You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुएझ कालवा : लाखो टन वाळू उपसून एव्हर गिव्हन जहाज मोकळं करण्यात यश
सुएझ कालव्यात मंगळवारपासून अडकलेलं जहाज मोकळं करण्यात यश आलं आहे. हे जहाज मोकळं करण्यासाठी लाखो टन वाळू उपसावी लागली.
1300 फुट लांब असलेलं जहाज सरळ करण्यात आलं असून यामुळे आता सुएझ कालव्यातील वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
इंचेप या कंपनीनेही जहाज बाहेर निघाल्याचं म्हटलं आहे.
ट्रगबोट्स आणि ड्रेजर्सच्या साहय्याने या जहाजाला बाहेर काढण्यात आलं. इजिप्तच्या भागात असलेला सुवेझ कालवा हा जागतिक व्यापारउदीमासाठी आत्यंतिक महत्त्वाचा मानला जातो.
सुएझ कालवा सागरी मालवाहतुकीचा कणा समजला आतो. सुएझ कालव्यामुळे आशिया आणि युरोप खंडातील जलवाहतूक शक्य झाली.
जगभरातील व्यापाराच्या 12 टक्के मालाची सुएझ कालव्यातून केली जाते.
काय झालं होतं नेमकं?
मंगळवारी (23 मार्च) चीनहून नेदरलॅंडला जाणारं मालवाहू जहाज सुएझ कालव्यात अडकलं होतं. जहाज अडकल्याने जगभरातील व्यापारावर याचा मोठा परिणाम झाला.
सुएझ कालवा बंद झाल्याने खनिज तेलाच्या किमती सहा टक्क्यांनी वाढल्या होत्या.
सुएझ कालवा म्हत्त्वाचा का आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊया...
1) पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा
इजिप्तमध्ये असलेला सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी जोडतो. हा कालवा 193 किलोमीटर लांब आहे. आशिया आणि युरोप यांच्यातील हा कालवा सर्वांत छोटी लिंक आहे.
सुएझ कालवा मालवाहतुकीसाठी 1869 मध्ये सुरू करण्यात आला. सुवेझ कालवा सुरू होण्याच्या अगोदर पूर्व आणि पश्चिमेच्या देशातून ये-जा करणारी मालवाहतूक करणारी जहाजं दक्षिण अफ्रिकेच्या केप-ऑफ-गुड होपला वळसा घालून प्रवास करत.
जागतिक समुद्र परिवहन परिषदेच्या माहितीनुसार, सुएझ कालव्यामुळे आशिया आणि युरोपातील मालवाहू जहाजांचं नौ हजार किलोमीटरचं अंतर कमी झालं.
2) दैनंदिन दळणवळण 9.5 अब्ज
कन्सल्टन्सी फर्म लॉईट्स लिस्टच्या माहितीनुसार, बुधवारी 40 मालवाहू जहाज आणि 24 टॅंकर्स सुवेझ कालवा पार करण्यासाठी वाट पहात होते.
या जहाजांवर अन्न, सीमेंट तर, टॅंकर्समध्ये पेट्रोलियम पदार्थ आहेत. न्यूज एजेंन्सी ब्लुमबर्गच्या माहितीनुसार, जनावरांचा चारा आणि पाणी नेणारे टॅंकर्सही अडकून पडले आहेत.
सुएझ कालव्याची भौगोलिक परिस्थिती पहाता, याला 'चोक पॉइंट' म्हणून ओळखलं जातं.
एका अंदाजानुसार, सुएझ कालव्यातून दरवर्षी 19 हजार जहाजातून 120 कोटी टन मालाची ने-आण केली जाते. लॉईट्स लिस्टच्या माहितीनुसार, सुवेझ कालव्यातून दररोज 9.5 अब्ज मूल्य असलेली जहाजं ये-जा करतात.
3) सप्लाय चेनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण
जाणकारांच्या माहितीनुसार, सुएझ कालवा जगभरातील मालाची ने-आण करण्यासाठी फार महत्त्वाचा आहे.
सी इंटेलिजन्सतज्ज्ञ लार्स जेन्सेन सांगतात, "पहिली समस्या पोर्ट कंजेशन (बंदरात जहाजांची गर्दी) होण्याची शक्यता आहे."
"अंदाज करूया की सर्व जहाजांवर माल भरलेला आहे. या परिस्थितीत 55 हजार टीयूई (कंटेनर क्षमता) मालाच्या हिशोबाने दोन दिवसात आशियाहून युरोपला जाणारा 110 टीयूई माल अडकून पडलाय. सुएझ कालवा परत सुरू झाल्यानंतर ही जहाजं एकत्र युरोपातील बंदरात पोहोचतील. ज्यामुळे बंदरात गर्दी होईल," असं ते म्हणतात.
याचा थेट परिणाम बाजारावर पडेल असं लार्स म्हणतात. "बाजारात विकला जाणारा माल, पुरवठा आणि किंमतीवर याचा परिणाम होईल."
4) महागाई वाढण्याची भीती
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनातील कॅम्बेल विद्यापिठात सागरी विषयाचे जाणकार सल्वाटोर मर्कोग्लियानो, सुवेझ कालवा बंद झाल्याचे गंभीर परिणाम जगभरात पहायला मिळू शकतात असं मत व्यक्त करतात.
"सुएझ कालवा बंद झाल्याने मालवाहू जहाजं आणि तेलाचे टॅंकर युरोपमध्ये जेवण, इंधन आणि तयार माल पोहोचवू शकले नाहीत," असं ते बीबीसीशी बोलताना म्हणतात.
बीबीसीचे आर्थिक विषयांचे रिपोर्टर थियो लेगट्ट सांगतात, "सुएझ कालवा पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याचं कारण, मध्यपूर्वेच्या देशातून युरोपात इंधन आणलं जातं."
लॉईट्स लिस्ट इंटेलिजन्सच्या माहितीनुसार, गेल्यावर्षी सुएझ कालव्यातून 5163 टॅंकरची वाहतूक झाली होती.
अमेरिकेच्या ईआयएच्या माहितीनुसार, सुएझ कालवा आणि सुमेड पाईपलाईनच्या माध्यमातून सागरी मार्गाने होणाऱ्या तेलाच्या व्यवहारातील नऊ टक्के आणि आठ टक्के नॅचरल गॅसची ने-आण होते.
सुएझ कालवा बंद झाल्याने बुधवारी सहा टक्क्यांनी वाढलेल्या तेलाच्या किमती गुरूवारी काही कमी झाल्या.
रिस्ताद कॅबिनेटच्या ब्योनार टोनहुगेनने न्यूज एजेंन्सी एएफपीला सांगितलं, "या समस्येचा परिणाम काही कालावधीसाठी दिसून येईल. पण, सुएझ कालवा जास्त दिवस बंद राहिला तर, महागाई वाढेल. याचा परिणाम जास्त दिवस दिसून येईल."
लंडनच्या 'क्लाइड एंड को' मधील सागरी वाहतूकीचे तज्ज्ञ वकील इयान वुड्स एनबीसीशी बोलताना म्हणतात, "जहाजांवर लाखो डॉलर्सचं सामान आहे. सुएझ कालवा सुरू झाला नाही तर, जहाजांना दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल. याचा अर्थ, जास्त वेळ आणि किंमत मोजावी लागणार. वाढलेली किंमत सामान्यांकडून वसूल करण्यात येईल."
2015 मध्ये सुएझ कालव्याला रुंद करण्यात आलं. पण, या कालव्यातून वाहतूक मोठी आव्हानात्मक आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)