LGBTQ : समलैंगिक जोडप्यांनी पारंपरिक विवाहासाठी शोधला 'हा' मार्ग

समलैंगिक जोडप्यांना पारंपरिक पद्धतीनं विवाह करण्यात अनेक अडचणी येतात. मात्र अशा भारतीय-अमेरिकन जोडप्यांनी विवाह बंधनात अडकून एक होता यावं यासाठी एक नवी आणि अनोखी कल्पना शोधली आहे. त्याबाबतचा सविता पटेल यांचा हा रिपोर्ट.

समीर समुद्र आणि अमित गोखले यांनी पारंपरिक हिंदु विधीनुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना एका अनपेक्षित अशा अडचणीचा सामना करावा लागला. त्यांना लग्न लावून देणारे पुरोहित (पुजारी) त्यांना मिळू शकले नाहीत.

"आम्हाला हिंदु पद्धतीनं लग्न करायचं होतं. पण अनेक पुजारी नाही म्हणाले. एकानं तर मला गे असल्याच्या कारणामुळं लग्न लावण्यासाठी अवाजवी रक्कम मागितली, तेव्हा मला धक्काच बसला," असं नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणारे समीर यांनी सांगितलं.

पण, इच्छा नसलेल्या पुजाऱ्याकडून बळजबरी लग्न लावून घेण्याची त्यांचीही तयारी नव्हती, त्यामुळं त्यांनी यावर एक मार्ग शोधून काढला.

"आमच्या मित्रांपैकीच एकानं पुजे संदर्भातील सर्वसाधारण बाबी आणि विधी शिकून घेतले आणि त्या माध्यमातून आम्ही हिंदू पद्धतीनं समलैंगिक विवाह सोहळा करण्याचा निर्णय घेतला,'' असं समीर यांनी सांगितलं.

अशी अनेक भारतीय-अमेरिकन जोडपी बॉलिवूड स्टाईल आणि पारंपरिक पद्धतीनं थाटामाटातील मोठ्या विवाह सोहळ्यांची स्वप्न पाहतात. पण समलैंगिक जोडप्यांसाठी हे बोलण्याएवढं सोपं नाही. अमेरिकेत तर 2015 मध्येच समलैंगिक विवाहांना मान्यता मिळाली आहे, तिथंही हे सहज शक्य होत नाही.

अमेरिकेत परवानगी मिळाल्यानंतर आतापर्यंत जवळपास 3 लाख गे जोडप्यांनी विवाह केले आहेत. पण अशा प्रकारे पारंपरिक विधीनुसार विवाह लावून देणारे (पुजारी) टाळाटाळ करत असल्याचा अनुभव भारतीय-अमेरिकन जोडप्यांना अनेकदा येतो.

'कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागायचं?'

मंदिरांमध्ये समलिंगी विवाहांना नकार देणं, पुजाऱ्यांचं विनाकारण फोनवर बोलत टाईमपास करणं, टाळाटाळ करणं किंवा काही प्रकरणांत तर लग्नाच्या दिवशीच गायब होणं असे अनेक अनुभव भारतीय-अमेरिकन गे जोडप्यांना आले. त्यामुळं अखेर अशा जोडप्यांनी मित्र किंवा हितचिंतकांच्या मदतीनं पारंपरिक विवाह सोहळे अनोख्या पद्धतीनं आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

उदाहरण द्यायचं झाल्यास सपना पांड्या यांचं देता येईल. हिंदू धर्मात शक्यतो महिला पुजारी आढळत नाही. पण स्वतःच्या लग्नासाठी त्या स्वतःच पुजारी बनल्या.

सपना आणि त्यांच्या पाकिस्तानी पत्नी सेहेर यांना पारंपरिक पद्धतीनं लग्न करायचं होतं. पण त्यांना विरोधाचा सामना करावा लागला.

"मंदिरात जाऊन पुजाऱ्यांना विचारण्यात मला सहजपणा वाटत नव्हता. त्याचप्रमाणं माझ्या पत्नीला मशिदीत जाऊन इमामांना विचारणं जमत नव्हतं. त्यामुळं आम्ही स्वतःच स्वतःच्या विवाहाचे विधी केले," असं सपना म्हणाल्या.

