प्रिन्स फिलीप : बीबीसी राजघराण्यातील निधनाचं वृत्तांकन कसं करते?

आज तुम्हाला बातम्या वेगळ्या पद्धतीच्या दिसतील. बीबीसीची वेबसाईट आणि न्यूज बुलेटिन केवळ एका विषयाचं अत्यंत सखोलपणे वृत्तांकन करतील, बातम्यांमध्ये कुठलीच हलकी-फुलकी गोष्ट पाहण्यास किंवा ऐकण्यास मिळणार नाही आणि बातमी वाचणाऱ्याचा आवाजही अधिक गंभीर असेल.

हे बदल ब्रिटनच्या राजघराण्यातील एका वरिष्ठ सदस्याच्या निधनामुळे झाले आहेत.

जर तुम्ही आजच्या बातम्या वाचत असाल किंवा पाहात असाल, तर तुम्हाला कळलं असेल की राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं निधन झालं आहे. राजघराण्यातील चार वरिष्ठ सदस्यांबाबत एक असलेले प्रिन्स फिलीप यांच्याबाबत बीबीसी अशा पद्धतीनं वृत्तांकन करेल.

त्यांच्यानंतर राणी एलिझाबेथ (दुसऱ्या), त्यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स (प्रिन्स ऑफ वेल्स) आणि त्यांचे पुत्र आणि पुढचे वारसदार प्रिन्स विलियम (ड्यूक ऑफ केम्ब्रिज) हे आहेत.

इतर माध्यमांच्या तुलनेत बीबीसी या घटनेचं अधिक गांभिर्यानं वृत्तांकन करत आहे, असं वाटू शकतं. तर तसं का आहे?

राजघराण्यातील निधन बीबीसीसाठी मोठा विषय का आहे?

राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) या 69 वर्षांपासून म्हणजेच सर्वाधिक काळ राजगादीवर आहेत. त्या ब्रिटनसह इतर 15 देशांच्या राष्ट्राध्यक्ष आहेत.

त्या 54 स्वतंत्र देशांची स्वयंसेवी संघटना असलेल्या कॉमनवेल्थच्याही प्रमुख आहेत. यात ब्रिटिशांची सत्ता होती, असे अधिक देश आहेत. ब्रिटनसह अनेक नागरिकांसाठी त्यांचं महत्त्व खूप आहे.

जेव्हा कधी ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्याचं निधन होतं, तेव्हा जगभरातील माध्यमांचं लक्ष त्याकडे वेधलं जातं. बीबीसी अशा घटनेचं अचूक वृत्तांकन करण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि योग्य कारणासाठीच हे केलं जातं.

बीबीसीची आर्थिक बाजू ब्रिटिश सरकार नव्हे, तर परवाना शुल्क या कर प्रकारातून सांभाळली जाते. हा शुल्क थेट जनता देते. बीबीसीमधील संपादकीय स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आर्थिक बाजूचा ही पद्धत अवलंबण्यात आलीय.

परवाना शुल्क देणाऱ्यांना, बीबीसीनं मूल्यांची जोपासणं करणं आवश्यक आहे आणि ब्रिटनमध्ये अनेक वर्षांपासून राजघराण्यात जनतेचं हित आहे असं वाटतं.

राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांच्या आईचं 2002 साली निधनं झालं, तेव्हा त्यांचा मृतदेह वेस्टमिंस्टर पॅलेसमध्ये तीन दिवसांपर्यंत ठेवण्यात आला होता. त्यावेळी तिथं एक लाखाहून अधिक लोक शोक व्यक्त करण्यासाठी पोहोचले होते.

विंडसरमध्ये त्यांचं दफन करण्यापूर्वी रस्त्यावर 10 लाखांहून अधिक लोक गोळा झाले होते आणि टीव्हीवर एक कोटी लोकांनी पाहिलं होतं, असा अंदाज आहे. जगातील माध्यमांनी या घटनेचं अधिक विस्तृतपणे वृत्तांकन केलं होतं.

राजघराण्यातील एखाद्या सदस्याशी संबंधित बातम्यांमुळे जगभरात चर्चा होतात. राजघराण्याचे अनेक कार्यक्रम जगभरातील अब्जावधी लोक पाहतात, हे थोडं आश्चर्यकारक वाटू शकतं.

या बातम्या मोठ्या असतात आणि बीबीसी त्यांचं त्याचप्रमाणे वृत्तांकन करते.

बीबीसीसाठी राजघराण्याचं वृत्तांकन करणारे प्रतिनिधी जॉनी डायमंड सांगतात की, "एखाद्या सेलिब्रेटी व्यक्तीकडे लोकांचं जितकं लक्ष असतं, त्यापेक्षा जास्त लक्ष राजघराण्याच्या सन्मानाकडे असतं."

