आफ्रिका : महिलेने एकाच वेळी दिला 9 बाळांना जन्म

फोटो स्रोत, EPA
माली देशाच्या नागरिक असणाऱ्या 25 वर्षांच्या एका महिलेने 9 बाळांना जन्म दिलाय. डॉक्टरांनी केलेले स्कॅन आणि तपासण्यात 7 बाळं असण्याचं सांगण्यात आलं होतं, पण या महिलेने त्यापेक्षा 2 जास्त बाळांना जन्म दिला.
हलिमा सिस्से यांनी मोरोक्कोमध्ये 9 बाळांना (Nonuplets) जन्म दिला. मालीच्या सरकारने विशेष व्यवस्था करून त्यांना या
विशेष डिलीव्हरीसाठी मोरोक्कोला नेलं होतं. माली (Republic of Mali) हा देश आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला आहे.
या नऊ बाळांचा सिझेरियन डिलीव्हरीने जन्म झाला. यामध्ये 5 मुली आणि 4 मुलगे असून सगळ्या बाळांची तब्येत नीट असल्याचं मालीच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय.
या महिलेच्या पतीने बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मी खूप खुश आहे. माढ्या बायको आणि मुलांची तब्येत बरी आहे."
अशा प्रकारे 9 बाळांचा एकाच वेळी जन्म होणं ही अतिशय दुर्मिळ घटना आहे आणि जन्माच्या वेळी किंवा नंतर गुंतागुत निर्माण होण्याची शक्यता असते. अनेकदा यामुळे काही बाळांचा जीव वाचू शकत नाही.
एकाच वेळी जास्त बाळांचा जन्म होण्याचा गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड आतापर्यंत अमेरिकेतल्या एका महिलेच्या नावावर होता. 2009मध्ये तिने 8 बाळांना जन्म दिला होता आणि या सगळ्या बाळांची प्रकृती उत्तम होती.

फोटो स्रोत, Mali's health ministry
अशा प्रकारे 9 बाळांचा एकाच वेळी जन्म होण्याची घटना यापूर्वी दोनदा नोंदवण्यात आल्या आहेत. 1971 मध्ये ऑस्ट्रेलियात आणि 1999मध्ये मलेशियात महिलांनी 9 बाळांना जन्म दिला होता, पण ही बाळं फार दिवस जगली नाहीत.
8 बाळांच्या सुखरूप जन्माचा रेकॉर्ड नावावर असणाऱ्या नादिया सुलेमान यांची 8 मुलं आता 12 वर्षांची झाली आहेत. IVF द्वारे त्यांना ही गर्भधारणा झाली होती.
9 बाळांचा सुखरूप जन्म झाल्याबद्दल मालीचे आरोग्य मंत्री फँटा सिबे यांनी दोन्ही देशांच्या वैद्यकीय पथकांचं अभिनंदन केलंय.
कासाब्लांकामधल्या ज्या एन बोर्जा क्लिनिकमध्ये या बाळांचा जन्म झाला, त्याचे वैद्यकीय संचालक प्रा. युसुफ अलौवी यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितलं, "ही केस अतिशय दुर्मिळ आणि अनोखी होती. 10 डॉक्टर्स आणि 25 पॅरामेडिक्सच्या पथकाने या प्री-मॅच्युअर बाळांचा जन्म पार पाडला."
या सगळ्या बाळांचं वजन प्रत्येकी 500 ग्रॅम ते 1 किलोदरम्यान असून पुढचे किमान 2 ते 3 महिने त्यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागणार आहे.
हलिमा सिस्से यांना 7 बाळं होणार असल्याचं आधी डॉक्टर्सनी सांगितलं होतं, असं रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटलंय. यानंतर सिस्से यांचं बाळंतपण हा संपूर्ण माली देशात चर्चेचा विषय झाला होता.
या महिलेचं आरोग्य आणि बाळांच्या जिवाला असणारा धोका याची मालीमधल्या डॉक्टर्सना काळजी वाटत असल्याने तिथल्या सरकारने यात लक्ष घातलं.

फोटो स्रोत, EPA
हलिमा यांना आधी माली देशाची राजधानी असणाऱ्या बामाकोमधल्या हॉस्पिटलमध्ये 2 आठवडे दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 30 मार्च रोजी त्यांना मोरोक्कोला हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सिबे यांनी सांगितलं.
मोरोक्कोमधल्या हॉस्पिटलमध्ये 5 आठवडे उपचार घेतल्यानंतर मंगळवारी (4 मे) हलिमा यांची प्रसुती झाली आणि त्यांनी 9 बाळांना जन्म दिला.
ही महिला कासाब्लांकामधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तेव्हा ती 25 आठवड्यांची गर्भार होती. ही प्रसुती 30 आठवड्यांपर्यंत डॉक्टरांनी पुढे नेली आणि त्यानंतर ही डिलीव्हरी झाली.
या महिलेचा पती त्यांच्या मोठ्या मुलीसोबत मालीमध्येच असून आई आणि ही 9 बाळं काही आठवड्यांनंतर त्यांच्या मायदेशी - मालीला परतण्याचा अंदाज आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