नव्या नात्याच्या या बंधनात अडकण्यासाठी त्यांनी हिंदु मंत्र आणि कुराणातील ओळींची निवड केली आणि स्वतः ते म्हटले.

सपना पंड्या या अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी काम करतात. सध्या त्या प्रामुख्यानं LGBTQ समुदायांच्या विवाह सोहळ्याची कामं पाहतात, असं त्यांनी सांगितलं.

समलैंगिक समुदायाबाबतचे दुराग्रह आणि गैरसमज दूर व्हावे यासाठी, सपना यांच्यासारखे काही जण त्यांचे व्यवसाय आणि करिअर सांभाळून अशा प्रकारे पुजारी बनले आहेत. लग्न हे केवळ पुरुष आणि महिला यांच्यातच होऊ शकतं असं मानणाऱ्या पारंपरिक पुजाऱ्यांना जणू त्यांनी आव्हान दिलं आहे.

अभिषेक सांघवी हे जैन पुजारी असून ते कर सल्लागार म्हणून काम करतात. 2019 मधील वैभव जैन आणि पराग शाह यांच्या समलिंगी जैन विवाह सोहळ्यातील त्यांचा व्हीडिओ जगभरातील अनेक समलिंगी जोडप्यांसाठी प्रेरणा ठरला.

"तेव्हा दोन जैन तरुण जैन विवाहासाठी शोधाशोध करत होते. करुणा हा तर जैन धर्माचा पाया आहे. सर्व धर्मदेखील प्रेमाचीच शिकवण देतात," असं सांघवी म्हणाले.

डॉ. शुकवाक दास हेदेखील याच्याशी सहमत आहेत. मूळचे ख्रिश्चन आणि हिंदु धर्म स्वीकारलेले दास यांनी संस्कृत आणि भारतीय अभ्यासात पीएचडी केली आहे. लॉस एंजल्समध्ये असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिराचे ते प्रमुख पुजारी आहेत. त्यांनी असे हजारो विवाह लावले आहेत.

...आणि पारंपरिक पद्धतीने विवाहाचं स्वप्न झालं साकार

"समलैंगिक व्यक्तींचा विवाह होऊ शकत नाही असं कुठंही म्हटलेलं (हिंदू धर्मग्रंथांत) मला माहिती नाही," असं ते म्हणाले.

त्यांनी काही दिवसांपूर्वीच लावलेल्या एका समलिंगी विवाहाच्या आठवणीही सांगितल्या. "आमच्या मुलाला तुम्ही संस्कृतीत स्थान दिलं असं म्हणत नवरदेवाच्या वयस्कर माता पित्यांनी साश्रू नयनांनी माझे आभार मानले. आपण सर्व या विश्वामध्ये आत्म्याच्या रुपात आहोत. कधी आपण पुरुष तर कधी महिलेच्या शरिरात असतो. पण सर्व आत्मा या समानच आहेत," असं ते म्हणाले.

दास यांनी मोनिका मरक्वेझ आणि निक्की बरुवा यांचा समलिंगी (लेस्बियन) विवाह लावून देत त्यांचा उत्साहदेखील वाढवला.

"मोनिका आणि मी आमच्या दोघींचीही नाळ आपआपल्या संस्कृतींशी जोडलेली होती. अगदी बालपणापासून आम्ही पारंपरिक पद्धतीनं लग्नाची स्वप्न पाहिली होती," असं भारतीय-अमेरिकन उद्योजिका आणि लेखिका बरुआ म्हणाल्या.

त्यांच्या पार्टनर मेक्सिन-अमेरिकन आहेत. त्यांनाही पुजारी शोधण्यात अडचणी आल्या पण दास यांच्यामुळं त्यांचं विवाहाचं स्वप्न पूर्ण होऊ शकल्याचं निक्की बरुवा म्हणाल्या. "त्यांनी आम्हाला कधीही वेगळी अशी वागणूक दिली नाही किंवा तशी जाणीवही होऊ दिली नाही. तो अगदी नैसर्गिक आणि अत्यंत सुंदर असा अनुभव होता. आम्ही एकमेकींसाठीच बनलो आहोत, असं आम्हाला वाटलं," असं त्या म्हणाल्या.

