जेट एअरवेज : दिवाळखोरीतल्या कंपनीने पुन्हा कशी केली उड्डाणाची तयारी ?

जेट एअरवेज

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मोहम्मद शाहीद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एकेकाळी भारतात प्रचंड प्रसिद्ध असलेली विमान कंपनी जेट एअरवेजनं पुन्हा एकदा हवेत झेपावण्याची तयारी सुरू केली आहे.

मंगळवारी (22 जून) राष्ट्रीय कंपनी कायदा लवादानं (NCLT)जेट एअरवेज पुन्हा सुरू करण्यासाठी कालरॉक-जालान कंसॉर्टियम योजनेला मंजुरी दिली आहे.

NCLT च्या मुंबई पीठानं डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच DGCA आणि हवाई वाहूतक मंत्रालयाला 22 जूनपासून 90 दिवसांसाठी जेट एअरवेजला टाइम स्लॉट देण्यास सांगितलं असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे.

टाइम स्लॉट देण्याबाबत DGCA अंतिम निर्णय घेईल. मात्र त्याला काही कालावधी लागू शकतो, असंही म्हटलं जात आहे.

जेट एअरवेजचा प्रवास

NRI व्यावसायिक नरेश गोयल यांनी 1992 मध्ये जेट एअरवेज सुरू केली होती. 1995 पासून कंपनीच्या विमानांनी उड्डाण सुरू केलं होतं. त्यानंतर 2004 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणंही सुरू झाली.

कंपनीनं चांगली प्रगती केली. एक काळ असाही होता जेव्हा एअर इंडियाव्यतिरिक्त जेट एअरवेज ही एकमेव भारतीय विमान वाहतूक कंपनी होती, जी विदेशातूनही उड्डाणांची सेवा देत होती.

जेट एअरवेज

फोटो स्रोत, Getty Images

आकडे पाहता फेब्रुवारी 2016 मध्ये भारतातील एकूण हवाई प्रवास करणाऱ्यांपैकी 21.2% प्रवासी जेट एअरवेजनं प्रवास करायचे. रोज जगातील 55 पेक्षा अधिक ठिकाणांहून त्यांची जवळपास 300 उड्डाणं असायची.

पण जेट एअरवेजचे हे सुगीचे दिवस फार काळ टिकले नाहीत. हवाई वाहतूक क्षेत्राची परिस्थिती बिघडत होती, शिवाय बँकेची कर्जही होतीच, त्यामुळं कंपनी दिवाळखोरीच्या टप्प्यावर आली.

मार्च 2019 मध्ये नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी कंपनीच्या संचालक पदांचा राजीनामा दिला.

त्यानंतर एप्रिल 2019 मध्ये जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणं बंद झाली आणि कर्जदारांच्या गटानं जून 2019 मध्ये दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली.

पण वर्षभरानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये लिलावादरम्यान कालरॉक कॅपिटल अलायन्स आणि मुरारीलाल जालान यांनी जेट एयरवेज कंपनी खरेदी केली.

कालरॉक-जालान कंसोर्टियम नेमकं काय आहे?

कालरॉक कॅपिटल ही लंडमधली एक जागतिक आर्थिक सल्लागार संस्था आहे. ही संस्था जवळपास 20 वर्षांपासून रियल इस्टेट आणि इतर विविध कंपन्यांमध्ये मुख्य आणि सह गुंतवणूकदार अशा भूमिकेत राहिली आहे.

तर कंसोर्टियममधील दुसरे भागीदार दुबईतील व्यावसायिक मुरारीलाल जालान आहेत.

जेट एअरवेज

फोटो स्रोत, Getty Images

जालान यांचे युएई, रशिया, उझबेकिस्तान आणि भारतात व्यवसाय आहेत. जालान जेट एअरवेजमध्ये कोणत्या पदावर असतील हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

जेट एअरवेजच्या माध्यमातून भारताच्या हवाई वाहतूक बाजारपेठेत प्रवेश करण्याचा कालरॉकचा हेतू असल्याचं कालरॉकचे व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य मनोज नरेंद्र मदनानी यांच्या हवाल्यानं ब्लूम्बर्ग क्विंट वेबसाइटनं लिहिलं आहे.

