You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लष्कराशी संबंधित अधिकाऱ्यांनी लंडनमधला दूतावास ताब्यात घेतला, मान्यमारच्या माजी राजदूतांचा दावा
म्यानमारच्या लंडनमधल्या माजी राजदूतांनी बुधवारची रात्र कारमध्ये काढली. आपल्याला दूतावासाच्या बाहेर ठेवण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.
रॉयटर्स वृत्त संस्थेशी बोलताना राजदूत क्याव झ्वार मिन म्हणाले, "म्यानमारच्या लष्कराशी संबंधित व्यक्तींनी (Military attaché) दूतावासातील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास सांगितलं आणि तुम्ही आता म्यानमारचे प्रतिनिधी नाहीत असं सांगितलं."
ब्रिटीश परराष्ट्र सचिव डॉमिनिक राब यांनी ही दादागिरी असल्याचं म्हणत या घटनेचा निषेध केलाय. पण दूतावासातल्या पदाचा बदल त्यांनी स्वीकारलेला आहे.
म्यानमारच्या लष्कराने 1 फेब्रुवारी रोजी देशातील सत्तेवर ताबा मिळवला, त्यामुळे तिथं निदर्शनं आणि हिंसेचं सत्र सुरू झालं आहे. क्याव झ्वार मिन यांनी पदच्युत नेत्या आंग सान सू ची यांच्या सुटकेची मागणी केली आहे.
जवळपास 500 हून अधिक लोकांचा लोकशाहीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात मृत्यू झाला आहे, त्यामध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे.
क्याव झ्वार मिन यांनी बुधवारी घडलेल्या या घटनेचं 'भर लंडनमध्ये झालेला उठाव' असं वर्णन केल्याचं रॉयटर्सनी लिहिलं आहे. या प्रकारचा उठाव (यशस्वी) होऊ शकणार नाही असं ते म्हणाले आहेत.
लंडनमधील म्यानमार दुतावासाबाहेर बाहेर उभं राहून मेट्रोपोलिटन पोलीस फोर्सशी राजदूत बोलत आहेत असे चित्रीकरण झाले आहे.
(बाहेरील संकेतस्थळावरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही)
कर्मचाऱ्यांनी इमारतीत येऊ नये म्हणून पोलिसांना बोलावण्यात आलं होतं असं सांगितलं जात आहे. त्यानंतर दूतावासाबाहेर निदर्शक जमू लागले होते.
मार्च महिन्यात क्याव झ्वार मिन यांनी सू ची यांच्या सुटकेची मागणी बीबीसीशी बोलताना केली होती. "म्यानमार दुभंगला आहे आणि तो यादवी युद्धाच्या तोंडावर आहे," असं ते म्हणाले होते.
आपल वक्तव्य हे म्हणजे 'देशद्रोह नाही' असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
क्याव हे लष्करातील माजी कर्नल आहेत. युकेचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी त्यांच्या 'धाडसाचं आणि देशप्रेमाचं' कौतुक केलं होतं.
लंडनमधील सर्व व्यवहारांचे अधिकार उपराजदूत चिट विन यांच्याकडे देण्यात आले आहे अशी माहिती रॉयटर्सनं दिली आहे.
यूकेच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला माहिती देताना सांगितलं, "मुत्सद्दी नियमावलीनुसार लंडनमधील म्यानमारच्या राजदुतांच्या स्थितीबद्दल स्पष्टीकरण मागवले आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)