You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबान, इस्लामिक स्टेट आणि अल-कायदात फरक काय?
- Author, होजे कार्लोस क्वेटो
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अफगाणिस्तानातल्या सत्ता समीकरणात तीन कट्टरवादी संघटनांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या तीन संघटना आहेत तालिबान, अल-कायदा, आणि इस्लामिक स्टेट.
अफगाणिस्तानातून पाश्चात्य देशांचं सैन्य परतल्यानंतर आता मध्यपूर्वेत आणि मध्य आशियात जिहादी कट्टरवादाचा नवा अध्याय सुरू होईल, अशी भीती विश्लेषकांना वाटतेय.
गेल्या काही वर्षांत अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट भलेही कमजोर पडले असतील पण तरीही या संघटना अजूनही सक्रिय आहेत आणि आता बदलत्या परिस्थितीत त्या पुन्हा मजबूत होऊ शकतात.
तालिबानसारखीच या दोन्ही संघटनांची विचारसरणी कट्टरतावादी आहे पण या तिन्ही गटांच्या महत्त्वकांक्षा आणि काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
न्यूयॉर्कमधला थिंकटँक सूफान सेंटरचे सुरक्षा विश्लेषक आणि संशोधक कॉलिन क्लार्क या तीन संघटनांमधला फरक उलडगडून दाखवतात.
"तालिबान अफगाणिस्तानातला महत्वाचा खेळाडू आहे. अल-कायदा वेगवेगळ्या देशातल्या जिहाद्यांचा एक समूह आहे ज्यांना पुन्हा आपलं नेटवर्क उभं करायचं आहे. इस्लामिक स्टेटही असंच काहीसं आहे पण तालिबान आणि अल-कायदा दोघंही त्यांचे शत्रू आहेत आणि दोघांशीही त्यांना युद्ध करायचं आहे.
तीन संघटनांच्या स्थापनेची कहाणी
अल-कायदा आणि तालिबान दोन्ही संघटनांचा उदय ऐंशीच्या दशकाच्या शेवटी सोव्हिएत आक्रमणाचा विरोध करण्यासाठी झाला होता.
दोन्ही संघटनांच्या उदयाचा संबंध नव्वदच्या दशकातल्या अफगाणिस्तानामधल्या अंतर्गत वादातही आहे.
सन 2003 मध्ये जेव्हा अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं तेव्हा इस्लामिक स्टेटचा जन्म झाला. यात इराकी सेना आणि अल-कायदाशी संबंधित लोक सहभागी झाले.
अल-कायदाची स्थापना सौदी अब्जाधीश ओसामा बिन लादेनने ऐंशीच्या दशकाच्या शेवटी केली होती.
अल-कायदाचा अर्थ होतो नेटवर्क. सुरुवातीला सोव्हिएत संघाच्या विरोधात लढणाऱ्या मुसलमानांना अल-कायदाने हत्यारं आणि इतर गोष्टींची मदत पोहचवली.
यासाठी अल-कायदाने जगभरातल्या मुसलमानांना आपल्या संघटनेत भरती करून घेतलं.
सोव्हिएत सैन्याचा पाडाव झाल्यानंतर उत्तर पाकिस्तान आणि दक्षिण अफगाणिस्तानात पश्तून बंडखोर आणि विद्यार्थ्यांचा एक समूह खूप लोकप्रिय झाला. या समुहाला तालिबान या नावाने ओळखलं जायचं.
त्यांनी अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत केल्यानंतर शांतता आणि सुरक्षा यासोबतच कडक शरिया कायदे लागू करण्याचं वचन दिलं. तालिबानला अफगाण लोकांचं समर्थन लाभलं आणि त्यांनी लवकरच काबूल जिंकून घेतलं.
1996 च्या सुरुवातीपर्यंत जवळपास संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या नियंत्रणाखाली आला होता. आता अल-कायदाची अफगाणिस्तानातली भूमिका फक्त मदतनीस इतकीच राहिली नव्हती.
जगभरात कट्टरवादी हल्ले करण्याचे दावे करून अल-कायदा एक जिहादी संघटना बनली होती. तालिबानी सरकारने आधी त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली आणि नंतर पैशांच्या बदल्यात अल-कायदाला अफगाणिस्तानात आश्रय दिला, त्यांचं स्वागत केलं.
अल-कायदाची इराकी शाखा इस्लामिक स्टेटचं नेतृत्व करत होती. 2003 मध्ये इराकवर अमेरिकेने हल्ला केल्यानंतर अल-कायदा परदेशी सैन्याला विरोध करण्यात अग्रेसर होती.
