You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दक्षिण कोरिया : महिलांनी केस कापल्यावर पुरुषांना का राग येतो?
- Author, येवेट टॅन आणि वेयी यिपो
- Role, बीबीसी न्यूज
दक्षिण कोरियाची तिरंदाज अॅन सॅनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्ण पदकांची कमाई केली. मायदेशी परतल्यावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव तर झालाच मात्र टीकेचा भडिमारही झाला.
कारण? कारण तिचे केस लहान आहेत.
लहान केसांमुळे तिच्यावर अपमानास्पद शेरेबाजी करण्यात आली. तिला 'स्त्रीवादी'ही म्हटलं गेलं. दक्षिण कोरियात 'स्त्रीवादी' असणं म्हणजे 'कट्टर पुरूष द्वेषी', असा समज आहे.
अॅन टोकियोहून परतल्यावर एका यूजरने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, "तिला गोल्ड मेडल मिळालं, हे चांगलंच आहे. पण, तिच्या लहान केसांवरून ती 'स्त्रीवादी' वाटते. जर तसं असेल तर मी माझा पाठिंबा काढून घेतो. सर्व स्त्रीवाद्यांचा नाश होवो."
मात्र, अॅनावर टीकेची झोड उठल्यावर तिच्या समर्थनार्थही मोहीम सुरू झाली. दक्षिण कोरियातील लहान केस असलेल्या हजारो स्त्रियांनी त्यांचे फोटो शेअर करत 'केस लहान असले म्हणून आमचं स्त्रीपण कमी होत नाही', असा संदेश दिला.
दक्षिण कोरियातील स्त्रियांनी भेदभाव आणि गैरसमजांविरोधात दिर्घ लढा दिला आहे. मात्र, गेल्या दशकभरात #MeToo ते गर्भपात बंदी कायद्याच्या विरोधापर्यंत अनेक लढे देत तिथल्या लेकींनी स्त्रीसमानतेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
दक्षिण कोरियातील नारीशक्तीने सुरू केलेल्या या नव्या चळवळीमुळे आणखी काही बदल घडेल का?
'लहान केसांनी माझं स्त्रीपण कमी होत नाही'
हॅन जियाँग यांनी ट्वीटरवर #women_shortcut_campaign या हॅशटॅगखाली लहान केसांसाठीची मोहीम सुरू केली आहे.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "प्रत्येक पुरूषी वर्चस्व असणाऱ्या ऑनलाईन कम्युनिटीवर अॅनाविरोधात एक नव्हे, दोन नव्हे तर अनेक स्रीविरोधी शेरेबाजी होत असल्याचं बघून मी फार अस्वस्थ झाले."
या स्रीविरोधकांमध्ये प्रामुख्याने तरुण पुरूषांचा समावेश असला तरी त्यात काही ज्येष्ठ पुरूष आणि स्त्रियांही आहेत.
त्या म्हणाल्या, "अशा प्रकारच्या सामूहिक हल्ल्यातून पुरूष स्त्रीदेहावर नियंत्रण ठेवू शकतो आणि स्त्रीने स्वतःची स्त्री म्हणून असलेली ओळख लपवायला हवी, असा संदेश दिला जातो."
"स्त्रियांना त्यांचे कापलेले लहान केस दाखवता यावे आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महिला खेळाडूंप्रती सन्मान व्यक्त करता यावा, हे दोन्ही उद्देश साधले जातील, अशी मोहीम उघडण्याचा विचार माझ्या मनात आला."
हॅन यांनी ट्वीटरवर मोहीम सुरू केल्यावर त्यांना भरभरून प्रतिसाद मिळू लागला. दक्षिण कोरियातील हजारो स्त्रियांनी छोटे केस असलेले आपले फोटो या हॅशटॅगसोबत पोस्ट करायला सुरुवात केली.
अनेकींनी लांबसडक केस आणि त्यानंतर कापलेले केस असे दोन्ही फोटो शेअर केले. तर अनेकींनी अॅन सॅनने आम्हाला केस कापण्यासाठी प्रेरित केल्याचं म्हटलं.
लहान केसांचा संबंध स्त्रीवादाशी का जोडण्यात येतो?
हॅवोन जंग लेखिका आहे. दक्षिण कोरियातील #MeToo चळवळीविषयीचं त्यांचं पुस्तक लवकरच येऊ घातलं आहे.
त्या सांगतात 2018 साली दक्षिण कोरियात 'cut the corset' चळवळ सुरू झाली होती. या चळवळीत स्त्रियांनी केस कापून आणि कुठलाही मेकअप न करता सौंदर्याची जी पारंपरिक व्याख्या मानली गेली तिला छेद देण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासूनच छोटे केस आणि स्त्रीवाद यांना एकमेकांशी जोडून बघितलं जाऊ लागलं.
लेखिका हॅवोन जंग म्हणतात, "तेव्हापासून कापलेले लहान केस म्हणजे एकप्रकारचं पॉलिटिकल स्टेटमेंट मानलं जाऊ लागलं"
"या स्त्रीवादी प्रबोधनाविरोधात पुरुषांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. स्त्रीवादाच्या नावाखाली हे अती होत असल्याची त्यांची भावना झाली."
बोटांनी दर्शविलेल्या विशिष्ट आकारावरून वाद
दक्षिण कोरियात स्त्रियांच्या लहान केसांविरोधातल्या मोहिमेआधी आणखी एक आक्रमक मोहीम राबवण्यात आली होती.
अंगठा आणि तर्जनी या दोन बोटांनी दर्शविलेल्या एका विशिष्ट आकारावर काही पुरुषांनी तीव्र आक्षेप घेतला होता.
