You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जर्मनी आणि बेल्जियममध्ये पुरामुळे हाहाःकार, 150 जणांचा मृत्यू
विक्रमी पावसामुळे जर्मनी आणि बेल्जियममध्ये नद्यांना पूर आलाय. पश्चिम युरोपमध्ये आतापर्यंत 150 जणांचा बळी गेला असून अनेकजण बेपत्ता आहेत.
स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स या देशांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रूट यांनी दक्षिण भागात आणीबाणी जाहीर केली आहे.
युरोपीय नेत्यांनी या सगळ्यासाठी हवामान बदल कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. औद्योगिक काळानंतर जगाचं तापमान 1.2 डिग्री सेल्सिअसने वाढलं आहे.
जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टेनमायर यांनी शनिवारी पुराचा फटका बसलेल्या भागांना भेट दिली. जर्मनीत आतापर्यंत पुरामुळे शंभरहून अधिकजणांचा मृत्यू झाला. पुराने या भागाची दुर्दशा झाली आहे. हजारो लोकांचं आयुष्य या पुराने उद्धस्त झालं आहे.
शुक्रवारी झालेल्या पुरामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांच्या मनात साशंकता आहे.
धुवाधार पावसामुळे फोनचं नेटवर्क कोलमडलं आहे. रस्त्यांची चाळण झाली आहे. लाखभराहून अधिक घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.
जर्मनीतील राइन वेस्टफालिया, राइनलँड पालाटिनेट, सारलँड या भागांना मोठा फटका बसला आहे.
राइनलँड-पालाटिनेट भागात 1300 जण बेपत्ता आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे बचावकार्याने वेग घेतला असून, हा आकडा कमी होत आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
स्थानिक नागरिकांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितलं की, इथली परिस्थिती युद्धासारखी आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गाड्या वाहून गेल्या आहेत. घर मोडकळीस आली आहेत. इथे मृतांचा आकडा वाढू शकतो असं बचाव अधिकाऱ्यांनी सांगितलं.
बेल्जियममध्ये दहापैकी चार प्रांतांमध्ये लष्कराने बचावाचं कार्य सुरू केलं आहे. 20 जुलै राष्ट्रीय शोक दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
बेल्जियममध्ये पुरात वीस लोकांचा मृत्यू झाला आहे. नेदरलँड्सच्या लिमबर्ग प्रदेशात पुराचं पाणी वाढत चालल्याने लोक घर सोडून सुरक्षित भागात जात आहेत. स्वित्झर्लंडमध्ये जोरदार पावसानंतर पूर आला आहे.
या देशांमधील परिस्थिती जाणून घेऊया फोटोंच्या माध्यमातून.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)