कोरोना साथीवर मात केलेल्या या देशांकडून आपण शिकायला हव्यात 'या' 5 गोष्टी

    • Author, जेन कॉर्बिन
    • Role, बीबीसी पॅनोरामा

कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळे उपाय योजले जात आहेत. त्यापैकी काही उपाय परिणामकारक ठरल्याचं दिसतं. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणते ठरलेत, याचा बीबीसी पॅनोरमाच्या जेन कॉर्बिन यांनी घेतलेला हा आढावा...

मी गेल्या वर्षभर कोव्हिडचं वार्तांकन केलं. आता माझं मिशन होतं जगभरातले नेते आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून या विषाणूला आळा घालण्यासाठी त्यांनी कुठल्या गोष्टींना प्राधान्य दिलं, हे जाणून घेणं.

या सर्व माहितीचा अभ्यास केल्यानंतर विषाणूचा प्रसार आणि विषाणूचा संसर्ग झाल्याने होणाऱ्या मृत्यूला आळा घालण्यासाठी चार गोष्टी महत्त्वाच्या असल्याचं मला जाणवलं.

  • सीमेवर नियंत्रण आणि प्रवाशांची तपासणी करण्यासाठी तातडीची आणि प्रभावी कृती करणे
  • कोरोनाची लागण झाल्याचा संशय असणाऱ्या प्रत्येक संशयित रुग्णाची चाचणी करणे, त्याला ट्रॅक करणे आणि ट्रेसिंग करणे.
  • विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी क्वारंटाईन केलेल्यांना सर्व ती मदत पुरवणे
  • प्रभावी नेतृत्त्व आणि सातत्यपूर्ण आणि वेळेत सार्वजनिक संदेश

आम्ही सर्व योग्य उपाय योजले, असा दावा कुणीही केलेला नाही. मात्र, जगभरात प्रभावी आणि परिणामकारक ठरलेली काही प्रमुख धोरणं आम्ही खाली देत आहोत. हे सर्व एकत्र केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या साथरोगांच्या नियंत्रणासाठीची ब्लूप्रिंट ज्याला 'पॅन्डेमिक प्लेबुक' म्हणतात, आपसूकच तयार होईल.

स्टेप 1 : तयारी (Prepration)

स्टॅनले पार्क दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये राहतात. जू येऑन त्यांची मुलगी. जूला घेण्यासाठी ते एअरपोर्टवर गेले, त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे गळाभेट घेतली नाही. यावेळी त्यांच्या हातात मास्क आणि स्टॅनेटायझिंग स्प्रे होता.

स्टॅनले सांगतात, जागतिक साथरोगचा हा त्यांचा पहिला अनुभव नाही. याआधी 2015 साली पूर्व आशियात मर्सची साथ पसरली होती. त्यावेळी मर्सचा उद्रेक आणि त्यामुळे पसरलेली भीती त्यांच्या आजही स्मरणात आहे.

मर्सच्या त्या साथीतून केवळ स्टॅनलेच नाही तर त्यांच्या देशानेही धडा घेतला आणि सार्वजनिक आरोग्याला धोका ठरणारी आणीबाणी उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी 48 सुधारणा केल्या. दक्षिण कोरियाने मर्सच्यावेळी केलेल्या या तयारीचा त्यांना कोव्हिड काळात फायदा झाला. कुठल्याही प्रकारचा देशव्यापी लॉकडाऊन किंवा उद्योग-व्यवसाय बंद न करता दक्षिण कोरियाने कोव्हिडचा आलेख खाली आणला.

जू येऑन अॅटलांटावरून परतल्या होत्या. मायदेशी परतल्यावर त्या दोन आठवडे वडिलांच्या घरी क्वारंटाईन होत्या. त्यांनी कोव्हिड ट्रॅकिंग अॅपही डाऊनलोड केलं. या अॅपमुळे त्या कुठे-कुठे गेल्या याची माहिती सरकारला मिळाली. अॅप डाऊनलोड केल्यानंतर पुढच्या दोन आठवड्यात आरोग्य प्रशासनाकडून त्यांना 6 वेळा चेकअप कॉल्सही आले. त्यांनी क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी केली. त्या घरातून अजिबात बाहेर पडल्या नाही. गार्डनमध्येही गेल्या नाही.