"आमच्या मते भारतात जगातील तिसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत विमान वाहतुकीची बाजारपेठ आहे. तसंच जागतिक पुरवठा साखळी आणि व्यवस्थापनाचा विचार करता जेट एअरवेजकडं चांगल्या पायाभूत सुविधा आहेत," असं त्यांनी म्हटलं आहे.

जेट एअरवेजला बजेट एअरलाइन (स्वस्तात सेवा देणारी) बनवण्याऐवजी पूर्ण सेवा देणारी विमान वाहतूक कंपनी बनवण्यावर कालरॉक लक्ष केंद्रीत करेल. कारण सध्या भारतात केवळ एअर इंडिया ही एकमेव अशा सेवा देणारी कंपनी आहे, असंही मदनानी म्हणाले.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

कालरॉक-जालान कंसोर्टियमने NCLT मध्ये सादर केलेले प्रस्ताव चांगले असून त्यातून जेट एअरवेजला पुनर्जीवन मिळण्याच्या शक्यता असल्याचं, एका हवाई वाहतूक तज्ज्ञांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

त्यांच्या मते, दिवाळखोरीच्या नव्या कायद्यामुळं जेट एअरवेजला दिलासा मिळाला. NCLT चा निर्णय हे त्याचं एक उदाहरण आहे. कंपनी बंद झाली असती, तर अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड आली असती. पण आता ते रोजगार वाचतील आणि नव्या रोजगारांच्याही शक्यता निर्माण होतील.

एप्रिल 2019 मध्ये जेव्हा जेट एअरवेजनं उड्डाणं बंद केली, त्यावेळी त्यांच्याकडे 12 विमानं आणि 8,500 पेक्षा अधिक कर्मचारी होते. सध्या त्यांच्याकडे असलेली विमानं आणि कर्मचारी यांची नेमकी माहिती उपलब्ध नाही.

जेट एअरवेज

फोटो स्रोत, Getty Images

'जेट एअरवेज' ब्रँडचा पुन्हा वापर करण्याची कंपनीच्या नव्या प्रमोटरची इच्छा आहे. वर्षाच्या अखेरीपर्यंत 25 विमानांसह पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.

कर्जाचं ओझं कसं उतरवणार जेट एअरवेज?

कंपनीनं 2019 मध्ये जेव्हा पूर्णपणे काम थांबवलं, त्यावेळी त्यांच्यावर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक सरकारी कंपन्यांचं जवळपास 8,000 कोटींचं कर्ज होतं.

कंपनीचे मालक आता बदलले असले तरीही कंपनी मात्र अजूनही कर्जबाजारीच आहे.

"कंपनीवरचं कर्जाचं ओझं उतरवण्यासाठी कालरॉक-जालान कंसोर्टियमने ऑक्टोबर 2020 मध्ये एक प्रस्ताव दिला होता. त्यानुसार, पहिल्या दोन वर्षात कर्ज देणाऱ्यांना 600 कोटी रुपये देतील आणि जवळपास कंपनीची 89% टक्के भागीदारी घेतील," असं लाइव्ह मिंटच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

जेट एअरवेज

फोटो स्रोत, Getty Images

त्याशिवाय पहिल्या वर्षी स्थावर मालमत्तेसह लक्झरी कार विकण्याचाही विचार आहे. त्यानंतर नव्या प्रमोटर्सनी तिसऱ्या वर्षी 131 कोटी, चौथ्या वर्षी 193 कोटी आणि पाचव्या वर्षी 259 कोटी रुपये कर्जदारांना परत करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

सोबतच कंपनीला होणारं उत्पन्नही त्यात जोडलं जाईल. अशा प्रकारे पाच वर्षांमध्ये कर्ज देणाऱ्या बँकांना 1,183 कोटी रुपये परत करण्याचा हा प्रस्ताव आहे.

कालरॉक कॅपिटलतर्फे पुन्हा कंपनी सुरू करण्यासाठी 900-1000 कोटी रुपयेही दिले जातील. तर आर्थिक कर्ज देणाऱ्यांना जेट एअरवेजमध्ये 10% इक्विटी (एक प्रकारची भागीदारी) देखील मिळेल.

जेट एअरवेज समोरील आव्हाने

NCLT समोर झालेल्या सुनावणीमध्ये जेट एअरवेजनं उड्डाणांसाठी जुनेच टाईम स्लॉट देण्याची मागणी केली आहे. पण DGCA आणि नागरी उड्डयण मंत्रालयानं त्याचा विरोध केला आहे.

