मराठा आरक्षण: ‘मराठा समाजाला एकत्र आणणं कठीण, पण...’ – शाहू छत्रपती

    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठी

कोल्हापूर संस्थानचे महाराज श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासोबत बीबीसी मराठीने विशेष संवाद साधला. कोरोनामुळे कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा रद्द झाला तसंच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल शाहू महाराज छत्रपती यांनी मतं व्यक्त केली.

प्रश्न - प्लेगच्या साथीनंतर 100 वर्षांनी कोरोनाच्या साथीमुळे ऐतिहासिक शाही दसरा रद्द करावा लागला आहे. याबद्दल काय वाटतं. ?

उत्तर- प्लेग साथीवेळी हा सोहळा रद्द करावा लागला होता असा रिपोर्ट आहे. आता 100 वर्षानंतर पुन्हा एकदा हा सोहळा रद्द करण्याची पाळी आली. परंतु त्यावेळी सुद्धा एक वर्ष जरी रद्द केला असला तरी सुद्धा त्याचा अर्थ असा नाही की तो अधूनमधून रद्द झाला. नंतरच्या काळात 99 वर्ष चालूच राहिला. तसं यापुढेही सुरूच राहिल. पण एक वर्ष बंद राहिला तर आकाश कोसळणार नाही. एक वर्ष जास्तीत जास्त फरक पडेल. आता काही महिन्यात कोव्हिड-19 वर नियंत्रण निश्चित येईल. त्यामुळं नेहमी पुढसुद्धा बघायला मिळेल.

प्रश्न- मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला न्यायालयात स्थगिती मिळाल्याने वाद पेटला आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं की नको याबाबत तुमचं काय मत आहे.?

उत्तर - आंदोलन पेटलं आहे याचा अर्थ काय हे मला कळलं नाही.

प्रश्न- मराठा समाजाला आरक्षणासाठी अजूनही संघर्ष करावा लागतोय.

उत्तर - सर्वोच्च न्यायालयात यावर लवकरच सुनावणी सुरू होईल असा सर्वांचा अंदाज आहे. आणि लवकरात लवकर आपल्याला त्याचा निकाल मिळणार आहे.

प्रश्न - मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व संभाजीराजे छत्रपती करत आहेत. हे आंदोलन कोणत्या दिशेने जावं याविषयी तुम्ही संभाजीराजेंना काही सूचना, सल्ले देता का? तुमच्यामध्ये याबाबत चर्चा होते का ?

उत्तर - परवाच एक कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वानाच कोल्हापूरच्या लोकांना काही प्रश्न होते. सर्वसाधारणपणे पुढची पावलं काय असावीत याबाबत ही मीटिंग होती. तर पुढची पावलं काय असावीत याची दिशा काय असावी ही मी दिलेली आहे. त्या मीटिंगमध्ये संभाजीराजे होते.

प्रश्न - मराठा समाजाने आरक्षणासाठी मूक मोर्चे काढले. नवी मुंबई इथं आंदोलनाला हिंसक वळण लागलं. हे आंदोलन कोणत्या दिशेने जावं याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

उत्तर - कोल्हापूरमध्ये कधी हिंसक वळण लागलेलं नाही. आंदोलन दिशेने जावं म्हणजे हक्काचं आहे ते मिळवलं पाहिजे. त्यात काही प्रश्न नाही. SC, OBC, ST या सगळ्यांच्या बाबतीत आपण जो आदर्श बाळगतो, त्यांचे विचार बाळगतो , त्यांना जे आरक्षण मिळालं आहे त्यांना धक्का न लागता हे आरक्षण मिळवायचं आहे हे निश्चित.

प्रश्न- आरक्षणाच्या या आंदोलनादरम्यान मराठा समाजामध्ये अनेक गट पडले आहेत. हे गट पक्षीय किवा संघटनाच्या रुपात पाहायला मिळतात. या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही काही करणार आहोत का?

उत्तर - आपण इतिहास जर पाहिला तर मराठा समाज एकत्र फारसा काही आलेला नाही. तर सगळ्यांना एकत्र करणं हे कठीणच आहे. आताही तुम्ही पाहिलं तर परवा मी माझ्या भाषणातही सांगितलं की मराठा समाज हा सर्व पक्षांत विखुरला आहे, राष्ट्रवादीमध्ये आहे, शिवसेनेत आहे, भाजपमध्ये आहे, समाजवादी पक्षात आहे वगैरे वगैरे. एकत्र येणं हे निश्चित चांगलं होईल पण या पॉईंटवर सगळे एकत्र आलेत असं मी मानतो.

प्रश्न - मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. याबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुमची काही चर्चा झाली आहे का?

उत्तर - त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रसंग मला काही आला नाही. त्यांचे ते सगळे सक्षम आहेत. एकमेकांशी चर्चा करतील. महाराष्ट्रासाठी, मराठ्यांसाठी, देशासाठी योग्य विचार करुन दिशा ठरवतील.

प्रश्न- कोल्हापूर आणि सातारा या राजघराण्यामध्ये वाद आहेत. उदयनराजे, शिवेंद्रराजे आणि संभाजीराजे यांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही वडीलधारे म्हणून काही करणार आहात का? मध्यस्थी करणार आहात का?

उत्तर - मी मध्यस्थी करण्याची पाळी कधी आली नाही. ना कधी ते या विषयावर चर्चा करायला माझ्याकडे आले. यावर खाजगीरित्या चर्चा करण्याचं विशेष नाही. सार्वजनिक दृष्टीकोनातून आपण चर्चा करतोच आहे.

प्रश्न- छत्रपती हे सर्वांचे असतात अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती. त्यावर तुमचं मत काय धनगर समाज असेल किवा ब्राह्मण महासंघ यांनीदेखील आरक्षणाच्या वादात उडी घेतली आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

उत्तर- धनगर समाजाला आरक्षण आहेच आहे. पण त्यात त्यांना काही बदलून हवं आहे. त्यासाठीसुद्धा योग्य काय ते नेतेमंडळी आणि धनगर समाज विचार करेल.

प्रश्न - छत्रपती घराणं सर्वासाठी कार्यशील असेल का?

उत्तर - शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्यापासून छत्रपती घराणं म्हणजे सर्व समाजाकडे लक्ष देणारा म्हणजे छत्रपती.

प्रश्न - संभाजीराजे हे सध्या मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसतायत. पण त्यांनी सक्रिय राजकारणात यावं असं तुम्हाला वाटतं का?

उत्तर - त्याबाबतीत आपण त्यांनाच विचारलं तर जास्त स्पष्ट होईल ना.

प्रश्न - पण वडील म्हणून तुमची भूमिका काय?

उत्तर - वडील म्हणून माझी हीच भूमिका आहे की सर्वसामान्यांचं काम करत राहणं हे महत्त्वाचं आहे.

प्रश्न - मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत 27 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होतेय. काय होईल असं तुम्हाला वाटतं.?

उत्तर - आता मी ज्योतिषी असतो तर मी काहीतरी सांगितलं असतं. पण ते नसल्यामुळं पुढचं काय होईल ते सांगता येत नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)