सुएझ कालवा : 6 दिवसांच्या युद्धानंतर जेव्हा 8 वर्षे बंद झाला होता सुएझ कालवा

सुएझ कालवा, व्यापारी मार्ग, जलवाहतूक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1967 ते 1975 या कालावधीत सुएझ कालव्यात चौदा व्यापारी जहाजं फसली होती.

जगभरातील एकूण व्यापाराचा विचार करता त्याचा दहावा हिस्सा हा सुएझ कालव्यातून होतो. अगदी वर्षानुवर्षे सुएझ कालव्यातून सुरू असलेल्या वाहतुकीला या आठवड्यात अचानक ब्रेक लागला. या समुद्री मार्गावरचा हा ट्रॅफिक जाम ऐतिहासिक होता.

सुएझ कालव्यात अडकलेल्या 400 मीटर लांब आणि 60 मीटर रुंद 'एव्हर गिव्हन' जहाजाला हटविण्याच्या प्रयत्नांना अखेर यश आलं. मंगळवारपासून (23 मार्च) हे जहाज सुएझ कालव्यात अडकलं होतं.

हे जहाज मोकळं करण्यासाठी लाखो टन वाळू उपसावी लागली. त्यानंतर सुएझ कालव्यातील वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला.

ही काही किरकोळ गोष्ट नव्हती. सुएझ कालव्यातून दर दिवशी 9.5 अब्ज डॉलर्सच्या सामानाची वाहतूक होते. 'एव्हर गिव्हन' जहाजाच्या घटनेचा आंतरराष्ट्रीय व्यापाराला फटका बसलाच, पण सुएझ कालवा व्यापारी वाहतुकीसाठी बंद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती.

जून 1967 सालची गोष्ट आहे...इजिप्त, सीरिया आणि जॉर्डनचं इस्रायलसोबत युद्ध सुरू झालं होतं आणि दोन्ही बाजूंच्या गोळीबारामध्ये सुएझ कालव्यात 15 व्यापारी जहाजं अडकली होती. इतिहासामध्ये हे युद्ध 'सहा दिवसांचं युद्ध' म्हणूनच ओळखलं जातं. कारण सहाच दिवस हे युद्ध चाललं होतं.

सुएझ कालवा, व्यापारी मार्ग, जलवाहतूक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जलवाहतूक

पण तरीही सुएझ कालवा बंद करण्यात आला होता. कालव्यात अडकलेल्या 15 जहाजांपैकी एक बुडालं आणि उरलेली 14 जहाजं पुढची तब्बल आठ वर्षं तिथेच कैद होऊन अडकली होती. पण सुएझ कालवा इतकी वर्षं बंद का ठेवला गेला? आणि या संघर्षाची नेमकी सुरूवात कशी झाली होती?

अरब-इस्रायल युद्ध

राष्ट्रपती गमाल अब्दुल नासिर यांच्या नेतृत्वाखाली इजिप्तने मे, 1967 साली इस्रायलच्या सीमेवर सैनिकांची संख्या वाढवायला सुरूवात केली होती. इस्रायलसोबत कोणत्याही तऱ्हेचा संघर्ष उद्भवलाच, तर या शेजारी देशाला पूर्णपणे उद्धवस्त करण्याचाच त्यांचा हेतू होता.

सीरियानेही इस्रायलला नेस्तनाबूत करण्याच्या धमक्या द्यायला सुरूवात केली. अनेक आठवडे तणाव कायम राहिल्यानंतर पाच जून 1967 ला निर्वाणीची लढाई सुरु झाली. त्याच दिवशी इस्रायलनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत इजिप्तवर बॉम्ब हल्ला केला आणि त्यांच्या हवाई दलाचं 90 टक्के नुकसान केलं.

सीरियाच्या हवाई दलाचीही अवस्था इस्रायलनं अशीच केली होती. जेव्हा हा बॉम्बहल्ला सुरू होता तेव्हा बुल्गारिया, चेकोस्लोवाकिया, फ्रान्स, पोलंड, स्वीडन, पश्चिम जर्मनी, ब्रिटन आणि अमेरिकेची 15 व्यापारी जहाजं सुएझ कालव्यातून प्रवास करत होती.

