अर्जेंटिना : 'या' कंपनीत कर्मचारीच ठरवतात एकमेकांचा पगार

    • Author, डगल शॉ
    • Role, बिझनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज

तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणचे सहकारीच तुमचा पगारही ठरवू लागले तर? वाचायला णि ऐकायला थोडं आश्चर्यजनक वाटेल, पण अशी एक कंपनी आहे, जिथं कर्मचारीच एकमेकांचा पगार ठरवतात.

कर्मचाऱ्यांना कामासाठी अधिकाधिक उत्तम वातावरण मिळावं, यासाठी अर्जेंटिनातली एक स्वॉफ्टवेअर कंपनी काही मूलभूत आणि महत्त्वाचे बदल करण्याचा प्रयत्न करतेय. '10Pines' (टेन पाईन्स) असं या कंपनीचं नाव आहे. कारभार अधिकाधिक पारदर्शक आणि लोकशाहीवादी ठेवण्याचा या कंपनीचा प्रयत्न असतो. त्यासाठी या कंपनीने कर्मचाऱ्यांनाच एकमेकांचा पगार ठरवण्याची मुभा दिली आहे.

याच कंपनीत नोकरी करणारे एरियल उमान्सकी यांनी डिसेंबर 2020 मध्ये त्यांना देण्यात आलेली 7% वेतनवाढ न घेण्याचा निर्णय घेतला. इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत आपली कामगिरी चांगली नाही आणि म्हणून आपण वेतनवाढ घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या पाच वर्षात त्यांनी दोन वेळा वेतनवाढ नाकारली आहे.

ते म्हणतात, "मला असुरक्षित वाटलं. माझ्यापेक्षा चांगली कामगिरी करण्यांच्या तुलनेत मला जास्त लाभ मिळतोय, असं मला वाटलं. शिवाय, इतरांच्याही ते लक्षात आलं असतंच."

या कंपनीत वर्षातून तीन वेळा वेतनवाढ होते. 'रेट मिटींग' या बैठकीत वेतनवाढ ठरवली जाते. या बैठकीत कंपनीतल्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. अपवाद फक्त प्रोबेशनवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा.

या बैठकीत कर्मचारी किंवा वरिष्ठ वेतनवाढीसाठी स्वतःचं नाव पुढे करू शकतात. मग त्या कर्मचाऱ्याला किंवा वरिष्ठाला पगारवाढ द्यायची का, यावर खुली चर्चा होते.

2010 साली बुनोज एरिस या अर्जेंटिनाच्या राजधानीत 85 कर्मचाऱ्यांसह टेन पाईन्स या तंत्रज्ञान कंपनीची स्थापना करण्यात आली होती. स्टारबक्स, बर्गर किंग अशा मोठ्या ग्राहकांसाठी ही कंपनी स्वॉफ्टवेअर तयार करते.

कंपनीला वर्षाला जेवढा नफा होतो त्यापैकी 50% नफा कर्मचाऱ्यांमध्ये वाटला जातो.

उमान्सकी सांगतात, "ओपन सॅलरीमुळे कुणाला किती पगार मिळतो, हे कळत असलं तरी याचा सर्वात मोठा फायदा असा की यातून कोण कुणापेक्षा जास्त कमावतं, हे समजतं आणि यालाच हायरारकी म्हणजेच कोण वरच्या पदावर आणि कोण खालच्या पदावर आहे, हे कळतं."

आणि हीच खरी मेख आहे. टेन पाईन्स कंपनीला सर्वांना एकाच पातळीवर आणायचं आहे. कंपनीत पारदर्शकता असावी, हा या कंपनीचा उद्देश आहे.

कंपनीत नव्याने ज्वॉईन झालेल्या कर्मचाऱ्याचा पहिला तीन महिन्यांचा ट्रायल पीरियड संपला की त्या कर्मचाऱ्यालाही दर महिन्याला होणाऱ्या बैठकांना उपस्थित रहाता येतं. या बैठकांमध्ये नवीन क्लायंट कोण असू शकतं, कंपनीचा खर्च आणि व्यवहार आणि अर्थातच कर्मचाऱ्यांचा पगार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होते.

कंपनीचा कुणी एक सीईओ किंवा काही मॅनेजर्स नाहीत. अर्थात कंपनीचं काम सुरळित पार पडावं, यासाठी काही वरिष्ठ सहकारी असतात. त्यांना 'असोसिएट्स' किंवा 'मास्टर्स' म्हटलं जातं.

टेन पाईन्स कंपनीचे संस्थापक आणि 'मास्टर' जॉर्ज सिल्वा म्हणतात, "कंपनीत कुणीही बॉस नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार ठरवण्याचा अधिकार आम्ही कर्मचाऱ्यांनाच दिला आहे. अमेरिकेत आहे तशी वेतनातली तफावत आपल्या कंपनीत असू नये, अशी आमची इच्छा आहे."

एखादा नवीन कर्मचारी कंपनीत रुजू होतो त्यावेळी तो पगारासाठी काही प्रमाणात निगोशिएट करू शकतो. मात्र, त्याच्याएवढाच अनुभव असणाऱ्या कंपनीतल्या विद्यमान कर्मचाऱ्यांच्या अनुमतीनेच नवीन कर्मचाऱ्याचा पगार ठरत असतो.

