तालिबान : मौलवी घनी बरादर काबूलमध्ये दाखल, तालिबानच्या सरकार स्थापनेच्या हालचाली

अफगाणिस्तानात नवं सरकार स्थापन करण्याच्या उद्देशानं तालिबानचे सहसंस्थापक मौलवी अब्दुल घनी बरादर काबूलमध्ये पोहोचले आहेत.

काबूलमध्ये ते त्यांच्या सहकाऱ्यांशी आणि इतर नेत्यांशी याबाबत चर्चा करणार आहेत.

एक सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्यासाठी ते जिहादी नेते आणि इतर लोकांशी चर्चा करतील. त्यांच्या भेटीगाठी घेतली, असं तालिबानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं न्यूज एजन्सी एएफपीला सांगितलं आहे.

बरादर यांना 2010 मध्ये पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. पण नंतर 2018 मध्ये त्यांना कतारला पाठवण्यात आलं होतं.

बरादर यांना तालिबानच्या दोहातल्या तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं. त्यांना अमेरिकी सैन्याबरोबर होणाऱ्या समझोत्यावर हस्ताक्षर करण्याचे अधिकार देण्यात आले होते.

बरादर मंगळवारी कतारहून कंदहारला पोहोचले होते. कंदहारला तालिबान्यांचा बालेकिल्ला मानलं जातं. तिथंच त्यांचा उदय झाला होता.

अब्दुल घनी बरादर कोण आहे?

मौलवी अब्दुल घनी बरादर हे 1994 साली तालिबानची स्थापन करणाऱ्या चार व्यक्तींपैकी एक आहेत.

सन 2001 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानवर आक्रमण झालं, तेव्हा तालिबानला सत्तेपासून दूर करण्यात आलं. त्या वेळी नाटो सैन्यदलांविरोधातील बंडखोरीची धुरा बरादर यांनी सांभाळली होती.

त्यानंतर फेब्रुवारी 2010 मध्ये अमेरिका व पाकिस्तान यांच्या एका संयुक्त कारवाईदरम्यान त्यांना पाकिस्तानातील कराचीमधून अटक करण्यात आलं.

2012 सालापर्यंत मौलवी बरादर यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती.

त्या वेळी अफगाणिस्तानच्या सरकारने शांतता चर्चेला चालना देण्यासाठी ज्या कैद्यांच्या मुक्ततेची मागणी केली होती, त्यात बरादर यांचं नाव प्राधान्यक्रमावर होतं.

सप्टेंबर 2013 मध्ये पाकिस्तानी सरकारने त्यांना मुक्त केलं, पण त्यानंतर ते पाकिस्तानातच थांबले की इतर कुठे निघून गेले हे स्पष्ट झालं नाही.

मौलवी बरादार तालिबानी नेता मुल्ला मोहम्मद उमर यांचे सर्वांत विश्वासू सहकारी होते.

अटक झाली तेव्हा ते तालिबानमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते.

बरादर यांच्या स्थानावरील नेता शांतता चर्चेसाठी तालिबानचं मन वळवू शकतो, असं अफगाणिस्तानी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायमच वाटत होतं.

2018 साली कतारमध्ये अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी तालिबानने मंजुरी दिली, तेव्हा तालिबानी राजनैतिक मंडळाचं प्रमुखपद बरादर यांच्याकडे आलं.

मुल्ला बरादर कायमच अमेरिकेशी चर्चा करण्याच्या बाजूचे होते.

1994 मध्ये तालिबानची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी कमांडर आणि रणनीतिकार अशी भूमिका निभावली.

मुल्ला उमर जिवंत असताना बरादार यांच्याकडे निधीसंकलन आणि दैनंदिन व्यवहाराची धुरा होती.

अफगाणिस्तानातील सर्व लढायांमध्ये त्यांनी तालिबानच्या बाजूने महत्त्वाची भूमिका निभावली. विशेषतः हेरात व काबूल या क्षेत्रांमध्ये ते सक्रिय होते.

तालिबानला सत्ता सोडावी लागली तेव्हा ते उप-संरक्षण मंत्री होते.

त्यांना अटक झाली तेव्हा अफगाणिस्तानातील एका अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं होतं की, 'बरादर यांची पत्नी मुल्ला उमर यांची बहीण आहे. तालिबानच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा हिशेब आधी तेच ठेवत असत. अफगाणी सैन्यदलांविरोधातील सर्वांत आक्रमक हल्ल्यांचं नेतृत्व त्यांच्याकडे असायचं.'

तालिबानच्या इतर नेत्यांप्रमाणे मुल्ला बरादर यांच्यावरही संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंध लावले होते. त्यांना प्रवास करण्यावर आणि शस्त्रं विकत घेण्यावर प्रतिबंध होता.

2010 साली अटक होण्यापूर्वी त्यांनी काही निवडक सार्वजनिक विधानं केली होती.

2009 साली त्यांनी ई-मेलद्वारे न्यूजवीक साप्ताहिकाला मुलाखत दिली होती.

अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या वाढत्या उपस्थितीबाबत ते म्हणाले होते की, तालिबानी अमेरिकेचं अधिकाधिक नुकसान करण्याच्या प्रयत्नात आहेत.

आमच्या जमिनीवरून शत्रूंचा नायनाट होत नाही, तोवर आमचा जिहाद सुरूच राहील, असं त्यांनी सांगितलं होतं.

इंटरपोलच्या म्हणण्यानुसार, मुल्ला बरादर यांचा जन्म उरूझगान प्रांतातील देहरावूड जिल्ह्यामध्ये वीटमाक या गावी 1968 साली झाला.

ते दुर्रानी कबिल्यातील असल्याचं मानलं जातं. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करझईसुद्धा दुर्रानी आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)