दिवाळखोरी प्रकरणाच्या सुनावणीपूर्वी कंपनीकडं असलेल्या टाइम स्लॉटवर पुन्हा दावा करता येऊ शकत नाही, असं DGCA आणि मंत्रालयानं म्हटलं आहे.

जेट एअरवेज

फोटो स्रोत, Getty Images

जेट एअरवेज ही प्रमुख हवाई वाहतूक कंपनी होती. त्यामुळं त्यांच्याकडं विमानांच्या उड्डाणांचे महत्त्वाचे टाईम स्लॉट होते. पण त्यांची उड्डाणं बंद झाल्यानंतर इतर कंपन्यांना ते देण्यात आले. आता जेट एअरवेजला तेच टाइम स्लॉट परत हवे आहेत.

कंपनी पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेवर निगराणीची जबाबदारी, ग्रँट थॉर्नटन या सल्लागार कंपनीवर सोपवली आहे.

या कंपनीचे रिस्ट्रक्चरिंग सर्व्हिसेसचे (पुनर्रचना सेवा) प्रमुख आशिष छोछरिया यांनी विविध माध्यमांशी बोलताना याबाबत नाराजी व्यक्त केली. पूर्वीचे टाइम स्लॉट मिळाले नसल्याने आम्ही हताश झालो आहोत. हे टाइम स्लॉट आधी होते ते नाहीत. हे त्यांच्या आसपासचे असते तरीदेखील चाललं असतं, असंही ते म्हणाले.

याचबरोबर आणखी एक मोठं आव्हान मार्गांच्या बाबतही असणार आहे. नवीन उड्डाणं कोणत्या मार्गांवर असतील हेही अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.

जेट एअरवेजसाठी कर्मचारी हेदेखील मोठं आव्हान असेल. एकेकाळी 16,000 कर्मचारी असलेल्या या कंपनीतील कर्मचाऱ्यांची नेमकी संख्याही समोर आलेली नाही. कंपनी जेव्हा तोट्यात जात होती आणि उड्डाणं एकापाठोपाठ बंद होत होती, त्यावेळी अनेकवेळा पायलट आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याचंही पाहायला मिळालं होतं.

कोरोना काळातही इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच हवाई वाहतूक क्षेत्रालाही मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटोमुळं प्रादेशिक हवाई वाहतूक क्षेत्राचं मोठं नुकसान झालं, असं कापा इंडिया या सल्लागार संस्थेनं नुकत्यात सादर केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

कोरोनामुळं हवाई वाहतुकीची सेवा देणाऱ्या कंपन्यांची संख्या आधीच्या सहा मोठ्या आणि तीन प्रादेशिक कंपन्यांवरून आता दोन ते तीनवर आली आहे, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

तसंच 2020 मध्ये कोरोनामुळं देशातील इंडिगो आणि स्पाइसजेट या दोन कंपन्यांचंही मोठं नुकसान झालं.

जेट एअरवेज

फोटो स्रोत, Getty Images

इंडिगोला पहिल्या तिमाहीमध्ये 2,884 कोटी आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये 1,194 कोटींचं नुकसान झालं होतं.

अशा परिस्थितीमध्ये जेट एअरवेज पुन्हा सुरू होणं, या सर्वांसाठीच एक मोठं आव्हान असेल.

त्याशिवाय जेट एअरवेजसमोरही आता एअर इंडिया, इंडिगो, गो एअरवेज, स्पाइसजेट याशिवाय विस्तारा सारख्या कंपन्यांचं आव्हान असेल.

जेट एअरवेजसाठी हे पुन्हा शून्यापासून सुरूवात करण्यासारखं असेल, असं हवाई वाहतूक तज्ज्ञांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.

"जेट एअरवेज-2 चं ब्रँड नेम वापरलं जाईल पण, ही कंपनीची नवी सुरुवातच असेल. कंपनीसमोर अनेक आव्हानं असतील. पण तसं असलं तरी त्यांची योजना चांगली आहे. स्पर्धक कंपन्यांसमोर याचं नवीन उत्पादन असेल. त्यांना जम बसवण्यास जरा वेळ लागेल, पण जेट एअरवेजचं नाव जोडलं गेलेलं असल्यानं जुने ग्राहक पुन्हा या कंपनीकडे परतू शकतात," असंही ते म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)