दक्षिण कोरियाचे पंतप्रधान चुंग साय-क्युन म्हणाले होते, "इतिहासाची पुनरावृत्ती होतेय - पुन्हा तेच घडू नये, यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच कठोर प्रतिबंधात्मक उपाय लागू केले."

स्टेप 2 : टेस्ट, ट्रॅक आणि ट्रेस

गेल्या वर्षीचा मार्चचा महिना होता. नॉर्थ-ईस्ट इंग्लंडचे जनरल फिजिशिअन डॉ. डेव्हिड होज बीबीसी पॅनोरामाशी बोलताना म्हणाले होते, "सध्याची परिस्थिती फार आव्हानात्मक आहे. मी जे पेशंट्स तपासतो त्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, याबद्दल मला काहीच माहिती नाही. कदाचित शेकडो जणांना याची लागण झाली असावी आणि आपल्याला त्याची कल्पनाही नाही."

यूकेमध्ये गेल्यावर्षी मार्चच्या शेवटी शेवटी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तोपर्यंत यूके सरकार संपर्क साखळी शोधण्याचं काम करत होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी कम्युनिटी टेस्टिंग म्हणजेच सार्वजनिक चाचण्या थांबवल्या. त्यावेळी यूकेमध्ये केवळ हॉस्पिटल्समध्येच कोव्हिड चाचणीची व्यवस्था होती. सरकारने त्यांचा 'टेस्ट अँड ट्रेस' उपक्रम मे महिन्यात सुरू केला.

याउलट पूर्व आशियातल्या बहुतांश देशांनी ट्रेसिंग म्हणजेच संपर्क साखळी शोधण्याचं काम जानेवारी महिन्यापासूनच सुरू केलं होतं. दक्षिण कोरियामधल्या सेऊलमधलं यांगजीसारखं हॉस्पिटल पूर्णपणे कोव्हिडसाठी राखीव ठेवण्यात आलं. कोव्हिड टेस्टिंगपासून ते कोव्हिड ट्रिटमेंटपर्यंतच्या सर्व सोयी एकाच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होत्या. चाचणीसाठी लोकांना हॉस्पिटलच्या आत जाण्याचीही गरज नव्हती. त्यासाठी विशेष बूथ तयार करण्यात आले होते. या बूथमध्ये हातभर अंतरावरून कुठल्याही प्रकारचा शरीरिक संपर्क येणार नाही, अशा प्रकारे चाचणीसाठी नमुने गोळा केले जायचे. हॉस्पिटलकडून ज्या काही चाचण्या व्हायच्या त्या बूथवर नमुने गोळा करून तिथेच ते नमुने तपासले जायचे आणि अवघ्या चार ते पाच तासात रिपोर्टही मिळायचा. दक्षिण कोरियामध्ये हे सुरू असताना तिकडे यूकेमध्ये कोरोना चाचणीचा रिपोर्ट यायला एक दिवस किंवा त्याहून जास्त वेळ लागत होता.

हॉस्पिटलच्या बाहेर 'ट्रॅक अँड टेस्ट' पथक प्रत्येक संशयितावर लक्ष ठेवून असायच. ही वेगवेगळी पथकं असायची. काही पथकं फॉरेंसिक होती. त्यांच्याकडे संशयितांची सर्व माहिती होती. इतकंच नाही तर संशयितांचे क्रेडिट कार्ड आणि मोबाईल फोन डेटाही ते अॅक्सेस करू शकत होते. ते संपूर्ण जिल्ह्याचं सीसीटीव्ही फुटेज तपासायचे आणि त्यात काही संशयास्पद आढळल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी सगळे रस्ते धुंडाळले जायचे.