सुएझ कालवा, व्यापारी मार्ग, जलवाहतूक

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सुएझ कालव्यात अडकलेलं जहाज

पीटर फ्लैक त्यावेळी ब्रिटनच्या 'एगापेनोर' जहाजावर होते. त्यांनी 2020 साली बीबीसी रेडिओ फोरशी बोलताना म्हटलं होतं, "आमचं जहाज सुएझ कालव्याच्या दक्षिण टोकाला पोहोचलं, आमच्या कॅप्टननं सांगितलं की, इस्रायल आणि अरब देशांदरम्यान युद्ध सुरू झालं आहे."

"आम्ही पुढे सरकलो तसं आम्ही लढाऊ विमानं वाळवंटावरून उडताना पाहिली. मला अजूनही आठवतंय. इस्रायली विमानं खूप खालून उडत होती. इजिप्तच्या हवाई अड्ड्यांवर ते बॉम्ब टाकत होते आणि त्यांचा नेम अचूक होता."

सुएझ कालव्याचा रस्ता

मलेशियाहून रबर आणि प्लॅस्टिकची खेळणी घेऊन चाललेलं 'एगापेनोर' हे ब्रिटीश जहाज सुएझ कालव्यात अडकलेल्या 15 जहाजांपैकी एक होतं.

चीनवरून अक्रोड आणि पाम तेल घेऊन जाणाऱ्या 'मेलम्पुस' जहाजावर त्यावेळी तैनात असलेल्या जॉन ह्यग्स यांनी बीबीसी रेडिओ फोरला सांगितलं होतं, "सिनाईच्या वाळवंटातून दोन इस्रायली लढाऊ विमानांनी उड्डाण केलं. ते आमच्या जहाजावरून गेलं. कानाचे पडदे फाटतील एवढा मोठा त्या विमानाचा आवाज होता."

इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यात एक जहाज बुडालं. ते अमेरिकन जहाज होतं. याच दरम्यान सुएझ कालव्यात असलेल्या जहाजांना ग्रेट बिटर तलावात आश्रय घेणं भाग पडलं.

सुएझ कालवा, व्यापारी मार्ग, जलवाहतूक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सहा दिवस चाललेल्या लढाईत इस्रायलने इजिप्त, जॉर्डन, सीरिया यांना तडाखा दिला होता.

अमेरिकेतील कँपबेल विद्यापीठात सागरी मार्गाच्या इतिहासाचे प्राध्यापक असलेले सेल मर्कोग्लियानो सांगतात, "सुएझ कालव्यात त्यावेळी अडकलेल्या जहाजांना कोणाचाही निशाणा बनायचं नव्हतं. त्यामुळेच त्यांना ग्रेट बिटर तलावात आश्रय घ्यावा लागला."

युद्धाच्या दुसऱ्या दिवशी इजिप्तनं सुएझ कालव्याच्या अगदी शेवटच्या टोकाला एक जहाज बुडवलं. तिथे स्फोटकं लावली जेणेकरून तो मार्ग बंद होईल आणि इस्रायल येण्या-जाण्यासाठी सुएझ कालव्याचा वापर करू शकणार नाही. तिन्ही अरब देशांच्या पराभवानंतर हे युद्ध दहा जूनला संपलं. मात्र इजिप्तनं सुएझ कालव्याचा रस्ता बंदच ठेवला आणि तिथे अडकलेली 14 जहाजं बाहेर पडू शकणार नाहीत.

ग्रेट बिटर लेक असोसिएशन

संघर्ष जेव्हा टोकाला पोहोचला होता तेव्हा आणि हे युद्ध संपल्यानंतरही ग्रेट बिटर तलावात अडकलेल्या जहाजांवरच्या लोकांचं आयुष्य कठीण बनलं होतं. 2010 साली बीबीसी रेडिओ फोरवर प्रसारित झालेल्या 'द यलो फ्लीट' या कार्यक्रमात प्रेझेंटर पीटर स्नो यांनी सांगितलं की, राजनयिक चर्चांनंतर जहाजावर अडकलेल्या लोकांना घरी पाठविण्यात आलं, पण त्यांच्यापैकी काही जणांना तीन महिन्यांपर्यंत तिथेच राहावं लागलं होतं.

