You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणिस्तान: तालिबानबाबत बैठकीला रशियाचं चीन-पाकिस्तानला निमंत्रण, मग भारताला का नाही?
- Author, अब्दुल सय्यद
- Role, रिसर्चर, बीबीसी उर्दूसाठी
रशियानं तालिबानची वाढती आक्रमकता आणि अफगाणिस्तानमधील बिघडत चाललेली स्थिती यावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
या बैठकीत रशियानं अमेरिका, चीन आणि पाकिस्तानला बोलावलं आहे. मात्र भारताला आमंत्रित केलं नसल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
अफगाणिस्तानातील विविध भागांवर तालिबानचा ताबा सातत्यानं वाढत आहे. त्यामुळं रशियानं अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेवर जोर देण्यासाठी महत्त्वाच्या भागीदारांची ही बैठक आयोजित केली आहे.
11 ऑगस्टला कतारमध्ये होऊ घातलेल्या या बैठकीला 'एक्सटेंडेड ट्रॉइका' म्हटलं जात आहे. अशाच प्रकारचा आणखी एक प्रयत्न याच वर्षी 18 मार्च ते 30 एप्रिल दरम्यानही करण्यात आली होती.
एक्सटेंडेड ट्रॉइकामध्ये भारताला आमंत्रित केलं नसल्यानं विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
अफगाणिस्तानातील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी भारताला सोबत घेऊनच प्रयत्न करायला हवे, असं गेल्या महिन्यात रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी ताश्कंदमध्ये म्हटलं होतं. त्यामुळं भारताला न बोलवल्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
सर्गेई लाव्हरोव्ह यांच्या या वक्तव्यानंतर एक्सटेंडेड ट्रॉइकामध्ये भारताला बोलावलं जाण्याची अपेक्षा होती. पण तसं झालं नाही.
तालिबानवर भारताचा प्रभाव नाही : रशिया
तालिबानवर भारताचा काहीही प्रभाव नसल्याचं रशियानं याबाबत कारण सांगताना म्हटलं आहे.
अफगाणिस्तानातील रशियाचे राजदूत जामीर काबुलोव्ह यांनी 20 जुलैलाच भारत एक्सटेंडेट ट्रॉइकामध्ये सहभागी होऊ शकत नाही असं सांगितलं होतं. त्यासाठी भारताचा प्रभाव नसल्याचं सांगण्यात आल्याचं, रशियाची वृत्तसंस्था तासच्या वृत्तात म्हटलं.
''एक्सटेंडेड ट्रॉइकाचा फॉरमॅट असा आहे की, त्यात केवळ चीन, पाकिस्तान आणि अमेरिकाच सहभागी होऊ शकतात. या चर्चेत केवळ दोन्ही बाजूंवर (अफगाणिस्तान आणि तालिबान) स्पष्ट प्रभाव असेल असेच देशच सहभागी होऊ शकतात,'' असं रशियाचे राजदूत म्हणाले.
अफगाणिस्तान संकटाचा विचार करता रशियाचे अमेरिकेबरोबर अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. पण आता दोन्ही देश शांतता प्रक्रियेसाठी प्रयत्न करत आहेत.
अफगाणिस्तानसाठी भारतानं आतापर्यंत काय केले?
दरम्यान, भारतानं अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्याचं कायम समर्थन केलं आहे.
भारतानं आतापर्यंत युद्धग्रस्त अफगाणिस्तानात पुनर्निर्माणाचं काम आणि इतर सहकार्यासाठी तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
त्यापूर्वी शुक्रवारी अफगाणिस्तानात वाढत्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर झालेल्या यूएनएससी (सुरक्षा परिषद) ची बैठक झाली होती. अफगाणिस्तानचा भूतकाळ त्याचं भविष्य बनू शकत नाही, असं भारतानं या बैठकीत म्हटलं होतं.
भारताच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत अफगाणिस्तानातील वेगानं बदलत्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली होती.
भारतातीतल अफगाणिस्तानच्या राजदुतांनी त्यासाठी भारताचे आभारही मानले होते.
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद हनिफ आत्मर यांनी मंगळवारी या मुद्द्यावर बैठक बोलवण्याचा आग्रह केला होता.
तालिबाननं अफगाणिस्तानातलं पहिलं मोठं शहर मिळवलं
अफगाणिस्तानातील नैऋत्य दिशेला असलेल्या एका प्रांतावर तालिबान बंडखोर संघटनेने संपूर्ण ताबा मिळवला आहे.
तालिबानी बंडखोरांनी निमरोज प्रांताची राजधानी झरंज या शहरावर शुक्रवारी (6 ऑगस्ट) नियंत्रण मिळवलं, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून बीबीसीला मिळाली. पण अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत माहिती हाती लागलेली नाही.
अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेत असताना या परिसरावर तालिबानी बंडखोरांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली होती. मजल दरमजल करत अखेर निमरोज प्रांताच्या राजधानीपर्यंत तालिबान येऊन पोहोचलं.
