'सुएझ कालव्यातील जल वाहतूक कोंडीसाठी मला जबाबदार ठरवण्यात आलं'- मारवा सुलेहदोर

    • Author, जोशुआ चीटम
    • Role, बीबीसी न्यूज

गेल्या महिन्यात मारवा सुलेहदोर यांनी काही विचित्र पाहिलं.

एव्हर गिव्हन नावाचे जहाज सुएझ कालव्यात अडकल्याने जगातील सर्वाधिक व्यस्त असणारा व्यापारी मार्ग विस्कळीत झाला आणि अनेक जहाजं रखडली. अशा बातम्या प्रसार माध्यमांमधून सतत येत होत्या.

याच वेळी मारवा यांनी आपला फोन पाहिला आणि त्यांना कळाले की, या घटनाक्रमाला आपणच जबाबदार असल्याची अफवा इंटरनेटवर पसरली आहे.

इजिप्तची पहिली महिला जहाज कॅप्टन मारवा सांगतात, "हे पाहून मला धक्काच बसला."

सुएझ मार्गात व्यत्यय आला तेव्हा मारवा सुलेहदोर त्याठिकाणाहून शेकडो मैल दूर अलेक्झांड्रियामधील आएडा-फोर नावाच्या जहाजात काम करत होत्या.

इजिप्तच्या सागरी सुरक्षा प्राधिकरणाचे हे जहाज लाल समुद्रात आवश्यक माल वाहतुकीचे काम करते.

अरब लीग (काही अरब देशांनी 1945 साली मिल रिजनल ऑर्गनायझेशनची स्थापना केली) विद्यापीठाच्या अरब अकॅडमी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड मेरिटाइम ट्रान्सपोर्टच्या (एएसटीएमटी) विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठीही या जहाजाचा वापर केला जातो.

'एव्हर गिव्हन' जहाज सुएझ कालव्यात अडकण्यासाठी मारवा सुलेहदोर जबाबदार असण्याबद्दल स्क्रीनशॉट्स शेअर केले जात होते. ही बातमी बहुधा अरब न्यूज नावाच्या एका न्यूज वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असावी. सुएझ कालव्यातील घटनेत त्यांचा सहभाग असल्याचं त्यात म्हटलं होतं.

या बातमीत मारवा यांचा फोटो वापरण्यात आला होता. हा फोटो 22 मार्च रोजी अरब न्यूजच्या बातमीत प्रसिद्ध करण्यात आला होता. मारवा इजिप्तच्या पहिल्या महिला जहाज कॅप्टन बनल्याची ही बातमी होती. मारवा यांचा बनावट फोटो ट्विटर आणि फेसबुकवर अनेकवेळा शेअर करण्यात आला आहे.

'महिला असल्याने कदाचित लक्ष्य केले जात आहे'

एव्हर गिव्हन जहाज अडकल्याच्या खोट्या बातम्या पसरवण्यासाठी त्यांच्या नावाने अनेक बनावट ट्विटर अकाऊंट्स सुरू केली आहेत.

या अफवा कोण आणि का पसरवत आहे याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचं 29 वर्षीय मारवा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

मारवा सांगतात, "मी या क्षेत्रातील एक यशस्वी महिला असल्याने मला लक्ष्य केलं जात असावं असं मला वाटतं. पण मी ठामपणे असं सांगू शकत नाही."

ऐतिहासिकदृष्ट्या पुरुषप्रधान असलेल्या या उद्योगात मारवा यांना पहिल्यांदाच अशा आव्हानाचा सामना करावा लागत नाहीये. सध्याची आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेची आकडेवारी पाहता, जहाजांवर काम करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या केवळ दोन टक्के इतकीच आहे.

मारवा सांगतात त्यांनी कायम समुद्रावर प्रेम केले. त्यांचा भाऊ एएसटीएमटीमध्ये दाखल झाला तेव्हा त्यांनाही मर्चंट नेव्हीमध्ये जाण्यासाठी प्रेरणा मिळाली. पण त्यावेळी फक्त पुरुषांनाच एएएसटीएमटीमध्ये प्रवेश होता.

