कोव्हिडमुळे 'या' देशात एवढ्या लहान मुलांचे मृत्यू का होत आहेत?

    • Author, नतालिया पासारिन्यो आणि लुईस बर्रोचो
    • Role, बीबीसी ब्राझील

कोरोनाची साथ सुरू होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण तरीही ही साथ नियंत्रणात आलेली नाही.

सद्यस्थितीत ब्राझीलमध्ये कोरोना मृत्यूंचं प्रमाण अतिशय वाढत चाललं आहे.

कोरोना व्हायरसमुळे तरूण किंवा किशोरवयीन मुलांचा मृत्यू कमी होतो, याचे अनेक सबळ पुरावे उपलब्ध आहेत. पण ब्राझीलमध्ये थोडीशी वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1300 लहान मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे.

एका डॉक्टरांनी जेसिका रिकर्ते यांच्या एका वर्षाच्या मुलाला पाहण्यास नकार दिला होता. मुलाच्या आजारपणाचे लक्षण कोरोनाशी जुळत नसल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. पण पुढच्या दोनच महिन्यात त्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

शिक्षकी पेशात असलेल्या जेसिका यांना दोन वर्ष वंध्यत्वावरील उपचारानंतर अपत्यप्राप्ती झालेली होती. त्या सांगतात, "आमचं मूल आमच्यासाठी आशेचं किरण होतं. त्याने आमच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाश आणला होता. त्याने आम्हाला इतका आनंद दिला, त्याची आम्ही कल्पनाही केलेली नव्हती.

जेसिका यांच्या मुलाचं नाव लूकस असं होतं. लूकसला सर्वप्रथम भूक न लागण्याची समस्या आली. पूर्वी तो चांगला जेवायचा.

दात येत असल्याने बहुदा असं होत असेल, असं जेसिका यांना आधी वाटलं. पण लूकसची देखभाल करणाऱ्या नर्सनी त्याच्या गळ्याला सूज आलेली असू शकते, असं जेसिका यांना सांगितलं. त्यानंतर लूकसला ताप येणं सुरू झालं. त्याला श्वासोच्छवास करताना अडचणी येऊ लागल्या.

कोव्हिड चाचणी न केल्याने वाढल्या अडचणी

जेसिका लूकसला घेऊन रुग्णालयात गेल्या. त्यांनी त्याची कोव्हिड टेस्ट करण्याबद्दल डॉक्टरांना सांगितलं.

जेसिका म्हणतात, डॉक्टरांनी लूकसच्या शरिरातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासलं. ही पातळी 86 टक्क्यांपर्यंत घसरली होती. हे भलतंच घडतंय, अशी मला त्यावेळी जाणीव झाली.

लूकसला जास्त ताप नव्हता. डॉक्टर म्हणाले, "काळजी करू नका. कोव्हिड चाचणी करण्याची गरज नाही. गळ्याला सूज आल्याने त्याला त्रास होत आहे."

कोव्हिड-19 लहान मुलांमध्ये अत्यंत दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांनी जेसिका यांना सांगितलं. डॉक्टरांनी काही अँटीबायोटिक्स औषध देऊन जेसिका यांना घरी पाठवलं.

जेसिका सांगतात, डॉक्टरांनी दिलेला 10 दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स आम्ही पूर्ण केला. शेवटच्या दिवशी लूकसच्या आजारपणातील लक्षणं कमी झाली. पण त्याचा थकवा कायम होता. यामुळे मला कोरोना व्हायरससंदर्भात जास्त चिंता वाटू लागली.

त्या सांगतात, मी त्याचे अनेक व्हीडिओ त्याची नर्स, नातेवाईक, सासुबाई आणि इतरांना पाठवून दिले. पण मीच जास्त विचार करत आहे, असं अनेकांनी मला म्हटलं. त्यांनी मला बातम्या पाहणं टाळण्याचा सल्ला दिला. माझ्या मनात विनाकारण या सर्व गोष्टींची भीती आहे, असं त्यांना वाटत होतं. पण माझ्या मुलाला खरंच श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं मला माहीत होतं.

