You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
George Floyd: गुडघ्याखाली गळा दाबून हत्या करणाऱ्या पोलिसाला 22 वर्षं कारावासाची शिक्षा
अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांना 22 वर्ष 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
गेल्या वर्षी (2020) मे महिन्यात जॉर्ज फ्लॉईड हत्या प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांनी फ्लॉईड यांच्या मानगुटीवर गुडघा दाबून त्यांची हत्या केली असा आरोप होता.
यामध्ये न्यायालयाने शॉविन यांच्यावरील दोष सिद्ध झाला. न्यायालयाकडून त्यांना तब्बल साडेबावीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केला. तसंच जॉर्ज फ्लॉईड यांच्यासोबत त्यांनी केलेल्या क्रूर कृत्यामुळे त्यांना ही शिक्षा करण्यात आली, असं न्यायाधीशांनी आदेशात म्हटलं आहे.
अमेरिकेतील मिनियापोलीस शहर परिसरात गेल्या वर्षी मे महिन्यात हे प्रकरण समोर आलं होतं.
45 वर्षीय डेरेक शॉविन यांनी निःशस्त्र फ्लॉईड यांच्या मानेवर गुडघा दाबून ठेवला. त्यामुळे श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाला होता.
नंतर या घटनेचा व्हीडिओ संपूर्ण जगभरात व्हायरल झाला. त्यानंतर अमेरिकेसह जगात इतर ठिकाणीही या घटनेचा निषेध नोंदवत मोठ्या प्रमाणात आंदोलनही झालं होतं.
अमेरिकेतील न्यायालयाने यावर्षी एप्रिल महिन्यातच शॉविन यांना सेकंड डिग्री मर्डर आणि इतर अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी मानलं.
यावेळी शॉविन यांचा कोणताही वाईट हेतू नव्हता, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. कोणत्याही वाईट हेतूविना झालेली ती फक्त एक चूक होती, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र त्यांचा दावा फेटाळून लावण्यात आला आहे.
डेरेक शॉविन यांच्या शस्त्र बाळगण्यावरही आजीवन बंदी घालण्यात आली आहे.
त्यासोबतच इतर तीन माजी पोलीस अधिकाऱ्यांनाही जॉर्ज फ्लॉईड यांच्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले आहेत.
फ्लॉईड यांच्या कुटुंबाने तसंच त्यांच्या समर्थकांनी शॉविन यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचं स्वागत केलं आहे.
वकील बेन क्रंप यांनी ट्वीट करून म्हटलं, "हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. फ्लॉईडचे कुटुंबीय आणि या देशाच्या जखमा भरण्यासाठी याची मदत होईल."
जॉर्ज फ्लॉईड यांची बहीम ब्रिंजेट फ्लॉईड म्हणाल्या, "पोलिसांच्या क्रौर्याचं प्रकरण आता गांभीर्याने घेतलं जात आहे, हे या निर्णयातून दिसून येतं. मात्र, आपल्याला या मार्गावर अजून खूपच लांबचा प्रवास करायचा आहे."
हा निर्णय उचित वाटत आहे, पण याविषयी आपल्याला जास्त माहिती नसल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिली आहे.
सुनावणीदरम्यान काय झालं?
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान फ्लॉईड यांचे भाऊ टेरेन्स फ्लॉईड यांनी दोषीला 40 वर्षांची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली होती.
का? तू काय विचार करत होतास? माझ्या भावाच्या मानेवर गुडघा टेकवला, त्यावेळी तुझ्या डोक्यात काय चालू होतं, असे प्रश्न त्यांनी यावेळी विचारले.
सुनावणीदरम्यान फ्लॉईड यांच्या मुलीचा एक व्हीडिओसुद्धा दाखवण्यात आला. यामध्ये सात वर्षांची जियाना आपल्या वडिलांची आठवण काढताना दिसते.
या व्हीडिओमध्ये तिने आपल्या वडिलांवर प्रेम करत असल्याचं म्हटलं. ती पुढे म्हणाली, "मी नेहमी त्यांच्याबाबत विचारत असते. माझे वडील मला ब्रश करण्यासाठी नेहमी मदत करायचे."
ही घटना देश आणि समाजासाठी अतिशय वेदनादायक होती. पण यामध्ये सर्वात जास्त दुःख जॉर्ज फ्लॉईड यांच्या कुटुंबीयांनी सहन केलं आहे, असं न्यायाधीश यावेळी म्हणाले.
शिक्षेचा निर्णय कोणत्याही भावनेच्या भरात किंवा सहानुभूतीसाठी घेण्यात आलेला नाही. पण तरीही कुटुंबाचं दुःख दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही, असं न्यायाधीश पीटर काहील यांनी म्हटलं.
जॉर्ज फ्लॉईड यांच्यासोबत काय घडलं होतं?
46 वर्षीय जॉर्ज फ्लॉईड यांनी 25 मे 2020 रोजी दक्षिण मिनियापोलीसमधील एका दुकानातून सिगारेटचं पाकीट विकत घेतलं होतं.
मात्र, जॉर्ज यांनी 20 डॉलरची नकली नोट दिल्याचं दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने म्हटलं. त्यामुळे तो सिगारेटचं पाकीट परत मागत होता. मात्र जॉर्ज फ्लॉईड यांनी असं करण्यास नकार दिला. त्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्याने पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलीस त्याठिकाणी दाखल झाले होते.
पोलिसांनी फ्लॉईड यांना त्यांच्या कारमधून बाहेर निघण्याची सूचना केली. त्यांच्या हातांना बेड्या ठोकण्यात आला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी गस्ती वाहनातून फ्लॉईड यांना नेण्याचा प्रयत्न केला. पण जॉर्ज यांनी त्यास विरोध दर्शवल्यानंतर त्यांच्यात झटापट सुरू झाली. त्यानंतर डेरेक शॉविन यांनी फ्लॉईड यांना जमिनीवर पाडलं आणि त्यांच्या मानगुटीवर आपला गुडघा दाबून ठेवला.
सुमारे 9 मिनिट शॉविन हे फ्लॉईड यांच्या मानेवर गुडघा ठेवून होते. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हीडिओ बनवला.
लोकांनी फ्लॉईड यांना सोडून देण्याची विनंती पोलिसांना केली. फ्लॉईड यांनीही आपला श्वास रोखला जात असल्याचं 20 पेक्षा जास्त वेळा शॉविन यांना सांगितलं. पण शॉविन यांनी त्यांना सोडलं नाही.
थोड्याच वेळात जॉर्ज फ्लॉईड जागीच बेशुद्ध पडले. त्यानंतर अँब्युलन्समधून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र एका तासानंतर जॉर्ज फ्लॉईड यांना मृत घोषित करण्यात आलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)