इतकंच नाही तर दक्षिण कोरियात ज्यावेळी कोव्हिड-19 आजाराचा एकही रुग्ण नव्हता तेव्हापासूनच पंतप्रधान चुंग साय-क्युन यांनी स्वतः सगळी सूत्र हाती घेतली आणि 'टेस्ट, ट्रॅक आणि ट्रेस'ला प्राध्यान्य देत कृती सुरू केली.

ते म्हणाले, "हे धोरण अंवलंबिल्यामुळेच आपल्याला उत्तम आणि अर्थपूर्ण परिणाम मिळाले."

दक्षिण कोरियाची लोकसंख्या आहे 5 कोटी 20 लाख आणि या देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1,693 जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, चाचणी यंत्रणेत सतत सुधार होत असल्याचं आणि ही यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी शक्य ते सर्व करत असल्याचं यूके सरकारचं म्हणणं आहे.

स्टेप 3 : क्वारंटाईनमध्ये सहाय्य

भारतात केरळमध्ये कम्युनिटी आरोग्य कर्मचारी असलेल्या उषा कुमारी म्हणतात, "आम्ही लोकांना घरात राहा, हे पटवून दिलं आणि त्यामुळेच कोव्हिडच्या प्रसाराला आळा घालता आला."

केरळमध्ये उषासारख्या 30 हजार 'आशा कर्मचारी' आहेत.

उषा यांना जो भाग देण्यात आला, त्या भागात ज्यांना घरात आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या, ते सर्व दिलेल्या नियमांचं पालन करत आहेत की नाही, यावर लक्ष ठेवणं आणि त्यांना गरजेच्या असणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध करून देणं, ही जबाबदारी देण्यात आली होती. उषा स्वतः त्यांच्यासाठी वाण सामान आणायच्या, त्यांची औषधं आणून द्यायच्या.

इतकंच नाही तर केरळमध्ये कोव्हिडच्या अगदी सुरुवातीपासून 'कम्युनिटी किचन' सुरू करण्यात आले. घरी किंवा हॉस्पिटल्समध्ये आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांसाठी या किचनमधून दररोज 600 डबे मोफत पुरवले जायचे. याशिवाय, कोव्हिडमुळे आयसोलेशनमध्ये रहाण्याची वेळ आलेल्या कोरोनाग्रस्तांच्या मानसिक अवस्थेकडेही विशेष लक्ष देण्यात आलं. कोरोनाग्रस्तांसाठी मानसिक आरोग्य सेवाही पुरवण्यात आली.

गरजवंतांना आर्थिक मदतही देण्यात आली. मात्र, यूकेमध्ये घरी आयसोलेशनमध्ये राहणाऱ्यांना 500 युरो देण्याची योजना सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात आली. त्यापूर्वी कोव्हिडच्या 4 महिन्यात ज्यांनी ज्यांनी कोव्हिडमुळे आर्थिक मदतीसाठी अर्ज केले होते त्यापैकी तब्बल दोन तृतिआंश अर्ज फेटाळण्यात आले होते.

यूकेमधल्या सायंटिफिक अॅडव्हाईस ग्रुप फॉर इमरजंसीज रिपोर्टने सप्टेंबरमध्ये एक अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांपैकी 20 टक्क्यांहून कमी लोकांना नियमांचं पूर्णपणे पालन केलं होतं.

या अनुभवानंतर यूके सरकारने आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत मिळण्यासाठीचे निकष अधिक व्यापक केले आहेत.

केरळमध्ये तीन वर्षांपूर्वी निपाह विषाणूची साथ आली होती. तो अनुभव गाठीशी होता, असं केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलेजा सांगतात. त्याच अनुभवाचा कोव्हिड काळात फायदा झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. घरी आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोरोनाग्रस्तांना सर्वतोपरी मदत मिळावी, असा त्यांचा आग्रह होता. यामुळेच कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यात आणि हॉस्पिटलमधली गर्दी टाळण्यात यश आल्याचं शैलेजा यांचं म्हणणं आहे.