सन 2006 मध्ये इराकमध्ये अल-कायदा आणि इतर कट्टरवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये विलीन झाल्या. त्यांनी स्वतःला 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक' असं नाव दिलं. या संघटनेला जगभरात इस्लामचं नेतृत्व करायचं होतं. आता ते अल-कायदाच्या मुळ विचारांच्या विरोधात होते.
2011 साली जेव्हा इस्लामिक स्टेटचा सीरियात प्रभाव वाढायला लागला तेव्हा त्यांनी स्वतःला अल-कायदापासून लांब केलं आणि आपली वेगळी चूल मांडली.
इस्लामची व्याख्या
बीबीसी मुंडोने 'इस्लामची व्याख्या या संघटनांच्या मते काय आहे?' हा प्रश्न ज्या ज्या तज्ज्ञांना विचारला त्यांनी म्हटलं की तालिबान, अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट या तिन्ही संघटना इस्लामची व्याख्या आपल्या कट्टरवादी विचारसरणीने करतात.
याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की या तिन्ही संघटना इस्लामच्या सुन्नी शाखेशी संबंधित आहेत ज्या शियांच्या तुलनेत कुराणात वर्णन केलेया सिद्धांतांचा कडवा अर्थ काढतात.
मुस्लीम देशांमध्येही इस्लामच्या व्याख्येवरून वाद आहेत.
लंडनच्या किंग्स कॉलेजचे रिसर्चर मायकल ग्रोप्पी म्हणतात, "त्यांना वाटतं इस्लामच्या नावावर हिंसा करणं योग्य आहे. हे सच्च्या मुसलमानाचं कर्तव्य आहे आणि जे याचं पालन करत नाहीत ते वाईट मुसलमान आहेत."
"या तिन्ही संघटनांना वाटतं की सामाजिक आणि राजकीय आयुष्याला धार्मिक आयुष्यातून वेगळं काढता येत नाही. बायबलप्रमाणेच कुराणातही काही कडक कायदे दिलेले आहेत. पण मुसलमानांचा एक मोठा वर्ग या हिंसक सिद्धांतांना नाकारतो."
अर्थात या तिन्ही संघटनांचा कट्टरतावाद संघटनेच्या उद्देशांनुसार वेगवेगळा आहे. तज्ज्ञ या मुद्द्यांवरून या तीन संघटनांमधला फरक समजावून सांगतात.
तिन्ही संघटनांचं उदिष्ट
तालिबानला अफगाणिस्तानात शरिया कायदा लागू करायचा आहे. याआधी त्यांनी असं केलं होतं त्यावेळेची राजवट महिलाविरोधी होती.
1996 ते 2001 या काळातल्या तालिबान राजवटीच्या कटू आठवणींमुळेच अनेक अफगाण लोकांनी गेल्या काही आठवड्यात देशातून पलायन केलं. त्यांना भीती वाटतेय की तालिबान पुन्हा सत्तेत आल्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होईल.
जॉर्जटाऊन विद्यापीठात कट्टरवाद आणि मध्यपूर्वेतल्या विषयांचे जाणकार डॅनियल बेमॅन म्हणतात, "अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटच्या तुलनेत तालिबान तितके कट्टरपंथी नाहीयेत. ते अफगाणिस्तानातल्या जुन्या वैभवशाली दिवसांना पुन्हा आणू इच्छितात."
"तिघांमधला सगळ्यांत मोठा फरक हा आहे की अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वकांक्षा आहेत तर तालिबानचा रोख संपूर्णपणे अफगाणिस्तानवर आहे."
प्रत्यक्षात इस्लामचं नेतृत्व कोणी करावं यावर अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट एकमेकांच्या विरोधात उभे असले तरी त्यांची विचारसरणी सारखची आहे. त्यांच्यामते आपल्या संघटनेचं जो नेतृत्व करेल तोच जगभरातल्या मुस्लिमांचं राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या नेतृत्व करेल.
डॅनियल बेमॅन म्हणतात की, "यातला एक फरक असा की इस्लामिक स्टेटला असं राज्य आताच्या आताच स्थापन करायचं आहे तर अल-कायदाचं म्हणणं आहे की असं लगेच करणं घाई ठरेल. जिहादी समुदाय आणि मुस्लीम समाज अजून एका छत्राखाली यायला तयार नाहीये. ही त्यांची प्राथमिकता नाहीये."
तिघांचे शत्रू
तालिबान, अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटचे शत्रू एकच आहेत - अमेरिका आणि पाश्चात्य देश.
मायकल ग्रोप्पी म्हणतात, "मुस्लिमच पण वेगळ्या पंथाची सरकारंही त्यांची शत्रू आहेत. अशी सरकारं जे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचं समर्थन करतात. असे देश जे इस्लामचा कडवा अर्थ मान्य करत नाहीत किंवा ते देश ज्यांनी धर्म आणि राजकारण वेगवेगळं ठेवलं आहे ते सगळे या तिन्ही संघटनांचे शत्रू आहेत."
