अफगाणिस्तानः काबूल स्फोटांमध्ये 90 ठार, 150 जखमी; बायडन म्हणाले...

काबूल विमानतळाबाहेर 2 स्फोट झाले आहेत.

काबूल विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटांमध्ये 90 लोकांचा मृत्यू झाला असून 150 लोक जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्यानं बीबीसीला दिली आहे.

यात अमेरिकन लोकांचाही मृत्यू झाल्याचं पेंटागॉनने म्हटलं आहे.

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, "या हल्ल्यामागे जे लोक असतील त्यांना शोधून काढू, याची किंमत त्यांना मोजावी लागेल. त्यांना आम्ही विसरणार नाही आणि माफही करणार नाही. अमेरिकन लोकांना आमचं काम करण्यापासून दहशतवादी थांबवू शकत नाहीत. आम्ही काबूलमधलं मिशन थांबवणार नाही, लोकांना सुरक्षितपणे अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याचं काम सुरूच राहील."

मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. पण मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली आहे.

विमानतळावर असलेल्या अमेरिकन सैन्याच्या अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, एका हल्लेखोराने गर्दीत घुसून पहिला स्फोट घडवून आणला. त्यानंतर दुसऱ्या हल्लेखोराने आधी गोळीबार केला आणि मग स्वत:ला उडवलं.

"स्फोटांनंतर व्हायरल झालेल्या व्हीडिओंमध्ये मृतदेहांचा खच पडलेला दिसून येत आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे," असं बीबीसीचे अफगाणिस्तान प्रतिनिधी सिंकदर किरमानी यांनी सांगितलं आहे.

तालिबानने या हल्ल्यांचा निषेध केला आहे. आम्ही आमच्या लोकांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवून आहोत, असं त्यांनी म्हटलंय. तसंच हे दृष्टचक्र लवकरच थांबेल, असंही तालिबानच्या प्रवक्त्यांनी ट्विट केलं आहे.

या स्फोटांमध्ये अमेरिकन नागरिकांचासुद्धा मृत्यू झाल्याचं पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

काबूल एअरपोर्टवर सुरुवातीच्या स्फोटानंतर काही वेळ गोळीबार झाला आणि मग दुसरा छोटा स्फोट झाला, अशी माहिती बीबीसीच्या जॉनाथन बियाल यांनी दिली आहे.

दोन्ही स्फोट हे विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच झाले. याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील निर्वासित रोज मोठ्या प्रमाणावर गोळा होत आहेत.

आत्मघाती हल्ल्याद्वारे हा स्फोट करण्यात आल्याचं अमेरिकी सैन्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

"अॅबी गेटजवळ झालेल्या या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या आणि इतर काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसंच त्यानंतर काही वेळातच अॅबी गेटजवळच्या बॅरॉन हॉटेलमध्ये किंवा त्याजवळ काही अंतरावरच आणखी एक स्फोट झाला आहे," असं पेंटॉगॉनचे जॉन किर्बी यांनी ट्वीट करून म्हटलंय.

ब्रिटिश सैन्याच्या ताब्यात असलेल्या गेटवर हा स्फोट झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काबुल विमानतळात प्रवेश करण्यासाठी अनेक प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी 3 बंद करण्यात आले आहेत. दहशदवादी हल्ला होऊ शकतो या भीतीने हे तीन गेट बंद करण्यात आले आहेत. त्यापैकीच अॅबी गेटजवळ हा स्फोट झाला आहे. या परिसरात गेल्या आठवड्यापासून शेकडो शरणार्थी जमा झाले होते.

अॅबी गेट ब्रिटिश सैन्याच्या ताब्यातच होतं हे आता ब्रिटिश सैन्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. पण त्यात कुणी ब्रिटिश सैनिक मारला गेला आहे का, हे अजून स्पष्ट झालं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

काबूल विमानतळावर 2 स्फोट झाल्याचं तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचंदेखील म्हणणं आहे.

