अमेरिकेला आयडा चक्रीवादळचा तडाखा, 10 लाख घरांचा वीज पुरवठा खंडित

फोटो स्रोत, Getty Images
हरिकेन आयडा (Ida)चा धोका अमेरिकेच्या लुईझियाना राज्यावर घोंघावतोय. आतापर्यंतचं हे सगळ्यांत शक्तीशाली चक्रीवादळ असल्याचं म्हटलं जातंय. हे चक्रीवादळ धडकल्यानंतर ताशी 240 किमी वेगाने वारे वाहत होते.
या वादळी वाऱ्यांमुळे लुईझियानातल्या न्यू ऑरलिन्स या शहरासोबतच संपूर्ण राज्यातला वीजपुरवठा खंडित झाला असून जनरेटर्सच्या मदतीने अत्यावश्यक ठिकाणांचा पुरवठा सुरू आहे.
लुईझियाना राज्यातल्या सुमारे 10 लाख घरांमध्ये सध्या वीज नसून हा पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही आठवड्यांचा अवधी लागण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय.
यापूर्वीचं अमेरिकेला जबरदस्त तडाखा देणारं वादळ होतं कतरिना. 2005 मध्ये आलेल्या या हरिकेनमुळे 1,800 जणांचा जीव गेला होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर अमेरिकेमध्ये पूर परिस्थिती उद्भवल्यास तिला तोंड देण्यासाठीच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्या किती सक्षम आहेत, हे आता या हरिकेन आयडाच्या तडाख्यादरम्यान सिद्ध होईल.
हरिकेन आयडाने मेक्सिकोच्या आखातात शनिवारी जोर धरला आणि रविवारी हे वादळ न्यू ऑरलिन्सला धडकलं. यामध्ये इमारती, झाडं आणि विद्युत वाहिन्यांचं मोठं नुकसान झालंय.
या वादळामुळे मेक्सिकोच्या आखातातलं 90 टक्के तेल उत्पादन बंद करण्यात आलंय.
अशी नावं का?
चक्रीवादळ नेमकी काय असतात? म्हणजे एकाला हरिकेन म्हटलं तर मग दुसऱ्याला टायफून का म्हणतात?
ही सर्व वादळं उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल असतात. पण जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं.
उत्तर अटलांटिक आणि पूर्वोत्तर पॅसिफिक महासागरात त्यांना हरिकेन असं संबोधलं जातं.
वायव्य पॅसिफिक महासागरात अशा प्रकारची वादळं टायफून म्हणून ओळखली जातात, तर दक्षिण पॅसिफिक आणि हिंदी महासागरात या वादळांना सायक्लोन म्हटलं जातं.
उष्णकटिबंधीय सायक्लोन ही हवामानशास्त्रज्ञांद्वारे वापरली जाणारी सामान्य संज्ञा आहे.
उष्णकटिबंधीय पाण्यावर उगम पावणारे ढग आणि झंझावात यांचं मिश्रण जेव्हा चक्राप्रमाणे फिरतं, त्याला सायक्लोन म्हणतात, असं USच्या National Oceanic and Atmospheric Administrationचं म्हणणं आहे.
हे सायक्लोन कमीत कमी ताशी 119 किमी वेगानं येऊन धडकत असेल तर त्याच्या उगमानुसार त्याला हरिकेन किंवा टायफून असं संबोधलं जातं.
वाऱ्याच्या गतीनुसार हरिकेनचे वर्गीकरण हरिकन 1 ते हरिकन 5 अशा गटांमध्ये केलं जातं.
ही वादळं केव्हा येतात?
अटलांटिक महासागरात ही वादळं सामान्यतः 1 जून ते 30 नोव्हेंबरदरम्यान येतात. या प्रदेशातील 95 टक्क्यांपेक्षा अधिक वादळं याच कालावधीत येतात.
वायव्य पॅसिफिक महासागरातील टायफून मे ते ऑक्टोबरदरम्यान येतात. असं असलं तरी ही वादळं वर्षात कधीही तयार होऊ शकतात.

फोटो स्रोत, EPA
तर दक्षिण पॅसिफिक महासागरात सायक्लोन नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येतं.
वादळांना नावं कशी पडली?
संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान संघटना हे जगभरातल्या वादळांच्या नावाची यादी बनवत असते.
टायफून हैयान किंवा हरिकेन कॅटरिना यांसारख्या अत्यंत धोकादायक वादळांची नावं बदलण्यात आली आहेत.
ज्या देशांमध्ये हरिकेन, टायफून, सायक्लोन वादळं येतात, त्या देशांकडून जागतिक बैठकीदरम्यान वादळांची नावं सुचवली जातात.
चक्रीवादळाचं विज्ञान
उबदार समुद्राच्या पाण्यामुळे हवा वेगात वाहू लागते. जसंजसं उबदारपणा कमी होत जाते, तसतशी हवेतील उष्णता कमी होते.
यामुळे एक चक्र तयार होतं. उष्णकटिबंधीय वादळांचा वेग ताशी 119 किलोमीटर असतो.
वादळादरम्यान प्रचंड लाटा तयार होतात. ज्यावेळेस या लाटा किनाऱ्यावर पोहोचतात तेव्हा त्यांच्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते.
वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे हानी होऊ शकते. यामुळे घरं पडू शकतात, झाडं पडू शकतात.
समुद्रातील पाण्याचं तापमान वाढत असल्यानं त्यामुळे भविष्यात हरिकेनची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
उष्ण वातावरणामुळे अधिक पाणी थांबवलं जातं आणि यामुळे हरिकेनची व्याप्ती वाढण्याची शक्यता असते.
पण हवामान बदल आणि हरिकेन यांच्यातील संबंध अनेक घटकांवर अवलंबून असतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








