You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग सूज्ञ आहेत, त्यांच्यामध्ये इतरांनी पडू नये - व्लादिमीर पुतिन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सूज्ञ नेते असून भारत आणि चीनमधले वाद सोडवण्याची क्षमता या दोघांमध्ये असल्याचं मत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केलंय.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची PTI वृत्तसंस्थेने दुभाषाच्या मदतीने मुलाखत घेतली. त्याविषयीची बातमी त्यांनी दिली आहे.
या ऑनलाईन मुलाखतीदरम्यान PTI ने पुतिन यांना भारत - चीन संबंधांविषयी प्रश्न विचारला. त्यावर पुतिन म्हणाले, "हो, भारत आणि चीनमधल्या संबंधांमध्ये काही अडचणी असल्याचं मला माहित आहे. पण शेजारी देशांमध्ये नेहमीच कोणते ना कोणते वाद असतातच. पण भारताचे पंतप्रधान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष या दोघांचेही स्वभाव मला माहित आहेत."
पुतिन पुढे म्हणाले, "हे दोघेही अतिशय सूज्ञ आहेत आणि ते एकमेकांचा आदर करतात. मला वाटतं की त्यांच्यामध्ये असणाऱ्या कोणत्याही वादावर ते तोडगा शोधतील. इतर कोणीही त्यांच्यामध्ये ढवळाढवळ करण्याची गरज नाही."
रशिया आणि चीनची जवळीक
रशिया आणि चीनच्या वाढत्या जवळीकीचा परिणाम भारत आणि रशियादरम्यानच्या सुरक्षा संबंधांवर होईल का, असाही प्रश्न PTI ने पुतिन यांना विचारला.
याचं उत्तर देताना ते म्हणाले, "भारत - रशिया संबंध आणि चीन -रशिया संबंधांमध्ये रशियाने कधीही कोणत्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही. भारत आणि रशियातलं नातं हे विश्वासाच्या आधारावर टिकून आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याबद्दल आम्ही भारतीयांचं कौतुक करतो.
"आमचे संबंध धोरणात्मक स्वरूपाचे आहेत. यामध्ये अर्थव्यवस्थेपासून ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षणाबद्दलच्या परस्पर सहकार्याचा समावेश आहे आणि संरक्षण म्हणजे केवळ भारताने रशियाकडून अवजारं खरेदी करणं नाही. आमचे संबंध जिव्हाळ्याचे संबंध आहेत."
क्वाडबद्दल पुतिन यांचं मत काय?
पुतिन यांच्यासोबतच्या या चर्चेमध्ये भारत, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांतल्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांचे संपादक सहभागी झाले होते.
रशिया - अमेरिका संबंध, कोरोनाची जागतिक साथ, रशियावरचे अमेरिकेचे निर्बंध आणि गाझा पट्टीसारख्या अनेक मुद्द्यांविषयीचं मत पुतिन यांनी या चर्चेदरम्यान मांडलं.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव यांनी काही दिवसांपूर्वी 'क्वाड' म्हणजे आशिया खंडाची नाटो संघटना असल्याची टीका केली होती.
याविषयी विचारल्यानंतर पुतिन म्हणाले, "आम्ही क्वाडमध्ये सहभागी नाही. एखादा देश काय पावलं उचलतोय याविषयी मी काही बोलू शकत नाही. कारण कोणत्या देशासोबत किती आणि कसे संबंध ठेवायचे याचा अधिकार प्रत्येक स्वतंत्र देशाला आहे. फक्त कोणत्याही देशांत होणाऱ्या भागीदारीचं उद्दिष्टं हे कोणाला तरी लक्ष्य करण्याचं नसावं, असं माझं मत आहे."
व्लादिमीर पुतिन 16 जूनला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भेटणार आहेत. याविषयी अतिशय शांतपणे त्यांनी सांगितलं, "आम्ही पहिली पावलं टाकत नाही. मी त्याबद्दल बोलतोय ज्यामुळे आमच्यातले संबंध खराब झाले आहेत. आम्ही स्वतःवर निर्बंध लादलेले नाहीत. अमेरिकेनेच प्रत्येक वेळी कोणतंही कारण नसताना आमच्यावर निर्बंध लादले आहेत."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)