ही मे 2020 मधली गोष्ट आहे. त्यावेळी कोरोना व्हायरसची साथ पसरण्यास सुरुवात झाली होती. ब्राझीलच्या ईशान्य भागात तंबोरिल परिसरात सिएरा शहरात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी संपूर्ण शहराला त्याचा धक्का बसला होता.

लूकस आणि जेसिका यांना इतर रुग्णालयात नेल्यास त्यांना कोरोना संसर्ग होऊ शकतो, अशी भीती जेसिका यांचे पति इजरायल यांना वाटत होती.

पण पुढचे काही आठवडे लूकस जरा जास्त झोपू लागला. अखेर 3 जूनच्या दिवशी जेवणानंतर लूकसला सतत उलट्या होऊ लागल्या.

जेसिका तातडीने स्थानिक रुग्णालयात गेल्या आणि त्यांनी लूकसची कोरोना चाचणी करून घेतली.

त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं त्याच्या नर्सनी सांगितलं.

बहुतांश मुलांमध्ये MIS ची स्थिती

त्यावेळी रुग्णालयात रिसक्यूरेटरही (कृत्रिम श्वासोच्छवास देणारी मशीन) नव्हतं, असं जेसिका यांनी सांगितलं.

लूकसला सोबराल येथील पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये पाठवण्यात आलं. ते तिथून दोन तासांच्या अंतरावर होतं. तिथं गेल्यानंतर लूकसला मल्टी-सिस्टिम सिंड्रोम (MIS) ची समस्या जाणवत असल्याचं समजलं.

MIS म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती मर्यादेपेक्षा जास्त सक्रिय होते. त्यामुळे अंतर्गत भागात महत्त्वाच्या अवयवांमध्ये सूज येते.

तज्ज्ञांच्या मते, सहा आठवड्यांपेक्षा जास्त वयोगटातील बालकांमध्ये कोरोना संसर्ग झाल्यानंतर अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. पण हे अत्यंत दुर्मिळ असल्याचंही म्हटलं जातं.

साओ पावलो विद्यापीठात साथ रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. फातिमा मारिन्हो यांनी याविषयी अधिक माहिती दिली.

कोरोना साथीदरम्यान MIS चे सर्वाधिक प्रकरण त्यांनी पाहिले आहेत. मात्र सर्वच प्रकरणांमध्ये मुलांचा मृत्यू झाला नाही, असं त्यांनी सांगितलं.

लूकसला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यावेळी जेसिका यांना त्याच्या खोलीत राहण्याची परवानगी नव्हती.

जेसिका यांनी त्यांच्या नणंदेला त्याठिकाणी बोलावून घेतलं.

त्या सांगतात, "आम्ही मशीनचा बीप-बीप हा आवाज ऐकू शकत होतो. मशीन बंद होत नाही तोपर्यंत हा आवाज सलग येत राहतो. व्यक्तीचं निधन होण्याचा अंदाज त्यातून येतो. ही मशीन काही मिनिटे बंद होऊन पुन्हा चालू लागली. ते पाहून आम्ही दोघी रडायला लागलो.

लूकसला हृदयविकाराचा धक्का बसला होता. पण त्याला वाचवण्यात यश आलं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं.

बालरोग विशेषज्ञ डॉ. मेनुएला मोंते यांनी एका महिन्यापर्यंत लूकसवर सोबरालच्या ICU मध्ये उपचार केले होते.

त्या म्हणाल्या, "लूकसची स्थिती अत्यंत गंभीर होती. पण मला त्याची काळजी वाटली. कारण त्याच्यात अशा प्रकारची गंभीरं लक्षणं दिसण्याचं कोणतंच कारण नव्हतं."