हा आकार म्हणजे पुरुषांच्या लिंगाला कमी लेखण्याचा प्रकार असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.
हा आकार म्हणजे दक्षिण कोरियातील 'मेगालिया' या सध्या निष्क्रीय असलेल्या कट्टर स्त्रीवादी ऑनलाईन कम्युनिटीचा लोगो होता. हा समुदाय पुरूषविरोधी असल्याचं मानलं जातं.
या विरोधामुळे GS25 कंपनी, फ्राईड चिक चेन असलेल्या BBQ जेनेसिस आणि क्योचोन या सारख्या ब्रँडना यावर्षीच्या सुरुवातीला हा वादग्रस्त आकार असेलल्या आपल्या प्रिन्ट जाहिराती मागे घ्याव्या लागल्या होत्या.
खरंतर कुठलंही राजकीय वक्तव्य करण्याचा या कंपन्यांचा इरादा नव्हता. तरी त्यावेळी पुरुषांमध्ये विद्वेषाची भावना इतकी तीव्र होती की त्या आकाराशी साम्य असलेलं चित्र दिसताच त्याला लक्ष्य केलं जाई आणि ते काढून टाकण्यास भाग पाडलं जाई.
लॉस एंजेलिसमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये जेंडर स्टडिज विषयाच्या प्राध्यापिक डॉ. ज्युडी हॅन सांगतात, "काही पुरुष या प्रतिमेला स्त्रीवादाच्या एका विशिष्ट ब्रँडशी जोडून बघत आणि त्यामुळे त्यांना या प्रतिमेचा प्रचंड राग होता. ही प्रतिमा पुरुषांना कमी लेखत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं."
काही वेळा विरोधाचा सूर इतका तीव्र होता की कंपन्यांना माफीही मागावी लागली.
उदाहरणार्थ GS25 चे अध्यक्ष चो यून-संग यांनी या जाहिरातीमुळे भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत जाहिरात तयार करण्यात सहभागी सर्वांची चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. तरीही त्यांना पदावरून कमी करण्यात आलं होतं.
मात्र, अशाप्रकारे दिलगिरी व्यक्त केल्यामुळेच स्त्रीविरोधी घटकांचं मनोबल वाढल्याचं तज्ज्ञांना वाटतं.
लेखिका जंग म्हणतात, "त्यांनी आता ऑलिम्पिक विजेत्या अॅन सॅनला लक्ष्य केलं आहे. या वर्गाला द्वेष असणाऱ्या अनेक गोष्टींची ती प्रतिक आहे."
"तिचे केस लहान आहेत. ती महिला महाविद्यालयात शिकली. तिने काही असे हावभाव केले जे या ऑनलाईन जमावाला पुरूषविरोधी वाटतात."
पुढील वाटचाल
पुरुषांना विशेषतः तरुण मुलांना असं वाटतं की स्त्रिया जे यश संपादत आहेत ते त्यांच्या खर्चावर आणि हीच धारणा स्त्रीविरोधाच्या मुळाशी आहे.
हॅन म्हणतात, "पुरुषी वर्चस्व असणाऱ्या ऑनलाईन कम्युनिटीमध्ये तरुण मुलांना शिकवलं जातं की त्यांच्यावर होणारा अन्याय हा स्त्रियांमुळे आहे. उदाहरणार्थ परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करून स्त्रिया पुरुषांची जागा बळकावतात."
दक्षिण कोरियामध्ये महाविद्यालयीन प्रवेश आणि नोकरी यासाठी तीव्र स्पर्धा आहे आणि काही पुरुषांना असं वाटतं की स्त्रियांना स्त्री असल्याचा फायदा मिळतो.
उदाहरणार्थ दक्षिण कोरियात सर्व पुरुषांना 18 महिन्यांची सैन्यसेवा देणं बंधनकारक आहे. यात आमचा बराच वेळ वाया जात असल्याचं पुरुषांचं म्हणणं आहे. शिवाय, दक्षिण कोरियात अनेक महिला विद्यापीठं आहेत जिथे अत्यंत मागणी असणारे अभ्यासक्रम शिकवले जातात. मात्र, महिला विद्यापीठांप्रमाणे केवळ पुरुषांसाठी विद्यापीठं नाहीत. त्यामुळे स्पर्धेत आपण मागे पडत असल्याचं पुरुषांचं म्हणणं आहे.
मात्र, वास्तविक परिस्थिती वेगळी आहे.
दक्षिण कोरियात स्त्रिया पुरुषांच्या वेतनाच्या केवळ 63% कमावतात. विकसित राष्ट्रांमध्ये सर्वाधिक वेतन तफावत दक्षिण कोरियात आहे.
ही सगळी परिस्थिती बघता दक्षिण कोरियाच्या स्त्रियांचं भविष्य कसं असेल आणि लहान केसांवरून सुरू करण्यात आलेली नवीन चळवळ स्त्रियांना सशक्त करण्यात खरंच हातभार लावेल का, असा प्रश्न पडतो.
यावर लेखिका जंग म्हणतात, "गेल्या काही वर्षात खरंच काही बदल घडून आले आहेत, असं मला वाटतं. स्त्रिया आयुष्याचे नवनवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्त्रियांचा जो पारंपरिक मार्ग समजला जातो त्यावर चालण्यासाठी येणारा सामाजिक दबाव त्या झुगारत आहेत. सर्वात सोयीची वाटणारी केशभूषा निवडणं, हा याच मोठ्या लढ्याचा छोटासा भाग आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)