तालिबानचं काबूल: 'पुरुष बरोबर नसताना प्रवास का करत आहात?'

तालिबान

फोटो स्रोत, EPA

    • Author, लिस डुसेट
    • Role, प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, काबूल

तू कोणत्याही पुरुषाला सोबत घेतल्याशिवाय प्रवास का करत आहेस?

तालिबानच्या एका कट्टरवाद्याने एकट्या जात असलेल्या अफगाण महिलेला हा प्रश्न विचारला.

काबूलमध्ये एका काळ्या-पिवळ्या टॅक्सीत बसलेल्या या महिलेसोबत कोणताच पुरुष सदस्य नव्हता.

शहराच्या नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या चौकीजवळ इतर गाड्यांप्रमाणेच ही टॅक्सीही थांबवण्यात आली.

चौकीवर तालिबानचा पांढरा झेंडा फडकत होता. त्यावर काळ्या अक्षरात काही वाक्ये लिहिली होती.

काबूलमध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी आहे आणि कोणत्या गोष्टींना परवानगी नाही, हाच प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतोय.

डोक्यावर साफा घातलेल्या तालिबानी कट्टरवाद्याच्या एका खांद्यावर बंदूक लटकवलेली होती.

तुझ्या पतीला फोन कर, असा आदेश त्या कट्टरवाद्याने त्या महिलेला दिला.

माझ्याकडे फोन नाही, महिला उत्तरली.

त्यावेळी तालिबानच्या कट्टरवाद्याने तिला एका दुसऱ्या टॅक्सीत बसवून घरी पाठवून दिलं.

तालिबान

फोटो स्रोत, AAMIR QURESHI

फोटो कॅप्शन, काबूल

हिच्या पतीला घेऊन इथंच परत ये, अशी सूचना त्याने टॅक्सी ड्रायव्हरला केली.

महिलेना हा आदेश पाळल्यानंतरच तिची यातून सुटका झाली.

काबूलमध्ये लोकांचं आयुष्य आता एकाच ठिकाणी साचून पडलंय की काय, अशी परिस्थिती आहे.

अफगाण द्राक्षं, गर्द जांभळ्या रंगाचे आलुबुखार विकणारी जुन्या-फाटक्या कपड्यांतील मुले इकडून तिकडे फिरताना दिसतात.

वरवर पाहता असं वाटेल की काबूलमधलं आयुष्य पूर्वीप्रमाणेच आहे. पण तसं बिलकुल नाही.

काबूल आता तालिबानच्या फतव्यावर चालणारं शहर बनलं आहे. रस्त्या-रस्त्यांवर तालिबानी कट्टरवाद्यांचा बंदोबस्त लावलेला आहे.

काबूलमधून अमेरिकेचे सैनिक माघारी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती.

लोकांशी कसं वागावं याबाबत खबरदारी घ्या. आपल्या देशाला आधीच मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. त्यामुळे लोकांशी नरमाईने वागा, अशी सूचना त्यांनी तालिबानी कट्टरवाद्यांना केली होती."

काही गोष्टी सांगण्याची गरज नसते. गेल्या महिन्यात तालिबान काबूलच्या दिशेने वेगाने कूच करत होता, तेव्हा लोकांना याचा अंदाज आला होता. तालिबानच्या राजवटीत आपल्याला काय करावं लागेल, याची लोकांना कल्पना होती.

पुरुषांनी दाढी करणं बंद केलं. महिलांनी रंगीबेरंगी स्कार्फचा त्याग करून काळ्या रंगांचे स्कार्फ वापरणं, आपल्या कपड्यांची लांबी पाहणं सुरू केलं.

तेव्हापासूनच अफगाणिस्तानमध्ये अनिश्चितता आणि निराशेचं हे वातावरण कायम आहे.

स्वप्नं उद्ध्वस्त झाली

आता मी काय करावं, हाच प्रश्न अफगाण लोकांना आता सतावताना दिसत आहे. देश सोडण्याकरिता ते मदत मागत आहेत.

