पाकिस्तान: गिलगिटमधून 32 वर्षांपूर्वी उड्डाण घेतलेलं विमान नेमकं गेलं कुठं?

फोटो स्रोत, SHAHID IQBAL
- Author, मोहम्मद झुबेर खान
- Role, बीबीसी उर्दू
"माझे वडील अखेरच्या श्वासापर्यंत मुलगी, जावई आणि नातीची आठवण काढत राहिले. आयुष्यभर त्यांनी हिमालयातील डोंगरांपासून ते अफगाणिस्तान आणि भारताला लागून असलेल्या सीमा भागापर्यंत विमानाच्या अवशेषांचा ढिगारा शोधण्याचा अपयशी प्रयत्न केला. या विमानात त्यांची मुलगी, जावई आणि नात प्रवास करत होते.''
गिलगिटमध्ये राहणाऱ्या शाहीद इकबाल यांना पीआयएच्या उड्डाण घेतल्ल्या दुर्दैवी फ्लाइट नंबर 404 विमानाबाबत विचारलं तेव्हा त्यांनी वरील उत्तर दिलं.
25 ऑगस्ट 1989 ला सकाळी सुमारे 7:30 वाजता गिलगिटहून इस्लामाबादला जाणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या फ्लाईट क्रमांक 404 मध्ये क्रू मेंबर्ससह एकूण 54 प्रवासी होते. त्यात पाच अगदी लहान बाळांचाही समावेश होता.
या विमानानं गिलगिटमधून उ्ड्डाण घेऊन आता 32 वर्ष लोटली आहेत, पण अजूनही हे विमान बेपत्ता आहे. या विमानाबरोबर काय घडलं, कुठल्या परिस्थितीत अपघात झाला याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही.
अधिकाऱ्यांनी विमानाचे अवशेष शोधण्याचा दीर्घकाळ प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. अखेर विमानातील सर्वांना मृत जाहीर करण्यात आलं.
याच विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये शाहीदचे वडील अब्दुल रझ्झाक यांची मुलगी निलोफर, त्यांचे पती नासिरुद्दीन आणि चिमुकली नात यांचाही समावेश होता.
विमान नेमकं कुठं गेलं?
शाहीद इक्बाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांनी आयुष्यभर स्वतः त्या विमानाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. ''विमानाचे अवशेष म्हणजे काही, सुई एवढी वस्तू नाही जी दिसणार नाही,'' असं इक्बाल यांचे वडील म्हणायचे.
पण काही दिवसांपूर्वीच अब्दुल रझ्झाक यांचंही निधन झालं आहे.
विमानात एकूण 49 प्रवासी होते
या विमानात दोन विदेशी नागरिक आणि पाच चिमुकल्या मुलांसह 49 प्रवासी होती. तर पाच क्रू मेंबर्सचा समावेश होता. प्रवाशांमध्ये बहुतांश गिलगिट-बाल्टिस्तानचे रहिवासी होते.
दोन विदेशी प्रवाशांमध्ये पत्रकार आणि शिक्षक असलेले डॉक्टर रेना सीड्रेस आणि पॉल मॅकगवर्न हेही प्रवास करत होते.
शाहीद इक्बाल हे बहीण निलोफरपेक्षा चार वर्षांनी लहान आहेत.
"माझे भावोजी नसिरुद्दीन गिलगिट कृषी बँकेत मॅनेजर होते. त्यांचे वरिष्ठ सहकारी असिफुद्दीन यांच्यासह ते इस्लामाबादला जात होते. विमानात आसिफुद्दीन यांच्या पत्नी आणि मुलंही होते," असं शाहीद यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, JANG NEWSPAPER
"मी स्वतः बहीण, भाऊजी आणि भाची यांना विमानतळावर सोडलं होतं. तिथं आसिफुद्दीन यांचं कुटुंबही होतं. एअरपोर्टवर दोन्ही कुटुंब एकमेकांशी बोलत होती. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर मी घरी परत आलो."
"सुमारे दीड तासांनी आम्ही ते सगळे इस्लामाबादला सुखरुप पोहोचले का याची माहिती घेण्यासाठी विचारपूस केली. त्यावेळी आम्हाला विमान बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं. ते ऐकूण जणू आमच्यावर दगड कोसळला," असं ते म्हणाले.
फ्लाइन नंबर 404 शी संबंधित अनेक कुटुंबाची हीच कहाणी आहे.
हात दाखवत विमानात प्रवेश
गिलगिटचे रहिवासी असलेले जहूर अहमद रावळपिंडीमध्ये व्यवसाय करतात. त्यांचे लहान भाऊ एजाज अहमद, मामेभाऊ मोहम्मद इब्राहीम आणि भावाचे मित्र मोहम्मद इरफानही त्याच विमानात प्रवास करत होते.
"माझा भाऊ इस्लामाबादच्या एका नाइट कॉलेजमध्ये इंटरमिजिएटचा विद्यार्थी होता. तो सुट्यांसाठी घरी आला होता. सुट्या संपणार होत्या आणि आमचं घर विमानतळाच्या जवळच होतं. मी स्वतः त्याला मोटरसायकलवर त्याला विमानतळावर सोडायला गेलो होतो. मोहम्मद इब्राहीम आमच्या आधीच पोहोचले होते तर मोहम्मद इरफान हे विमानतळावर भेटले होते,'' असं त्यांनी सांगितलं.
तिघं मित्र हसत खेळत त्यांच्या समोर विमानात चढले होते, असं जहूर अहमद सांगतात. "त्या तिघांनी विमानात प्रवेश करण्यापूर्वी हात दाखवत मला निरोप दिला होता. अनेक वर्षांनंतर आजही मी ते दृश्य विसरू शकलेलो नाही."

