ड्यूक ऑफ एडिंबरा प्रिन्स फिलीप यांच्यावर अंत्यसंस्कार

फोटो स्रोत, PA Media
ड्यूक ऑफ एडिंबरा प्रिन्स फिलीप यांच्यावर आज (17 एप्रिल) अंत्यसंस्कार करण्यात आले. विंडसर कॅसलमधून जवळच असलेल्या सेंट जॉर्जेस चॅपलमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या कार्यक्रमात फक्त 30 जण सहभागी झाले होते.
प्रिन्स फिलीप यांचं 9 एप्रिलला वयाच्या 99 व्या वर्षी विंडसर कॅसल इथे निधन झालं होतं.
विशेष बदल करण्यात आलेल्या जॅग्वार लँड रोव्हर वाहनामधून प्रिन्स फिलीप यांचं पार्थिव विंडसर कॅसलमधून जवळच असलेल्या सेंट जॉर्जेस चॅपलपर्यंत नेण्यात आलं.

या गाडीचं वैशिष्ट्यं म्हणजे प्रिन्स फिलीप यांनी स्वतःच या गाडीचं डिझाईन तयार करत, गाडीमध्ये बदल करून घेतले होते.
2003 मध्ये वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी या गाडीत बदल करायला घेतले. आपल्या निधनानंतर या गाडीतून आपला देह नेण्यात यावा, ही इच्छा त्यांनी स्पष्ट केली होती आणि त्यादृष्टीनेच कारमध्ये बदल केले होते. 2019मध्ये ते 98 वर्षांचे असताना त्यांनी या कारमध्ये शेवटचे बदल करून घेतले होते.

फोटो स्रोत, PA Media
ग्रेनेडियर गार्ड्सच्या बँड पथकाच्या मागे या हिरव्या रंगाच्या जॅग्वार लँड रोव्हरमध्ये प्रिन्स फिलीप यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं.
प्रिन्स फिलीप यांची चारही मुलं - प्रिन्स चार्ल्स, प्रिन्सेस अॅन, प्रिन्स एडवर्ड आणि प्रिन्स अँड्र्यू या वाहनामागून चालले. त्यांच्या सोबत प्रिन्स फिलीप यांचे 3 नातू - प्रिन्स विल्यम आणि हॅरी आणि पीटर फिलीप हे देखील होते.

फोटो स्रोत, PA Media
ड्यूक यांची रोज सेवा करणारे त्यांचे खासगी कर्मचारी आणि सहाय्यक या मागे होते.
यानंतर असणाऱ्या 'स्टेट बेंटली' मधून महाराणी एलिझाबेथ यांनी चॅपलपर्यंत प्रवास केला.

फोटो स्रोत, PA Media
या अंत्यविधीच्या आधी राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी त्यांचा ड्यूक ऑफ एडिंबरांसोबतचा एक आवडता फोटो प्रसिद्ध केलाय. 2003मध्ये काऊंटेस ऑफ वेसेक्स सोफी यांनी हा फोटो स्कॉटलंडमध्ये काढला होता. बाल्मोरल इथल्या शाही कुटुंबाच्या खासगी एस्टेट जवळचा हा फोटो आहे.

फोटो स्रोत, Twitter /RoyalFamily
अंत्यविधीच्या या संपूर्ण कार्यक्रमाची आखणी प्रिन्स फिलीप यांनी केलेली मूळ आखणी आणि त्यांच्या इच्छेनुसार करण्यात आली असून हे करताना त्यामध्ये कोव्हिड19 ची जागतिक साथ लक्षात घेत, बदल करण्यात आलेले आहेत. अंत्यविधीचा सगळा कार्यक्रम विंडसर कॅसलमध्येच पार पडणार असून लोकांनी शाही कुटुंबाच्या या किंवा इतर कोणत्याही निवासस्थानाबाहेर जमा होऊ नये असं आवाहन करण्यात आलंय.
सेंट जॉर्जेस चॅपलमध्ये प्रिन्स फिलीप यांचं पार्थिव पोहोचल्यानंतर युके वेळेनुसार दुपारी 3 वाजता देशभरात मिनिटभराचं मौन पाळण्यात येईल. या मौनाच्या सुरुवातीला आणि अखेरीस युकेमधल्या 9 ठिकाणांहून आणि जिब्राल्टरमधून तोफांची सलामी दिली जाईल.

फोटो स्रोत, PA Media
या दरम्यानच्या 6 मिनिटांच्या काळामध्ये लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर कोणतंही विमान लँड होणार नाही किंवा टेक ऑफ घेणार नाही.
या नंतर अंत्यसंस्कारांना सुरुवात होईल. शाही कुटुंबातील निवडक 30 सदस्य यामध्ये सहभागी होतील. यामध्ये प्रिन्स फिलीप यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे.
सेंट जॉर्जेस चॅपलमधल्या रॉयल व्हॉल्ट (Royal Vault) मध्ये ड्यूक ऑफ एडिंबरांच्या देहाचं दफन करण्यात येईल. याच रॉयल व्हॉल्टमधल्या इतर भागांमध्ये यापूर्वी निधन झालेल्या शाही कुटुंबातल्या सदस्यांचं आणि यापूर्वी राज्य करणाऱ्या राजांचं दफन करण्यात आलेलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








