You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबान : 'मी गे असल्याचं कळलं तर ते मला मारून टाकतील'
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्याआधीसुद्धा अब्दुल( नाव बदलेलं आहे)चं आयुष्य कठीणच होतं. अब्दुल समलैंगिक आहे आणि ही गोष्ट जर त्याने कुणाला सांगितली तर त्याला तुरुंगात जावं लागलं असतं. आता तालिबानने ताबा मिळवल्यानंतर त्यांना जर आता असं काही कळलं तर तिथल्या तिथे हत्या केली जाते.
बीबीसी न्यूजबीटशी बोलताना अब्दुल सांगत होता की त्याच्या जीवाला धोका आहे. तालिबान एक कट्टरवादी संघटना आहे. ते इस्लामी परंपरा मानणारे लोक आहेत. 90च्या दशकात जेव्हा अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता होती तेव्हा अब्दुल्लाचा जन्मही झाला नव्हता.
अब्दुल सांगतो, "मी माझ्या घरच्या मोठ्या लोकांना तालिबानबद्दल बोलताना ऐकायचो. तालिबानविषयी काही चित्रपटसुद्धा आम्ही पाहिले होते. आता असं वाटतंय की आम्हीच या चित्रपटाचा एक भाग आहोत."
या आठवड्यात अब्दुलची अंतिम वर्षाची परीक्षा होती. एव्हाना तो आपल्या मित्रांबरोबर फिरायला गेला असता किंवा त्याच्या बॉयफ्रेंडला भेटला असता.
अब्दुल त्याच्या बॉयफ्रेंडला तीन वर्षांपूर्वी स्विमिंगपूलमध्ये भेटला होता. आता त्यांचं घर चार दिवसांपासून बंद आहे. आता त्यांच्या घराच्या बाहेर तालिबानचे लोक उभे आहेत.
तालिबानची भीती का वाटते?
तो सांगतो, "जेव्हा मी खिडकीतून बाहेर उभं राहून तालिबानला पाहतो तेव्हा मला भीती वाटते. माझं शरीर थरथर कापायला लागतं. सामान्य लोकांची कत्तल होतेय. मी त्यांच्यासमोर काही बोलू शकेन असं मला वाटत नाही."
अब्दुल फक्त तालिबानलाच नाही तर त्याच्या कुटुंबियांनाही काही सांगू शकत नाही. अब्दुल सांगतो, "अफगाणिस्तानात कोणताच समलैंगिक स्वत:विषयी त्यांच्या कुटुंबियांशी बोलत नाही. माझ्या कुटुंबियांना माझ्याविषयी कळलं तर ते मला मारतील. कदाचित माझा जीवही घेतील."
अब्दुलने त्याची लैंगिकता लपवून ठेवली होती. तो काबूलमध्ये त्याचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत होता. तो सांगतो, " माझा अभ्यास चांगला सुरू होता. हे शहर छान आहे. इथे आपलं एक वेगळं आयुष्य आहे."
एका आठवड्यातच त्याने आपलं आयुष्य इतकं बदलताना पाहिलं आहे. त्याला भीती वाटते, "मला नाही वाटत की आता मी माझं शिक्षण पूर्ण करू शकेन. माझ्या मित्रांशी माझा संपर्क तुटला आहे. मला माहिती नाही ते कोणत्या परिस्थितीत आहे.
"माझा पार्टनर आता दुसऱ्या शहरात आहे आणि मी वेगळ्या शहरात. तो इथे येऊ शकत नाही आणि मी तिथे जाऊ शकत नाही."
'ते समलैंगिकाना पाहताच गोळी मारतील'
अब्दुलचे वडील अफगाण सरकारमध्ये काम करायचे आणि आता ते लपले आहेत. अब्दुलच्या ओळखीतले बहुतांश लोक भीतीमुळे घराबाहेर पडत नाहीत. काही महिला धोका पत्करून घराबाहेर जात आहेत मात्र तेही पुरुषांबरोबर. गेल्या एक आठवड्यात अब्दुलसमोर अंधार निर्माण झाला आहे.
"मी प्रचंड नैराश्यात आहे. मी हे सगळं संपवण्याबाबत विचार करतो. मी अशा प्रकाराचं पारतंत्र्यातलं आयुष्य जगू इच्छित नाही. मला भविष्यात स्वातंत्र्य हवं आहे. तू समलैंगिक आहेस म्हणून इथे राहू शकत नाही असं कोणी म्हणायला नको."
आम्ही स्त्रियांना त्यांचे अधिकार देऊ, असं तालिबानने म्हटलं आहे. पण अब्दुलचा त्यांच्यावर विश्वास नाही.
तो म्हणतो, "भलेही तालिबानने स्त्रियांना अधिकार दिले तरी ते एलजीबीटी समूहाला कधीच स्वीकारणार नाहीत. ते त्याला जागीच मारून टाकतील."
विमानावर लटकून देश सोडून जाणाऱ्या लोकांबद्दल अब्दुल म्हणतो, "ते लोक वेडे नाहीत. त्यांचे इथे नोकरी व्यवसाय आहेत. त्यांचं सगळं छान सुरू होतं तरी ते इथून पळून जात आहेत. विमानाला लटकून जाणारे वेडे नाहीत. त्यांना माहिती आहे की ते अफगाणिस्तानात सुरक्षित नाहीत."
'मला सुद्धा स्वातंत्र्य हवंय'
अब्दुल सांगतो की तो देश सोडून जाण्याची संधीच शोधतो आहे. अनेक संघटना अफगाण नागरिकांची मदत करत आहेत.
ब्रिटन 20 हजार नागरिकांना आसरा देणार असल्याचं त्याला कळलं आहे. मात्र त्यासाठी कुठे अर्ज करायचा याची त्याला काहीही माहिती नाही.
ब्रिटनमध्ये समलैंगिकांसाठी काम करणाऱ्या स्टोनवॉलने ब्रिटन सरकारला एलजीबीटी समुदायाची मदत करण्याचं आवाहन केलं आहे. म्हणजे ते ब्रिटनमध्ये येऊन नवीन आयुष्य सुरू करू शकतील.
अब्दुल म्हणतो, "मी 21 वर्षांचा आहे. मी माझं सगळं आयुष्य युद्धात घालवलं आहे. बाँबस्फोट पाहिलेत, मित्रांना गमावलं आहे. नातेवाईक गमावले आहेत. आमच्यासाठी प्रार्थना करा, सगळ्यांसाठी प्रार्थना करा."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)