फोटो स्रोत, ZAHOOR AHMED
या घटनेनंतर त्यांच्या आईला नैराश्यानं ग्रासलं होतं, असं जहूर अहमद म्हणाले.
"मुलगा गमावल्यानंतर आईला धक्का बसला. माझी आई जेव्हाही विमान अपघाताची बातमी ऐकायची तेव्हा ती रडू लागायची. या घटनेला 32 वर्षे लोटली आहेत, पण विमानाचं नेमकं काय झालं? हे आम्हाला अजूनही सांगण्यात आलेलं नाही."
फ्लाइट नंबर 404 बरोबर काय घडलं?
बीबीसीनं फ्लाइट 404 बाबत माहिती मिळवण्यासाठी पीआयए आणि सिव्हिल एव्हीएशन अथॉरिटी (नागरी उड्डाण प्राधिकरण) शी संपर्क केला. ही अत्यंत जुनी घटना असून याबाबतच्या चौकशीचा कोणताही अहवाल रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्याचं, त्यांनी सांगितलं.
दोन्ही संस्थांनी याबाबत माहिती देणंच शक्य नसल्याचं सांगितलं.
एव्हिएशन सेफ्टी नेटवर्कच्या मते, फ्लाइट क्रमांक 404 हे एक फोकर F-27 फ्रेंडशिप विमान होतं. 1962 मध्ये त्यानं सर्वप्रथम उड्डाण घेतलं होतं.
बेपत्ता होण्यापूर्वी विमानानं एकूण 44 हजार तासांपेक्षा अधिक काळ उड्डाण केलं होतं.

फोटो स्रोत, JANG NEWSPAPER
एव्हिएशन सेफ्टी नेटवर्कच्या मते, या विमानानं शुक्रवारी 25 ऑगस्ट 1989 ला सकाळी 7:36 वाजता गिलगिटमधून उड्डाण घेतलं होतं. 7:40 वाजता विमानाच्या क्रूनं कंट्रोल रूमला संपर्क करून 7.59 वाजता समुद्रसपाटीपासून 10 हजार फूट उंचावर असण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
विमानातील क्रूनं कंट्रोल रूमबरोबर केलेला हा अखेरचा संपर्क ठरला. त्या काळातील काही मीडिया रिपोर्ट्सनुसार विमान काही मिनिटंच हवेत राहिल्यानंतर बेपत्ता झालं होतं.
शोध मोहीम
वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, पीआयएच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं की, विमान बेपत्ता झाल्यानंतर पाकिस्तानच्या हिमालय पर्वतरांगांमध्ये विमानाची शोधमोहीम राबवण्यात आली. या शोध मोहिमेत शोध घेणारे कर्मचारी आणि स्थानिक जाणकारांसह जवळपास 700 जणांचा समावेश होता.
विमानाची ही शोधमोहीम अनेक दिवस राबवण्यात आली.
हिमालयाच्या पर्वत रागांमध्ये राबवलेलया या मोहिमेत पाकिस्तानच्या हवाई दलाची चार हेलिकॉप्टर्स, दोन सी-130 आणि पीआयएची दोन विमानं सहभागी झाली होती.