नेमका कुठे झाला स्फोट?

काबूल विमानतळावर एका सांडपाण्याच्या नाल्याजवळ अफगाणिस्तानातील निर्वासितांची व्हिसाची कागदपत्रं तपासली जात होती. त्याच ठिकाणी हा स्फोट झाल्याचं अफगाणिस्तानचे पत्रकार बिलाल सारवरी यांनी सांगितलं. बिलाल यांना काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आलं आहे.

आत्मघातकी हल्लेखोरानं लोकांच्या गर्दीमध्ये स्वतःला उडवलं त्यानंतर दुसऱ्या हल्लेखोरानं गोळाबार सुरू केला अशी माहिती त्यांनी दिली.

'विमानतळावर आणखी स्फोटांची शक्यता'

काबूलमध्ये असलेले फ्रान्सचे डेवीड मार्टिनन यांनी नागरिकांना विमानतळाच्या गेटपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. आणखी स्फोट होण्याचा धोका असल्यानं त्यांनी लोकांना सावध केलं आहे. "माझ्या सर्व अफगाण मित्रांनो, जर तुम्ही एअर पोर्टच्या गेटवर असाल तर लगेचच तिथून लांब जा आणि लपून राहा. दुसऱ्या स्फोटाची शक्यता आहे," अशी पोस्ट त्यांनी ट्विटरवर केली आहे.

स्फोट अत्यंत शक्तिशाली

हा स्फोट अत्यंत शक्तिशाली होता असं काबूल विमानतळा बाहेर असलेल्या या हल्ल्याच्या एका प्रत्यक्षदर्शींने पत्रकारांशी बोलताना सांगितलं. "आम्ही ज्याठिकाणी होतो, त्याच ठिकाणी अचानक एक स्फोट झाला," असं रॉयटर्सच्या व्हीडिओत ही व्यक्ती म्हणताना दिसत आहे. स्फोट झाला त्या परिसरात जवळपास 400 ते 500 लोक होते असं त्यांनी सांगितलं. तसंच पीडितांमध्ये विदेशी लष्करातील काहींचा समावेश असल्याचंही तो म्हणाला. "आम्ही जखमींना स्ट्रेचरवरून याठिकाणी आणलं, त्यामुळे माझे कपडे पूर्णपणे रक्ताने माखले होते," असंही तो म्हणाला.

हल्ल्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष

अफगाणिस्तान सोडण्याची इच्छा असलेले हजारो नागरिक गेल्या काही दिवसांपासून काबूल विमानतळावर गर्दी करत होते. त्यामुळं या भागाला लक्ष्य केलं जाऊ शकतं, असा इशारा काही देशांकडून देण्यात आला होता. त्यानंतर हा स्फोट झालाय.

इंग्लंडनं तर हल्ल्याच्या तासाभरापूर्वीच याठिकाणी कोणत्याही क्षणी अत्यंत प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला होता.

अफगाणिस्तानच्या राजधानीमध्ये हल्ला होण्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली होती, असं संरक्षण मंत्री जेम्स हेप्पी यांनी सांगितलं.

अमेरिकेनंही अफगाणिस्तानतील अमेरिकेच्या नागरिकांना प्रवास न करण्याचा आणि विमानतळाच्या गेटबाहेर गर्दी न करण्याचा सल्ला दिला होता. सुरक्षिततेला धोका असल्याच्या कारणावरून हा सल्ला देण्यात आला होता.

ऑस्ट्रेलियानेही अलर्ट जारी करून विमानतळाच्या बाहेर असणाऱ्यांनी त्वरित तिथून निघावं, असं सांगितलं होतं.

असं असलं तरी अफगाणिस्तान सोडण्याची इच्छा असलेले अनेक अफगाण हे या इशाऱ्यांकडं दुर्लक्ष करत विमानतळाच्या गेटबाहेरच थांबले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)