राज्याची राजधानी फोर्तालेजा येथील अलबर्ट सबिन बाल रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ लोहोना तावारेज यांच्या मते, कोरोना संसर्ग झालेल्या बहुतांश बालकांमध्ये मधुमेह, हृदयविकार आणि स्थूलता यांच्यासारखे अन्य आजारही होते. पण लूकससंदर्भात असं काहीच नव्हतं.

लूकस ICU मध्ये 33 दिवस राहिला. त्या कालावधीत जेसिका त्याला फक्त 3 वेळा भेटू शकल्या. लूकसच्या हृदयावर उपचार करण्यासाठी इम्युनोग्लोबुलिन औषधाची आवश्यकता होती. हे औषध अत्यंत महागडं आहे. पण सुदैवाने एका रुग्णाने या औषधाचा एक डोस रुग्णालयाकडे दिला होता.

लूकसची तब्येत अत्यंत गंभीर असल्याने इम्युनोग्लोबुलिनच्या आणखी एका डोसची गरज होती. त्याच्या शरिरावर आता लाल डाग पडू लागले. त्याला ताप चढू लागला. श्वासोच्छवास घेण्यासाठी त्याला कृत्रिम यंत्रणेची गरज होती.

लूकसच्या तब्येतील थोडी सुधारणा झाली. तो स्वतःहून श्वास घेऊ लागला. त्यामुळे डॉक्टरांनी ट्यूब हटवली. शुद्धीवर आल्यानंतर लूकसला एकटं वाटू नये यासाठी त्यांनी जेसिका आणि इजरायल यांना व्हीडिओ कॉल केला.

जेसिका म्हणाल्या, त्याने आमचा आवाज ऐकल्यानंतर रडायला सुरू केलं. आमच्या बोलण्यावर आमच्या मुलाने दिलेली ती शेवटची प्रतिक्रिया होती. पुढच्या व्हीडिओ कॉलमध्ये मात्र मुलामधला सगळा त्राण निघून गेल्यासारखा तो वाटला. डॉक्टरांनी आम्हाला CT स्कॅन करण्यास सांगितलं. त्यामध्ये लूकसला स्ट्रोक आल्याचं निदर्शनास आलं.

दुसरीकडे जेसिका-इसरायल यांना लूकसच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याला ICU मधून बाहेर काढून जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल, असंही डॉक्टरांनी सांगितलं होतं.

जेसिका म्हणतात, "मी त्यादिवशी माझा मोबाईल सायलेंट करून ठेवला होता. लूकस माझ्या स्वप्नातही आला. तो माझ्या नाकाचं चुंबन घेत होता. माझ्यासाठी ती प्रेम आणि समर्पणाची भावना होती. मी दुसऱ्या दिवशी अत्यंत आनंदाने उठले. मोबाईल पाहिला तर डॉक्टरांचे 10 मिस कॉल होेते.

जेसिका यांनी कॉल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, "लूकसच्या हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजनची पातळी अत्यंत वेगाने खाली घसरत चालली होती. सकाळी त्याची प्राणज्योत मालवली आहे."

जेसिका यांच्याकडून जनजागृती

लूकसची कोव्हिड चाचणी मे महिन्यातच पहिल्यांदा रुग्णालयात गेल्यानंतर करण्यात आली असती तर आज तो जिवंत असला असता, असं जेसिका यांना अजूनही वाटतं.

त्या म्हणतात, "डॉक्टरांनी कोव्हिड झाल्याचं मान्य केलं नाही तर त्याची खात्री पटवण्यासाठी आपण कोरोना चाचणी करून घ्यायलाच हवी. एक लहान मूल त्याला कसं वाटतंय याबाबत सांगू शकत नाही. त्यामुळे आपण चाचणीचा आधार घेणं कधीही चांगलं."

योग्य उपचारास विलंब झाल्यामुळेच लूकसची तब्येत इतक्या गंभीर स्वरुपात बिघडली. लूकसला अनेक अडचणी येऊ लागल्या होत्या. त्याचं फुफ्फुस फक्त 70 टक्के काम करत होतं. हृदय 40

टक्क्यांपर्यंत निकामी झालं होतं. पण तरीसुद्धा त्याला वाचवणं शक्य होतं, असं जेसिका म्हणाल्या.

