You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रिन्स फिलीप यांच्या निधनासंदर्भातील बातम्यांच्या कव्हरेजसाठी बीबीसीला 1 लाख तक्रारी प्राप्त
ब्रिटनच्या 'सन' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रिन्स फिलीप यांच्या निधनासंबंधित बातम्यांच्या कव्हरेजसाठी सामान्य लोकांकडून बीबीसीला 1 लाख तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी (9 एप्रिल) 99 व्या वर्षी प्रिन्स फिलीप यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर बीबीसीने आपले सर्व कार्यक्रम पूर्णपणे बदलले.
ईस्टअँडर्स आणि मास्टरशेफ सारख्या कार्यक्रमांऐवजी बातम्या प्रसारित केल्या गेल्या. तसंच बीबीसी फोरचे प्रसारण थांबवण्यात आले.
बीबीसीने सांगितलं, 'राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन आम्ही आमचं कव्हरेज केलं. हीच आमची भूमिका आहे.'
दरम्यान, याकाळात कव्हरेजसंदर्भात एकूण किती तक्रारी प्राप्त झाल्या हे सांगण्यास बीबीसीने नकार दिला आहे. बीबीसी आपल्या तक्रारींवरील द्विमासिक अहवालात या आकडेवारीचा समावेश करेल असे समजते.
बीबीसीच्या इतिहासात प्रथमच एखाद्या कव्हरेजला 1 लाख तक्रारी आल्या असाव्यात.
बीबीसीला यापूर्वी सामान्य जनतेकडून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये 'जेरी स्प्रिंगर: द ऑपेरा' या कार्यक्रमाचा समावेश आहे. 2005 मध्ये बीबीसीला या कार्यक्रमासाठी 63 हजार तक्रारी आल्या.
याशिवाय अभिनेता अँड्र्यू सॅच यांना 2008 मध्ये रसेल ब्रँडच्या बनावट फोन कॉलबद्दल केलेल्या कार्यक्रमासाठी 42 हजार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
प्रिन्स फिलीप यांच्या निधनाच्या बातमीचे कव्हरेज करण्यासाठी आपल्या कार्यक्रमांमध्ये बदल करणारी बीबीसी ही एकमेव संस्था नाही. आयटीव्ही आणि चॅनेल फोर यांनीही या बातमीचे सखोल कव्हरेज करण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमात बदल केले होते.
मात्र, त्या दिवशी अनेक प्रेक्षकांनी आपले टीव्ही बंद केले. ताज्या आकडेवारीनुसार, आठवडाभरापूर्वीच्या तुलनेत शुक्रवारी (9 एप्रिल) आयटीव्हीच्या प्रेक्षकांच्या संख्येत 60 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले.
आठवडाभरापूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत या आठवड्यात बीबीसी वनच्या प्रेक्षकांमध्ये 6 टक्क्यांनी घट झाली, तर बीबीसी टूच्या प्रेक्षकांमध्ये दोन तृतीयांश घट झाली.
ब्रिटीश वेळेनुसार संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेदरम्यान केवळ 3 लाख 40 हजार प्रेक्षकांनी आपले टीव्ही सुरू केले होते.
शुक्रवारी (9 एप्रिल) रात्री टीव्हीवर सर्वाधिक पाहिला गेलेला कार्यक्रम चॅनेल फोरचा 'गॉगलबॉक्स' हा होता. 420 लाख प्रेक्षकांनी तो पाहिला.
बीबीसीकडे मोठ्या संख्येने तक्रारी येत असल्याने शनिवारी (10 एप्रिल) बीबीसीने आपल्या वेबसाइटवर प्रेक्षकांसाठी एक विशेष अर्ज अपलोड केला. यामुळे प्रेक्षकांना टीव्ही कव्हरेजबद्दल सहज तक्रार करता आली.
तक्रारींची संख्या कमी झाल्यानंतर रविवारी (11 एप्रिल) हा अर्ज वेबसाईटवरून हटववण्यात आला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)