टोकियो ऑलिम्पिक: जर्मन बॉक्सिंगपटूला हरवून लोव्हिना पोहोचली उपांत्यपूर्व फेरीत

फोटो स्रोत, Ramsey Cardy
पदकविरहित दिवसाची निराशा बॉक्सिंगपटू लोव्हिनाच्या विजयाने काही प्रमाणात भरून काढली.
भारताची बॉक्सिंगपटू लोव्हिना बोरगोहेनने ऑलिम्पिक पदार्पणात उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
लोव्हिनाने जर्मनीच्या अनुभवी नादिन अप्ट्झवर 3-2 अशी मात करत बाजी मारली. 69 किलो वजनी गटात खेळणाऱ्या लोव्हिनाने 12 वर्षाने मोठ्या बॉक्सिंगपटूला नमवण्याची करामत केली.
23 वर्षीय लोव्हिनसमोर पुढच्या लढतीत चायनीज तैपेईच्या निइन चिन चेनचं आव्हान असणार आहे. या लढतीत जिंकल्यास लोव्हिनाचं कांस्यपदक पक्कं होऊ शकतं.
लोव्हिनाने याआधी जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे.
मनू भाकेर-सौरभ चौधरी पदकाच्या शर्यतीतून बाहेर
नेमबाजीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या मिश्र प्रकारात मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडीकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र या जोडीला पदकासाठीच्या फेरीसाठी पात्र होता आलं नाही.
10मीटर एअर पिस्तूल प्रकारात या जोडीला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पात्रता फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात या जोडीने 380 गुणांची कमाई केली.
वयाची विशीही पार न केलेल्या या जोडीकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या कारण पाच विश्वचषक स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती. मात्र ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. वैयक्तिक प्रकारात मनूचं आव्हान पिस्तूलात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपुष्टात आलं होतं.
"जसपाल राणा आणि मनू भाकेर यांना एकत्र येण्यासंदर्भात प्रयत्न केले होते. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत", असं नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी सांगितलं. ऑलिम्पिकनंतर नेमबाजी चमूचा कोचिंग स्टाफ पूर्णत: बदलला जाईल असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Hindustan Times
रिओ ऑलिम्पिकनंतर समितीने दिलेल्या सर्व सूचनांचं आम्ही पालन केलं. जे करणं शक्य आहे ते सगळं केलं असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या दोघांच्या बरोबरीने यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माही सहभागी होत आहेत.
10 मीटर एअर रायफल प्रकारात एलाव्हेनी वेलावरन आणि दिव्यंश सिंग पनवर जोडी भारताचं प्रतिनिधित्व करेल.
भारतीय पुरुष हॉकी संघाला सूर गवसला
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभवाला सामोरं गेलेल्या भारतीय पुरुष संघाने स्पेनवर 3-0 असा विजय मिळवला. रुपिंदरपाल सिंगने दोन तर सिमरनजीत सिंगने एक गोल केला.
बॅडमिंटनमध्ये सात्विकसैराज-चिराग शेट्टी जोडीचा मुकाबला ब्रिटनच्या जोडीशी होणार आहे. भारतीय जोडीने ही लढत जिंकली तर त्यांना बादफेरीत प्रवेश मिळू शकतो.
शरथच्या पराभवासह टेटे पथकाचं आव्हान संपुष्टात
चीनच्या मा लोंगने शरथ कमालवर 11-7, 8-11, 13-11, 11-4, 11-4 असा विजय मिळवला. शरथच्या पराभवासह भारतीय टेटे पथकाचं आव्हान संपुष्टात आलं.
सात्विकसैराज-चिरागचं आव्हान संपुष्टात
सात्विकसैराज-चिराग शेट्टी जोडीने इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन वेंडी जोडीवर 21-17, 21-19 असा विजय मिळवला मात्र बाद फेरीत पोहोचण्यासाठी हा विजय पुरेसा ठरू शकला नाही.
एअर रायफल प्रकारातही निराशा
इलावेली वलारिव्हन आणि दिव्यंश सिंग पनवर यांना 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयश आलं. अंजूम मोडगिल आणि दीपक कुमार हेही पात्रता फेरीतूनच बाहेर पडले.
सेलिंगमध्ये नेत्रा कुमाकन, विष्णू सरवानन यांच्यासह भारताचे अन्य खेळाडू रिंगणात असतील.
सोमवारी काय घडलं?
टेबल टेनिसच्या महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या मनिका बत्राचं आव्हान संपुष्टात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
टेनिसमध्ये सुमीत नागलचं आव्हान संपुष्टात आलं. डेनिल मेदवेदेवनं सुमीतवर 6-2,6-1 असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं.
फेन्सिंग अर्थात तलवारबाजी खेळात भारताच्या भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादिया अझिझीवर 15-3 असा दणदणीत विजय मिळवला. मात्र पुढच्या लढतीत तिला पराभवाला सामोरं जावं लागलं. फ्रान्सचया मनोन ब्रुनेटनं भवानीवर 15-7 असा विजय मिळवला. ऑलिम्पिकमध्ये या खेळात भारताचं प्रतिनिधित्व करणारी भवानी पहिलीच खेळाडू आहे.
पोतुर्गालच्या यू फू हिने सुतिर्थावर सरळ गेम्समध्ये मात केली. सुतिर्थाने रविवारी झालेल्या लढतीत दमदार प्रदर्शन केलं होतं. मात्र आज तिला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. या पराभवासह सुतिर्थाचे स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
कोरियाच्या त्रिकुटाने उपांत्यपूर्व फेरीत भारतावर 6-0 असा विजय मिळवला. अतानू दास, प्रवीण जाधव आणि तरुणदीप राय या त्रिकुटाने कझाकिस्तानच्या संघावर 6-2 असा विजय मिळवत आश्वासक सुरुवात केली. मात्र बलाढ्या कोरियाच्या संघासमोर त्यांचं आव्हान संपुष्टात आलं.
नेमबाजीत पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. स्कीट प्रकाराच्या पात्रता फेरीत अंगद वीर सिंग बाजवाला 18व्या तर मैराज अहमद खानला 25व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. हे दोघेही अंतिम फेरीसाठी पात्र होऊ शकले नाहीत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