प्रोफेसर सेल मर्कोग्लियानो सांगतात, "सुएझ कालव्यात अडकलेली जहाजं त्या देशांची होती, ज्यांचा इजिप्त आणि इस्रायलसोबत कोणताही तह होऊ शकला नव्हता. काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा होती, पण तसं काही झालं नाही."

जेव्हा सुएझ कालवा अनिश्चित काळासाठी बंद राहिल अशी चिन्हं दिसायला लागली, तेव्हा जहाज कंपन्यांनी आपापल्या जहाजांवरील सामान आणि मशिनरीच्या देखभालीसाठी आपल्या स्टाफची नेमणूक करायला सुरूवात केली आणि वेळोवेळी त्यांची बदली पण केली जाऊ लागली.

मर्कोग्लियानो यांनी सांगितलं की, इथं अडकलेल्या जहाजांवर तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी 'ग्रेट बिटर लेक असोसिएशन' ची स्थापना केली, जेणेकरुन त्यांचं काम चालू राहिल आणि ते मानसिकदृष्ट्याही सक्षम राहतील.

'ग्रेट बिटर लेक असोसिएशन'ने ऑलिंपिकच्या धर्तीवर एका क्रीडा स्पर्धेचंही आयोजन केलं होतं. त्यामध्ये डायव्हिंग, शूटिंग, स्प्रिंटिंग, वॉटर पोलो, तीरंदाजीसारख्या 14 खेळांच्या स्पर्धा घेतल्या होत्या. इतकंच नाही तर सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांचंही वाटप केलं होतं.

सुएझ कालवा, व्यापारी मार्ग, जलवाहतूक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इजिप्तने सुएझ कालव्यात स्फोटकं उडवून मार्ग बंद केला होता.

असोसिएशनने टेबल टेनिसपासून फुटबॉलपर्यंत अनेक खेळ खेळून पाहिले. स्वतःचं पोस्ट ऑफिस उघडलं. अगदी पोस्टाची तिकिटंही काढली, जी नंतर जगभरातील संग्राहकांना देण्यात आली.

मर्कोग्लियानो सांगतात, "मात्र जेव्हा अनेक वर्षांनंतरही जहाजांची कोंडी कायम राहिली, तेव्हा अनेक कंपन्यांनी आपली जहाजं निकामी झाल्याचं घोषित करून विमा कंपन्यांकडे नुकसानभरपाईचे दावे केले."

या जहाजांवर सिनाईच्या वाळवंटातून येणाऱ्या पिवळ्या रेतीचा थर जमा झाला होता आणि असंच सोडून दिल्यामुळे या जहाजांना 'यलो फ्लीट' असंही म्हटलं जाऊ लागलं होतं.

सुएझ कालवा बंद ठेवल्याचा नेमका परिणाम काय झाला?

इतिहासकार लिंकन पेन यांनी 'द सी अँड द सिव्हिलायझेशन : अ मेरिटाइम हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड' या नावानं एक पुस्तक लिहिलं आहे.

त्यांनी बीबीसी मुंडोला सांगितलं की, सुएझचा कालवा 1869 पासून खुला झाला होता. पण 1960 च्या दशकापर्यंत या मार्गावरून होणारा व्यापार प्रचंड वाढला होता. हा एक अतिशय महत्त्वाचा सागरी मार्ग बनला होता आणि या मार्गानं जाणाऱ्या जहाजांना आफ्रिकेहून जावं लागायचं नाही."

लिंकन पेन सांगतात, "त्यामुळेच 1967 साली जेव्हा हा मार्ग बंद झाला होता, तेव्हा त्याचा परिणाम सगळ्या जगावर झाला. दीर्घकाळापर्यंत तो टिकून राहिला. सर्वाधिक प्रभाव इजिप्तवर झालेला पहायला मिळाला. कारण इजिप्तच्या जीडीपीचा चार टक्के हिस्सा हा सुएझ कालव्यातून जाणाऱ्या जहाजांमधूनच यायचा."

सुएझ कालवा, व्यापारी मार्ग, जलवाहतूक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1975 सुएझ कालवा व्यापारासाठी खुला करण्यात आला.

