प्रिन्सेस डायना यांना त्रास देण्याचा हेतू नव्हता : मार्टिन बशीर

"प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना यांना त्रास देण्याचा हेतू नव्हता", असं पत्रकार मार्टिन बशीर यांनी म्हटलं आहे.

1995 साली त्यांनी युवराज्ञी डायना यांची एक मुलाखत घेतली होती. ही मुलाखत सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. या मुलाखतीविषयी बोलताना मार्टिन बशीर म्हणाले, "मी घेतलेल्या मुलाखतीमुळे युवराज्ञी डायना यांना काही त्रास झाला असेल, असं मला वाटत नाही."

ही मुलाखत मिळवण्यासाठी पत्रकार मार्टिन बशीर यांनी 'चुकीच्या' मार्गाचा अवलंब केला आणि बीबीसीपासूनही ही बाब लपवून ठेवली, असं या मुलाखतीची निष्पक्ष चौकशी करणाऱ्या समितीने सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे.

युवराज्ञी डायना यांच्या दोन्ही मुलांप्रती अत्यंत खेद वाटत असल्याचं मार्टिन बशीर यांनी 'द संडे टाईम्स' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

प्रिन्स विलियम्स यांनी 'त्या मुलाखतीने युवराज्ञी डायना यांच्या आयुष्यात मानसिक अस्वस्थता निर्माण केल्याचा' आरोप केला होता. हा आरोप फेटाळून लावत मार्टिन बशीर म्हणाले, "युवराज्ञी डायना त्यांच्या निकटवर्तीय होत्या आणि त्या त्यांना आवडायच्या."

वृत्तपत्राशी बोलताना बशीर म्हणाले, "1990 च्या सुरुवातीलाही गुप्तपणे फोन कॉल रेकॉर्ड केले जात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, मी त्यापैकी कुठल्याही बातमीचा स्रोत नव्हतो."

'मुलाखतीनंतरही मैत्री कायम होती'

त्या मुलाखतीतील विषयांवर युवराज्ञी डायना कधीही नाखूश नव्हत्या, असा दावाही बशीर करतात. मुलाखतीनंतरही युवराज्ञी डायना आणि आपल्यात मैत्रीचे संबंध होते, असंही बशीर यांनी म्हटलं आहे.

युवराज्ञी डायना यांच्याशी असलेल्या मैत्रीचा हवाला देत बशीर म्हणाले, "1996 साली त्या दक्षिण लंडनमधील एका हॉस्पिटलमध्ये माझी पत्नी आणि आमच्या तिसऱ्या बाळाला भेटायलाही आल्या होत्या."

ते पुढे म्हणाले, "त्या मुलाखतीसाठी सगळं युवराज्ञी डायना यांच्या इच्छेनुसारच घडलं होतं. मुलाखत कधी प्रसारित करणार, त्यातले विषय कुठले असतील, या सगळ्यांची त्यांना कल्पना होती."

युवराज्ञी डायना यांच्याशी ओळख करण्यासाठी पत्रकार मार्टिन बशीर यांनी काही बनावट बँक कागदपत्रं दाखवून त्यांचे भाऊ अर्ल स्पेन्सर यांचा विश्वास संपादन केल्याचा ठपका स्वतंत्र चौकशी समितीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

या आरोपांवर बशीर म्हणतात, "ते चुकीचं होतं, हे मी कबूल करतो. मला त्याचा पश्चाताप आहे. मात्र, मुलाखत देण्याचा निर्णय युवराज्ञी डायना यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्याचा बँकेच्या कागदपत्रांशी काहीही संबंध नव्हता आणि मी ती मुलाखत घेऊ शकलो, याचा मला अभिमान वाटतो."

ब्रिटनच्या नॅशनल गॅलरीचे अध्यक्ष लॉर्ड हॉल यांच्या राजीनाम्यानंतर 'द संडे टाईम्स' वृत्तपत्राने मार्टिन बशीर यांची ही मुलाखत प्रकाशित केली आहे. चहुबाजूंनी टीका झाल्यावर लॉर्ड हॉल यांनी पदाचा राजीनामा दिला होता. बशीर यांनी बीबीसीसाठी युवराज्ञी डायना यांची मुलाखत घेतली त्यावेळी टोनी हॉल (सध्या लॉर्ड हॉल) बीबीसीचे डिरेक्टर ऑफ न्यूज होते.

चौकशी समितीचा अहवाल आणि मुलाखतीशी संबंधित प्रश्न

गुरुवारी (20 मे) चौकशी समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती लॉर्ड डायसन म्हणाले होते, "मुलाखत मिळवण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला त्यामुळे बीबीसीची ओळख असणाऱ्या 'प्रामाणिकपणा आणि पारदर्शिता' या मूल्यांना धक्का बसला आहे."

मार्टिन बशीर यांनी युवराज्ञी डायना यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते बीबीसीमध्ये ज्युनिअर प्रतिनिधी होते. राजघराण्याशी त्यांचे संबंध नव्हते आणि राजघरातील व्यक्तींशी त्यांची ओळखही नव्हती. त्यामुळे त्यांना युवराज्ञी डायना यांची मुलाखत मिळाल्याचं कळल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, ती मुलाखतच इतकी सनसनाटी होती की इतर सगळे प्रश्न मागे पडले.

मुलाखतीसाठी बीबीसीने बशीर यांना एवढ्या लवकर परवानगी का दिली, असा सवालही टीकाकारांनी केला होता. बशीर यांनी जे सांगितलं त्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि सत्य जाणून घेण्यासाठी अर्ल स्पेन्सर यांनी विचारपूस का केली नाही? असाही प्रश्न विचारण्यात आला.