तालिबान्यांनी ग्रामीण भागातून सुरुवात करत एकेका मोठ्या शहराच्या दिशेने आक्रमण सुरू केलं आहे.
तालिबानच्या या आक्रमणामुळे अफगाणिस्तानातील विविध प्रांत आणि त्यांची सरकारे दबावाखाली आल्याचं दिसून येतं.
पश्चिमेकडील हेरत आणि लष्करगाह या प्रांतांमध्येही तालिबानने प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.
झरंज हे ईराणच्या सीमेला लागून वसलेलं मोठं शहर आहे. या परिसरातील व्यापारी केंद्र म्हणून या शहराची ओळख आहे.
तालिबानने सुरुवातीला झरंजच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर बंडखोरांनी सातत्याने झरंज शहरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
झरंज शहरातील एका कार्यालयाबाहेर अजूनही धुमश्चक्री सुरू आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी बीबीसीला दिली.
निमरोज पोलिसांच्या एका प्रवक्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर काही माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली होती.
सरकारी कुमक तोकडी पडत असल्यामुळे तालिबानने शहरावर नियंत्रण मिळवलं, असं त्यांनी सांगितलं.
लष्कर गाहमध्ये प्रवेश
अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात तालिबानी सैनिक आणि अफगाणिस्तानी सैन्यामध्ये लढा अधिक तीव्र बनला आहे.
हेलमंद प्रांताची राजधानी असलेल्या लष्कर गाहमध्ये तालिबाननं प्रवेश केला आहे. त्यांनी याठिकाणी सरकारी रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या विभागीय कार्यालयावर ताबा मिळवला आहे. 20 वर्षांनंतर त्यांनी पुन्हा स्वतःचं प्रसारण सुरू केलं आहे.
त्याशिवाय गव्हर्नर हाऊस आणि शहरातील इतर संवेदनशील भागांमध्ये अफगाणिस्तानचं सैन्य आणि तालिबान यांच्यात संघर्ष सुरू आहे.
तालिबाननं शहरातील ज्या भागांवर ताबा मिळवला आहे त्याठिकाणी लष्कराच्या हवाई दलाकडून मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. त्यात एका विद्यापीठावरही हल्ला झाल्याचं लष्कर गाहच्या स्थानिक रहिवाशांनी सांगितलं आहे.
भारत सरकारनं पुरवलेल्या लढाऊ विमानांनी लश्कर गाहमधील एका मोठ्या रुग्णालयावर हल्ला केल्याचा दावा अफगाणिस्तानातील तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहीद यांनी शनिवारी ट्विटरद्वारे केला होता.
अमेरिकेच्या हवाई दलाचा बॉम्ब हल्ला
मंगळवारी (3 ऑगस्ट) सकाळी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनीही लष्कर गाहमध्ये दोन वेळा तालिबानी सैनिक बॉम्बहल्ले केल्याचं अफगाणिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार बिलाल सरवरी यांनी सांगितलं.
लष्कर गाहमध्ये असलेले तालिबान मल्टीमीडिया आयोगाचे प्रमुख असद अफगाण यांनी मंगळवारी येथील परिस्थितीबाबत माहिती दिली. गव्हर्नर हाऊस, सेंट्रल जेल, पोलिस, गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराच्या विभागीय मुख्यालयाबरोबरच लष्कर गाहच्या सर्व सरकारी इमारतींवर तालिबाननं ताबा मिळवल्याचं त्यांनी सांगितलं.
स्थानिक नागरिकांनाही असद अफगाण यांच्या या दाव्याला दुजोरा दिला आहे. तालिबाननं या इमारतींना घेराव घातला आहे. त्यामुळं अफगाणिस्तानचं लष्कर एकमेकांना मदत करण्यासाठी पोहोचू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
तालिबाननं लष्कर गाहमध्ये असलेल्या एकमेव विमानतळालाही घेराव घातला आहे. तालिबानी सैनिक एकाही विमानाला उड्डाणाची अथवा उतरण्याची परवानगी देत नसल्याचंही असद म्हणाले.
तालिबाननं मंगळवारी सकाळी एका बॉम्ब हल्ल्यात लष्कर गाह तुरुंगावर हल्ला चढवला. त्यामुळं तुरुंगाची एका बाजूची भिंत तुटली असल्याचं, पत्रकार बिलाल सरवरी यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितलं.
तीव्र युद्ध सुरू असल्यानं स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, लोक घरात कोंडलेले असल्याचं बिलाल सरवरी पुढं म्हणाले.
गेल्या काही दिवसांमध्ये तालिबाननं हेलमंदच्या अनेक जिल्ह्यांवर ताबा मिळवल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रांतीय राजधानीतून पलायन केलं. त्यामुळं आता शहरात मोठ्या प्रमाणावर अन्नाची कमतरता जाणवायला सुरुवात झाली आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत अर्ध्या भागात अफगाणिस्तानच्या लष्कराचा ताबा आहे, तर उर्वरित अर्धा भाग हा तालिबानच्या ताब्यात आहे. तीव्र युद्धामुळं जखमींना रुग्णालयात नेणंही कठीण होत आहे.