फोटो स्रोत, JANG NEWSPAPER
पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून भारतीय हवाई दलानंही भारताच्या हद्दीत विमानाचे अवशेष शोधण्यासाठी मोहीम राबवली होती.
त्या काळात याबाबत प्रकाशित झालेल्या बातम्यांवरून समोर आलेल्या माहितीनुसार बहुतांश शोधमोहीम जगातील सर्वात कठीण असलेल्या नागा पर्वत आणि त्याच्या आसपास राबवण्यात आली. त्यावेळी नागा पर्वतावर असलेल्या दोन ब्रिटिश गिर्यारोहकांनी माध्यमांना एक विमान नागा पर्वतावर अत्यंत कमी उंचीवर उडताना दिसल्याचं सांगितलं होतं.
अधिकाऱ्यांनी शोध मोहीम संपल्याचं जाहीर करून विमानातील प्रवाशांना मृत घोषित केलं. तरीही माझ्या वडिलांना यावर विश्वास बसत नव्हता असं शाहीद इक्बाल सांगतात. त्यामुळं ते स्वतः नागा पर्वतावर गेले होते. त्याठिकाणी शोध घेण्यासाठी त्यांनी अनेक स्थानिकांची मदतही घेतली होती.
शाहीद इक्बाल यांच्या मते, अधिकाऱ्यांनी मोहीम संपल्याचं जाहीर केल्यानंतर केवळ त्यांच्या वडिलांनीच नाही तर, अनेक कुटुंबांनी त्यांच्या परीनं विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. अनेक महिने अशाप्रकारे शोघ घेणं सुरुच होतं.
"माझे वडील इतर प्रवाशांच्या कुटुंबीयांबरोबर चित्रालला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या डोंगरांवरही गेले होते. त्याठिकाणीही त्यांनी स्थानिक लोकांशी संपर्क केला होता. नियंत्रण रेषेवरही त्यांनी खूप शोध घेतला होता. शक्य त्या सर्व ठिकाणी त्यांनी शोध घेतला होता.''
शक्यता काय?
पाकिस्तानच्या हवाई दलाचे एक माजी अधिकारी सरदार फिदा हुसेन यांच्या मते, नेमकं काय झालं असेल याबाबत काहीही सांगणं शक्य नाही.
फिदा हुसेन यांनी इराकच्या राष्ट्रीय एअरलाइनसाठी सल्लागार म्हणूनही काम केलं आहे.
ही घटना घडली त्यावेळी विमानाचे अवशेष अशा कठीण भागातून शोधता येतील इतपत तंत्रज्ञान विकसित नव्हतं, असं ते म्हणाले. त्यामुळं आता केवळ शक्यतांवर चर्चा करता येऊ शकेल कारण अवशेष किंवा ब्लॅकबॉक्स काहीही मिळालेलं नाही.
फिदा हुसेन यांच्या मते, कंट्रोल रूमबरोबर अखेरचा संपर्क झाला त्यावेळी सर्वकाही अगदी सामान्य होतं.
"जगभरात प्रत्येक उड्डाणानंतर अशाप्रकारे संपर्क केला जातो. ही अत्यंत सामान्य प्रक्रिया होती, त्यावरून काहीही अंदाज लावता येणार नाही. विमानानं जेव्हा उड्डाण घेतलं तेव्हा सर्वकाही ठिक होतं, असाच अंदाज लावता येऊ शकतो."

फोटो स्रोत, SHAHID IQBAL
''पहिल्या संपर्कानंतर पुन्हा संपर्कच झाला नाही. साधारणपणे विमानात काही बिघाड झाला तर सर्वात आधी एअर ट्राफिक कंट्रोलला माहिती दिली जाते. पण अशी काहीही माहिती मिळाली नव्हती. त्यामुळं दुर्घटना अचानक आणि अनपेक्षितपणे घडली असल्याची शक्यता आहे. त्यामुळं पायलटला ट्राफिक एअर कंट्रोलशी संपर्क करण्याची संधीच मिळाली नसेल,'' अशी शक्यता सरदार फिदा हुसेन यांनी व्यक्त केली.
"विमानाची संपर्क यंत्रणाच खराब झाली असल्यामुळं संपर्क करता आला नसेल, असंही शक्य आहे."
जर त्या काळातले काही पुरावे एकत्रित करून ठेवले असते किंवा पुरावे असलेले चौकशी, तपासाचे काही अहवाल असते तर त्याच्या आधारे आजच्या काळातील तंत्रज्ञानाची मदत घेत शोधमोहीम पुन्हा सुरू करता आली असती. पण आता ते अशक्य असल्याचं फिदा हुसेन म्हणतात.
नागा पर्वतावरील बर्फ आणि बर्फाच्या डोंगरांवर विमानाचा शोध घेणं सोपं ठरलं नसेल, असं ते म्हणाले.
"विमान बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच आम्ही सर्व गिलगिट विमानतळावर पोहोचलो. तिथं सर्व गोंधळाची स्थिती होती. विमानतळावर काम करणारे बहुतांश हे गिलगिटचे रहिवासी होते. त्यांना आम्ही ओळखत होतो, असं जहूर सांगतात.
सगळीकडं गोंधळाचं वातावरण असल्यानं सगळे केवळ ऐकिव आणि वादग्रस्त गोष्टींवर चर्चा करत होते.
"ज्या विमानानं उड्डाण घेतलं होतं, त्या विमानाचा स्वतंत्र वैमानिक नव्हता. तर पर्यटनासाठी आलेल्या दुसऱ्याच वैमानिकानं विमान उडवलं होतं, असं काही लोकांनी आम्हाला सांगितलं."
"त्यावेळी आम्ही हे सर्व तपास करणाऱ्या समितीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. पण सुरुवातीपासूनच आम्हाला अधिकारी आणि तपास समितीचं वर्तन योग्य नसल्याचं जाणवत होतं. ते आमच्या बोलण्याकडं लक्ष देत नव्हते," असं जहूर अहमद म्हणाले होते.
"चौकशीचा अहवाल लवकरच सादर केला जाईल, असं आम्हाला सांगितलं जात होतं. पण आता या सर्वाला 32 वर्ष लोटून गेली आहेत..."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