नव्या कर्मचाऱ्याला कामावर घेताना शेवटच्या मुलाखती त्याची कंपनीच्या सर्वच्या सर्व 80 कर्मचाऱ्यांबरोबर बैठक होते. यावेळी कुठलेही तांत्रिक प्रश्नोत्तर घेतले जात नाहीत. यातून नव्या येणाऱ्या उमेदवाराचे छंद, त्याला कशात रस आहे, याविषयी जाणून घेतलं जातं. शिवाय, टेन पाईन्सची कार्यपद्धती त्याला कळावी, हादेखील एक हेतू असतो.

आमचा दृष्टीकोन 'SOCIOCRACY' म्हणजे समाजशाही थोडक्यात समाजवादी असल्याचं टेन पाईन्सचं म्हणणं आहे. ब्राझीलचे उद्योजक रिकार्डो सेमलेर यांच्यापासून प्रेरणा घेत टेन पाईन्सची स्थापना करण्यात आली. रिकार्डो यांनीही आपल्या पिढीजात उद्योगात आमूलाग्र बदल केले आणि कंपनी व्यवस्थापकांऐवजी कर्मचाऱ्यांना चालवायला दिली. सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेऊन त्यावर तोडगा काढण्याचं काम रिकार्डो यांनी कर्मचाऱ्यांना दिलं. यामुळे आपला उद्योग वेगाने वाढला आणि कंपनीने मोठा नफा कमावल्याचं रिकार्डो यांचं म्हणणं आहे. रिकार्डो यांनी यावर 'मेव्हरिक' नावाने पुस्तकही लिहिलं आहे.

"आम्ही या पुस्तकालाच आमचं बायबल मानतो", असं सिल्व्हा सांगतात.

जगभरात "अशाप्रकारच्या पुरोगामी आणि पारदर्शक कंपन्या" वाढत असल्याचं 'Human Experiance at Work' पुस्तकाचे लेखक आणि यूकेतल्या HEX या कर्मचारी प्रशिक्षण आणि सल्लागार फर्मचे संस्थापक बेन व्हिटर सांगतात. पगारातल्या पारदर्शकतेसारख्या पावलांमुळे सकारात्मक स्पर्धेचं वातावरण तयार होतं आणि सर्वांना समान संधी मिळते, असं मत ते व्यक्त करतात.

ते म्हणतात, "अनेक कंपन्यांमध्ये पगारासारख्या बाबी फार अंधारात ठेवल्या जातात. इतकंच नाही तर 'तुम्ही कुणाच्या किती जवळचे आहात', यावर तुमचा पगार ठरत असतो, अशीही भीती व्यक्त होत असते. मात्र, (टेन पाईन्स) यासारख्या दृष्टीकोनामुळे यात पारदर्शकता येते आणि जबाबदारीही निश्चित होते."

मात्र, टेन पाईन्स कंपनीमधल्या कामकाजाच्या पद्धतीचे काही तोटे असल्याचंही बेन व्हिटर यांना वाटतं. 80 कर्मचारी असणाऱ्या कंपनीमध्ये हे शक्य आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट झाली तर मात्र याचा फारसा फायदा होणार नाही, असं व्हिटर म्हणतात.

शिवाय, कर्मचाऱ्याला कामावर ठेवताना कंपनीच्या सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांसमोर त्याची मुलाखत घेतली तर अबोल किंवा लोकांमध्ये न मिसळणाऱ्या व्यक्तीवर अशा मुलाखतीचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असंही ते सांगातत. तसंच ज्यावेळी सर्व मिळून एखादा निर्णय घेतात तेव्हा त्यात पक्षपात होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचं व्हिटर यांचं म्हणणं आहे.

मात्र, कुठलाही पक्षपात न होता विविधता आणि सर्वसमावेशकता जपली जावी, यासाठी केवळ महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमांसारखे वेगवेगळे कार्यक्रम घेत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

याविषयी सांगताना टेन पाईन्स कंपनीत अनुभवी स्वॉफ्टवेअर डेव्हलपर असलेल्या अँजेलिस टेला अॅरेना सांगतात, "आमची ही सर्व प्रक्रिया गेल्या 12 वर्षात तयार झालेली आहे. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांनीच पगार ठरवायाचा हा निर्णय आम्ही कंपनीत 30 कर्मचारी असताना घेतला होता. कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यावर हे शक्य होईल का, याबाबत आमच्या मनातही शंका होती. मात्र, कर्मचारी संख्या 50 झाल्यावरही आम्ही ते करू शकलो. विश्वास टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला सतत प्रोसेस अपडेट करावी लागते."

कंपनीची अशीच वाढ होत राहिली तर दुसरं ऑफिस उघडावं लागेल. तिथेही अशाच पद्धतीने कामकाज होईल आणि ते ऑफिसही स्वायत्त असेल, असं त्या सांगतात.

कंपनीच्या पारदर्शकतेविषयी बोलताना कंपनीचे सहसंस्थापक जॉर्ज सिल्व्हा म्हणतात, "समान आणि पारदर्शक यात फरक आहे, हे कळणं महत्त्वाचं आहे. आम्ही सर्व समान नाही. मात्र, आम्ही अधिकाधिक पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला कर्मचाऱ्यांना नियंत्रित करू पाहणाऱ्या आणि त्यांना लहान मुलांसारखी वागणूक देणाऱ्या सर्वसामान्य कंपन्यांसारखं व्हायचं नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)