तालिबाननं सोशल मीडियावर काही व्हीडिओदेखील पोस्ट केले होते. यात त्यांनी लष्कर गाहमधून पकडलेल्या अनेक अफगाणिस्तानी सैनिकांकडून माहिती घेतल्याचं दिसत आहे. पकडलेले सैनिक आणि अधिकारी लष्कर गाहमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या इतर सैनिक आणि सरकारी अधिकाऱ्यांची माहिती देत असल्याचं, बिलाल सरवरी म्हणाले.
लश्कर गाहचे महत्त्व काय?
आजवरच्या इतिहासाचा विचार करता, हेलमंदवर ज्यांचा ताबा असतो त्यांना अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये यश मिळतं, असं तालिबानचे निकटवर्तीय समजले जाणारे अफगाणिस्तानी पत्रकार नसीब जदरान म्हणाले.
त्यांच्या मते, लष्कर गाहवर तालिबाननं ताबा मिळवल्यानं अफगाणिस्तानचे दक्षिण आणि पश्चिम प्रांत आणि त्यातही विशेषतः हेरात आणि कंधहार तालिबानच्या ताब्यात येतील. त्यामुळं तालिबान आणि सरकार दोघांमध्येही लष्कर गाहवर ताबा मिळवण्याच्या लढा तीव्र झाला आहे.
गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेबरोबर दोहामध्ये युद्धबंदीचा करार झाला होता. तीन महिन्यांपूर्वी 1 मे रोजी जेव्हा युद्धबंदीचा काळ संपला त्यावेळीही तालिबाननं हेलमंदमधून हल्ले सुरू केले होते.
राजधानी असलेल्या लष्कर गाहशिवाय तालिबाननं नवा आणि नहर-ए-सिराज या जिल्ह्यांवरही हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये तालिबानला सुरुवातीला मोठं यश मिळालं. पण काही दिवसांनी लष्करानं मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करत तालिबानला मागं हटवलं आणि सोबतच त्यांना मोठी हानीही पोहोचवली. पण आता तालिबाननं हेलमंदच्या सर्व 15 जिल्ह्यांवर ताबा मिळवला आहे.
हेलमंद दक्षिण अफगाणिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. त्याच्या सीमा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतांबरोबरच अफगाणिस्तानच्या सात प्रांताशी मिळतात. त्यात कंधहार, निमरोज, फराह, गौर, दाइकंदी, अर्झगान आणि झाबुलचा समावेश आहे.
हेलमंद हा अफगाण तालिबानचा बालेकिल्ला समजला जातो. 9/11 च्या हल्ल्यानंतर तालिबाननं ज्या भागात वेगानं पाय पसरले त्यापैकी हा एक भाग होता. अमेरिका आणि त्यांच्या सहकारी सैन्याला या भागात तालिबानच्या ऐतिहासिक विरोधाचा सामना करावा लागला होता. हेलमंदचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अफूच्या शेती आणि उत्पादनाचं हे महत्त्वाचं केंद्र आहे.
गेल्या 20 वर्षांमध्ये प्रथमच तालिबाननं लश्कर गाहमध्ये प्रवेश करत प्रमुख ठिकाणांवर ताबा मिळवला असल्याचं पत्रकार आणि विश्लेषक डॉक्टर दाऊद आझमी म्हणाले. तालिबानच्या विरोधात काही भागांत अफगाणिस्तानच्या लष्कराला अपयश आलं असलं तरी त्यांना हवाई ह्ल्ल्यांची मदत मिळत असल्याचं ते म्हणाले.
हे हवाई हल्ले तालिबानचा वेग कमी करण्यासाठी किंवा त्यांना मागं हटण्यासाठी भाग पाडू शकतात, असं डॉक्टर दाऊद आझमी यांचं म्हणणं आहे.
लष्कर गाहची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या शहराचा इतर ठिकाणांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तालिबानच्या सध्याच्या हल्ल्यापासून संरक्षण झालं तरीही, जास्तवेळ ताबा टिकवण्याची क्षमता लष्करात नसल्याचं अफगाणिस्तानात इंटरनॅशनल क्राइसिस ग्रुपचे विश्लेषक अँड्रयू वाटकिन्स यांचं म्हणणं आहे.
लष्कर गाह ही तालिबानच्या ताब्यात येणारी पहिली विभागीय राजधानी आणि प्रमुख शहर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. मात्र यावर ताबा मिळवणं हे तालिबानसाठी सर्वाधिक प्राधान्याचं आहे, असंही ते म्हणाले.
वाटकिन्स यांनी अफगाणिस्तानात संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये कामही केलं आहे.
लष्कर गाहवर तालिबाननं मिळवलेला ताबा पाहता त्यांनी केलेले दावे फोल ठरत असल्याचं वाटकिन्स यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितलं. अफगाणिस्तानच्या जनतेला त्रास होऊ नये म्हणून सध्या मोठ्या शहरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही, असं तालिबाननं आधी म्हटलं होतं. कारण तसं केल्यानं मोठी हानी होऊ शकते, असं तालिबाननं म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)