You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाओमी ओसाकाची फ्रेंच ओपनमधून माघार, 'माध्यमांसमोर बोलल्यास दडपण येते'
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मानसिक आरोग्यासाठी पत्रकार परिषदांमध्ये सहभागी होणार नाही असं ओसाकाने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं.
गेल्या काही वर्षांपासून नैराश्याचा त्रास होत असल्याचं 23 वर्षीय ओसाकाने म्हटलं आहे. चार ग्रँडस्लॅम जेतेपदं नावावर असलेल्या ओसाकाने रविवारी फ्रेंच ओपन स्पर्धेत सलामीची लढत जिंकली. ओसाकाने रोमानियाच्या पॅट्रिसिआ मारिया तिगला नमवलं.
मात्र सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सहभागी न झाल्याने ओसाकाला 15,000 डॉलर्स रकमेचा दंड ठोठावण्यात आला.
ओसाकाने अशा पद्धतीने पत्रकार परिषदांमध्ये सहभाग नोंदवला नाही तर तिची स्पर्धेतून हकालपट्टी होऊ शकते असं स्पर्धेच्या आयोजकांनी म्हटलं होतं.
एखाद्या खेळाडूला मानसिक आरोग्यासंदर्भात त्रास असेल तर त्याला अशाप्रकारे पत्रकार परिषदेत सहभागी होण्याची सक्ती करावी का? का त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी यावरून टेनिस वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
ओसाकाची भूमिका
हाय,
ग्रँड स्लॅम स्पर्धेत माझ्यावर अशी परिस्थिती ओढवेल असं वाटलंही नव्हतं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेदरम्यान मी पत्रकार परिषदांना उपस्थित राहणार नाही असं जाहीर केलं होतं. मला असं वाटतं स्पर्धेच्या दृष्टिकोनातून तसंच अन्य खेळाडू आणि माझ्या आरोग्याचा विचार करता मी स्पर्धेतून माघार घेणंच योग्य ठरेल. जेणेकरून बाकी खेळाडू खेळावर लक्ष केंद्रित करू शकतील.
मला कोणाच्याही मार्गात अडथळा बनून चित्त विचलित करायचं नाहीये. पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाही हे सांगण्याची माझी वेळ चुकली. मी अधिक चांगल्या प्रकारे मला जे म्हणायचं होतं ते मांडायला हवं होतं. मानसिक आरोग्य संकल्पनेचं गांभीर्य मी कमी करायला नको होतं.
2018 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेपासून मला नैराश्याचा त्रास होतो आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मला कडवा संघर्ष करावा लागला. जे मला ओळखतात त्यांना मी मितभाषी आणि अंतर्मुख आहे हे ठाऊक आहे. ज्यांनी मला स्पर्धेत खेळताना पाहिलं असेल तेव्हा सामना खेळायला येताना माझ्या कानाला हेडफोन लावलेले असतात. दडपण कमी करण्यासाठीचा माझा तो उपाय आहे.
टेनिसचं वृत्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी माझ्या कारकीर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचं वागणं सौजन्यपूर्ण राहिलं आहे. पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाही असं सांगून मी काही खरंच चांगल्या पत्रकारांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याकरता मी माफी मागते.
सार्वजनिक जीवनात बोलणं हा माझा प्रांत नाही. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसमोर बोलताना मला प्रचंड दबाव जाणवतो. मी अतिशय दडपणाखाली जाते. उत्तरं देताना मला एकदम तणावात असल्यासारखं वाटतं.
पॅरिसमध्ये आल्यापासून मला अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे दडपणाखाली वावरण्यापेक्षा स्वत:ची काळजी घेऊन पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहणं योग्य ठरेल असं मला वाटलं.
मी स्पर्धेची मुख्य फेरी जाहीर होण्याआधीच हे सांगितलं. कारण काही ठिकाणी नियम कालबाह्य आहेत. मला त्याकडेही लक्ष वेधायचं होतं.
मी स्पर्धेच्या आयोजकांना वैयक्तिक कळवलं आणि माफीही मागितली. स्पर्धा संपल्यानंतर मी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी नक्कीच बोलेन असंही सांगितलं. कारण ग्रँड स्लॅम स्पर्धा खडतर असतात.
मी टेनिसपासून काही काळ दूर असेन. परंतु परतल्यानंतर टेनिस प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा करणार आहे जेणेकरून खेळाडू, प्रसारमाध्यमं आणि चाहते या सगळ्यांसाठी काही सुवर्णमध्य काढता येईल.
तुम्ही सगळे नीट असाल अशी आशा बाळगते. तुम्ही सुरक्षित राहा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. पुढच्या वेळेस भेटू.
कोण आहे ओसाका?
यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ओसाकाने महिला एकेरीच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीवर मात करत जेतेपदाची कमाई केली होती. तिनं याआधी 2019 साली या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं.
2018 आणि 2020 साली तिनं यूएस ओपन स्पर्धेचं जेतेपदही पटकावलं होतं. 2019 साली ओसाका टेनिस महिला एकेरीच्या क्रमवारीत अव्व्ल स्थान गाठणारी ती पहिली आशियाई खेळाडूही बनली होती.
ओसाकाचे वडील लेओनार्ड फ्रान्स्वा हैटीचे तर आई तामाकी ओसाका जपानची आहे. तिची मोठी बहीण मरी ओसाकादेखील टेनिस खेळते.
