अत्याचार, हत्या आणि स्फोटांचे कट ज्या घरांमध्ये झाले, ती घरं का विकली जात आहेत?

कोलंबियाच्या कॅरेबियन तटांवर तीन बेडरूम, दोन-बाथरूम आणि मोठा स्वीमिंग पूल असलेला बंगला भाड्यावर उपलब्ध आहे. चारी बाजूंनी जंगलाने वेढलेल्या पनामा बॉर्डरवर चार बेडरूमचं घर विक्रीसाठी आहे. तर, कोलंबियातील दुसरं मोठं शहर मेडेलिनमध्ये मोठा सी-आर्ट डेको बंगला तुम्ही विकत घेऊ शकता.

कोलंबियातील प्रॉपर्टीच्या या जाहिराती अत्यंत आकर्षक आहेत. पण, ही घरं घेण्याचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

कोलंबियात विकण्यासाठी उपलब्ध असलेली ही घरं, उजव्या विचारसरणीच्या निमलष्करी टोळी सदस्यांची आणि रेवोल्यूशनरी आर्म फोर्सेस ऑफ कोलंबियाच्या डाव्या विचारांच्या सदस्यांची आहेत.

फेब्रुवारीमध्ये कोलंबिया सरकारने ऑनलाइन रिअल इस्टेट एजेंसी 'बिएन्स' लॉंच केली. या एजेंसीद्वारे सरकारने जप्त केलेली किंवा बंदूकधाऱ्यांकडून सरकारला सरेंडर करण्यात आलेली ही घरं विकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सरकारच्या माहितीनुसार 1600 घरं, अपार्टमेंट, फार्म आणि जमीन विकण्याचा सरकारचा मानस आहे.

या संपत्तीच्या विक्रीतून 14.3 कोटी डॉलर्स (10 कोटी पाउंड) जमा होतील अशी आशा आहे. ही रक्कम कोलंबियातील हिंसाचारात भरडले गेलेल्या 70 लाख लोकांना मोबदला म्हणून दिली जाणार आहे.

युद्ध पीडितांची मदत

मीगल एवेन्दानो, कोलंबियातील हिंसाचारात बळी पडलेल्यांना मदत म्हणून उभारण्यात आलेल्या फंडचे प्रमुख आहेत. ते म्हणतात, "शांती प्रक्रियेअंतर्गत लोकांना देण्यात आलेली आर्थिक रक्कम किंवा सोनं फंडमध्ये बदलणं सोपं आहे. यामुळे युद्ध पिडीतांची मदत शक्य आहे. मात्र, काही घरांची विक्री किंवा त्यांना भाडेतत्वावर देणं शक्य नाही."

"या फंडला रिअल इस्टेट एजन्सीसारखी सर्व्हिस गरजेची आहे. जेणेकरून या घरांची लवकरात-लवकर विक्री होऊ शकेल. यात उशीर झाला तर आम्हाला परवडणार नाही. रिअल इस्टेट एजन्सीच्या मदतीने घरं भाड्यावर किंवा विकली जात असतील. तर, युद्धात नाहक बळी पडलेल्यांसाठी एक मोठी रक्कम जमा होण्यात मदत होईल," असं मीगल एवेन्दानो पुढे म्हणतात.

कोलंबियातील ही घरं विक्रीची सुरूवात 2018 मध्ये करण्यात आली. मात्र, दोन वर्षात फक्त 12 घरं विकली गेली आहेत.

मीगल एवेन्दानो म्हणतात, "एजन्सीच्या मदतीने घरं आणि इतर गोष्टी विकण्यामुळे यात पारदर्शकता येईल. या देशाला टोळीयुद्धाच्या संघर्षाचा मोठा इतिहास आहे. ही घरं विकल्यामुळे हा खुनी इतिहास पुसला जाण्यात मदत होईल आणि लोकांना मिळणाऱ्या मोबदल्याचा मुद्दा चर्चेत येईल."

सरकारने विकण्यासाठी ठेवलेली अनेक घरं ग्रामीण भागात आहेत. सरकार आणि बंदूकधारी टोळ्यांमध्ये शांती प्रस्तावावर सही केल्यानंतर पाच वर्ष हिंसाचार सुरू होता.