आपण कुणालाही बनावट कागदपत्रं दाखवलेली नसल्याचं म्हणत बशीर बीबीसीमधील व्यवस्थापकांशीही खोटं बोललं, असंही निवृत्त न्यायमूर्ती लॉर्ड डायसन यांच्या अहवालात म्हटलं आहे.

बीबीसी आपले निकष पूर्ण करण्यास 'अपयशी' ठरले आणि याचा 'आम्हाला खेद वाटतो', असंही अहवालात म्हटलं आहे.

बीबीसीने चूक मान्य केली

अर्ल स्पेन्सर यांनी 2020 साली या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत मुलाखत मिळवण्यासाठी 'फसवणूक' करण्यात आल्याचा आरोप केला होता.

'डेली मेल' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अर्ल स्पेन्सर यांनी म्हटलं होतं, "माझा विश्वास संपादन करून युवराज्ञी डायना यांची भेट व्हावी, यासाठी मार्टिन बशीर यांनी राजघराण्यातील अनेक वरिष्ठांविषयी अनेक खोटे आणि मानहानी करणारे दावे केले."

तपासात समोर आलेली माहिती बीबीसी 'स्वीकारते', अशी प्रतिक्रिया बीबीसीचे चेअरमन रिचर्ड शार्प यांनी म्हटलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "बीबीसी लॉर्ड डायसन यांच्या अहवालाचं स्वागत करते आणि यात छापलेल्या माहितीचा खुल्या मनाने स्वीकार करते. आम्हाला मान्य आहे की अशा काही बाबी घडल्या ज्यांचा स्वीकार केला जाऊ शकत नाही. या ऐतिहासिक चुका असल्याचंही आम्ही मान्य करतो."

गेल्या आठवड्यातच मार्टिन बशीर यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून बीबीसीमधून राजीनामा दिला होता.

राजीनाम्यानंतर ते म्हणाले होते, "इतर कुणाच्या आयुष्यात सुरू असलेल्या उलथा-पालथीसाठी मला जबाबदार ठरवणं योग्य नाही, असं मला वाटतं. स्वतःचे निर्णय त्यांनी स्वतः घेतले. त्यांच्या आयुष्यतील गुंतागुंतीच्या आधारावर त्यांनी ते निर्णय घेतले होते. अर्ल स्पेन्सर करत असलेले आरोप आणि त्यामागची कारणं मी समजू शकतो. राजघराणं आणि मीडिया यांच्यात जे अवघड संबंध आहेत त्याची जबाबदारी केवळ खांद्यांवर टाकून उपयोगन नाही."

अर्ल स्पेन्सर यांनी या प्रकरणात बीबीसीचीही चौकशी करावी, अशी मागणी लंडनच्या मेट्रोपोलिटन पोलिसांकडे केली आहे. न्या. लॉर्ड डायसन चौकशी समितीच्या अहवालाची प्रत मिळवून त्याआधारे इतर काही पुरावे मिळतात का, याचा तपास करू आणि त्यानंतरच पुढील कारवाई होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

मुलाखतीत युवराज्ञी डायना काय म्हणाल्या होत्या?

बीबीसी पॅनोरामावर प्रसारित झालेल्या त्या मुलाखतीत युवराज्ञी डायना यांनी राजघराण्यातील व्यक्तींशी संबंध, पती युवराज चार्ल्स यांच्यासोबत लग्न आणि कॅमिला पारकर यांच्याशी त्यांचे असलेले विवाहबाह्य संबंध यावर खुलेपणाने बातचीत केली होती.

या मुलाखतीआधी राजघराण्यातील कुणीही टीव्हीवर घराणं आणि घराण्यातील सदस्यांविषयी इतक्या उघडपणे बोललं नव्हतं आणि त्यामुळे ही मुलाखत खूप गाजली.

या मुलाखतीत युवराज्ञी डायना म्हणाल्या होत्या, "माझे पती युवराज चार्ल्स यांचं कॅमेला पार्कर (युवराज चार्ल्स यांच्या विद्यमान पत्नी आणि डचेस ऑफ कॉर्नवेल) यांच्याशी अफेअर आहे आणि त्यामुळे मी अस्वस्थ आहे."

आपल्या लग्नाविषयी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, "या लग्नात तीन व्यक्तींचा समावेश आहे."

आपल्याला बुलिमिया नावाचा भावनिक आजार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. यात व्यक्तीला कधी वजन कमी करण्याची तीव्र इच्छा होते तर कधी खूप खाण्याची तीव्र इच्छा होते. कधी उपाशी राहण्याची इच्छा होते तर कधी उलट्या करण्याची.

युवराज चार्ल्स यांच्या खांद्यावर महाराज होण्याची जबाबदारी आल्यास कदाचित ते ही जबाबदारी सांभाळू शकणार नाही, असं सूतोवाचही युवराज्ञी डायना यांनी केलं होतं.

युवराज चार्ल्स यांच्या स्टाफनेच त्यांच्याविरोधात एकप्रकारची मोहीम उघडल्याचंही त्या म्हणाल्या होत्या.

आजपासून 27 वर्षांपूर्वी घेतलेली ही मुलाखत खूप गाजली होती. तब्बल दोन कोटी तीस लाख लोकांनी ही मुलाखत बघितली होती. त्यावरून खूप वादळही उठलं होतं.

31 ऑगस्ट 1997 रोजी युवराज्ञी डायना यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)