मरियम राजाई त्याच लोकांपैकी एक. राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्या सरकारचं पतन झाल्यानंतर काय करावं लागेल, हे त्यांना चांगलंच माहीत होतं.

मरियम राजाई
फोटो कॅप्शन, मरियम राजाई

15 ऑगस्टच्या दिवशी तालिबानी कट्टरवादी काबूलच्या रस्त्यांवर दिसू लागले, तेव्हा अॅटर्नी जनरल यांच्या कार्यालयात महिला वकिलांचं वर्कशॉप त्या घेत होत्या.

तालिबानच्या संभाव्य धोक्याची सूचना त्यांना मिळाली तेव्हा एका विद्यार्थिनीने म्हटलं, आपण क्लास सुरूच ठेवूया.

पण काही वेळातच क्लास बंद करावा लागला. तेव्हापासूनच मरियम राजाई आपल्या कुटुंबासोबत इकडून तिकडे भटकत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलंही आहेत.

मरियम यांची तीन वर्षांची मुलगी निलोफर हिला मोठं होऊन इंजिनिअर बनायचं आहे.

दगड-मातीने बनलेल्या खोलीतील एका कोपऱ्यात निलोफरने बनवलेली प्लास्टिकच्या बॉक्सची इमारत ठेवलेली आहे. खिडकीच्या फटीतून कवडसे त्या बॉक्सवर पडलेले आहेत.

महिला आणि मुलींना इस्लामच्या अंतर्गत मिळणारे सगळे अधिकार देण्यात येतील, या तालिबानच्या वाक्याचा अर्थ येथील कोणालाच माहीत नाही.

मरियम राजाई यांच्यासारख्या महिलांना आता कार्यालयात येऊ नये, अशी सूचना कठोर शब्दात देण्यात आलेली आहे.

आतापर्यंत काबूलमध्ये आपण जगत असलेलं आयुष्य पुन्हा जगायला मिळेल किंवा नाही, हाच प्रश्न लोकांना पडलेला आहे. आपलंच शहर त्यांना आता परकं असल्याचा भास त्यांना होऊ लागला आहे.

"अभ्यास, नोकरी, समाजातलं प्रतिनिधित्व यांचा मला अधिकार आहे. पण माझी सगळी स्वप्नं उद्ध्वस्त झाली आहेत," अशा शब्दांत मरियम यांनी खंत व्यक्त केली.

कंत्राटदार मागे राहिले

अफगाणिस्तानात दोन दशकांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय समुदाय ठाण मांडून होता. त्यामुळे इथं एक नवा समाजगट निर्माण झाला होता. यातील अनेकजण आता धोक्याच्या सावटाखाली आले आहेत.

हमीद
फोटो कॅप्शन, हमीद

काबूलमधील ब्रिटनच्या दूतावासात 13 वर्षांपेक्षा जास्त वर्षे शेफ म्हणून काम करणारे हमीद सांगतात, "ख्रिसमसच्या पार्टीचे अनेक सुंदर क्षण आठवतात. आम्ही रुचकर जेवण बनवायचो. मजा यायची."

आम्ही एका गालिचावर त्यांच्यासोबत बसलो. सोबत त्यांची पाच मुलंही होती. समोर काही जुने फोटो, त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून मिळालेली प्रशस्तीपत्रकं ठेवलेली होती.

हमीद यांच्यासह दुतावासातील इतर 60 कर्मचारी एका खासगी कंत्राटदारामार्फत ठेवण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयाकडून थेट नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तिथून आधीच हटवण्यात आलं. पण खासगी कंत्राटदारांमार्फत असलेले कर्मचारी इथंच राहिले.

निराश भावनेने हमीद सांगतात, "आम्ही कठोर मेहनत केली होती. इतकंच नव्हे तर कोव्हिड लॉकडाऊनदरम्यानही आम्ही काम करत होतो. त्यांनी आम्हाला इथून बाहेर न काढणं हा आमच्यासाठी धोका आहे."