हिंसक इतिहासाचं सावट

मेडेलिनमधील मॉटेकेसिनो मॅन्शनसारखे बंगले आणि इमारती शहराच्या सुरक्षित भागात आहेत. पण, हिंसक इतिहासाचं सावट त्यांच्यावर अजूनही आहे.

संगमरवराने बनवण्यात आलेला हा बंगला शहराच्या मध्यभागी आहे. या बंगल्याचं महिना भाडं 4700 डॉलर्स आहे. यात 12 खोल्या, 13 बाथरूम, एक लाउंज बार, अनेक स्वीमिंग पूल आणि कारंजं लावण्यात आलं आहे.

हा बंगला उजव्या विचारसरणीची निमलष्करी टोळी सेल्फ डिफेंस फोर्सेस ऑफ के च्या संस्थापकांचा आहे. या टोळीने हिंसाचार बंद केलाय. ज्या जमिनीवर हे घर बांधण्यात आलं, त्याठिकाणी मोठा हिंसाचार झाला होता.

या बंगल्यात निमलष्करी टोळ्यांचे प्रमुख एकत्र भेटत. कोलंबियात सुरू असलेल्या टोळीयुद्धाच्या संघर्षात अनेकांवर अत्याचार करण्यात आले. या योजना याच बंगल्यात बनवल्या जात. सामान्यांवर बॉम्ब टाकणं, लोकांची हत्या यांसारख्या योजना याच बंगल्यातून प्लान करण्यात आल्या.

या बंगल्यात लोकांना मरणयातना दिल्या जात. टोळ्यांमधील शार्प शूटर्सना प्रशिक्षण याच ठिकाणी दिलं जायचं.

मीगल एवेन्दानो सांगतात, "तीन एकरवर बनवण्यात आलेला हा बंगला खूप सुंदर आहे. हा पॉश परिसरात बनवण्यात आला आहे. पण, या बंगल्याचा इतिहास पहाता, याची विक्री शक्य नाही."

हिंसाचाराचे नाहक बळी

सिव्हिल इंजीनिअर सर्गियो ओर्टिज यांनी या बंगल्याचा इतिहास विसरून बंगला खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्गियो ओर्टिज सांगतात, "त्यांच कुटुंबही कोलंबियात सुरू असलेल्या हिंसाचाराला बळी पडलंय. ही प्रॉपर्टी भाड्यावर देण्याची त्यांना आशा आहे. बंगल्यातील मैदान लोकांसाठी व्यायाम करण्याची जागा आणि पार्क करण्याची त्यांची योजना आहे."

ते सांगतात, ही प्रॉपर्टी माझ्या कुटुंबाला मिळाली तर, या बंगल्याचा वापर फिजिकल थेरपी सेंटर म्हणून करण्याचा विचार आहे. यालाच लागून असलेल्या इमारतीला म्युझिकल सेंटर करण्याचा त्यांचा मानस आहे.

"आमची इच्छा आहे लोकांना शांत जागा आणि मन प्रफुल्लित करणारं वातावरण देण्याची. देशाची मदत करण्याचा हा मार्ग आम्ही निवडला आहे," असं ते म्हणतात.

सरकारची उपस्थिती

कोलंबियातील एका क्रायसेस ग्रुपचे अभ्यासक एलिजाबेझ डिकिन्सन सांगतात, "मोठ्या शहरात प्रॉपर्टी जास्त सुरक्षित आहे. ज्या प्रॉपर्टी विकण्यासाठी उपलब्ध आहेत, त्या भागात अजूनही टोळ्या सक्रिय आहेत. याठिकाणी सरकारची उपस्थिती फार कमी आहे. याठिकाणी प्रॉपर्टी विकत घेणं म्हणजे, धोका पत्करण्यासारखं आहे."

"सर्वांना माहित आहे की ही संपत्ती कोणाची आहे. लोकांच्या भावना या घरांशी आणि बंगल्यांशी जोडल्या गेल्या आहेत," असं त्या सांगतात.

घर भाड्यावर घेतलेल्यांना जबरदस्तीने घर सोडावं लागण्याचा अनेक घटना घडल्या आहेत. तर, प्रॉपर्टी घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या काही लोकांना धमकी मिळाली आहे.

मात्र, एवेन्दानो यांनी आशा सोडलेली नाही. हळूहळू निमलष्करी टोळ्या आणि गोरिल्ला योद्ध्यांची घरं सामान्य घरं बनू लागली आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)