केरळची लोकसंख्या साडेतीन कोटी आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात भारतात सर्वाधिक कोरोनाग्रस्त केरळमध्ये होते. तिथून केरळ सरकारने प्रयत्न सुरू केले. परिणामी आज जगात कोरोनाचा सर्वात कमी मृत्यूदर केरळमध्ये आहे.

स्टेप 4 : वृद्धांची काळजी घ्या

गेल्या वर्षी एप्रिलच्या सुरुवातीला जनरल फिजिशिअन लिसा फेडरले यांनी जर्मनीमधल्या टुबिंगन शहरातल्या केअर होम्समध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी चाचण्या करायला सुरुवात केली. केअर होम्स म्हणजे एक प्रकारचे वृद्धाश्रम.

इटली आणि स्पेनमध्ये कोव्हिड-19 चा सर्वाधिक परिणाम ज्येष्ठ नागरिकांवर झाला होता आणि त्यामुळे "सर्वाधिक जोखीम असणाऱ्यांभोवती एक सुरक्षा कवच तयार करायला हवं", असं टुबिंगन शहराचे महापौर बोरिस पालमेर यांना वाटलं.

महापौरांना मिळणारा स्थानिक निधी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी दिला. त्यांनी ज्येष्ठांसाठी टॅक्सी सर्व्हिसमध्ये सवलत दिली, खरेदीसाठी वेळ ठरवून दिली इतकंच नाही तर घरोघरी जाऊन मोफत मास्क वाटप केलं.

या सर्वांचा परिणाम असा झाला की, शहरातल्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये कोव्हिड रुग्णांची गर्दी झाली नाही आणि हॉस्पिटलवर इतर कुठलेही ऑपरेशन्स बंद करण्याची वेळ आली नाही.

यूकेतल्या इतर देशांच्या तुलनेत जर्मनीने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही वेगळे मार्ग अवलंबिले. जर्मनीच्या केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला तिथल्या परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं. संपूर्ण जगाप्रमाणेच युरोपातही कोव्हिड-19 मुळे सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचा झाला. मात्र, जर्मनीने अगदी सुरुवातीपासून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली.

खरंतर संपूर्ण यूकेमधल्या केअर होम्समध्ये अगदी सुरुवातीपासून बाहरेच्या सर्वांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र, तिथे चाचण्या कमी होत असल्याचे आरोप झाले. सुरुवातीचा बराच काळ गेल्यानंतर 15 एप्रिलला यूकेने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून केअर होम्समध्ये आलेल्या सर्वांना कोव्हिड चाचणी बंधनकारक केली. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार जुलैपर्यंत इंग्लंड आणि वेल्समधल्या केअर होम्समध्ये कोव्हिड-19 मुळे जवळपास 20 हजार जणांचा मृत्यू झाला.

संसर्गजन्स रोगतज्ज्ञ प्रा. डेल फिशर म्हणतात, "नर्सिंग होम्स म्हणजेच वृद्धांसाठीच्या हॉस्पिटल्समध्ये सर्वाधिक जोखीम असणारे लोक असतात आणि यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आणि म्हणूनच जगभरात जिथे-जिथे नर्सिंग होम्सकडे विशेष लक्ष पुरवण्यात आलं नाही तिथे-तिथे कोरोनाचा मृत्यूदर जास्त दिसतो."

स्टेप 5 : लसीकरण मोहीम

आज युकेमध्ये अडिच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. यूकेमधली ही आजवरची सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे आणि ही मोहीम यशस्वीरित्या राबवली जातेय.

लसीकरण मोहिमेत यूकेला मिळालेल्या या यशामागचं गमक आहे मोहिमेसाठीचं नियोजन. यूकेच्या आरोग्य आणि सामाजिक सेवा विभागाने देशात एकही कोव्हिड रुग्ण नव्हता तेव्हापासून लसीकरणासाठीची योजना आखायला सुरुवात केली होती. गेल्या उन्हाळ्यातच सरकारने ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनका लसीचे 10 कोटी डोस आणि फायझर-बायोटेक लसीच्या 3 कोटी डोसेसाठी करार केले होते.