मदतीचा मार्ग शोधण्यात येईल, असं आश्वासन इतर देशांप्रमाणे ब्रिटननेही दिलं आहे.

तालिबानसोबतची एक भेट

काही लोकांनी आधीच घाईने काबूल सोडलेला आहे. पण काहींना आनंदही झालेला आहे.

अफगाणिस्तानच्या विविध प्रांतांमधून काबूलला आलेल्या एका गटाने आम्हाला हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ चर्चेसाठी बोलावलं.

लिस डुसेट यांच्यासोबत चर्चा करताना तालिबानी कट्टरवादी
फोटो कॅप्शन, लिस डुसेट यांच्यासोबत चर्चा करताना तालिबानी कट्टरवादी

25 वर्षीय रफीउल्लाहच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता क्षणीच जाणवला. तो म्हणाला, गेल्या 25 कित्येक वर्षांत मी काबूलला येऊ शकलो नव्हतो."

त्याच्याच वयाच्या लोकांना आता देशाचं भविष्य अधांतरी असल्याचं वाटतं, असं मी त्याला विचारलं. तो म्हणाला, "आम्ही सगळे अफगाण आहोत. आता हा देश शांतता आणि समृद्धीच्या दिशेने पुढे चालला आहे."

तालिबानी कट्टरवादी घरोघरी जात आहेत. लोकांना सरकारी फोन आणि गाड्या परत करण्यास सांगितलं जात आहे. काही ठिकाणी तर लोकांच्या खासगी गाड्याही जप्त करण्यात आल्या.

भ्रष्टाचार न करता गाडी घेताच येणार नाही, असं वाटल्याने तालिबानने या गाड्या जप्त केल्या.

पश्चिम काबूलच्या दश्त ए बार्ची परिसरात हजारा अल्पसंख्यांक समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. याठिकाणी तालिबानी घरोघरी झाडाझडती केली. इथल्या पुरुषांना अटक करण्यात आल्याचंही वृत्त आहे.

काबूलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने म्हटलं, "मला खूप भीती वाटते. आम्हाला कामाला जावं लागेल. आमच्या कुटुंबात कमाईचा हा एकमेव मार्ग असल्यामुळे आम्हाला कामाला जाऊ द्या, अशी विनंती आम्ही तालिबानकडे केली आहे."

तालिबानचं वास्तव

काबूल शहरात बँकांबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. बहुतांश बँका बंद आहेत. काहींकडे पैसे नाहीत.

गर्दीत एक माणूस ओरडत होता. एक आठवडा झाला. आम्ही रोज इथं येत आहोत. पण रिकाम्या हातांनीच परतावं लागतं."

अफगाणिस्तान

काबूलपासून दूर अंतरावर असलेल्या ग्रामीण भागात लोकांना लढाई संपल्याने दिलासा मिळाला आहे.

पण जिवंत राहण्यासाठी लाखो लोकांची लढाऊ अद्याप सुरुच आहे.

काबूल विमानतळ परिसरातील मुक्त पत्रकार अहमद मांगली सांगतात "हा इतिहास आहे की वास्तव आहे? मला माझ्या डोळ्यांवरच विश्वास होत नाही."

तालिबानचे प्रवक्ते मीडियासोबत ताळमेळ जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. पण इथं प्रत्येकाच्याच हातात शस्त्रं आहेत. बंदूक हातात पकडलेल्या प्रत्येकाला वाटतं तो बादशहा आहे. मला किती धोका आहे माहीत नाही. पण इतिहासाचा भाग मला व्हायचं आहे."

पण काहीही असो, अफगाणिस्तानचा इतिहास आता बदलू लागला आहे. गेल्या काही वर्षांत घडलेल्या गोष्टी बदलण्यात येत आहेत. लाल लिपस्टिक आणि पांढरे गाऊन घातलेल्या महिलांचे पोस्टर हटवले जात आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)