोरे पाटील यांच्याशी लावून दिलं. एकमेकांना हार घालून गांधी पद्धतीनं त्यांनी हे लग्न लावून दिलं. ही प्रथा पुढे अनेक कार्यकर्त्यांनीही सुरू ठेवली.

क्रातीसिंह नाना पाटील आपल्या कुटुंबीयांसोबत.

फोटो स्रोत, SUBHASH PATIL

सत्यशोधक चळवळीचे बाळकडू घेतच हौसाबाई मोठ्या झाल्या, पण इंग्रज सरकारच्या दडपशाहीचे आणि उद्भवलेल्या परिस्थितीचे चटके त्यांना बसत होतेच.

त्याकाळाविषयी हौसाबाई सांगत होत्या, "एकदा माझ्या आजीच्या चोळ्या फाटल्या होत्या. नवी चोळी विकत घेण्याइतपत पैसा आमच्याजवळ नव्हता. शेवटी आजीनं माझ्या वडिलांची जुनी लुंगी शोधून काढली आणि त्या पांढऱ्या लुंगीच्या 2 चोळ्या शिवल्या.

आम्ही आजीला वाईट वाटू नये म्हणून म्हणायचो, 'आजी तुला ही पांढरी चोळी शोभून दिसती.' आजी म्हणायची असू दे बया, या पांढऱ्या चोळीसारखं पाढरं निशाण दातात धरून इंग्रज आपल्या स्वातंत्र्य सैनिकांपुढं शरण येतील आणि जो पर्यंत तसं व्हणार नाही तोपर्यंत मी अशाच चोळ्या वापरणार'. पुढे आजीने ते व्रत कायम स्वरुपी पाळलं."

सध्याच्या परिस्थितीविषयी विचारलं असता, हौसाबाई म्हणत, "माझ्या कुटुंबीयांनी, कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या या स्वातंत्र्याची झालेली दयनीय अवस्था बघून पुन्हा एकदा पेटून उठावसं वाटतं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)