मात्र, युरोपात हे नियोजन दिसलं नाही. तिथे लसीकरण मोहिमेसाठीचं नियोजनही उशिरा सुरू झालं आणि प्रत्यक्ष मोहिमेची सुरुवातही धीम्या गतीने झाली. यूकेमध्ये आज 36 टक्क्यांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्या तुलनेत युरोपात खूपच कमी म्हणजे केवळ 6% लसीकरण झालंय. युरोपीय महासंघाने लसीसाठीचे करार केले त्याच्या तीन महिने आधीच यूकेने करार केले होते.

विकसनशील राष्ट्रांमध्ये तर परिस्थिती अधिक बिकट आहे. युरोपातले जवळपास सर्वच देश आणि अमेरिकेत लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे. मात्र, आफ्रिकेतल्या अनेक देशांमध्ये अजूनही लसीकरण सुरू झालेलं नाही.

मायकल कुटा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनमध्ये राहतात. जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोव्हिड-19 लसीसाठीच्या ट्रायल्समध्ये इतर अनेकांप्रमाणे त्यांनीही भाग घेतला. या ट्रायलमध्ये लस मिळाल्याचा त्यांना अत्यानंद आहे. ते म्हणतात, "माझ्या कुटुंबाला माझी गरज आहे. त्यामुळे या जागतिक साथीत लस मिळणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं."

गरिब देशांना कोरोना लस मिळावी यासाठी G-7 देशांची 'Gavi' ही संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेअंतर्गत कोव्हॅक्स कार्यक्रम राबवण्यात येतोय. यूके या संघटनेतला सर्वात मोठा देणगीदार आहे. कोव्हॅक्स कार्यक्रमासाठी यूकेने 5 अब्ज युरोचा निधी दिला आहे. दक्षिण आफ्रिकेनेही या कार्यक्रमावर स्वाक्षरी केली आहे.

असं असलं तरी लसीकरणासंबंधीचं धोरण आखताना त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्रितपणे प्रयत्न होणं गरजेचं आहे. ज्या देशांना मोठ्या प्रमाणावर लस विकत घेणं परवडत नाही, अशा देशांमध्ये विषाणूमध्ये बदल होण्याची म्हणजेच म्युटेशनची शक्यता अधिक असते. अशाप्रकारे म्युटेशन होऊन विषाणूचे नवे व्हॅरिएंट तयार होतात. हे व्हॅरिएंट अधिक वेगाने पसरतात. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलमध्ये कोरोना विषाणूचे वेगाने पसरणारे व्हॅरिएंट आढळून आले आहेत. हेच नवे व्हॅरिएंट मग जगाच्या इतर भागांमध्येही पसरतात. नव्या व्हॅरिएंटवर लस निष्क्रिय ठरू शकते, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटतेय. त्यामुळे लसीला प्रतिकार करू शकणारा व्हॅरिएंट तयार झाल्यास ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं आहे तिथल्या लसीकरण मोहिमेचा काहीच उपयोग होणार नाही.

'मोठी किंमत चुकवली'

आज जागतिक पातळीवर लस वितरणाचं काम सुरू झालं आहे. त्यामुळे कोव्हिड-19 आजाराविरोधातल्या लढ्यात आपल्याला एक महत्त्वाचं यश मिळालं आहे.

प्रा. डेल फिशर म्हणतात गेल्या 12 महिन्यांच्या अनुभवावरून आपण धडा घ्यायला हवा.

ते म्हणतात, "आपल्यावर एक मोठं संकट कोसळलं आणि आपण त्याची मोठी किंमत चुकवली आहे. जेव्हा ही साथ संपेल त्यावेळी आपण सगळं विसरून सामान्य आयुष्य जगायला लागलो तर ती घोडचूक ठरेल. आपण यातून धडा घेतला नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)