पश्चिम युरोपमधील पूरस्थिती आणखी गंभीर, मृतांचा आकडा 180वर

पश्चिम युरोपातील पूरस्थितीने आणखी गंभीर स्वरुप घेतलं आहे. पुराचा फटका बसून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 180 वर गेली आहे.

दरम्यान, पुराचं पाणी थोडंफार कमी झाल्यामुळे गाळात अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे.

जर्मनीच्या राईनलँड-फ्लाटिनेट प्रांतात एहरवीलर भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.

या परिसरात सर्वाधिक 110 नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

जर्मनीच्या सर्वाधिक दाट लोकवस्तीच्या भागातील नॉर्थ राईन-वेस्टफालिया प्रांतात 45 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

जर्मनीनंतर बेल्जियम देशातही पुराचा जोरदार फटका बसल्याचं दिसून येतं. तिथं आतापर्यंत 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल लवकरच पूरप्रभावित परिसराच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्कुल्ड गावाचा दौरा त्या करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षांनी शनिवारी (17 जुलै) या भागाचा दौरा केला होता. या परिसरात बराच काळ मदतकार्य करावा लागेल, असं राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे.

जर्मनीच्या कॅबिनेटची बैठक बुधवारी (21 जुलै) होणार आहे. या बैठकीत तत्काळ मदतनिधी उभारण्यासाठीच्या पॅकेजचा प्रस्ताव मांडणार असल्याचं अर्थमंत्री ओलाफ स्कोल्ज यांनी सांगितलं.

पुरामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी 300 मिलियन युरो इतक्या रकमेची आवश्यकता असल्याचं ओलाफ स्कोल्ज यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

पुराच्या मागील अनुभवांचा विचार करत अधिकाऱ्यांना पुनर्निर्माण कार्य करावं लागेल. यामध्ये अब्जावधी युरोंचा खर्च येऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं.

सद्यस्थितीत, जर्मनी, बेल्जियम आणि नेदरलँड्स परिसरातील पूरप्रभावित क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र पश्चिम आणि मध्य युरोपातील इतर ठिकाणी अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे.

शनिवारी (17 जुलै) रात्री जर्मनी आणि चेकोस्लाव्हियाच्या सीमेवर तसंच ऑस्ट्रियाच्या सीमेवर पुरस्थिती निर्माण झाली होती.

जर्मनीच्या बर्कटेस्गाडेन भागातही नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे या परिसरातील 65 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं. या दरम्यान इथं एका नागरिकाचा मृत्यूही झाला.

ऑस्ट्रियाच्या हॅलीन शहरात शनिवारी अचानक पावसाला सुरुवात झाली. मात्र येथील जीवितहानीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

ऑस्ट्रियाच्या अनेक शहरांमध्येही अशीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे नुकसान झाल्याच्या बातम्या येत आहेत.

हवामान बदल विषयातील तज्ज्ञांच्या मते, खराब हवामान आणि जगभरात वाढत असलेलं तापमान यांचा थेट संबंध आहे. या मुद्द्यावर लवकरात लवकर पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)