"अरब देशांसमोरील अडचणही वाढली. कारण त्यांच्या देशातून जाणाऱ्या तेलाची वाहतूकही याच मार्गानं व्हायची. परिणामी युरोपला रशिया अधिक तेल विकायला लागला. जगाच्या आर्थिक चक्राला अमेरिका आणि युरोपच गती देत होते. तेव्हा चीन आर्थिक महासत्ता बनला नव्हता. युरोप जी जहाजं पाठवायचा, ती छोटी असायची. त्यांना आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरून पुढे जावं लागायचं त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढायचा."

लिंकन पेन पुढे सांगतात, "आफ्रिकेचा हा रस्ता चांगलाच लांब पल्ल्याचा पडायचा. त्यामुळे नंतर हे ठरवलं गेलं की दोन लहान जहाजं पाठविण्याऐवजी एकच मोठं जहाज पाठवलं जावं. त्यानंतर जहाजांचा आकार वाढत गेला. 1975 साली जेव्हा सुएझ कालव्याचा रस्ता पुन्हा खुला करण्यात आला, तेव्हा अशी काही जहाजं होती, जी त्या मार्गानं जाऊ शकत नव्हती. त्यामुळेच इजिप्तनं कालव्याच्या रुंदीकरणाचं काम हाती घेतलं."

सुएझ कालवा खुला कसा झाला?

लिंकन पेन सांगतात," सुएझ कालव्याचा रस्ता बंद करून इजिप्त पाश्चिमात्य देशांना एक संदेश देऊ पाहत होता. पाश्चात्य देश इस्रायलचं समर्थन करतात, असा इजिप्तचा समज होता. तेलाचा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळा निर्माण करून अमेरिका आणि युरोपला मध्य पूर्वेबद्दलची भूमिका बदलण्यास भाग पाडू असं इजिप्तला वाटत होतं. "

मात्र इजिप्तचा हा समज प्रत्यक्षात आला नाही. सुएझ कालव्याची नाकाबंदी चांगलीच ताणली गेली. आपण कमकुवत नाहीये, हेच दाखविण्याचा दोन्ही बाजूंचा प्रयत्न होता.

सुएझ कालवा, व्यापारी मार्ग, जलवाहतूक

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सुएझ कालव्यात अडकलेलं जहाज

सुएझची ही कोंडी पुन्हा एकदा एका युद्धानेच फुटली. 1973 साली योम किप्पुरची लढाई झाली. यामध्ये इजिप्त आणि सीरियानं इस्रायलवर हल्ला केला. हा हल्ला ज्यू कॅलेंडरमध्ये सर्वांत पवित्र मानल्या गेलेल्या दिवशीच केला गेला.

लिंकन पेन सांगतात की, योम किप्पुरच्या लढाईनं सर्वच पक्षांना चर्चेसाठी एकत्र यावं लागलं. सुएझ कालव्याचा मार्ग खुला केला जावा, यावरच तडजोड झाली. सुएझ कालवा बंद ठेवून कोणाचंच काही भलं होणार नाही, हे सगळ्यांच्याच लक्षात आलं होतं. नासर यांचे उत्तराधिकारी अन्वर अल् सादात यांच्या नेतृत्वाखाली इजिप्तनं आपला जुना निर्णय बदलला.

बुडवलेली जहाजं तसंच स्फोटकं हटविण्यामध्ये वर्षभराचा वेळ गेला आणि अखेरीस पाच जून 1975 ला सुएझ कालवा वाहतुकीसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात आला. ज्या दिवशी अरब-इस्रायल युद्ध सुरू झालं होतं, तोच हा दिवस होता.

तिथं अडकलेल्या 14 जहाजांपैकी केवळ दोनच जहाजं पुन्हा समुद्रात प्रवास करण्याच्या योग्यतेची राहिली होती. ही दोन्ही जहाजं जर्मनीची होती. बाकी जहाजांना तिथून ओढून बाहेर काढलं आणि नष्ट करण्यात आलं.

मर्कोग्लियानो सांगतात की, अशाप्रकारे आलेल्या अडचणीतूनच सुएझचा कालवा किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित होत गेलं. एक जहाज किंवा एक लढाई जगाच्या व्यापारात अडचणी निर्माण करू शकते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)