विवाह कोण लावणार हा प्रश्न

दास आणि पांड्या यांच्यासारख्या पुरोगामी विचाराच्या पुजारींना सध्या अमेरिकेत प्रचंड मागणी आहे. अनेकदा अशा जोडप्यांचा विवाह कोण लावणार असा प्रश्न पडतो. त्यामुळं बहुतांश वेळा त्यांना बाहेरच्या शहरांमध्येही जावं लागतं.

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये शक्यतो गोष्टी लवकर स्वीकारल्या जातात असा इतिहास आहे. पण तरीही याठिकाणी समलैंगिक जोडप्यांचा विवाह लावणाऱ्या पुजाऱ्यांची कमतरताच आहे. याठिकाणची काही हिंदू मंदिरं समलैंगिक विवाहाची परवानगी देत नाहीत. माधुरी अंजी आणि प्रीती नारायणन यांना हे कळलं तेव्हा त्या निराश झाल्या.

"आम्हाला अखेर दक्षिण आशियातील LGBTQ समुहाच्या माध्यमातून आमचे पुजारी राजा भट्टार हे मिळाले. लॉस एंजल्समधील आमचे हे पुजारी माझ्याच समुदायातील समलैंगिक पुरुष आहेत. आम्ही विधीमधील काही गमतीशीर भाग घेतले आणि कंटाळवाणे भाग वगळले. आम्ही दोघीही महिला आहोत, त्यामुळं स्त्री पुरुष अशा विषयाला काही अर्थच उरत नाही," असं नारायणन म्हणाल्या.

अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण सोहळ्यांना LGBTQ समुदायातील जोडप्यांबरोबरच सर्वसामान्य किंवा विषमलिंगी जोडप्यांचीही पसंती मिळत आहे. कारण त्यांनाही त्यांच्या समाजातील किंवा समारंभात अडचणी येणाऱ्या जात-पात, रुढी-परंपरा या काढून टाकण्याची इच्छा आहे.

हळूहळू वैचारिक बदलांना सुरूवात...

यामुळं पुजाऱ्यांच्या एका नव्या (क्वीर) समुदायाचा उदय होत आहे. मी मनाने पूर्णपणे एक हिंदु व्यक्ती आहे. पण मी उभयलिंगी होऊ शकतो याची मला जाणीव झाल्यानंतर, मला अशा प्रकारच्या विवाहांच्या कामात मदत करण्याची प्रेरणा मिळाल्याचं ताहील शर्मा म्हणाले. ताहील हे युनायटेड रिलिजन इनिशिएटिव्हचे उत्तर अमेरिकेचे समन्वयक आणि साधना या पुरोगामी हिंदुंच्या गटाचे सदस्य (बोर्ड मेंबर) आहेत.

पुजारी असो, वेडिंग प्लानर असो, केटरर्स असो किंवा मेंदी आर्टिस्ट विवाह सोहळ्यांशी संबंधित क्षेत्रामध्येदेखील आता वैचारिक बदलाला सुरुवात झाली असल्याचं वेडिंग प्लानर पूर्वी शाह म्हणाल्या. "आता अशा सेवा देणारे बहुतेक सगळे नकार न देता होकारच देतात. समलिंगी जोडप्यानं मला संपर्क केल्यास, मलाही अशा सोहळ्याचं नियोजन करायला नक्कीच आवडेल," असंही त्या म्हणाल्या.

मात्र असं असलं तरी अनेकांच्या विचारात अद्याप बदल होणं गरजेचं आहे, असं दक्षिण कॅलिफोर्नियातील मेंदी कलाकार नेहा अस्सर म्हणाल्या. नेहा यांना अशा प्रकारच्या समलिंगी विवाहांमध्ये गरजेनुसार त्यांच्या कलेच्या माध्यमातून बदल केले आहेत.

उदाहरण द्यायचे झाल्यास त्यांनी नवरीच्या हातावरील मेंदीमध्ये नवरदेवाचं नाव लपवण्याच्या परंपरेलाच छेद दिला आहे.

"मला तर दोन नवरींच्या हातावरच्या मेंदीमध्ये दोन्ही नवरींचीच नावं लपवण्यात खूप आनंद होतोय!"

(सविता पटेल या सॅन फ्रान्सिस्कोमधील पत्रकार आहेत. त्या भू-राजकारण, तंत्रज्ञान, सार्वजनिक आरोग्य आणि भारतीय समुदायांबाबत लिखाण करतात.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)