आमिर खान याला विमानातून खाली उतरवलं, नेमकं प्रकरण काय?

फोटो स्रोत, PA Media
मास्क घालण्याच्या मुद्यावरून ब्रिटिश बॉक्सिंगपटू आमिर खानला अमेरिकेत एका विमानातून खाली उतरवण्यात आलं आहे.
मास्क नाकावर नीट लावलेला नाही या तक्रारीवरून 34 वर्षीय आमिर आणि त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी विमानातून बाहेर काढलं.
नेवार्कहून डल्लास फोर्ट वर्थ हे विमान दोन प्रवाशांनी मास्क संदर्भातील नियमावलीचं पालन न केल्यामुळे परतलं असं एअरलाईन्सने म्हटलं आहे. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याचं एअरलाईन्सने नाकारलं आहे.
एअरलाईन्स प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "कस्टमर केअर टीम खान यांच्या संपर्कात आहे. नेमकं काय घडलं याचा आम्ही आढावा घेत आहोत. प्रवाशांची सुरक्षितता आणि आरोग्य यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमावलीची आम्ही त्यांना कल्पना देऊ."
ट्वीटरवर व्हीडिओ पोस्ट करत आमिरने म्हटलं आहे की, "नेवार्क इथून कोलॅरॅडो इथल्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी मी रवाना झालो. या प्रवासादरम्यान मला देण्यात आलेल्या वागणुकीने धक्का बसला आहे."
लाईटवेट गटात माजी विश्वविजेता असलेला आमिरने म्हटलं आहे की, "मला विमानातून बाहेर काढण्यात आलं. अमेरिकन एअरलाईन्स स्टाफने माझ्या सहकाऱ्याच्या मास्कसंदर्भात तक्रार केली. त्याने मास्क योग्य पद्धतीने घातला नव्हता असं त्यांचं म्हणणं होतं. कोरोना नियमावलीचं पालन होत नसल्याने त्यांना विमान थांबवणं भाग होतं. त्यांनी माझ्या मित्राला बाहेर काढलं. परंतु मी काहीच चुकीचं वागलं नव्हतो".
आमिर पुढे म्हणतो, "शिबिरस्थळी पोहोचण्याकरता आता मला नव्याने विमानाचं आरक्षण करावं लागलं. माझं काहीच चुकलेलं नसताना मला विमानातून काढण्यात आलं. अमेरिकन एअरलाईन्सने माझ्या प्रवासावर बंदी आणली".
अमेरिकन्स एअरलाईन्सचं फ्लाईट700 हे विमान न्यू जर्सीमधील नेवार्क लिबर्टी इंटरनॅशनल एअरपोर्टहून सुटलं मात्र दोन प्रवाशी नियमांचं पालन करत नसल्याच्या तक्रारीमुळे माघारी परतलं. मोबाईल एअरप्लेन मोडमध्ये टाका, मास्क परिधान करा अशा सूचना केबिन क्रूने प्रवाशांना दिल्या होत्या.
विमान माघारी परतलं तेव्हा प्रोटोकॉलनुसार पोलीस तिथे उपस्थित होते. मात्र त्यांनी कोणत्याही प्रवाशाला विमानाबाहेर काढलं नाही तसंच त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेपदेखील केला नाही.
आमिर तसंच त्यांच्या सहकाऱ्याला एअरलाईन्सद्वारे प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही, असंही या प्रवक्त्याने स्पष्ट केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