तरीही मारवा यांनी प्रवेशासाठी अर्ज केला. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी या प्रवेश अर्जाची दखल घेतली आणि त्यांना प्रवेश देण्यात आला.

राष्ट्राध्यक्षांनी सन्मान केला

प्रवेशानंतर अभ्यासादरम्यान जवळपास प्रत्येक वळणावर त्यांना भेदभावाला सामोरं जावं लागलं असं मारवा सांगतात.

त्या सांगतात, "माझ्याबरोबर अभ्यास करणारे बहुतेक पुरुष वयाने मोठे होते. त्यांचे विचार वेगवेगळे होते. अशा परिस्थीत संवाद साधण्यासाठी समविचारी व्यक्ती भेटणं कठीण होतं. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य राखत परिस्थितीला सामोरं जाणं हे मोठं आव्हान होतं."

"आजही आपल्या समाजात स्त्रिया आपल्या कुटुंबांपासून दूर राहून समुद्रात एकट्या काम करू शकतात हे मान्य करायला लोक तयार नाहीत. पण जेव्हा तुम्ही तुमचे आवडीचे काम करता तेव्हा त्यासाठी इतरांच्या परवानगीची गरज नसते," असंही मारवा म्हणाल्या.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर मारवा यांनी जहाजात फर्स्ट मेट म्हणून काम केले. 2015 साली सुएझ कालव्यात जेव्हा पहिल्यांदा आएडा-फोर जहाज पाण्यात उतरवले तेव्हा मारवा यांना कॅप्टन म्हणून पहिली संधी देण्यात आली.

त्यावेळी सुएझ कालवा ओलांडणाऱ्या मारवा या इजिप्तच्या सर्वांत तरुण आणि पहिल्या महिला कॅप्टन ठरल्या होत्या. राष्ट्रपती अब्दुल फतेह अल-सिसी यांनी इजिप्तमध्ये 2017 रोजी झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला.

सुएझ कालव्यात जेव्हा जहाज अडकवल्याप्रकरणी त्यांच्या नावाच्या अफवा सुरू झाल्या तेव्हा याचा परिणाम आपल्या कामावर होईल असंही त्यांना वाटलं.

"ही खोटी बातमी इंग्रजी भाषेत होती. त्यामुळे अनेक देशांमध्ये ती वेगाने पसरली. ही बातमी फेटाळण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. कारण यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धोका पोहचत होता. आजपर्यंत मी जी मेहनत केली त्यावर पाणी फेरलं जात होतं," मारवा सांगतात.

पण आपल्याला मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे आपला उत्साह कायम राहिल्याचं मारवा सांगतात, "या खोट्या बातम्यांवर जे कॉमेंट्स येत होते त्यापैकी अनेक नकारात्मक होते. पण अनेक सामान्य लोकांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सकारात्मक कमेंट्सही लिहिल्या होत्या."

"मी अशा कमेंट्वरच लक्ष दिले जे माझा उत्साह वाढवत होते. मला मिळणाऱ्या प्रेमाने माझा राग शांत झाला. मी पाठीराख्यांची आभारी आहे. मला आता पूर्वीपेक्षा अधिक लोक ओळखतात हे सुद्धा वास्तव आहे."

कॅप्टन म्हणून पूर्ण रँक मिळवण्यासाठी मारवा सुलेहदोर पुढील महिन्यात अंतिम परीक्षा देणार आहेत. या क्षेत्रात महिलांसाठी आपण एक प्रेरणा ठरू अशी आशा त्यांना आहे.

मारवा म्हणाल्या, "तुमचे आवडते काम करण्यासाठी तुम्हाला लढा द्यावा लागत असेल तर पाऊल मागे घेऊ नका आणि नकारात्मक विचारांना बळी पडू नका, हेच मला या क्षेत्रात येणाऱ्या महिलांसाठी सांगावेसे वाटते."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)