सेरेना आणि व्हीनस विल्यम्सचा खेळ पाहून लेओनार्ड यांनी आपल्या दोन्ही मुलींना टेनिस शिकवायला सुरूवात केली होती. ओसाकाचा जन्म जपानच्या ओसाका शहरात झाला होता. पण तीन वर्षांची असल्यापासून अमेरिकेत राहिली आहे.
अमेरिकेत लहानाची मोठी झाली असली, तरी ती अजूनही जपानची नागरीक आहे आणि जपानचंच प्रतिनिधित्व करते. जपानसोबतच हैटीविषयीही तिनं प्रेम आणि अभिमान वेळोवेळी व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी यूएस ओपन जिंकल्यावर अधिकृत फोटो काढताना तिनं हैटी आणि आफ्रिकन वंशाचं प्रतिनिधित्व करणारा हेडबँड घातला होता. त्याच स्पर्धेत ओसाकाची एक वेगळी बाजू जगाला दिसून आली.
मास्कद्वारे फोडली होती वर्णभेदाला वाचा
ओसाका गेल्या वर्षी यूएस ओपनमध्ये प्रत्येक सामन्यात एक वेगळा मास्क घालून खेळायला उतरली. काळ्या रंगाच्या त्या प्रत्येक मास्कवर अमेरिकेत पोलिसांकडून किंवा वर्णद्वेषातून मारल्या गेलेल्या कृष्णवर्णीय व्यक्तींची नावं लिहिली होती.
मग या सर्व व्यक्तींच्या कुटुंबीयांनी त्यांचे व्हीडियो संदेश पाठवत ओसाकाचे आभार मानले. स्पर्धेचं प्रसारण करणाऱ्या वाहिनीनं ते संदेश ओसाकाला दाखवले, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
बीबीसी मराठी प्रतिनिधी जान्हवी मुळेंचं विश्लेषण
नाओमी ओसाकानं खेळांच्या विश्वातल्या एका अतिशय गंभीर प्रश्नाला वाचा फोडली आहे. अनेक खेळाडूंनी तिची बाजू घेतली आहे, पण तिचा मार्ग योग्य होता का, असा प्रश्नही विचारला जातो आहे.
ओसाकासारख्या यशस्वी खेळाडूला हजारो डॉलर्सचा दंड किंवा एखाद्या स्पर्धेतून माघार घेणं परवडू शकतं. पण बाकीच्यांचं काय? एखाद्या नवख्या खेळाडूला ही समस्या जाणवत असती, तर कदाचित त्याची फारशी चर्चाही झाली नसती. पण ती स्टार खेळाडू आहे आणि आपलं म्हणणं मांडताना घाबरत नाही.
ओसाका सध्या यशाच्या शिखरावर आहे, तिचा खेळ आणि सामाजिक जाणीवांमुळे ती जगभरत अनेकांची आदर्श बनली आहे. पण ट्रॉफी उचलताना तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हास्यामागच्या मानसिक संघर्षाची अनेकांना कल्पना नाही.
एरवीही खेळाडूंच्या मानिसक आरोग्याविषयी बोलताना केवळ त्यांच्या कणखरपणाचा उदो केला जातो, पण सामन्यादरम्यानचा ताण, पराभवानं आलेलं नैराश्य किंवा यशाच्या ओझ्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. खास करून टेनिससारख्या एकट्यानं खेळायच्या खेळात तर तुम्ही एकाकी पडता आणि सगळं जग तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून असतं.
अशा परिस्थितीत सामन्यानंतर केवळ अर्ध्या तासानं, विशेषतः पराभवानंतर एखाद्याला माध्यमांशीच काय, कुणाशीही बोलावंसं वाटत नसेल, तर त्यांच्यावर तशी सक्ती करणं योग्य आहे का?
दुसरीकडे, ज्या चाहत्यांच्या आणि माध्यमांच्या जोरावर खेळाडूंना प्रसिद्धी, पैसा आणि खेळण्याचं स्वातंत्र्य मिळतं, त्यांच्याशी बोलणं साफच नाकारणं योग्य आहे का?
थेट टोकाचे निर्णय घेण्यापेक्षा दोन्ही बाजूंनी चर्चा केली असती, तर यात काही मधला मार्गही निघू शकला असता. पण इथे ओसाकानं खेळाचे प्रशासक आणि स्पर्धेच्या आयोजकांशी आधी काही चर्चा न करता, स्पर्धा तोंडावर असताना आपली बाजू मांडली आणि मानसिक ताणाचं कारण देत थेट पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला, तर आयोजकांनी तिची बाजू समजून न घेता, काही मधला मार्ग न काढता थेट दंडाची कारवाई केली, याकडेही लक्ष वेधलं जाणं गरजेचं आहे.
मी स्वतः क्रीडापत्रकार म्हणून अशा अनेक पत्रकार परिषदांमध्ये होते जिथे पराभवानंतर खेळाडूंना कठीण प्रश्न विचारले गेले. मी स्वतःही असे प्रश्न विचारले आहेत. बहुतांश क्रीडापत्रकार समोरच्याची मनस्थिती समजून घेऊनच प्रश्न विचारतात. एखाद्या खेळाडूला बोलावंसं वाटत नसेल, उत्तर द्यायचं नसेल तर तसं सांगण्याचं स्वातंत्र्यही असतं. पत्रकारांवरही वेळेत बातमी देण्याचा दबाव असतो, जो खेळाडूंनीही लक्षात घ्यायला हवा.
संवाद आणि समजूतदारपणा यांचा अभाव ही खरी समस्या आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)