डॉ. मोंते सांगतात, "MIS ला थांबवणं अत्यंत कठीण असतं. सुरुवातीच्या टप्प्यात याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने उपचार केल्यास यामध्ये यश मिळतं."

जेसिका आता लूकसची कहाणी सांगून लोकांची जनजागृती करत आहेत. गंभीर लक्षणं दिसूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना त्याबाबत माहिती आणि सल्ला देण्याचं काम त्या करतात.

माझ्याकडे याची माहिती असली असती तर मी अधिक सावध राहिले असते, असं त्या नेहमी सांगताना दिसतात.

लहान मुलांना कोव्हिडचा धोका कमी किती?

डॉ. फातिमा मारिन्हो सांगतात, "लहान मुलांना कोव्हिडचा कोणताच धोका नाही, असा गैरसमज पसरला आहे. लहान मुलांनाही कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला, हे एका अहवालात आढळून आलं आहे.

ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2020 ते 15 मार्च 2020 पर्यंत कोव्हिड-19मुळे 9 वर्षांपर्यंतच्या तब्बल 852 तर एका वर्षांपर्यंत वयोगटातील 518 बालकांचा मृत्यू झाला.

डॉ. मारिन्हो यांच्या मते, हा आकडा दुप्पट असू शकतो. कोरोना चाचणी न झाल्याने ही आकडेवारी कमी दिसत आहे.

साथीदरम्यान, अनस्पेसिफाईड अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे 1302 बालकांसोबतच 9 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील 2060 मुलांनी आपले प्राण गमावले आहेत.

असं होण्याचं कारण काय?

ब्राझीलमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण जास्त असल्यामुळेच देशातील कोरोनाबाधितांची संख्या जास्त असल्याचं तज्ज्ञांना वाटतं.

ब्राझिलियन सोसायटी ऑफ पेडियाट्रिक्स येथील सायंटिफिक डिपार्टमेंट ऑफ इम्युनायझेशनचे अध्यक्ष रेनाटो कफूरी सांगतात, "आपल्या देशात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. लोक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल होत आहेत. कोरोनामुळे बळी जाणाऱ्या रुग्णांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत भारताने मागे टाकण्यापूर्वी ब्राझील गेले कित्येक दिवस दुसऱ्या क्रमांकावर होतं. देशातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. संपूर्ण देशात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. औषधांचीही टंचाई आहे. देशातील अनेक रुग्णालयांमध्ये ICU बेडची कमतरता आहे.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष झायर बोलसोनारो यांनी लॉकडाऊन करण्याला विरोध दर्शवला आहे. देशात P.1 नामक एक नवा व्हेरिएंटही आढळून आला आहे. हा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य मानला जातो. साथीच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत गेल्या काही दिवसांत कोरोना मृ्त्यूंचं प्रमाण दुपटीने वाढलं.

कमी प्रमाणात चाचणी होत असल्याने लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला आहे.

मारिन्हो सांगतात, लहान मुलं गंभीर स्वरुपात आजारी पडल्यानंतरच त्यांच्या कोरोना संसर्गाची माहिती मिळते. रुग्णांची ओळख पटवण्यात अडचणी येतात. योग्य प्रमाणात चाचणी होत नाही. त्यामुळे संसर्गाची माहिती उशिरा मिळते. परिणामी उपचारही उशीरा होतो."

लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्यामागे फक्त चाचण्यांचं कमी प्रमाण हे एकमेव कारण नाही. पण मुलांमध्ये आढळून येणारी इतर लक्षणं, विविध वयोगटात वेगवेगळी लक्षणं दिसणं या कारणांमुळे सुद्धा अनेक अडचणी येतात.