इराण आणि सीरियाची सरकारं या तिन्ही संघटनांच्या शत्रू यादीत समाविष्ट आहेत. पण इराण आणि सीरियाशी त्यांचं खरंच शत्रुत्व आहे का यावरूनही प्रश्न उठले आहेत. अमेरिकेने हे अनेकदा म्हटलं की इराणचं शिया सरकार आणि सुन्नी अल-कायदा यांच्यात परस्परसंबंध आहेत.
डॅनियल बेमॅन म्हणतात की, "इस्लामिक स्टेट आधीपासूनच अल-कायदाच्या तुलनेत अधिक हिंसक आहे. पाश्चिमात्य देशांखेरीज इस्लामिक स्टेट त्या मुस्लिमांच्याही विरोधात आहे जे त्यांची विचारसरणी मानत नाहीत."
अफगाणिस्तानला इस्लामिक अमिरात बनवून तालिबानला काय साध्य करायचं आहे?
अल-कायदाचा प्रमुख शत्रू अमेरिका आहे पण इस्लामिक स्टेट मात्र मध्यपूर्वेतल्या शिया मुसलमानांवर तसंच अन्य धार्मिक अल्पसंख्याक लोकांवर हल्ला करत आलेलं आहे.
डॅनियल बेमॅन म्हणतात की, "अल-कायदाही शिया मुसलमानांना विधर्मी मानतं पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांना ठार करणं टोकाचं ठरेल आणि यामुळे साधनसंपत्ती वाया जाईल. यामुळे जिहादी विचारसरणीलाही धक्का बसेल."
मायकल ग्रोप्पी यांच्या मते इस्लामिक स्टेट तालिबानलाही शत्रू समजतं कारण त्यांनी अमेरिकेसोबत करार करून गद्दारी केलीये असं त्यांना वाटतं.
पण इस्लामिक स्टेट एका तिसऱ्या संघटनेमार्फत तालिबानशी संबधित आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की इस्लामिक स्टेटच्या खुरासान शाखेचा तालिबानच्या हक्कानी नेटवर्कशी घनिष्ट संबंध आहेत आणि त्यामुळे ते तालिबानच्याही जवळचे आहेत.
थोडक्यात सांगायचं झालं तर इस्लामिक स्टेट अनेक आघाड्यांवर लढतंय. अफगाणिस्तानात त्यांची लढाई तालिबानशी आहे पण 2014 साली अल-कायदापासून वेगळं झाल्यानंतर इस्लामिक स्टेट त्यांच्याशीही लढतंय.
तिघांची काम करण्याची पद्धत
अमेरिकेशी लढण्यासाठी अल-कायदाने 11 सप्टेंबर सारखा भयाण हल्ला केला. या शिवाय त्यांनी मुस्लिमांचं मतपरिवर्तन करण्यासाठी प्रोपेगंडा मोहीम सुरू केली.
"इस्लामिक स्टेटही अल-कायदाच्या रस्त्यावर चालण्याच्या गोष्टी करतं पण त्यांची पद्धत जास्त हिंसक आहे. ते जास्त मोठ्या भूभागावर सत्ता गाजवू इच्छितात," डॅनियल बेमॅन सांगतात.
"त्यांना अशी सत्ता प्रस्थापित करायची आहे जिथे मुस्लीम लोक त्यांच्या इस्लामच्या व्याख्येनुसार राहतील. इस्लामिक स्टेटसाठी कट्टरवाद एक क्रांतिकारी लढाईचा भाग आहे. त्यांचं नियंत्रण असलेल्या भागात सामूहिक नरसंहार, सार्वजनिकरित्या लोकांची मुंडकी छाटणं आणि बलात्कारासारख्या गोष्टी सामान्य आहेत. ते लोकांना भयाच्या अधिपत्याखाली ठेवू इच्छितात. पण अल-कायदाचा या बाबतीत सौम्य आहे."
इस्लामिक स्टेटच्या खुरासान शाखेने काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला करून 200 लोकांचा जीव घेतला. पण तालिबान मात्र काबूलवर ताबा मिळवण्याच्या आधीपासूनच अफगाण सरकार आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करत होतं.
या व्यतिरिक्त या तिन्ही संघटनांच्या लोकांना भरती करून घ्यायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. या तिन्ही संघटनांनी आपला प्रभाव असणाऱ्या भागात स्थानिक पातळीवर लोकांची भरती केली आहे पण अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट मध्यपूर्वेच्या बाहेरच्या लोकांना आपल्या संघटनेत सहभागी करून घेण्यात यशस्वी झाले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)