"असं का आहे? हे नेमकं सांगणं कठीण आहे. मात्र, बऱ्याच लोकांना राजघराण्याच्या गोष्टींमध्ये रस आहे. दरम्यान बऱ्याच जणांना आजच्या आधुनिक जगात राजघराणं म्हणजे काहीसं वेगळं वाटतं."

बीबीसीच्या वर्ल्ड सर्व्हिस लँग्वेज न्यूज कंट्रोलर तारिक कफाला सांगतात, "राजघराण्यातील कुणा वरिष्ठ सदस्याच्या निधनाबाबत संपूर्ण जगातील लोकांना जाणून घ्यायचं असतं. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे पूर्ण जगातील 10 कोटींहून अधिक प्रेक्षक, श्रोते आणि वाचक आहेत, जे अशा पद्धतीच्या घटनेचं व्यापक वृत्तांकनाची अपेक्षा करतात."

ब्रिटनच्या राजघराण्यातील वरिष्ठ सदस्याच्या निधनाचं बीबीसी कसं वृत्तांकन करते?

बीबीसीच्या प्रेक्षकांच्या मनात हे येऊ शकतं की, हे वृत्त त्यांनी इतर ठिकाणी सर्वात आधी का पाहिलं. याचं कारण बीबीसी कुठल्याही घटनेचं सर्वात आधी वृत्तांकन करण्याऐवजी सर्वात अचूक आणि योग्य पद्धतीनं वृत्तांकन करण्यावर विश्वास ठेवते.

यासंबंधित वृत्ताकडे 'ब्रेकिंग न्यूज स्टोरी'ऐवजी एक अधिकृत घोषणा म्हणून पाहिलं जाते. इतर वृत्तसंस्था लक्ष वेधण्यासाठी ग्राफिक्सचा वापर करतात. मात्र, बीबीसीचं वृत्तांकन तोलून मापून स्वरातच झालं पाहिजे, ज्यातून त्या व्यक्तीच्या आयुष्याला आठवण्यावर भर दिला जातो, जी या जगात आता राहिली नाहीय.

राजघराण्यातील वरिष्ठ सदस्याच्या निधनानंतर बीबीसी इतर बातम्यांचं लगेच वृत्तांकन करत नाही. तसंच, हलक्या-फुलक्या बातम्यांना टीव्ही, वेबसाईट आणि रेडिओ न्यूज बुलेटीनमधून हटवलं जातं.

राजघराण्यातील कुणाच्या निधनाचे वृत्त काही तासांनंतरही वेबपेजवर आणि बुलेटीनमध्ये सर्वात मोठी घडामोड म्हणूनच दाखवली जाते.

प्रिन्स फिलीप यांच्यासाठीही हीच पद्धत का?

हे खरं आहे की, प्रिन्स फिलीप हे राजगादीच्या रांगेत नव्हते. शिवाय, त्यांना कधीच राजाची पदवीही मिळाली नाही. त्यांचे पुत्र राजगादीचे वारसदार आहेत.

ब्रिटनमध्ये कुणी महिला सम्राटासोबत विवाह करते, तेव्हा तिला राणीची पदवी मिळते. मात्र, कुणी पुरुष जेव्हा राणीशी विवाह करतो, तेव्हा त्याला राजाची पदवी मिळत नाही.

20 नोव्हेंबर 1947 साली विवाहानंतर प्रिन्स फिलीप हे राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांच्या जवळच्या मित्राप्रमाणे राहिले. ब्रिटनच्या इतिहासात राणीचे सर्वाधिक काळ सोबती म्हणून ते राहिले आणि राणीला सहकार्य करणं हेच त्यांचं प्राथमिक कार्य होतं.

ते एका संघाप्रमाणे होते. राणी त्यांच्या भाषणाची सुरुवात 'माझे पती आणि...' असंच करत होत्या.

विवाहाच्या 50 व्या वाढदिवशी राणी आपल्या भाषणात म्हणाल्या होत्या, "ते अत्यंत सरळ आणि अनेक वर्षांपासून माझी ताकद बनले आहेत. मी, माझं कुटुंब, हा देश आणि इतर अनेक देशांवर त्यांचे इतके ऋण आहेत, जितका कधी त्यांनी दावाही केला नाही आणि आपल्याला ते लक्षातही येणार नाही."

निधनाचं वृत्तांकन करण्यासाठी ही सर्व कारणं महत्त्वपूर्ण आहेत?

डायमंड म्हणतात, "खरं पाहिलं तर ही जगातील ही शेवटची राजेशाही आहे आणि फिलीप नेहमीच राणीच्या बाजूने राहिले, तसंच राणीसोबतच प्रवास केला. जगातील प्रत्येक कोपऱ्यात ते राणीसोबत दिसले."

"खरंतर ते आपल्या पद्धतीनं एक प्रसिद्ध व्यक्ती राहिले आहेत."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)