त्या सांगतात, "सामान्य कोव्हिडच्या लक्षणांव्यतिरिक्त मुलांमध्ये डायरियाच्या समस्या दिसून येतात. त्यांना पोटात, छातीत दुखतं. यामुळे मुलाला रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याची माहिती मिळत नाही.

शिवाय, गरिबी आणि आरोग्य सुविधांची कमतरता हेसुद्धा एक कारण मानलं जात आहे.

20 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील 5857 कोरोनाबाधितांवर एक अभ्यास करण्यात आला. लहान मुलांचा कोरोनाने मृत्यू होण्यासाठी इतर आजार आणि सामाजिक-आर्थिक अडचणी हेसुद्धा कारणीभूत आहेत.

मारिन्हो यांनी याला दुजोरा देताना म्हटलं, "बहुतांश रुग्ण कृष्णवर्णीय तसंच गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचू शकत नाही. या मुलांना मृत्यूचा धोका अधिक आहे. लहान घरांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही. त्यांना ICU लवकर उपलब्ध होत नाहीत."

त्याशिवाय, या मुलांमध्ये कुपोषणाची समस्या अधिक असते. त्यामुळे या मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अत्यंत कमी असते.

मारिन्हो सांगतात, "कोव्हिडमुळे अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागलं. एका वर्षांत 70 लाख ते 2.1 कोटी नागरिक दारिद्र्यरेषेखाली जाऊ शकतात. लोकांची खायची भ्रांत झाली आहे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम मृत्यूदरावर होतो.

साओ पावलो स्कूल ऑफ मेडिसिनचे ब्रायन सूसा यांनी याविषयी एक संशोधन केलं आहे. त्यानुसार मुलांच्या एका समूहगटाला कोरोनाचा अधिक धोका आहे. कोव्हिड लस देताना याचा विचार करायला हवा. सध्या 16 वर्षांच्या खालील मुलांच्या लसीकरणाची कोणतीही व्यवस्था नाही.

पालकांच्या अनुपस्थितीत मृत्यू दुर्दैवी

कोरोना संसर्गाच्या भीतीने नातेवाईक ICU मधील मुलांना भेट घेऊ शकत नाहीत. अलबर्ट सचिब बाल रुग्णालयातील ICU मध्ये कार्यरत असलेले डॉ. सिनेरा कायनेइरो सांगतात, "ही परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. आपल्या मुलांना कसं वाटतंय हे त्यांचे पालकच सांगू शकतात. मुलांचं दुःख पालकच समजू शकतात.

पालक आपल्या मुलांच्या तब्येतीबाबत ऐकतात त्यावेळी ते अत्यंत तणावात येत असतात. त्यांना आपल्या मुलांसोबत वेळ घालवायचा असतो. पालकांच्या अनुपस्थितीत मुलांचा मृत्यू होणं अतिशय दुर्दैवी आहे, असं डॉ. कारनेइरो यांना वाटतं.

शास्त्रज्ञांच्या मते, या वयोगटातील मुलांना मृत्यूचा धोका अजूनही अत्यंत कमी आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 3 लाख 45 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैेकी सून्य ते 9 वयोगटातील मुलांच्या मृत्यूचं प्रमाण 0.58 टक्के आहे. ही संख्या 2000 पेक्षाही जास्त आहे.

मदत कधी मागाल?

साधारणपणे, एखाद्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्यास किंवा इतरवेळी खालील लक्षणं आढळून आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा -

  • बाळाच्या शरीरावर लाल शिक्के पडणं
  • मुलाचं शरीर नेहमीपेक्षा जास्त थंड पडल्याचं जाणवणं
  • त्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल
  • मुलगा श्वास घेताना विचित्र आवाज काढत असल्यास
  • बाळ कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत पडून असेल किंवा व्याकूळ दिसून आल्यास
  • मुलांचे ओठ निळे पडल्यास
  • किशोरवयीन मुलांमध्ये अंडकोषात वेदना होत असल्यास

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)